हायड्रेट स्पार्क बॉटल  

Total Views | 43


 

आज अनेक नवनव्या गोष्टी आपल्याला सहज पाहायला मिळतात, मग ते ब्लुटूथ वॉच असो, ब्लुटूथवर चालणारे फिजेट असो किंवा हातावर पट्ट्याच्या स्वरूपात बांधले जाणारे हार्टबिट मोजण्याचे यंत्र असो, हे सर्वांच्याच पसंतीला उतरले आहे. मात्र,जर अशीच आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण मोजणारी ब्लुटूथवर चालणारी बाटली असली तर... होय, हे अगदी खरं आहे. शरीरातील पाण्याचे अचूक प्रमाण आणि शरीराला कधी किती पाणी हवं, याची माहिती ठेवणारी ब्लुटूथ बाटली नुकतीच विकसित करण्यात आली आहे. त्याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.

दररोज वापरणार्‍या वस्तूंमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा तरुण पिढीच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. अशातच नुकताच पिण्याच्या पाण्यासाठीही स्मार्ट बाटली विकसित करण्यात आली आहे. याला ‘हायड्रेट स्पार्क’ नावाने ओळखले जाते. या बाटलीमध्ये ब्लुटूथची सुविधा देण्यात आली आहे. ब्लुटूथच्या माध्यमातून ही बाटली मोबाईलमधील एका अ‍ॅपशी जोडणे शक्य होणार आहे. याच अ‍ॅपच्या माध्यमातून ती बाटली वापरणारी व्यक्ती किती पाणी पिते किंवा त्याला त्याची किती आवश्यकता आहे, याची माहिती साठवून ठेवता येते. ही बाटली तंत्रज्ञानाने युक्त असल्यामुळे नक्कीच ती इतर बाटल्यांपेक्षा वेगळी ठरते.दिवसभरात आपण शरीराला आवश्यक पुरेसे पाणी प्यायलो आहोत का, याची माहिती, याची सूचना ही बाटली अ‍ॅपच्या माध्यमातून संबंधित वापरकर्त्यांपर्यंत पोहोचविणार आहे.

‘हायड्रेट स्पार्क’ या बाटलीमध्ये एक स्टेम बसविण्यात आले आहे. त्याद्वारे त्या बाटलीमध्ये किती पाणी राहिले आहे हे मोजण्यात येते, तसेच बाटलीच्या वरील भागात एक सेंसरदेखील देण्यात आला आहे. त्याद्वारे किती पाणी बाटलीबाहेर गेले याची नोंद ठेवण्यात येते. त्यावरूनच दररोज आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या पाण्यापैकी आपण किती पाणी प्यायलो आहोत हे मोजण्यात येते. तसेच ही बाटली आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण करत असलेल्या हालचालींप्रमाणे दिवसाचा किती पाणी प्यायला हवे याचीदेखील नोंद ठेवते. यासाठी प्रामुख्याने शरीराची रचना, या बाटलीचा वापर करत असलेल्या वापरकर्त्यांचे ठिकाण, तसेच आसपासच्या हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या शरीराला आवश्यक पाण्याची गरज ही बाटली ठरवत असते.

ही सर्व माहिती स्पार्कमध्ये साठवून ठेवण्यात येते, तसेच ती अ‍ॅपमार्फत संबंधित वापरकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात येते.आपल्या हालचालींप्रमाणे दिवसभरातील माहिती आणि पाण्याची गरज ही अ‍ॅपमार्फत पुरवण्यात येते. ही बाटली सहजरित्या इतर बाटल्यांप्रमाणेच वापरता येते. ती वापरणे अगदी सोपे आहे. बाटलीमध्ये पाणी भरल्यानंतर संबंधित वापरकर्त्यांच्या मोबाईलवरील अ‍ॅपवर त्या बाटलीमध्ये किती पाणी आहे, याची माहिती मिळते, तसेच बाटलीच्या तोंडाशी सेंसर असल्यामुळे आपली पाणी पिण्याची वेळ झाल्यास किंवा शरीरातील पाणी कमी झाल्यास खुद्द बाटलीवरच तसा लाईट दिसू लागतो. सध्या ही बाटली अमेरिकेमध्ये उपलब्ध असून ती 47 डॉलर्सना विकत घेता येऊ शकते. मात्र, ती अन्य ठिकाणी कधी उपलब्ध होईल, याची माहिती मिळू शकली नाही.

 

- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121