इंदिराजी म्हणजे सासूंचेही चमचे तोंडपुजे होते. पण त्यांच्या भरवशावर इंदिराजींनी कधी राजकारण केले नाही वा डावपेच खेळले नव्हते. त्यांनी पक्षाचे नेते किंवा तथाकथित सल्लागारांपेक्षा सामान्य जनतेच्या भावनांवर स्वार होण्यात धन्यता मानली. कुठल्याही विपरीत प्रसंगी लोकांमध्ये जायचे आणि त्यांची मदत मागायची, हा सासूचा खाक्या होता, तर सूनबाई आपल्या गोतावळ्याच्या बाहेर पडून आपल्या डोळ्यांनी जग बघू शकलेल्या नाहीत. त्यांनी सरकारला चुका करण्याची मोकळीक दिलेली नाही की संसदेबाहेरच्या जनता राजकारणाला प्राधान्य दिलेले नाही. नित्यनेमाने जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उचलून जनतेला थेट जाऊन भिडण्याचा प्रयत्नही केलेला नाही. त्यांचे सुपुत्र जनतेपर्यंत जाण्याचा खेळ नित्यनेमाने करीत असतात. पण ते काय बरळतात, त्याचा सामान्य माणसाला थांगही लागत नाही.
’नेशनल हेराल्ड’ खटल्याच्या बाबतीत खवळलेल्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी एक विधान केले होते. ‘‘आपण इंदिरा गांधींची सून आहोत आणि आपण कोणाला घाबरत नाही.’’ खरेच घाबरण्याची काही गरजही नाही. सत्य ज्याच्या पाठीशी ठामपणे उभे असते, त्याला कोणाला घाबरण्याचे काही कारण नसते. पण सासूची आठवण सोयीची असेल तिथे करूनही भागत नाही. इंदिराजींची सून म्हणून आपणही तितक्याच निर्भय असल्याचा दावा करणार्या सोनियांना, त्याच खटल्यात आपल्या सासूची हिंमत दाखविता आलेली नव्हती. साधे कोर्टाचे समन्स आले, तर त्याला हजेरी लावून खटला लढवता आला असता. पण समन्स रद्द करून घेण्यासाठी सोनियांनी थेट उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यापर्यंत पळापळ केलेली होती. शेवटी तिथे थप्पड खाऊन त्याच समन्सला हजेरी लावण्याची नामुष्की त्यांच्या पदरी आली होती. आज त्याच सूनबाई विरोधकांचे नेतृत्व करीत आहेत आणि १९८० सालात इंदिराजींनी जनता लाट कशी परतून दाखविली, तसा चमत्कार सूनबाई करतील, अशी अनेकांची अपेक्षा आहे. पण सूनबाई कितीही सासूबाईंचा हवाला देत असल्या, तरी त्यांच्यापाशी इंदिराजींच्या इतकी हिंमत वा धूर्तपणा नाही. कारण त्यांना सासूबाईने उपभोगलेली सत्ता व हुकूमत नक्की ठाऊक आहे. पण सासूबाईपाशी असलेला संयम मात्र या सुनेपाशी नाही, अन्यथा १९८० सालात सत्तेची चक्रे इंदिराजींनी कशी फिरवली, त्याचेच अनुकरण सुनेने केले असते. इंदिराजींनी तेव्हा कधीही संसद बंद पाडण्याचा आगाऊपणा केला नाही. त्यांच्या संसदेतील नुसत्या उपस्थितीचाही जनता पक्षीयांना धाक होता. म्हणून पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या इंदिराजींची निवड बहुमताने रद्द करण्यापर्यंत धावपळ जनता पक्षीयांनी केलेली होती. उलट आज सोनिया बिहारमधले महागठबंधन सरकार टिकवण्याची केविलवाणी धावपळ करीत आहेत.
१९७७ सालात कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आणि त्यात इंदिराजींसह त्यांचा सुपुत्र संजय गांधीही बाजूच्या अमेठी मतदारसंघात पराभूत झाला होता. नंतर कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांनाही इंदिराजींच्या नेतृत्व आणि करिष्म्याची शंका येऊ लागली होती. म्हणून त्यांना महत्त्वाच्या पदापासून दूर राखण्याचे डाव पक्षातही सुरू झालेले होते. पण त्याला बिचकून इंदिराजींनी अन्य कुणाची मदत मागितली नाही. आपल्या मूठभर निष्ठावंतांना सोबत घेऊन नव्या पक्षाची उभारणी केली. पुढल्या दोन वर्षांत त्यांनी देशाचे राजकारण आमूलाग्र बदलून दाखविले होते. तो चमत्कार त्यांनी संसदेतील कामकाजाची कोंडी करून घडवला नव्हता की, युक्तीवादाने केला नव्हता. खरे तर इंदिराजी संसदेपासून पूर्णपणे दूर राहिल्या होत्या आणि त्यांनी सरळ जनतेला जाऊन भिडण्याची हिंमत दाखविलेली होती. ज्या जनतेने त्यांना झिडकारलेले होते, त्याच जनतेपर्यंत जाऊन हात जोडून माफी मागण्याचे धाडस इंदिराजींपाशी होते. दुसरी गोष्ट त्यांनी संसदेचे कामकाज बंद पाडण्याचा नकारात्मक कार्यक्रमकेला नाही. त्यापेक्षा जनता सरकारला कुठलाही त्रास होणार नाही, अशी भूमिका घेतलेली होती. लोकांनी जनता सरकारला कौल दिला आहे आणि म्हणूनच हे सरकार पूर्ण पाच वर्षे चालेल, अशी ग्वाही इंदिराजी देत होत्या. साहजिकच जनता पक्षातील नेते बाहेरचा धोका नसल्याने निश्चिंंत झाले होते आणि आपापसातले मतभेद उकरून एकमेकांच्या उरावर बसू लागलेले होते. परिणामी जनता सरकारच्या चुका होऊ लागल्या आणि कारभाराचा पुरता बोजवारा उडून गेला होता. इंदिराजींची तिच अपेक्षा होती. त्या सरकारला अपयशी होऊ दिले, तरच जनता त्यांच्यापासून दुरावेल आणि आपल्याकडे भक्कम सरकारसाठी येईल, अशी त्यांना खात्री होती. झालेही नेमके तसे. अडीच वर्षात जनता पक्षाच्या नेत्यांनी इतका घोळ घातला की, लोकसभाच बरखास्त करण्याची पाळी आली.
इंदिराजी सरकार पाडणार नाहीत, अशी खात्री झालेल्या जनता पक्षातील नेते आपापसात भांडू लागले आणि त्यांच्यात फाटाफूट झाली. तशीच कॉंग्रेस पक्षातही फूट पडलेली होती. अशा दोन फुटलेल्या गटांनी एकत्र येऊन नवे सरकार स्थापन करायचे ठरविले, तर इंदिराजींनी आपल्या गटाचा पाठिंबाही चरण सिंग यांना पंतप्रधान होण्यासाठी दिला. पण काही महिन्यांनी जेव्हा लोकसभेचे अधिवेशन आले, तेव्हापर्यंत इंदिराजी गप्प होत्या. जेव्हा अधिवेशनाचा दिवस आला तेव्हाच त्यांनी आपला हुकूमाचा पत्ता बाहेर काढला. आपण चरण सिंग यांना सरकार बनविण्यासाठी पाठिंबा दिला होता, सरकार चालविण्यासाठी नव्हे, अशी भूमिका जाहीर करून त्यांनी त्या सरकारला राजीनामा देण्यास भाग पाडले. परिणामी, लोकसभेच्या निवडणुका दोन वर्षे आधीच झाल्या. पण अशी स्थिती निर्माण करण्याचे सर्व डावपेच इंदिराजी खेळल्या होत्या. त्यांनी संयम आणि मौन धारण करून जनता पक्षाला मोकाट वागू दिले होते. चुकण्यासाठी सरकार चालवू दिले होते. गोंधळ घालण्याची मोकळीक दिली होती. आजच्या मोदी सरकारला तितकी सुविधा इंदिराजींच्या सुनेने दिली आहे काय? मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्याला चुका करण्याची कुठलीही मोकळीक सोनियांच्या कॉंग्रेसने दिलेली नाही. साहजिकच ज्यामुळे मोदींपासून सामान्य जनता दुरावेल, अशी कुठलीही स्थिती निर्माण होऊ शकलेली नाही. परीक्षेला बसलेल्या पोराला समोर उभे राहून त्याच्या प्रत्येक उत्तरातील चूक शोधून दुरुस्त करायला लावणारा पर्यवेक्षक हजर असेल, तर पोर नापास व्हायचे कसे ? मागल्या तीन वर्षांत मोदी सरकारला सोनियांच्या आक्रमक धोरणाने सतत सावध राखलेले आहे. पण दुसरीकडे इंदिराजी जशा जनतेला जाऊन भिडल्या होत्या, तसे सोनिया वा त्यांचे सुपुत्र काहीही करू शकलेले नाहीत. उलट आजही सत्ता उपभोगताना सवड काढून मोदी सतत जनतेच्या संपर्कात आहेत.
सासू व सुनेतला हा मोठा फरक आहे. इंदिराजी म्हणजे सासूंचेही चमचे तोंडपुजे होते. पण त्यांच्या भरवशावर इंदिराजींनी कधी राजकारण केले नाही वा डावपेच खेळले नव्हते. त्यांनी पक्षाचे नेते किंवा तथाकथित सल्लागारांपेक्षा सामान्य जनतेच्या भावनांवर स्वार होण्यात धन्यता मानली. कुठल्याही विपरीत प्रसंगी लोकांमध्ये जायचे आणि त्यांची मदत मागायची, हा सासूचा खाक्या होता, तर सूनबाई आपल्या गोतावळ्याच्या बाहेर पडून आपल्या डोळ्यांनी जग बघू शकलेल्या नाहीत. त्यांनी सरकारला चुका करण्याची मोकळीक दिलेली नाही की संसदेबाहेरच्या जनता राजकारणाला प्राधान्य दिलेले नाही. नित्यनेमाने जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उचलून जनतेला थेट जाऊन भिडण्याचा प्रयत्नही केलेला नाही. त्यांचे सुपुत्र जनतेपर्यंत जाण्याचा खेळ नित्यनेमाने करीत असतात. पण ते काय बरळतात, त्याचा सामान्य माणसाला थांगही लागत नाही. साहजिकच तोही प्रांत नरेंद्र मोदींसाठी सुनेने मोकळाच ठेवलेला आहे. आपल्या सासूची हुकूमत सोनियांनी बघितली. पण त्यामागचा धूर्तपणा किंवा सूक्ष्मबारकावे कधी जाणले नाहीत. कारण त्यांची सासूबाई इंदिराजी कधीच सून नव्हत्या. त्यांच्या विवाहानंतर त्यांच्या वाट्याला कधी सासूरवास आल्याचे कोणी ऐकले नाही. वढेर्याच्या सासूबाईंना एक ठाऊक नाही की, त्या कधीतरी सुनबाई होत्या. पण त्यांची ‘सास’ कधीच ‘बहू’ नव्हती. तिने आपल्या पित्याच्याही पुण्याईवर जगायचा दळभद्रीपणा केला नाही. राजकारणात आपल्याला मिळालेल्या किरकोळ संधीचा लाभ उठवित भल्याभल्यांना सुरुंग लावून आपल्या भवितव्याची पायाभरणी केली. प्रसंगी आपल्याच मस्तवाल सहकार्यांना नेस्तनाबूत करून हेतू साधण्याचा जुगार खेळण्याची हिंमत त्यांच्यात होती. कारण, इंदिराजी कधी सुनबाई नव्हत्या किंवा सासूबाईही नव्हत्या. त्या निव्वळ राजकीय नेत्या होत्या. म्हणूनच आपल्याहून समर्थ पुरुषांनाही नामोहरम करून विजय संपादन करत गेल्या.
- भाऊ तोरसेकर