मारणार्‍याची जात-धर्म महत्त्वाचा!

    02-Jul-2017   
Total Views | 2
 

 
 
आठवड्यात ‘सोनी’ टीव्ही वाहिनीवरील ‘क्राईमपेट्रोल’ या मालिकेमध्ये एक अजब कथा बघायला मिळाली. त्यात एका महिलेला खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झालेली होती. पाच वर्षे शिक्षा भोगल्यावर तिला पॅरोलवर आठवडाभराची सुट्टी मिळालेली असते. ती गर्भार असतानाही ज्या घरात कामकरीत असते, तिथे म्हातार्‍याची शुश्रूषा करणार्‍या नर्सची हत्या झालेली असते आणि त्याचा आळ आल्यामुळे या महिलेला शिक्षा झालेली असते. त्यातला म्हातारा खोटी साक्ष देतो, म्हणून आपल्याला दोषी ठरविले गेल्याचा राग त्या महिलेच्या मनात असतो. सहाजिकच सुट्टी मिळताच ती म्हातार्‍याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारते आणि शिव्याशाप देते. त्या महिलेच्या मुलाचा जन्मही तुरुंगात होतो आणि त्याच्या नशिबी अकारण तुरुंंगवास आलेला असतो. ही महिला म्हातार्‍याला धमक्या देते, त्याच्या दुसर्‍याच दिवशी त्याची हत्या होते आणि हिच्यावर दुसर्‍या खुनाचा आळ येतो. पण या खेपेस तपास अधिकारी चौकस असतो आणि तो गुन्ह्याच्या मुळाशी जातो. आधीच्या खुनाचाही शोध घेत गेल्यावर महिला निर्दोष असल्याचे निष्पन्न होते. मुद्दा इतकाच की, एका महिलेला अकारण शिक्षा कशाला व्हावी? तर अपुरी माहिती समोर आणलेली असते आणि काही साक्षी-पुरावेही सरमिसळ केलेले असतात. परिणामी न्यायाच्या नावावर अन्याय झालेला असतो. आपल्या नित्यजीवनात अपुरी माहिती कशी गडबड करू शकते, त्याचे हे भयंकर उदाहरण आहे. प्रत्येक वेळी इतके भयंकर परिणामहोतातच असे नाही. पण तपासातही इतक्या सहजपणे अपुरी माहिती वा साक्षी दगाबाजी करीत असतील, तर नित्याच्या व्यवहारात किती गफलती होऊन जातात, त्याचा अंदाजही अंगावर शहारे आणणारा आहे. सध्या वल्लभगड हरियाणातील एका हत्याकांडाचा खूप गाजावाजा होत असताना ती सत्यकथा आठवली.

नुकताच मुस्लिमांचा रमझान ईद व महिना संपला, या महिन्यात मुस्लीमरोज उपास करतात आणि अखेरीस सण साजरा करतात. त्याच सणाच्या कालखंडात दोन हत्याकांडे घडलेली आहेत. एक हरियाणाच्या वल्लभगड येथील रेल्वे गाडीत जमावाने जुनैद नावाच्या मुस्लीममुलाची भोसकून हत्या केली. त्याच्या सोबतचेही काहीजण जबर जखमी झाले. योगायोगाने त्याच दिवशी काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगर शहरातील जुम्मा मशिदीतही त्यापेक्षाही भयंकर घटना घडली. तिथे सुरक्षेसाठी तैनात केलेल्या महंमद अयुब पंडित नामक एका पोलीस अधिकार्‍याची मोठ्या जमावाने दगडांनी ठेचून हत्या केली. त्याचे कपडे फेडून त्याला विवस्त्र केले. नंतर त्याचा मृतदेह फरफटत नेऊन शक्य तितकी त्याची विटंबना केली. पण त्याविषयी आपल्या देशातल्या माणुसकीच्या कुणा मक्तेदारांना दोन शब्द बोलण्याची गरज वाटली नाही. पण त्यातला प्रत्येकजण वल्लभगडच्या जुनैदच्या हत्येने कळवळून गेला आहे. बिचारा जुनैद कोवळा पोर होता. त्याचा काय गुन्हा होता? अशीच हत्याकांडे केवळ मुस्लीमअसल्याने देशाच्या कानाकोपर्‍यात चालू आहेत, असा आक्रोश सुरू झाला आहे. अर्थात मृताविषयी अनुकंपा असणे मानवी भावनांचे प्रतीक आहे. त्यामुळेच जुनैदविषयी कोणाच्या डोळ्यात अश्रू ओघळले, तर चुकीचे मानायचे काही कारण नाही. ते जुनैद निरपराध असून बळी पडला म्हणून असले तर गोष्ट वेगळी. त्याऐवजी जुनैद कुणाकडून मारला गेला, त्या कळपाच्या वा जात-धर्माच्या नावाची तपासणी करून कोणी अश्रू ढाळत असेल, तर त्याला ‘माणुसकी’ म्हणता येणार नाही. त्याला ‘जातीयवाद’ किंवा ‘धार्मिक भेदभाव’च म्हणावा लागेल. आजकाल अशा भेदभावालाच ‘अनुकंपा’ म्हटले जाऊ लागले. त्यात मेलेल्याविषयी काडीमात्र सहानुभूती नसते, तर त्याच्या धर्म व मृत्यूला आपल्या राजकीय हेतूला पुढे सारण्यासाठी गलिच्छ वापर होत असतो.

आताही एक गोष्ट नजरेत भरणारी आहे. जुनैद असो किंवा महंमद अयुब असो, दोघेही मारले गेलेले तरुण मुस्लीमच आहेत. मुस्लिमांचे जीवन असुरक्षित झाले, म्हणून टाहो फोडणार्‍यांपैकी कोणाला अयुबविषयी किंचितही आस्था, आपुलकी दाखविता आलेली नाही. तुम्ही तसा प्रतिप्रश्न केलात, मग अयुबविषयीही आम्हाला दु:ख असल्याची पुस्ती जोडली जाते. पण दोन्ही हत्या एकाच वेळी झाल्या व तितकीच प्रसिद्धी दोन्ही हत्याकांडांना मिळाली असताना, अशा माणुसकीच्या मक्तेदारांच्या प्रतिक्रिया किती पक्षपाती आहेत बघा. जे कोणी निरपेक्ष पत्रकार आहेत, त्यांनी दोन्ही बातम्यांना तितकीच प्रसिद्धी दिली आहे आणि दोन्ही हत्यांचा समान निषेध केला आहे. पण काही पत्रकार व माणुसकीचे तमाममक्तेदार केवळ जुनैदसाठीच उर बडवत बसलेले आहेत, तर त्यांनी असा पक्षपात कशाला करावा, असा प्रश्न पडतो. तेव्हा त्यामागचे खरे कारण लक्षात येते. त्यांना जुनैद मेला की, अयुब मारला गेला, याच्याही काहीही कर्तव्य नसते. त्यात कोणी मुस्लीमआहे, म्हणूनही काडीची ममता नसते. त्यांना कर्तव्य असते, मारणार्‍यांविषयी! मारणारा जमाव कुठल्या कळपातला होता? कुठल्या जातीचा होता? किंवा मारेकर्‍यांचा धर्म कोणता होता? त्यानुसार माणुसकीचे मक्तेदार प्रतिक्रिया देत असतात. म्हणूनच त्यापैकी कोणी अयुबविषयी अनुकंपा दाखविली नाही, तर जुनैदविषयी आक्रोश केलेला आहे. कारण मरणारे मुस्लीमच असले तरी त्यांना मारणार्‍या जमावाच्या जाती-धर्मात मोठा फरक आहे. अयुबला मारणारा जमाव मुस्लिमांचा होता. त्यामुळे अयुबच्या मरण्याला काडीमात्र किंमत नसते किंवा त्याला माणुसकीच्या दृष्टीने काहीही महत्त्व नसते. पण जुनैदची गोष्टच वेगळी आहे. तो मुस्लीमआहे आणि हिंदू जमावाकडून त्याची हत्या झालेली आहे. थोडक्यात, अनुकंपा मारेकर्‍यांच्या धर्माशी निगडित राखता आली, तरच तुम्ही मानवतावादी असू शकता.

अर्थात त्यात नवे काहीच नाही. दीर्घकाळ आपल्या देशात गाझा पट्टीतील मुस्लिमांची इस्रायलकडून हत्या झाल्याच्या बातम्या रंगलेल्या आहेत. मुस्लिमांची कत्तल म्हणून आक्रोश होत राहिला आहे. पण त्याच मध्यपूर्वेत इराकचा हुकूमशहा सद्दामहुसेन याने शिया मुस्लिमांची सरसकट कत्तल केली, म्हणून इथे कोणी अश्रू ढाळलेले नव्हते. कारण सद्दाममुस्लीमआणि मरणारे शियाही मुस्लीमहोते. पण गाझा वा पॅलेस्टाईनमध्ये मुस्लिमांना मारणार्‍यांचा धर्म ज्यू असल्याने माणुसकीचा विषय झालेला होता. पण बगदादीच्या ‘इसिस’ने मारलेल्या बिगर मुस्लिमांची कोणाला फिकीर नसते. अगदी त्याच्याकडूनच मारल्या जाणार्‍या मुस्लिमांनाही माणूस म्हणून काही किंमत नसते. हा मोठा फरक पुरोगामी माणुसकीमध्ये असतो. त्यात मरणार्‍या व मारणार्‍यांच्या धर्मजातीच्या निकषावर भावना उचंबळून येत असतात किंवा थंडगार पडत असतात. विषय माणसाचा नसतो की, मानवतेचा नसतो, तर मारणार्‍यांच्या धर्मजातीचा असतो. आपल्याला ज्या धर्म जाती वा कळपाविषयी तिरस्कार आहे, त्यानुसार असे माणुसकीचे मक्तेदार प्रतिक्रिया देत असतात. त्यात कोण कसा मेला वा मारला गेला, याला काहीही महत्त्व नसते. त्यातील हिंसेलाही अर्थ नसतो. सगळा निकष आपल्या मनातला तिरस्कार व समोरच्याही जात-धर्म इतकाच असतो. तसे नसते तर अयुब असो किंवा जुनैद असो, सारख्याच प्रतिक्रिया आल्या असत्या आणि एकाचवेळी आल्या असत्या. कारण दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या आहेत आणि जशाच्या तशा घडलेल्या आहेत. पण त्यावरच्या प्रतिक्रिया मात्र, टोकाच्या भिन्न आहेत. विवेकाची कास सोडली, मग यापेक्षा काहीही वेगळे होत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी असते की, ज्यांना हा विवेक जपता आलेला नाही, तेच तुमच्या-आमच्या विवेकाला आवाहन केल्याची भाषा नित्यनेमाने बोलत असतात.
 
- भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121