अस्तित्व आणि अर्थ

    29-Jun-2017   
Total Views |
 

 
 
माणसाच्या सांस्कृतिक विकासावर चर्चा करीत असताना नवनवीन मापदंड वापरले जात असतात. त्यात परिपूर्णता नसली तरी कल्पनेची चमक असते. अशाच एका व्यक्तीने बोलता बोलता महाराष्ट्रातील विकसित व अविकसित भाग ठरविण्याचा नवा निकष सांगितला होता. ’’ज्या भागात लोक म्हणतील की, ‘मी वेळ देतो, पण पैसे देऊ शकणार नाही’ तो अविकसित भाग व ज्या भागात लोक म्हणतील की, ‘पैसे घेऊन जा, पण वेळ मिळणे अवघड आहे’ तो विकसित भाग.’’ हे विधान वरवर पाहता साधे वाटत असले तरी भांडवल आणि वेळ यांचा परस्पर संबंध आणि त्याचा विकास आणि उत्पन्नावर होणारा परिणाम यावर हे निरीक्षण प्रकाश टाकते. याहून अधिक खोलात जाऊन वेगवेगळ्या सामाजिक विश्लेषकांनी बदलत्या सामाजिक समस्यांचा विविध अंगांनी वेध घेतला आहे. त्यातून नवनवे दृष्टिकोन लक्षात येतात. अशाच एका विश्लेषणात मानवी संस्कृती पुढील कालचे प्रश्न व आजचे आणि भविष्यातील प्रश्न यात कोणता फरक आहे, याचे विश्लेषण केले आहे.
 
आपण अगदी गेल्या शतकाचा जरी विचार केला तरी शंभर वर्षांपूर्वी पर्यंत माणसापुढे त्याच्या अस्तित्वाचे प्रश्न उभे होते. त्यात विविध प्रकारच्या रोगाच्या साथींचा समावेश होता. अनेक प्रकारचे रोग असे होते की, त्यावर उपाय सापडले नव्हते. त्यातच त्यात नैसर्गिक आपत्तींची भर पडत असे. एखाद्या भागात दुष्काळ पडला तर त्यात हजारो माणसे बळी पडत. भूकंप, वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्येही बळी पडणार्‍यांची संख्या प्रचंड होती. त्यातच राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने होणार्‍या युद्धात किंवा अराजकात मानवी जीवन कःपदार्थ मानले जाई. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचे तर १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या सुमारास गोडसे भटजींनी प्रवास केला. त्याचे जे वर्णन केले त्यावरून हे लक्षात येते. याचा एकत्रित परिणाम म्हणजे माणूस साठ वर्षांचा होणे म्हणजे विशेष कामगिरी मानली जात असे. त्यामुळे त्याच्या षष्ट्यब्दीपूर्तीचे कार्यक्रम त्याच्या जीवनाच्या यशस्वितेचे गमक म्हणून केले जात. कारण इतकी वर्षे जिवंत राहणे, हेच त्याकाळचे मोठे आव्हान होते. ८० वर्षे झाल्यानंतर सहस्रचंद्रदर्शन करण्याचा कार्यक्रम करण्याचा योग, हा भाग्ययोग मानला जात असे. पण आता परिस्थिती आमूलाग्र बदलली आहे. रोगांच्या साथी अपवादात्मक बनल्या आहेत. अनेक रोगांवर मात करणारी औषधे निघाली आहेत. दुष्काळ पडला तरी अन्न, पाणी, गुरांचे रक्षण करणे ही समाज आपली जबाबदारी मानतो. काही वर्षांपूर्वी मिरजेहून लातूरला रेल्वेने पाणी नेणे, ही कल्पना अशक्य व हास्यास्पद वाटली असती पण आज ती कल्पना प्रत्यक्षात आली आहे. भूकंप, त्सुनामीसारख्या अजूनही काही नैसर्गिक आपत्ती आहेत, ज्यांचा अंदाज बांधणे किंवा त्यावर मात करणे शक्य झालेले नाही, परंतु वादळांच्या पूर्वसूचना मिळतात व त्यामुळे त्यात होणार्‍या हानीचे प्रमाण तुरळक असते. जगातील काही भागांत अजूनही युद्धे होत आहेत व दहशतवादाच्या भीतीनेही जग अस्वस्थ आहे. आफ्रिकेतील काही देश, अफगाणिस्तान यासारख्या भागातील यादवीवर अजूनही मात करता आलेली नाही, परंतु दीड-दोनशे वर्षांपूर्वी जगातील सर्वच भागांत जी अराजक सदृश्य स्थिती होती, त्यावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणून कायदा व सुव्यवस्था स्थितीवर नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. या सार्‍याचा परिणाम माणसाचे आयुष्य वाढण्यात व ते अधिक आरोग्यदायी बनण्यात झाला आहे. आता साठी गाठणे ही काही कौतुकाची बाब राहिलेली नाही आणि जर प्रकृतीची नीट काळजी घेतली, तर वयाची ८० गाठण्याचीही अपूर्वाई राहिलेली नाही. त्यामुळे माणूस आता अस्तित्वाच्या लढाईतून बाहेर पडला आहे, असे म्हणता येईल. 
 
पण ही लढाई जिंकत असताना एक नवा मोठा प्रश्न त्याच्यापुढे उभा आहे व तो म्हणजे एवढे आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळाले तरी जर माणसाला जीवनाचा अर्थ कळला नाही, तर अशा आयुष्याचा आनंद होण्याऐवजी त्या व्यक्तीला व त्यांच्या भोवतालच्या व्यक्तींना त्याची शिक्षाच होऊन जाते. त्यामुळे माणसासमोरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न हा, ते जीवन अर्थपूर्ण करण्याचा आहे. ज्यांचे जीवन आत्मकेंद्रित आहे, त्या व्यक्ती जेव्हा वार्धक्याकडे झुकू लागतात, त्यावेळी त्या मनाने अस्वस्थ होत जातात व इतरांनाही अस्वस्थ करीत जातात. अशा व्यक्तींना कुठे थांबले पाहिजे, हे न कळल्याने त्या नव्या प्रवाहापासून अलग पडत जातात. अशा कितीतरी व्यक्ती आपण पाहात असतो. अशा व्यक्तींना मिळणारे दीर्घायुष्य हा शाप आहे की वरदान? असा प्रश्न त्यांनाच विचारावा लागेल, पण अशाही अनेक व्यक्ती आहेत ज्या आपला आनंद दुसर्‍यांच्या आनंदातून घेत असतात. अशाही अनेक व्यक्ती आपल्याभोवती असतात. अशा व्यक्तींना अर्थपूर्ण व आनंदी जीवन जगण्याकरिता भरपूर व्यक्ती व घटना त्यांच्या अवतीभोवती मिळत राहातात. आपल्या आनंदी जीवनाची सांगड त्यांनी इतरांच्या आनंदाशी घातल्याने त्यांच्या आनंदात सहभागी होणार्‍यांची संख्याही भरपूर असते, पण हे आपोआप घडत नाही. ते घडविण्याकरिता विशेष प्रयत्न करावे लागतात.
 
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची एवढ्या झपाट्याने प्रगती होत आहे की, त्यामुळे विविध सुविधा आपल्या दारात आणून उभ्या केल्या आहेत. एकेकाळी ज्या सुविधा समाजातील धनिकांनाही शक्य नव्हत्या तशा अनेक सुविधा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात आल्या आहेत, पण या सुविधा दीर्घायुष्य देऊ शकतात, पण जीवनामध्ये अर्थ निर्माण करू शकत नाहीत. तो निर्माण व्हायचा असेल तर त्यासाठी माणसालाच प्रयत्न करावे लागतात. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उग्र झाला आहे, पण प्रश्न मांडताना, त्याचा प्रचार करताना सामाजिक सौहार्दावरच प्रहार केला, तर उद्या आर्थिक प्रश्न सुटले तरी त्यातून नवे प्रश्न तयार होतील. पंजाबमध्ये आलेली समृद्धी तेथील अमली पदार्थांच्या प्रसाराला व त्यातून होणार्‍या विनाशाला कारणीभूत ठरली आहे. तेलाने समृद्ध असलेल्या देशांचे उदाहरण तर अधिक बोलके आहे. निसर्गाने एवढी संपत्ती देऊनही ती संपत्ती त्या देशांच्या आनंदाला कारणीभूत ठरण्यापेक्षा तिथल्या विनाशालाच अधिक कारणीभूत ठरत आहे. समृद्धीच्या सोबत हिंसकताही वाढत आहे. कारण माणसाला आंतरिक शांतता असेल, तरच बाहेर शांतता निर्माण होऊ शकते.आंतरिकदृष्ट्या अस्वस्थ असलेली व्यक्ती स्वस्थ समाज निर्माण करू शकत नाही. जग जिंकण्याआधी मन जिंकण्याकडे लक्ष दिले तरच जिंकलेले जग समाधान देऊ शकते; अन्यथा नाही.
 
या दृष्टीने हिंदू संस्कृतीत ’योग’ विषयाचे असलेले महत्त्व आणि चार आश्रमांची कल्पना याकडे लक्ष दिले पाहिजे. योग ही संकल्पनाच शारीरिक व मानसिक आरोग्याशी निगडित आहे. ’आंतरराष्ट्रीय योग दिना’मुळे या विषयाला महोत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचेही महत्त्व आहे, कारण त्यामुळे या विषयाकडे जगाचे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले गेले आहे. परंतु योग ही जशी ’कृती’ आहे, तसाच तो ’विचार’ही आहे. त्यामुळे विचार वगळून केलेली कृती ही कोणतेच फळ देऊ शकत नाही. योग जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देते. माणूस ऐहिक यश मिळवित असताना त्याच्यामागे आंतरिक उन्नतीचे अधिष्ठान नसेल तर ते यश टिकाऊ ठरत नाही व त्यातून सुख मिळण्यापेक्षा ते दुःखालाच अधिक कारणीभूत ठरते. याच बरोबर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांची कल्पनाही निरोगी समाजव्यवस्थेसाठी आवश्यक आहे. यातील पहिल्या दोन पर्यायांमध्ये ऐहिक उद्दिष्टांवर भर आहे, तर पुढच्या दोन पर्यायांचा भर आंतरिक शोधावर आहे. जीवनामध्ये या दोन्हींचे संतुलन असेल, तरच खरे समाधान मिळू शकते. त्यामुळे जीवनाचा खरा आणि टिकाऊ अर्थ समजण्यासाठी बाह्य व आंतरिक जगाच्या शोधाची जाणीव निर्माण करणे व त्याकरिता आवश्यक असे वातावरण निर्माण करणे आवश्यक ठरते. विज्ञानाने जीवनाचे अस्तित्व सहजसाध्य केले आहे. त्याला अर्थ प्राप्त करून देण्याची जबाबदारी सुयोग्य जीवनविषयक दृष्टिकोन तयार करण्यावर पडते.
 
- दिलीप करंबेळकर

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय.