दोन राजधान्या !
स्पेनची भटकंती करून आल्यावर लोकांनी एक भलताच अवघड प्रश्न विचारला,
‘‘बघितल्यापैकी कोणतं शहर सर्वात आवडलं?’’ आम्ही चार शहरं निवडली, त्यात खूप भटकलो, खूप बघितलं, खूप चवी चाखल्या, खूप नवीन अनुभव घेतले. प्रत्येक शहराची काही वैशिष्ट्ये होती. त्यामुळे बार्सिलोना, माद्रिद, टोेलेडो की सिव्हले हे निवडणं फारच अवघड झालं.
आम्ही शहर फिरलोे ते चालत किंवा त्यांच्या लोकल मेट्रोने किंवा बसने, त्यामुळे स्थानिक लोकांशी संवाद साधता आला. त्यांच्या फक्त पर्यटकांच्या परिसरातच नव्हे तर गल्लीबोळातून फिरता आलं. यामुळे देश अजून जवळून बघता आला.
...आणि लक्षात आलं की, आपल्याला जसे नागपूर-पुणे-मुंबई वेगळे वाटतात तसेच त्यांनाही वाटतं किंबहुना प्रत्येक शहराचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व असतं आणि तीच त्याची खुबी असते. कुणीतरी असं म्हटलं होतं की, ’’जर शहरं पुरूष असते, तर, माद्रिद सर्वात देखणा असता.’’ मी हे वाक्य पाहिलं, वाचलं आणि नंतर तिथे गेले. त्यामुळे अपेक्षा खूपच होत्या आणि नजर देखणेपण शोधत होती... आणि आनंद म्हणजे प्रत्येक घडीला तो दिसला.
माद्रिद हे १६ व्या शतकापासून राजधानीचं शहर राहिलं आहे. त्यामुळे तो रूबाब आहेच. स्पेनचा भौगोलिक मध्य आहे. इथे सर्वांच्या टेस्टस, आवडी पुरवायला सगळं काही आहे. इतिहास, कला, वाङ्मय, निसर्ग, खाण्या-पिण्याची रेलचेल आणि मोकळेपणा कलाप्रेमींसाठी भव्य म्युझियम्समध्ये स्पेनचे मोठे चित्रकार पिकासो, डॅली, मिरो तर आहेतच, शिवाय राजघराण्याने इटालियन, बेल्जियमच्या कलाकारांनाही इथे राजाश्रय दिला. इथली तीन भव्य म्युझियम्स ही कलाप्रेमींसाठी मक्का आहे.
इथे राजवाडे, कॅथेड्रेल्स तर आहेच शिवाय मोठ्या बागा हे इथले वैशिष्ट्य आहे. राजधानीच्या शहरात घाईगडबडीत हरवणं तसं शक्य असतं पण, इथे ठायीठायी बागा पसरल्या आहे. जिथे निवांत शांतता निरवते. गंमत म्हणजे एका बागेच्या आवारात आम्हाला इजिप्तच्या मंदिरांची झलक मिळाली. ’Temple of Dabhod' नाईल नदीवर आस्वान धरण बांधलं तेव्हा त्यात काही वास्तूंना जलसमाधी मिळणार होती. इजिप्त सरकारने एक देऊळ स्पेनला भेट म्हणून दिलं आणि ते एक-एक दगड रचून तसेच्या तसे इथे उभे केले. हा इथला सनसेट पॉईंट आहे, फक्त सूर्य मावळायला रात्रीचे ९.३० वाजतात एवढेच!
माद्रिद सगळ्यात जिवंत शहर मानलं जातं. ’madrid hunca duerme' म्हणजे माद्रिद कधीच झोपत नाही, रात्रभर फिरण्यासाठी आणि पार्टीसाठी लोक इथे कुठून-कुठून येतात. त्यात आम्ही राहिलो ते होतं पार्टी हॉस्टेल. आम्ही झोपी जायचो तेव्हा इथली तरुण मंडळी नटून-थटून बाहेर पडायच्या मूडमध्ये असायची आणि आम्ही सकाळी बाहेर पडायच्या वेळेस ते परत येत असायचे! तरुण मंडळींना आकर्षित करणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली ’रिअल माद्रिद’ ही फुटबॉल टीम. खवैय्यांसाठी इथलं 'San Miguel Market' हे अप्रतिम ठिकाण आहे. अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ विकणारे असंख्य दुकानांचे हे बाजार. ऑलिव्ह ते मासे, गोड पदार्थ, पेय सगळं काही एकाच छताखाली. लोक फिरत फिरत विकत घेतात आणि मध्यभागी मांडलेल्या खुर्च्या-टेबलांवर जाऊन बसतात. विशेष म्हणजे इथे पर्यटकच नव्हे तर स्थानिक लोकही मस्त आलेले होते. मग कळलं स्थानिक लोक संध्याकाळी फारसं घरात थांबत नाहीत, तेही असेच बाहेर असतात.
मला मात्र जिथे फिरायला दिवस कमी पडला ते ठिकाण म्हणजे इथले रॉयल बोटॅनिकल गार्डन. इथे ३० हजार प्रजातींच्या वनस्पती जगभरातून आणून लावलेल्या आहेत. युरोपमधलं हे सर्वात मोठं शहर आहे. इथल्या बोन्सायचा खजिनादेखील अप्रतिम आहे. इतर बागांमधले गुलाबांचे आणि इतर फुलांचे ताटवे बहरले होते. भर रहदारीच्या रस्त्यावर अशी फुलं बघायला खूपच बरं वाटलं. वर्तमानातल्या राजधानीतून आम्ही भूतकाळातल्या राजधानीत गेलो. माद्रिदपासून ७० किमीच्या अंतरावर डोंगरावर वसलेलं टुमदार शहर म्हणजे टोलेडो. पूर्वी हे राजधानीचं शहर होतं.
पण, इथून राजधानी माद्रिदला हलवली (फिलिप राजाची तिसरी पत्नी इसाबेला, जी अप्रतिम सुंदर होती तिला म्हणे माद्रिद भलतंच आवडले!)
पूर्वी याला तीन संस्कृतींचे शहर म्हटले जात असे. कारण इस्लाम, ख्रिश्चन आणि ज्यू लोक इथे नांदत होते. उंच टेकडीवर वसलेल्या या शहराला ताजो नदीने तीन बाजूंनी घेरले आहे आणि चौथी बाजू प्राचीन रोमन भिंतीने सुरक्षित केली आहे. बसस्थानकापासून २० मिनिटांच्या अंतरावर असलेलं गाव वजा शहर दिसतंच जुनं. ४००-५०० वर्षांपूर्वी बांधलेल्या धडधाकट वास्तू, Timeless Architecture चे जिवंत नमुने आहेत. वास्तू टिकल्या आहेत आणि त्यांनी शहराचा पुरातनपणा टिकवला आहे. जुन्या वास्तूंमध्ये कुठेच अशा नवीन बिल्डींग डोळ्यांत खुपत नाही.
कोणीतरी म्हटलं होतं ’Get Lost in Toledo.' आम्ही ते शब्दशः घेतलं. जगातलं सर्वात भव्य गोथीक कॅथेड्रेल बघून आम्ही बाहेर पडलो आणि टोलेडोच्या त्या चिंचोळ्या एकसारख्या दिसणार्या दगडी गल्ल्यांमध्ये हरवलो. जीपीएसपण बोंबललं, सारखं गोल-गोल फिरत. पहिल्यांदा आम्हाला स्थानिक भाषा येत नसल्याचा तोटा कळला, कारण रस्त्यावर दोनच प्रकारचे लोक होते, एक इंग्लिश न बोलणारे स्थानिक आणि दुसरे आमच्यासारखे वाट चुकलेले पर्यटक आणि त्या एवढ्याशा गल्ल्यांमध्ये भल्यामोठ्या गाड्या फिरवणारे कुशल वाहनचालक.
जवळजवळ तासभर आम्ही दहा मिनिटांवर असणार्या ’Sinagoga de Santa Maria' ला पोचायला लागला. या Sinagogue चा वापर १६ व्या शतकापर्यंत होत असे, पण मग ज्यूंची, मुसलमानांची हकालपट्टी करण्यात आली किंवा धर्मांतर करून कॅथलिक धर्म स्वीकारण्यास त्यांच्यावर सक्ती केली गेली. जुन्या मशिदींचे रूपांतर चर्चमध्ये झाले. एकाच वास्तूत मुजुदार विसिगोथ आणि रोमन वास्तूशैली दिसते. इथलं कॅथेड्रेल तर एक चित्रकलेचं म्युझियमच आहे. ते Raphel, Rubens, Goya, EL-Grecoच्या पेंटिंगने परिपूर्ण आहे.
'Monsteris de san Juan de los Reyes ' हे भव्य चर्च फर्डिनांड आणि राणी इसाबेलाला पुरायला बांधले होते, पण पुढे गॅनेडा त्यांच्या ताब्यात आलं आणि त्यांनी स्वतःचे शेवटचे स्थानही बदललं.
पण मला टोलेडोला जाण्याचे वेगळे कारण होते. शिवाजी महाराजांशी ते निगडित आहे. शिवाजी महाराजांचा काय संबंध ? १५००-१६०० शतकात व्यापारी युरोपातून आशिया खंडात येत असत आणि हे लोक त्यांच्या इतर सामानांबरोबर तलवारीही आणत. इंग्रजांच्या तलवारी म्हणे फक्त लोणी कापण्यास योग्य ! पण टोलेडोच्या उत्तम धाटणीच्या, सुबक तलवारी, सुर्या स्टीलच्या एका वेगळ्याच मिश्र धातूपासून बनलेल्या असायच्या. मुळात इथली ही रोमन काळापासून इ. पू. ५०० पासूनची चालत आलेली परंपरा होती. शस्त्रनिर्मितीचं टोलेडो हे केंद्र होतं. शिवाजी महाराजांची ‘फिरंगी’ तलवार टोलेडोहून आली. जसजशी नवीन शस्त्रे आली, तलवारी मागे पडल्या आणि टोलेडोंचे महत्त्व कमी झाले. आता फक्त पर्यटक आठवण म्हणून छोटीमोठी मिग खरेदी करतात. हे शस्त्रांचे शहर फिरताना त्यांच्या भूलभुलैयासारख्या गल्ल्यांमध्ये असे हरवलो की बस्स. पण गंमत म्हणजे इथे आम्हाला तलवारी-सुर्या-खंजीर विकणार्या दुकानात ‘सिंदू’ भेटली. मल्याळम् ऍक्सेंटमध्ये इंग्रजी बोलणारी, केसांना खोबरेल तेल लावून चापून-चुपून वेणी बांधलेली, आपल्या वर्णाची! मग गप्पा! टोलेडोत ७० केरळी माणसं स्थायिक झाली आहेत. इथल्या कॉन्व्हेंटमध्ये अनेक केरळच्या नन्स आहेत. सिंदूची मावशी इथे आली, पाठोपाठ तिची भाचेकंपनी, अशा अनेक नन्सच्या अनेक भाच्यांनी टोलेडोत घर केलं आहे.
इथल्या नन्सचा एक वेगळाच इतिहास आहे. ’Convent of San Clemente' च्या नन्सने एका जगप्रसिद्ध मिठाईचा शोध लावला, ज्याला 'Designation of Origin'चं पेटंट मिळालं आहे. एका युद्धानंतर भयंकर दुष्काळ पडला, मग गहू संपले पण बदाम आणि साखर मुबलक प्रमाणात शिल्लक होते. मग या नन्सने दोन्ही जिन्नस एकत्र करून ‘मारझपान’ नावाचा पदार्थ तयार करून तो लोकांना चारला. आजही टोलेडोला येणारे पर्यटक तलवारी-सुर्या आणि मारझपान हमखास घेऊन जातात.
स्पेनमधून घेऊन जाण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत... त्याबद्दल पुढील भागात बार्सिलोना आणि सिव्हेल शहरांबरोबर!
- अंजना देवस्थळे