डेस्टीनेशन इस्राइल...!!

    04-Jul-2017   
Total Views |


पूर्वेला जॉर्डन आणि सिरिया, पश्चिमेला इजिप्त आणि उत्तरेला छोटासा लेबेनॉन या बरोबरच वेस्ट बँक आणि गाझा पट्टा यांच्या वेढ्यात असलेला, भूमध्य समुद्राच्या पूर्व किनार्‍यावर वसलेला, २२०२७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला मध्यपूर्वेतील एक छोटासा देश, इस्राइल. दक्षिण दिशेला रेड सी म्हणजे लाल समुद्राच्या आकाबाच्या आखातात या देशाला एक छोटेसे प्रवेशद्वार आहे. छोटासा देश असे वर्णन करायचे कारण असे की ज्यू धर्मियांचा हा एकमेव देश, आपले महाराष्ट्र राज्य याच्या पेक्षा साडे तेरा पटीने मोठे आहे आणि नागपुर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचे एकत्रित क्षेत्रफळ इस्राइल देशाएवढे आहे, यावरून नक्की कल्पना येईल याच्या छोट्याशा आकाराची.

जेरूसलम किंवा येरूसलम हे शहर या देशाची राजधानी आहे तर तेल अविव हे शहर याची आर्थिक राजधानी आहे. याच तेल अविव शहरात, जगभरातील देशांचे राजकीय आणि वाणिज्य दूतावास प्रस्थापित आहेत.

जेरूसलम शहरातील “टेंपल माऊंट” हे ज्यू धर्मियांचे “माऊंट मोरया” या नावाने ओळखले जाणारे पवित्र धर्मस्थळ. या बरोबरच ख्रिस्ती धर्म बांधवांचे हे, “माऊंट सियोन” या नावाने प्रख्यात असलेले श्रद्धास्थान. मात्र या ठीकाणाचे अन्य वैशिष्ठ्य असे की मक्का आणि मदिना या दोन पवित्र धर्मस्थळांनंतर, मुस्लिम धर्मियांसाठी “टेम्पल माऊंट” म्हणजेच “हरम अश शरीफ” या नावाने संबोधले जाणारे हे तिसरे महत्वाचे धर्मस्थळ. या संदर्भात काही सविस्तर लिहिणे आवश्यक आहे.

 

इ.स.वी.सन ११८७ मध्ये, तत्कालीन जेरूसलम या राज्यावर इस्लामी राज्यकर्त्यांनी ताबा मिळवला आणि तेंव्हा पासून आजपर्यंत, इस्लाम धर्म विश्वस्त निधी, या “टेंपल माऊंट” चे व्यवस्थापन पहात आलेले आहे. जॉर्डनच्या हाशमी घराण्याच्या राजाने सन १९४८ मधे वेस्ट बँक आणि पूर्व जेरूसलम या प्रदेशावर आक्रमण करून तो आपल्या राज्याला जोडून घेतला. सन १९६७ मधे इस्राइली फौजा आणि जॉर्डनच्या सेनेमधे झालेल्या सहा दिवसांच्या निर्णायक युद्धामध्ये इस्राइल या देशाने या प्रदेशावर नियंत्रण प्रस्थापित केले. मात्र अनेक शतकांपासून हा प्रदेश वादग्रस्त राहिला आहे. एक वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी की, आज जेरूसलम या शहराचा ‘ओल्ड सिटी ऑफ जेरूसलम’ हा विभाग आणि त्याठिकाणी असलेले “टेंपल माऊंट” हे इस्राइलच्या अधिपत्याखाली आहे तरीही, या श्रद्धास्थानाचे व्यवस्थापन आजही ‘जेरूसलम इस्लामिक वक्फ’ या इस्लामिक धार्मिक विश्वस्थ निधीकडेच आहे आणि त्याला इस्राइल सरकारने संमती दिली आहे आणि या व्यवस्थापनाला सहकार्यही केले जाते. आजही या व्यवस्थापनाचा संपूर्ण खर्च, जॉर्डनच्या राजातर्फे केला जातो.                   

 

हा लेख वाचकांसमोर ठेवताना काही खुलासा करणे आवश्यक वाटते. हा लेख लिहिण्याचा विचार प्रथम सुचला त्याचे कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवस होणारा इस्राइल देशाचा नियोजित दौरा. दुसरे कारण, काळाघोडा परिसरात असलेले नेसेट इलीयाहो सिनेगोग हे ज्यू धर्मियांचे देवालय, ज्याच्या प्रेमात मी गेले दहा वर्षे पडलेलो आहे. याची कमानकला, अंतर्गत रचना, रंगसंगती आणि या इमारतीचे आणि स्टर्लिंग सिनेमा समोरच्या ‘फ्रीमेसन हॉल’ या इमारतीबरोबर अनेक गोष्टीत असलेले साम्य आणि साधर्म्य.   

 

फ्रीमेसनरी या जागतिक संघटनेचा २००५ या वर्षी मी सभासद झालो. मुंबईमधे फ्रीमेसनरीचे आगमन १७५८ साली झाले होते आणि त्या निमित्ताने २५० वर्षांच्या इतिहासाची नोंद करणारे कॉफी टेबल बूक २०१३ मधे मी संपादित केले. त्यावेळी ‘फ्रीमेसन हॉल’ या इमारतीची अनेक छायाचित्रे काढली आणि त्यावेळी नेसेट इलीयाहो सिनेगोग सह या दोन इमारतीच्या साम्य स्थळांची कल्पना आली. फ्रीमेसनरीच्या इतिहासाने प्रभावित झालो होतो आणि अर्थातच किंग सॉलोमनच्या देवालयाचा समग्र इतिहास आणि त्याच्या भव्यता आणि निर्मितीच्या नोंदी, आकडेवारी अगदी सुरुवातीच्या वाचनात आला होता.

 

‘मेसन’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. “कमानकलाकार (architect); अभियंता (engineer), सुतार-लोहारकाम करणारे बांधकाम तंत्रज्ञ, खाणीतून काढलेल्या दगडाची आणि संगमरवराची घडाई करणारे आणि नियोजित रचनेनुसार भिंती तसेच आकर्षक आणि मजबूत कमानी बनवणारे गवंडी किंवा कडिया असे सगळे व्यावसायिक या एका ‘मेसन’ या शब्दात सामावलेले आहेत. गेल्या साधारण शंभर वर्षांपर्यन्त, आधुनिक बांधकाम यंत्रांचा उदय झालेला नव्हता. प्राचीन तंत्राने भव्य राजवाडे, देवालये, चर्चेस, मशिदी आणि साकव शतकानुशतके जगभर  निर्माण करणार्‍या बांधकाम व्यावसाईकांना, बाराशे ते चौदाशे वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या फ्रीमेसनरी या संघटनेने एकत्र बांधून ठेवले, त्याची मूळ  प्रेरणा म्हणजे किंग सॉलोमनचे  हे भव्य देवालय.

 

इस्राइल राष्ट्र आणि ज्यू धर्मियांच्या इतिहासात, किंग सॉलोमन याचा ‘धर्मरक्षक आणि जाणता राजा’ असा सन्मानपूर्वक उल्लेख केला जातो. ख्रिस्तपूर्व सन ९७० ते सन ९३० हा किंग सॉलोमनचा राज्यकाल. किंग डेव्हिड आणि रानी बेथेस्दा यांचा हा वारसदार सुपुत्र, वयाच्या विसाव्या वर्षीच याचा राज्याभिषेक झाला आणि याने राज्यकारभार सुरू केला. आपल्या श्रद्धेय देवाच्या कायम वास्तव्यासाठी देवालय बांधावे अशी वडील किंग डेव्हिड यांची सश्रद्ध इच्छा होती, मात्र त्यांना ते काम सुरु कारता आले नव्हते. वडिलांच्या इच्छेचा मान राखून, किंग सॉलोमन याने हे काम सुरू करून, माऊंट मोरीया या जुन्या जेरूसलम शहरातील टेकडीवर हे देवालय साकार केले. ज्यू धर्म इतिहास परंपरेत हे ‘किंग सॉलोमनचे देवालय’  किंवा ‘ फर्स्ट टेंपल’ अशा संबोधनाने ओळखले जाते.

 

किंग सॉलोमनच्या या देवालयाचे, त्याच्या भव्यतेचे आणि बांधकाम तपशीलाचे सविस्तर वर्णन, बायबल या ग्रंथाच्या ऋचामध्ये (१:king ६:७ / १:kings ६:१-३८ समास ७-८) केले आहे. मानवी इतिहासातील उत्कृष्ठ कमान कलेद्वारे (आर्किटेक्चर) निर्मिती झालेले पहिले आणि जगातील बांधकाम इतिहास नोंदीतील सर्वात भव्य असे या देवालयाचे वर्णन केले जाते. शवासन शरीर मुद्रेतील मानवी शरीराच्या आकाराच्या या देवळाचा गाभारा (sanctum sanctorum), शीर्षस्थानी म्हणजे डोक्याच्या जागी होता. ख्रिस्तपूर्व इ.स.वी.सन ९८२ ते ५८६ या चारशे वर्षांच्या काळात, दूरदूरच्या तत्कालीन समाजात हे मंदिर फार लोकप्रिय झाले. इ.स.वी.सन ५८६ मध्ये बॅबिलोनियन लोकांनी केलेल्या आक्रमणांत या देवलयाचा पूर्ण विध्वंस केला गेला. साधारण सत्तर वर्षांनंतर, इ.स.वी.सन ५१६ मध्ये याच जागेवर दुसरे देवालय बांधले गेले. ज्यू धर्मियांच्या हीब्रू लिपीतिल बायबल ‘Book of Ezra’ मधे, याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ख्रिस्तपश्चात पहिल्या शतकात सातव्या दशकात, रोमन लोकांनी जेरूसलम वर आक्रमण केले आणि त्यावेळी या दुसर्‍या देवलयाचा पुनश्च पूर्ण विध्वंस केला गेला.  

 

ख्रिस्तपश्चात सहाव्या शतकाअखेर रोमन साम्राज्याचा अस्तकाळ सुरू झाला. याच काळात मध्यपूर्वेतिल समाजात, मोहमदाच्या इस्लाम धर्माचा प्रचार, प्रसार आणि प्रभाव सुरू झाला होता. इ.स.वी.सन ६२१ मध्ये मोहमद मक्केहून जेरूसलम मध्ये आला आणि एका रात्री  त्या ठीकाणी त्याने केलेल्या प्रार्थनेमुळे त्याला स्वर्गाचे दर्शन झाले आणि इस्लाम धर्माचा प्रसार करण्याचे कार्य पूर्ण व्हावे म्हणून त्याने जेरूसलम शहरात पुनर्जन्म घेतला. त्यावेळी तिथे एकही मशीद नव्हती. १५ वर्षांनंतर या घटनेच्या स्मृतीनिमित्ताने, खलिफा उमर याने एका छोट्या मशिदीची स्थापना केली. इ.स.वी.सन ७०५ मधे ती जुन्या जेरूसलम शहरातील मशीद नव्याने बांधली गेली आणि आज ‘अल अक्सा मशीद’ किंवा ‘दूरची मशीद’  या नावाने ओळखली जाते. इ.स.वी.सन ७५४, ७८० आणि १०३५ या वर्षांमध्ये या मशिदीची वाढ होत राहिली. मोहमद पैगंबराला स्वर्गाचे दर्शन झाले त्या ठिकाणी इ.स.वी.सन ६९२ मधे ‘Dome of the Rock’ या वास्तूची उभारणी करण्यात आली. सोन्याचा घुमट असलेली ही अष्टकोनी वास्तू, इस्लाम धर्मियांचे सर्वात पुरातन श्रद्धास्थान आहे. अकराव्या शतकात, फार थोड्या काळासाठी, या प्रदेशावर ख्रिश्चन धर्मियांचे वर्चस्व होते आणि त्यावेळी इ.स.वी.सन १०९९ पर्यंत अल अक्सा मशिदीचा वापर चर्च म्हणून केला गेला होता.


अनेक शतकांपासून घडत राहिलेल्या या घटनांचा अभ्यास करताना, तत्कालीन समाजातील  राज्यकर्ते, धर्मगुरू आणि धर्मप्रसारक यांचे, आपल्या राज्याचा भौगोलिक विस्तार आणि या बरोबर धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे सातत्याने झालेले प्रयत्न आपल्या लक्षात येतात. प्रत्येक आक्रमकाने आक्रमित समाजाच्या धर्मस्थळांचा विध्वंस करायचा, त्यांच्या संस्कृतीला इजा करायची असे तंत्र जगभरातील आक्रमक समाजाने प्रत्यक्षात वापरलेले दिसते. इस्लाम धर्माचे पुरस्कर्ते अशा प्रयत्नात नेहमीच यशस्वी झाले असा लिखित इतिहास आहे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून इथे एका गोष्टीचे भान ठेवावे लागते. या घटनांच्या नोंदी ठेवणारे तत्कालीन दफ्तरकार हे राज्यकर्त्यांचे सेवक असावेत आणि कित्येक नोंदी राज्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी, त्यांच्या फायद्याच्या अथवा त्यांना धार्जिण्या असू शकतात. वरील लेख लिहिताना, प्रमाणित, प्रामाणिक दस्तऐवजांचा संदर्भ घेण्याचा प्रयत्न केला आहे. याचे गांभीर्य असे की काही दंतकथा सधृश नोंदी, काही शतकांनंतर, प्रत्यक्ष इतिहास म्हणून स्वीकारल्या जातात, असा अनुभव येतो, ज्या परिस्थितीत न्यायालये सुद्धा संभ्रमात रहातात.

 

माझ्या वरील विधांनाला समर्पक, या ‘टेंपल माऊंट’ संदर्भात घडलेल्या घटना पहाणे आवश्यक आहे. अल अक्सा मशिदीत फार कडक सुरक्षा असते आणि फक्त मुस्लिम धर्मियांनाच मशिदीत प्रवेश दिला जातो. इतकी कठोर सुरक्षा असली तरी पश्चिम बाजूला जुन्या मंदिराचा काही भाग शिल्लक आहे त्याला ‘Wailing wall’ म्हटले जाते. इथे ज्यू धर्मबांधव एका विशिष्ठ पद्धतीने प्रार्थना करतात. अलीकडच्या काळात, मशिदीचे वाढीव बांधकाम करताना, बर्‍याच मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले गेले. इस्राइली आणि जागतिक पुरातत्व संशोधकांनी वारंवार विनंती करूनही हे उत्खनन सुरूच राहिले. खणलेल्या मातीचे ढीग उपसल्या नंतर जुईश धर्म आणि संस्कृतीशी जुळणार्‍या अनेक गोष्टींचा शोध लागला. आज ज्यू समाज त्या ठिकाणी तिसरे मंदिर बांधण्याचा विचार करत आहे. मात्र इस्राइलच्या तीन बाजू इस्लामिक राष्ट्रांनी वेढलेल्या आहेत आणि सतत सुरक्षा सीमांवर युद्ध सदृश तणाव परिस्थिती असते, त्यामुळे तिसर्‍या मंदिर उभारणीचा विचार थोडा पुढे ढकलला जातो...!!

 

टेंपल माऊंट आणि अल अक्सा मशिदीसंदर्भात वर वर्णन केलेल्या परिस्थितिचे साधर्म्य आपल्या देशात कुठे आहे ते सुजाण वाचकाला नव्याने सांगण्याची गरज वाटत नाही. असेच प्राचीन देवालय असूनही, पुरातत्व संशोधनानंतर अनेक गोष्टी निखळ आणि नितळ स्वच्छ दिसत असतानाही, असत्याची बाजू मांडणारे अजूनही विरोधात आहेतच. २०१४ सालानंतर फरक इतकाच झालाय की ते फसवे राजकरणी आता सत्तेत राहिलेले नाहीत.

 

माननीय पंतप्रधानांच्या इस्राइल भेटी निमित्ताने या अभ्यासला उजाळा देता आला याचा आनंद वाटतोय...!!    

 

- अरुण फडके

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.