संपूर्ण देश ज्याची वाट बघत होता ते वस्तु आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी काल मध्यरात्री पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आले. संपूर्ण देशाने याचे स्वागत केले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यासाठी काल मध्यरात्री संसद भवनात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि इतर सर्व नेते उपस्थित होते. मात्र केवळ राजकीय नेत्यांनीच नाही तर भारतातील सामान्य नागरिकांनी देखील जीएसटीचे स्वागत केले आहे. तसेच जीएसटी विधेयक साजरे करण्यासाठी अनेक नवीन गोष्टी देखील केल्या आहेत. पुण्यातील वर्ल्ड ऑफ व्हेज या रेस्टोरेंटचे सर्वेसर्वा प्रल्हाद राठी यांनी देखील आपल्या रेस्टोरेंटमध्ये जीएसटी विधेयक साजरे केले आहे.
"जीएसटी विधेयक लागू करण्यात आले ही संपूर्ण देशासाठी एक अत्यंत गौरवाची बाब आहे. या गोष्टीचा आम्हाला आनंद झाला आहे, आणि तोच आनंद साजरा करण्यासाठी आम्ही आमच्या रेस्टोरेंटमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांना त्यांच्या ऑर्डर सह एक प्लेट गुलाबजाम आज उद्या आणि परवा असे तीन दिवस देणार आहोत. जीएसटी साजरा करण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे आणि याची कल्पना संपूर्ण कर्मचारी वर्गाला देण्यात आला आहे." अशी माहिती प्रल्हाद राठी यांनी दिली.
ऐतिहासिक क्षण साजरा करायलाच हवा..
"जीएसटी विधेयक लागू करण्याचे प्रयत्न गेल्या १६ वर्षांपासून सुरु होते. काल अखेर भारताच्या इतिहासात तो सुवर्ण क्षण आला. आणि भारतात जीएसटी विधेयक लागू करण्यात आले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये काल सर्व महत्वाच्या लोकांच्या उपस्थितीत भारतात जीएसटी विधेयक लागू करण्यात आले. २९ राज्यांनी एकत्र येवून पहिल्यांदा एकमताने विधेयक पारित केले. आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदा अशी आर्थिक क्रांती घडली आहे. आज लोकांना याचे परिणाम कदाचित दिसणार नाही, मात्र नजिकच्या भविष्यात या ऐतिहासिक निर्णयाचे परिणाम जगाला दिसून येतील." अशा भावना राठी यांनी व्यक्त केल्या.
"यूरोपने देखील यूरो लागू करून असाच एक मोठा निर्णय घेतला होता, आता आपण देखील हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे एक देश एक करप्रणाली होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देश एकत्रित आला आहे. जगाच्या पाठीवर २९ राज्यांनी एकत्र येवून एखादा महत्वाचा निर्णय घेणे हे कदाचित पहिल्यांदाच घडले असणार. कारण कुठल्याही राजकीय व्यवस्थेत असे होणे खूप अवघड आहे. त्यामुळे आपण हा क्षण साजरा केला पाहीजे." असेही ते यावेळी म्हणाले.
तसेच देशाच्या इतक्या महत्वाच्या निर्णयात जनतेने देशाला साथ द्यावी. केवळ स्वत: पुरता विचार न करत या देशाच्या भवितव्याचा विचार करावा. अनेक लोक तुम्हाला सांगतील की जीएसटीमुळे काय काय किती महाग झाले, मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा होणार आहे. आता कुणीच करचुकवेगिरी करु शकणार नाही. त्यामुळे हा निर्णय आपल्या हितासाठीच आहे हे लक्षात घेवून एक सामान्य नागरिक म्हणून या निर्णयात आपण सहभागी झाले पाहीजे. अशा भावना राठी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
- निहारिका पोळ