सर्वज्ञः स हि माधवः।- उत्तरार्ध

    05-Jun-2017   
Total Views | 7
 

 
 
या राष्ट्रासमोरील समस्यांच्या संदर्भात गुरुजींची भूमिका किती क्रांतदर्शी होती व मार्गदर्शन किती अचूक होते, याची अनेक उदाहरणे देता येतील. 15 ऑगस्ट, 1947 रोजी देशाची फाळणी होऊन भारताला खंडित स्वातंत्र्य मिळाले. फाळणीची घोषणा व दोन्ही देशांना प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळातील घटना अंगावर काटे आणणार्‍या आहेत. पाकिस्तानातील अनेक प्रांतात वर्षानुवर्षे राहणार्‍या लक्षावधी हिंदूंची अक्षरशः ससेहोलपट झाली. घरदार, जमीनजुमला, व्यवसाय, सर्व सोडून लाखोंच्या संख्येने हिंदूंना भारतात यावे लागले. त्यावेळी त्या त्या प्रदेशात राहणार्‍या मुस्लिमांनी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. सर्वत्र आगडोंब उसळलेल्या पंजाब व सिंध प्रांतात गुरुजींनी धैर्याने असंख्य सभा घेतल्या व हिंदूंना अभय दिले. लाहोर, कराची व हैदराबाद (सिंध) येथील त्यांच्या सभांना हिंदूंचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. संघाच्या हजारो स्वयंसेवकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे लक्षावधी हिंदूंचे सुखरूप स्थलांतर होऊ शकले. या काळात गुरुजींच्या धीरोदात्त व संयमी वृत्तीचे जे दर्शन घडले, त्यामुळे हिंदू समाजाचे तारणहार अशी त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगोलग दिल्ली येथे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ उडवून देण्याचा जो कट मुसलमानांनी रचला होता तो संघ स्वयंसेवकांच्या जागरूकतेमुळे उधळून लावला गेला. काश्मीर संस्थानच्या भारतातील विलीनीकरणाबाबत श्रीगुरुजींची भूमिका 

महत्त्वाची होती. या विषयासंदर्भात म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल व राजा हरिसिंग यांच्या भेटी घेऊन गुरुजींनी या विलीनीकरण प्रक्रियेला सर्वतोपरी साहय्य दिले.

मात्र, म. गांधींच्या हत्येनंतर देशाचे चित्र वेगाने पालटले. यासंदर्भात सूडबुद्धीने श्रीगुरुजींना आरोपीच्या पिंजर्‍यात नाहक उभे करण्यात आले. गुरुजींच्या अटकेनंतर लगोलग संघावर शासनाने बंदी घातली. गुरुजींनी ताबडतोब संघ विसर्जित केल्याची घोषणा केली 1 फेब्रुवारी, 1948 ते 13 जुलै, 1949 या काळात गुरुजींना देशाच्या विविध कारागृहांत ठेवण्यात आले. या काळात त्यांनी संघावर लादलेली अन्यायकारक बंदी उठवावी म्हणून पं. नेहरू व सरदार पटेलांना स्पष्ट परंतु संयत भाषेत पत्रे लिहिली. सरदार पटेलांची तर त्यांनी प्रत्यक्ष भेटही घेतली. सर्व चर्चा व वाटाघाटी निष्फळ ठरल्यानंतर गुरुजींनी देशभरातील स्वयंसेवकांना शांततापूर्ण सत्याग्रह करण्याचे आवाहन केले. शासनाने सूडबुद्धीने संघावर लादलेला बंदीहुकूम मोडून शांतपणे शाखा लावायची व विरोध झाल्यास स्वतःला अटक करून घ्यायची, असा तो शांततापूर्ण सत्याग्रह होता. जवळजवळ 80 ते 90 हजार स्वयंसेवकांनी देशभर सत्याग्रह करून कारावास स्वीकारला. देशातील तुरुंग ओसंडून वाहू लागले. जगातील कोणत्याही आंदोलनात इतक्या शांततामय मार्गाने व इतक्या मोठ्या संख्येने सत्याग्रह झालेला नव्हता. गांधीजींनी विकसित केलेले सत्याग्रह तंत्र गुरुजींनी अत्यंत प्रभावीपणे व यशस्वीरित्या राबविले. खंत याचीच वाटते की, जे तंत्र परकीयांच्या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी वापरले ते गुरुजींना नाइलाजाने स्वकीय राज्यकर्त्यांविरुद्ध वापरावे लागले. म्हणूनच या सत्याग्रहात कोठेही औषधालाही हिंसाचार झाला नाही. हे पर्व कमालीच्या शांततेत व शिस्तीत पार पडले. हजारो स्वयंसेवकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून व नोकरीधंद्यावर पाणी सोडून सत्याग्रहात उड्या घेतल्या आणि कारावास भोगला. त्या सर्वांची प्रेरणा श्रीगुरुजींचे उदात्त व धैर्यशाली व्यक्तिमत्त्व होते. सत्याग्रहाच्या देशव्यापी प्रचंड रेट्यापुढे शासनाला नमावे लागले व संघावरील बंदी उठविण्यात आली. पुढे श्रीगुरुजींना व संघाला गांधीवधाच्या कटात जे अश्लाघ्य पद्धतीने गुंतविण्यात आले, त्यातून  सर्वोच्च न्यायालयाने त्यांची बिनशर्त व  निर्दोष मुक्तता केली.गांधीजींच्याच सत्याग्रह तंत्राने संघावरील अन्यायकारक बंदी विरुद्धची लढाई गुरुजींच्या नेतृत्वाखाली संघाने जिंकली यालाच दैवदुर्विलास  म्हणावे लागेल. देशविभाजनाच्या वेळी हिंसेचा उडालेला आगडोंब, फाळणीच्या तीव्र वेदना व पुढे 1948 साली गांधीहत्येनंतर आलेली संघबंदी हे सर्व हलाहल गुरुजींनी स्थितप्रज्ञ वृत्तीने पचविले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात देशासमोर उभ्या राहिलेल्या अनेक समस्यांच्या संदर्भात गुरुजींनी जे जे  मार्गदर्शन वेळोवेळी केले, जे इशारे दिले त्याचे  महत्त्व पुढे काळानेच सिद्ध केले. भाषावार प्रांतरचनेमुळे देशांत प्रांतवादाचे प्राबल्य  माजेल व देशाच्या एकतेला पुढे-मागे धोका उत्पन्न होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. भौगोलिक सलगतेचा निकष लावून प्रशासनाला सोयीस्कर होतील, अशी लहान-लहान राज्ये करावीत, अशी त्यांची भूमिका होती. आज गोवा, पाँडिचेरी किंवा पूर्वांचलातील सात राज्यांसारखी छोटी राज्ये एकीकडे व उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहारसारखी अवाढव्य राज्ये एकीकडे असा असमतोल निर्माण झालेला दिसतो. पुढे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या एक भाषिक राज्यांचे विभाजन करून एका परीने आपली चूक केंद्रातील सत्ताधार्‍यांनी मान्य केली, हेच सिद्ध होते. प्रांतांच्या सीमा, धरणे, पाणीवाटप यांचे आंतरराज्यीय तंटे ही देशासमोरील डोकेदुखी आज आपण अनुभवत आहोत. हिंदीभाषी पट्ट्यातील राज्यांसाठी द्विभाषा सूत्र व बिगर हिंदी भाषी पट्ट्यातील राज्यांना त्रिभाषा सूत्र या केंद्राच्या अन्यायकारक धोरणामुळे दक्षिणेकडील राज्यांत जी हिंदीविरोधी आंदोलने झाली, त्यासंदर्भात गुरुजींनी दिलेले इशारे आजही उद्बोधक ठरतात. 1954 साली चीनचे पंतप्रधान चौ एन लाय यांच्या भारतभेटीच्या वेळी नेहरूंच्या स्वप्नाळू परराष्ट्र नीतीमुळे ‘हिंदी चिनी भाई भाई’चे नारे देशभर उमटत होते. त्यावेळी चीनने तिबेट ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न चालविला होता, त्या त्याच्या विस्तारवादी धोरणाची भयसूचक घंटा गुरुजींनी वाजविली होती. भारत आणि चीन यांच्या सीमांमध्ये असलेला तिबेट स्वतंत्र व सार्वभौम असणे हे भारताच्या सीमा सुरक्षित असण्याच्या दृष्टीने आवश्यक होते, असा इशारा गुरुजींनी दिला होता. पुढे चीनने तिबेट तर गिळंकृत केलाच, पण 1962 साली नेफाच्या (आताचे पूर्वांचल) बाजूने भारतावर आक्रमण केले व मॅकमोहन रेषा ओलांडून भारताचा सुमारे 40 हजार  कि. मी. भूभाग घशात घातला. आजही चिनी आक्रमणाचा धोका संपलेला नाही. आश्चर्य म्हणजे, या दोन्हींसंदर्भात श्रीगुरुजींनी पं. नेहरूंना व तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांना पत्रे लिहून जागे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या पत्रांची दखल घेणे सोडाच, त्यांची टर उडविण्यात आली. कोणाची भूमिका बरोबर होती, हे पुढे काळानेच सिद्ध केले.
1965च्या पाकिस्तानी  आक्रमणाचे वेळी सैन्याने रणांगणावर जे कमावले ते भारताने रशियाच्या  दबावामुळे ताश्कंद कराराने गमावले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा संशयास्पद स्थितीत झालेला मृत्यू ही भारताने त्यासाठी मोजलेली किंमत होती. 1971च्या भारत-पाक युद्धानंतर बांगलादेश स्वतंत्र झाला व सुमारे 90 हजार पाक सैनिक भारतात शरणार्थी म्हणून राहिले. वस्तुतः त्यावेळी पाकव्याप्त काश्मीरमुक्त करण्याच्या अटीवर या सैनिकांना सोडावे, असा सल्ला गुरुजींनी इंदिराजींना परोपरीने दिला होता. पण विजयाच्या क्षणीही केंद्र सरकारने कच खाल्ली. पकडलेले सैन्य भारताने सोडून दिले आणि काश्मीरचा प्रश्न लोंबकळत राहिला. आज 40 वर्षांनंतर तर त्या प्रश्नाने किती उग्ररूप धारण केले आहे व पाकिस्तानची  मुजोरी किती वाढली आहे, याचा अनुभव आपण दररोज घेत आहोत. पुन्हा एकदा रणभूमीवर जे यश जवानांनी आपले रक्त सांडून मिळविले ते राज्यकर्त्यांनी वाटाघाटीच्या टेबलावर (शिमला करार)  गमावले. राज्यकर्ते त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करीत राहिले, याचे गुरुजींना दुःख होते. वेळीच धैर्य व दूरदर्शीपणा दाखविला नाही, तर  देशासमोरील समस्या किती गुंतागुंतीच्या होतात याचे काश्मीरचा प्रश्न हे एक ज्वलंत उदाहरण आहे. वरील सर्व प्रसंगात श्रीगुरुजींनी देशाला केलेले  मार्गदर्शन हे राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे व त्यांचे दूरदर्शित्व अधोरेखित करणारे होते.
 
सामाजिक विषमता नष्ट होऊन सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा आणि निकोप 

समाजधारणा व्हावी, म्हणून गुरुजींनी दिलेल्या योगदानाचा आता थोडक्यात आढावा घेऊया. जन्माधिष्ठित जातिव्यवस्था, त्यातून उत्पन्न होणारी उच्चनीचतेची भावना व  सामाजिक विषमता हे हिंदू समाजातील विघटनकारी दोष आहेत. शेकडो वर्षे काही जातींना अस्पृश्य ठरवून गावकुसाबाहेर ठेवणे, त्यांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवून गुलामसदृश जीवन जगायला भाग पाडणे, ही हिंदू समाजातील भयानक विकृती आहे. तो माणुसकीला काळिमा फासणारा कलंक आहे. या सर्व आघाड्यांवर लढून सामाजिक न्याय प्रस्थापित केल्याशिवाय एकसंध, एकरस व संघटित समाज निर्माण होणे अशक्य आहे. अस्पृश्यता ही सवर्णांच्या मनातील विकृती आहे; त्यामुळे त्यांच्यात मानसिक परिवर्तन झाल्याशिवाय व त्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारात अमूलाग्र बदल झाल्याशिवाय समाज परिवर्तन शक्य नाही, ही संघ संस्थापकांपासून सर्वच संघनेतृत्वाची स्पष्ट भूमिका राहिली आहे. जातपात, उच्चनीचता, अस्पृश्यता यांच्या पलीकडे जाणार्‍या व्यापक हिंदुत्वाच्या भावाचे जागरण व हिंदू ही प्रत्येक व्यक्तीची ओळख (खवशपींळीूं) प्रस्थापित होणे हाच त्यासाठी मार्ग आहे, याची त्यांना जाणीव होती. संघस्थानाच्या प्रयोगशाळेत हिंदुत्वाचे भावजागरण होऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. व्यापक समाजजीवनात ते सिद्ध व्हावे, ही संघाची धडपड आहे.

आपला  समाज राज्यघटना प्रधान  नसून धर्मप्रधान  आहे. याचा अर्थ राज्यघटना वा कायदा यापेक्षा धर्म व नीतीचा, रुढी व परंपरांचा पगडा समाजमानसावर अधिक आहे. हे ओळखून श्रीगुरुजींनी देशातील सर्व शंकराचार्यांना व मठ मंदिरातील धर्माचार्यांना, संत-महंतांना एकत्र केले. त्यांनी मठ मंदिराबाहेर पडून व जनसामान्यांत मिसळून खर्‍याअर्थाने जगद्गुरू व्हावे, असे आवाहन केले. चर्च आणि शिक्षणसंस्था, चर्च आणि आरोग्य केंद्रे हातात हात घालून समाजसेवेचे काम करतात, तर मग मठ-मंदिरांनी समाजसेवेची केंद्रे का होऊ नये, समाजातील श्रद्धाभावनेचा सदुपयोग समाजधारणेसाठी, सामाजिक समतेच्या व न्यायाच्या प्रस्थापनेसाठी का करू नये, असे प्रश्न गुरुजी त्यांच्यासमोर उपस्थित करीत. याचेच पुढचे पाऊल म्हणजे त्यांनी 1964 साली देशातील शंकराचार्यांच्या, संत-महंतांच्या, धर्माचार्यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली. 
समाजजीवन पोखरून टाकणार्‍या त्रिदोषांना असणारा कथित धर्माधार नाहीसा केल्याशिवाय हिंदू समाज खर्‍याअर्थाने संघटित होऊ शकणार नाही, हे गुरुजींनी या धर्माचार्यांच्या मनावर बिंबविण्याचा अथक प्रयत्न केला. या समस्येचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. सामाजिक एकात्मतेसमोरील (डेलळरश्र ळपींशसीरींळेप) धोके अधोरेखित केले. हे सर्व करताना गुरुजींनी व्यक्तिगत मानापमान बाजूला ठेवले आणि सर्वांची या विषयावर सहमती व्हावी, म्हणून धडपड केली. शेवटी गुरुजींच्या प्रयत्नांना यश आले. 1969 साली उडुपी येथे आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या संमेलनात

देशातील सर्व धर्माचार्यांच्या उपस्थितीत भारताच्या-पर्यायाने हिंदूंच्या समाजव्यवस्थेला दिशा देणारा, युगाला कलाटणी देणारा ऐतिहासिक ठराव 
एकमताने संमत करून घेतला. जातिव्यवस्था, जन्माधिष्ठित उच्चनीचता व अस्पृश्यता यांना असणारा कथित धर्माधार सुस्पष्ट शब्दांत नाकारून ‘न हिंदू पतितो भवेत्। हिंदवःसोदरा सर्वे।’ अशी एकमुखी घोषणा त्यांच्याकडून करवून घेण्यात गुरुजींनी यश मिळविले. हा प्रस्ताव संमत झाला तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. हा प्रस्ताव संमत होणे म्हणजे सामाजिक समरसतेचा मार्ग प्रशस्त होणे. हा क्षण गुरुजींच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा होता. हिंदू समाजाच्या ऐक्याआड येणारा एक भावनिक अडसर दूर झाला होता. सारांश, जे जे हिंदू समाज व हिंदूराष्ट्राच्या हिताचे होते ते ते गुरुजींनी निर्भीडपणे  समाजाला सांगितले व तद्नुसार व्यवहार केला. त्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली संघ व संघ परिवार यांच्या माध्यमातून जीवनाच्या विविध क्षेत्रात व्यापक जनसंघटन उभे राहिले, सज्जनशक्ती संघटित झाली. सक्रिय झाली. सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी व्यापक जनशक्ती उभी राहिली. एकदा गुरुजी म्हणाले होते की, “धशी, ुश ुरपीं ीें लेर्र्पिींशी रश्रश्र ुरश्रज्ञी ेष श्रळषश.” “होय, संघमंत्राचा प्रभाव आम्हाला जीवनाच्या सर्व क्षेत्रावर उमटवायचा आहे!” त्यांचा विश्वास अनाठायी नव्हता. संघमंत्र व शाखातंत्र यांची विराट शक्ती गुरुजींनी आपल्या कार्यकाळातच सिद्ध केली. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ते मातृभूमीच्या व तिच्या पुत्ररुप हिंदू समाजाच्या सेवेत व चिंतनात रममाण झाले. श्रीगुरुजींचे हे संपूर्ण चिंतन ‘समग्र श्रीगुरुजी’ या 12 खंडात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथमालेत व ‘विचारधन’ या पुस्तकात उपलब्ध आहे. आज आपल्याला भेडसावत असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व समस्या; हिंदुत्व, हिंदू धर्म, हिंदू समाज व हिंदू संस्कृती यांच्यासमोरील प्रश्न; संघमंत्र व शाखातंत्र यांच्या विकासातील अडथळे, राष्ट्र उभारणीसाठी कार्यकर्ता विकास या प्रक्रियेत उत्पन्न झालेला काहीसा गतिरोध या सर्वांची चर्चा व त्यांची क्रांतदर्शी मीमांसा या ग्रंथांत केलेली आढळते. आज 50 वर्षांनंतरही गुरुजींचे तत्त्वचिंतन व व्यावहारिक मार्गदर्शन ताजेतवाने वाटते. आजच्या सर्व समस्यांची उकल त्यात आढळते, यातच त्याचे कालातीत व चिरकालीन महत्त्व सामावले आहे. गुरुजींना म्हणजेच पर्यायाने संघाला अभिप्रेत असणारे संघटित व समरस समाजजीवन आणि वैभवशाली राष्ट्रजीवन उभे करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होय.
 
प्राचार्य श्याम अत्रे
अग्रलेख
जरुर वाचा
मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३

मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स ..

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित

२१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'या' नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत!

एखादा कलाकार कितीही मोठा झाला, कितीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले, मसालापटांपासून चरित्रपटांपर्यंत आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिरेखा साकारल्या तरी रंगभूमीची ओढ कधीच संपत नाही. कोणताही हाडाचा कलाकार ठराविक वेळेनंतर पुन्हा तो रंगभूमीकडे वळतो, इथे होणाऱ्या तिसऱ्या घंटेसोबत व्यक्तिरेखेत शिरतो, प्रयोगांमागून प्रयोग करत त्यातच रमतो आणि जिवंत कला पाहण्याचा अनुभव रसिकांना देताना स्वत:लाही धन्य मानू लागतो. चतुरस्र अभिनेते सचिन खेडेकरही याला अपवाद नाहीत. मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ..