'क्रिकेट’ हा शब्द कानावर पडताच लगेचच हातात बॅट-बॉल घेतलेले पुरुष क्रिकेटपटू डोळ्यांसमोर येतात, पण आता हळूहळू हे चित्र बदलणार असं वाटू लागलं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट या क्रीडाप्रकारामध्ये महिला क्रिकेटर चर्चेचा विषय ठरू लागल्या आहेत. महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट महिला खेळाडूंचा इंग्लंडकडून पराभव झाला असला तरी या महिला खेळाडूंच्या कामगिरीचे देशभरात कौतुक केले जात आहे. कॅप्टन मिताली राजच्या नेतृत्वाखाली संघाने वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केल्याने प्रत्येक भारतीयांना त्यांचा आज अभिमान वाटत आहे. टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती या क्रीडा प्रकारांतही भारतीय महिला सरस कामगिरी करू लागल्या असून आता त्यात क्रिकेटची भर पडली आहे. महिला खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानावर केलेली कामगिरी तमाम महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार, हे निश्चित.
खरंतर भारतात महिला क्रिकेटची सुरुवात ही १९७३ मध्ये झाली आणि त्याच वेळी भारतीय महिला क्रिकेट संघाची स्थापना झाली. भारतीय महिला संघाने आपला पहिला सामना १९७६ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला होता. २००६ मध्ये आयसीसीने बीसीसीआयला भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनमध्ये सामील करून घेण्याचे निर्देश दिले, परंतु त्याचा लाभ फक्त २५-३० महिला क्रिकेट खेळाडूंनाच मिळाला. क्रिकेटला म्हणावा तसा प्रतिसाद भारतीय मुलींकडून मिळत नाही. महिला क्रिकेटला देशात मिळणार्या उत्तेजन आणि प्रोत्साहनाचा अभाव, सरावासाठी मोकळ्या मैदानांचा अभाव, क्रिकेट साहित्यात झालेली जबर भाववाढ अशा अनेक कारणांमुळे महिला क्रिकेटर्सच्या गुणांना वाव मिळाला नसावा. मुळातच ’क्रिकेट’ हा खेळ केवळ आणि केवळ पुरुषांचाच खेळ आहे, अशी संकल्पना आपल्याकडे रूढ झाली होती. म्हणूनच जवळपास गेल्या कित्येक वर्षांपासून महिला क्रिकेटर प्रकाशात आल्या नाही. पुरुष संघाप्रमाणेच महिलांच्याही जागतिक क्रिकेट स्पर्धा होतात आणि अटीतटीने खेळल्याही जातात. ही बाब खूप कमी जणांना माहीत असेल. पण आता हे चित्र बदलेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. आज क्रिकेटमधल्या मुलींनी मुसंडी मारली आहे. त्यांनी एक सामना गमावला असला तरी जिंकण्यासाठी खेळाडूंनी अखेरच्या क्षणापर्यंत लढण्याची जी जिद्द दाखवली ती कौतुकास्पद आहे.
- सोनाली रासकर