भारतीय लष्कर आणि पत्रकारी गर्दीतले वावदूक 

    05-Jun-2017   
Total Views |


काश्मीरमध्ये एप्रिल महिन्यात भारतीय सैन्याचे अधिकारी मेजर लिथुल गोगोई यांनी आपल्या एका मिशनचा भाग म्हणून एका काश्मिरी दगडफेक्याला आपल्या जीपच्या बॉनेटवर बांधून फिरवले आणि १२०० लोकांच्या हिंसक जमावाने वेढलेल्या एका पोलिंग बूथमध्ये शिरकाव करून तिथे अत्यंत भयानक परिस्थितीत अडकलेल्या जम्मू-काश्मीर पोलीस आणि आयटीबीपीच्या जवानांची सुटका केली. रक्ताचा एकही थेंब न सांडता मेजर गोगोई ह्यांनी आपली कामगिरी फत्ते केली. त्याबद्दल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले व त्यांना सेनाप्रमुखांचे प्रशस्तिपत्रकही देण्यात आले. 

लष्करप्रमुख बिपीन रावत यांची मुलाखत घ्यायला गेलेल्या एका वृत्तसंस्थेच्या वार्ताहराकडे जनरल रावत ह्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्टपणे बोलले. त्यांनी सांगितले की काश्मीर मध्ये जे काही चालू आहे ते एक 'डर्टी वॉर' म्हणजे युद्धाचे कसलेही नियम न पाळता केलेले एक अधर्मयुद्ध आहे असे म्हटले आहे. समोरचा शत्रू हा सैनिकासारखा दिसत नाही, सैनिकासारखा समोरासमोर लढत नाही. तो नागरी वेशात असतो, स्त्रिया व मुले ह्यांची मानवी ढाल वापरत हा शत्रू आपल्या सैनिकांवर हल्ले करत असतो. अश्या वेळी सैनिकांनी स्वतःचा जीव आणि समोरच्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी वेगळा विचार केला आणि कमीत कमी प्राणहानी होईल आणि आपल्यावर सोपवलेली कामगिरीही फत्ते होईल असे काही तरी केले तर त्याबद्दल त्या सैनिकाचे कौतुकच व्हायल हवे असे सांगत लष्करप्रमुखांनी मेजर लिथुल गोगोई ह्यांनी घेतलेल्या 'इनोव्हेटीव्ह' म्हणजे 'कल्पक' निर्णयाचे जाहीर कौतुक केले आहे. ही मुलाखत काही लष्करप्रमुखांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दिलेली नव्हती. अत्यंत प्रतिकूल अश्या युद्धजन्य परिस्थितीत, जिथे प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो अश्या वेळी आपली सैन्यातल्या एका तरुण अधिकाऱ्याने एक अत्यंत धाडसी, काहीसा वेगळा निर्णय घेऊन त्याला दिलेली कामगिरी फत्ते केली, त्याविषयी लष्करप्रमुख ह्या नात्याने आपली भूमिका मांडण्यासाठी जनरल रावत ह्यांनी ती मुलाखत दिली होती. 

पण ही मुलाखत प्रसिद्ध झाली आणि स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या काही पत्रकारांची अवस्था अक्षरशः अंगावर मीठ पडलेल्या गांडुळांसारखी झाली. जागतिक तेल उद्योग ते संतसाहित्य इथपर्यंतच्या कुठल्याही विषयावर अग्रलेख पाडणाऱ्या काही मराठी संपादकांची मजल तर लष्करप्रमुखांची संभावना 'वर्दीतले वावदूक' असे संबोधण्यापर्यंत गेली. स्वतः लिहिलेला अग्रलेख मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची नामुष्की ज्या संपादकावर आली त्या संपादकाला लष्करप्रमुखांना सल्ले देताना बघणे हा एक नितांत मनोरंजक अनुभव होता. ज्या व्यक्तीला स्वतःच्या शब्दांशी प्रामाणिक राहता येत नाही किमान त्याने तरी भारताच्या लष्कर प्रमुखांना शहाणपणा शिकवायच्या फंदात पडू नये. स्वतः गर्दीतले वावदूक होण्यात जे धन्यता मानतात त्यांनी वर्दीवर बोलावे तरी कशाला?

पण हे मराठी संपादक महोदय सभ्य वाटावेत असे अकलेचे तारे वायर नावाच्या एका इंग्रजी प्रोपागंडा पेज मध्ये पार्थ चॅटर्जी नामक एका लेखकाने तोडले आहेत. ह्या लेखकाने तर चक्क भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत ह्यांची तुलना अमृतसरमधल्या जालियाँवाला बागेतल्या हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या ब्रिटिश क्रूरकर्मा ब्रिगेडियर जनरल डायरशी केली आहे. 

१९१९ मध्ये बैसाखीच्या दिवशी अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराच्या जवळच्या जालियाँवाला बागेत जवळजवळ २०००० निःशस्त्र लोकांचा जमाव जमला होता. त्यात स्त्रिया आणि मुलेही होती. बागेत जायला फक्त एकाच निरुंद, चिंचोळी वाट होती. जनरल डायर ह्यांनी तिथे जमलेल्या लोकांना निघून जायची कसलीही संधी न देता गोळीबाराचे आदेश दिले. दहा मिनिटे अखंड बंदुका धडधडल्या. हजारावर राउंड फायर केले गेले. ज्या चिंचोळ्या गल्लीतून बाहेर जायची वाट होती, त्याच गल्लीत डायरचे सैनिक बंदुका रोखून बसले होते. बागेत अडकलेले लोक अक्षरशः सैरावैरा पळू लागले. जालियाँवाला बागेत आत  एक विहीर आहे, त्या विहिरीत अनेकांनी धडाधड उड्या घेतल्या. काहींनी भिंतीवर चढून बाहेर उड्या मारण्याचे निष्फळ प्रयत्न केले. गोळीबार थांबला तेव्हा बागेत रक्ताचा सडा पडला होता. ब्रिटिश सरकारच्या आकड्यानुसार जवळ जवळ चारशे लोक त्या दिवशी जालियाँवाला बाग हत्याकांडात मरण पावले. पण अमृतसरच्या लोकांच्या मते जवळजवळ हजार लोकांचा बळी त्या दिवशी गेला असावा. आजही जालियाँवाला बाग बघायला जाताना छाती दडपून जाते. तिथल्या त्या निःशस्त्र लोकांच्या किंकाळ्या अगदी आजही आपल्या मनात घुमतात. तिथल्या भिंतींवरती गोळ्यांच्या खुणा आजही आहेत आणि भिंत चढण्याचा निष्फळ प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या नखांच्या खुणाही तिथल्या विटांवर तुम्हाला आजही दिसतात. 

अत्यंत निर्विकारपणे शेकडो निःशस्त्र बायकामुलांचे बळी घेणारा ब्रिटिश क्रूरकर्मा जनरल डायर कुठे आणि अत्यंत शिस्तबद्ध अश्या भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल बिपीन रावत कुठे? जनरल डायरने आपल्या निर्णयाचे शेकडो लोकांचे जीव घेतले, मेजर लिथुल गोगोईने आपल्या निर्णयाने १२०० लोकांचे प्राण वाचवले. जनरल डायरच्या निर्णयामुळे बंदुकीच्या हजार फैरी निःशस्त्र जमावावर झाडल्या गेल्या. मेजर गोगोई ह्यांच्या धाडसी निर्णयाने एकही गोळी न झाडता पोलिंगबूथ मध्ये अडकलेल्या आठ लोकांची पेट्रोल बॉम्ब व दगड हाती घेतलेल्या हिंसक जमावापासून सुटका झाली. जनरल डायर ह्यांच्या निर्णयाने जालियाँवाला बाग रक्ताने लाल झाली, मेजर गोगोई ह्यांच्या निर्णयाने रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांच्यावर सोपवली गेलेली कामगिरी फत्ते झाली. अश्या ह्या मेजर गोगोई ह्यांच्या यशस्वी निर्णयाचे लष्करप्रमुखांनी जाहीर कौतुक करणे म्हणजे 'भारतीय लष्कराची जनरल डायर मोमेंट' म्हणणाऱ्या ह्या तथाकथित पुरोगामी लेखकाचे आणि तो लेख छापणाऱ्या वायरचे खरे तर जोड्यांच्या माळा घालून जाहीर सत्कार व्हायला हवेत. 

सध्या एकूणच प्रस्थापित पारंपरिक मीडियामध्ये निर्बुद्ध लोकांची खूप चलती आहे. देशप्रेम, देशाभिमान ह्या सामान्य लोकांना महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींची खिल्ली उडवणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पाश्चात्य 'उदारमतवाद्यांचे' उष्टे विचार भारतात रिसायकल करणे ह्यालाच बरेच लोक आजकाल पत्रकारिता हे नाव देतात. मानवी हक्क हे ह्या लोकांच्या हातातले आवडते शस्त्र. हे कधीही, कसेही, कुणावरही उगारता येते. मजा म्हणजे हे शस्त्र दुधारी असते, म्हणजे मेजर गोगोई ह्यांनी गोळीबार करायचा निर्णय घेतला असता तरी हे लोक 'मानवी हक्कांची पायमल्ली' झाली म्हणून रडले असते आणि आता रक्ताचा एक थेंबही न सांडता जेव्हा मेजर गोगोई ह्यांनी आपली कामगिरी यशस्वी करून दाखवली तेव्हाही 'मानवी हक्कांची पायमल्ली' झाली म्हणून ही जमात गळे काढते आहे. आपल्या विचारांमध्ये काहीही दम नसताना नुसता मोठा आवाज करून आपल्या पोरकटपणाचा रतीब घालणे ह्यालाच दुर्दैवाने आजकाल पुरोगामी पत्रकारिता म्हणतात. भारतीय लष्करप्रमुखांना  'वर्दीतले वावदूक' किंवा 'जनरल डायर' संबोधण्याचा आचरटपणा करून हे लोक आपलीच वैचारिक दिवाळखोरी जगापुढे उघड करत असतात ह्याचे भान मात्र त्यांना नसते. 

जाता जाता सहा दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीकडे मुद्दाम लक्ष वेधावेसे वाटते. गेल्या तेवीस वर्षात काश्मीरमध्ये लष्कराने मानवी हक्कांचे उल्लंघन केले अश्या तब्बल १७३६ तक्रारी दाखल झाल्या होत्या. कसून केलेल्या चौकशीनंतर असं सिद्ध झालंय की त्यातल्या केवळ ६६ तक्रारींमध्ये तथ्य होतं. तक्रारीअंती दोषी आढळून आलेल्या १५० सैनिकांना शिक्षा झालेल्या आहेत आणि ४९ केसेसमध्ये नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे. बाकीच्या सगळ्या केसेस खोट्या होत्या. पारंपरिक प्रसारमाध्यमे आणि काही पत्रकार लष्कराविरुद्धच्या कुठल्याही आरोपाला अमाप प्रसिद्धी देतील पण ही बातमी मात्र लोकांपर्यंत पोचवणार नाहीत. भारतीय लष्कर ही एक नियमांच्या चौकटीत काम करणारी, अत्यंत शिस्तबद्ध अशी संघटना आहे. केवळ लिहिता येतं म्हणून वाटेल ते निर्बुद्ध आरोप करणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतलं तर खूपच बरं होईल. 

- शेफाली वैद्य 

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.