शब्दांचे खेळ

Total Views |

 

शब्दांचे खेळ तसे भारतीयांना काही नवे नाहीत. आज देशभरातील अनेक जणांची या शब्दांच्या खेळामुळे फसवणूक होते. ग्राहकांची फसवणूक करण्यामागे दूरसंचार कंपन्याही काही मागे नाहीत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ’एमबीपीएस’ हा शब्द. आज ‘एमबीपीएस’चा मोबाईल हाताळणाऱ्या लहान मुलालाही फूल फॉर्म विचारा, तोही लगेच सांगेल, ’मेगा बाईट्स पर सेकंद’. मात्र, मोबाईल कंपन्या ‘बाईट्स’ आणि ‘बीट्स’असे शब्दांचे खेळ करुन ग्राहकांना ’मेगा बीट्स पर सेकंदा’चा इंटरनेटचा वेग देतात. तेव्हा, नेमकी या शब्दाच्या खेळामागची गोम आहे तरी काय, ते आज समजून घेऊया.

 

जगभरात इंटरनेटच्या वेगाचे परीक्षण करणारी संस्था ‘ओपन सिग्नल’ने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, फोर-जी एलटीई तंत्रज्ञानाच्या यादीतील ७५ देशांमध्ये भारत हा ७४ व्या स्थानावर आहे. भारतापेक्षा वाईट स्थिती ही केवळ ’कोस्टा रिका’सारख्या देशाची आहे. भारतातील सरासरी फोर-जी सेवेचा वेग ५.१४ एमबीपीएस आहे, तर दुसरीकडे श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्येही फोर-जी सेवेचा सरासरी वेग तुलनेने जास्त आहे. ‘ओपन सिग्नल’च्या अहवालानुसार, पाकिस्तान ६६ व्या, तर श्रीलंका ६९ व्या क्रमांकावर आहे. जगभरात थ्री-जी सेवेचा सरासरी वेग ४.४ एमबीपीएस आहे, तर भारतात फोर-जी सेवेचा सरासरी वेग ५.१४ एमबीपीएस आहे. याचाच अर्थ असा की, आपण फोर-जी सेवेसाठी पैसे देत असतानाही आपल्याला इंटरनेटचा दिला जाणारा वेग मात्र जवळपास थ्री-जी सेवेइतकाच आहे, तर दुसरीकडे देशातील थ्री-जी सेवेकडे पाहिले, तर त्याचा वेग या तुलनेत आणखीनच पिछाडीवर आहे. भारतात ग्राहकांना मिळणारा थ्री-जी सेवेचा सरासरी वेग हा १ एमबीपीएस पेक्षाही कमी आहे. जगभरात सध्या फोर-जी सेवेचा सरासरी वेग १६.२ एमबीपीएस आहे. सिंगापूरसारख्या देशाकडे पाहिले, तर जगभरातील सर्वात जास्त इंटरनेटचा वेग म्हणजेच ४५.६२ एमबीपीएस या देशात मिळतो, तर दुसरा क्रमांक लागतो तो दक्षिण कोरियाचा. दक्षिण कोरियामध्ये इंटरनेटचा सरासरी वेग ४३.४६ एमबीपीएस इतका नोंदवला गेला आहे.

मात्र, यात स्पष्टपणे दिसणारा एक विरोधाभास म्हणजे फोर-जी एलटीई नेटवर्कची उपलब्धता पाहता भारत प्रमुख २० देशांच्या यादीत म्हणजेच, १५ व्या क्रमांकावर आहे. देशात फोर-जी एलटीई सेवेची उपलब्धता जवळपास ८१.६ टक्के आहे. काही काळापूर्वी ती जवळपास ७१.६ टक्के एवढी होती. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरात फोर-जी सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फोर-जी सेवेच्या विस्ताराचे श्रेय रिलायन्सच्या जिओ सेवेला दिले जाते. कारण, जिओची देशभरातील फोर-जी सेवेची उपलब्धता जवळपास ९० टक्क्यांच्या आसपास आहे, तर दुसरीकडे इतर कंपन्यांकडे पाहिले तर त्यांची उपलब्धता मिळून ६० टक्क्यांच्या आसपास मोडते.

त्यातच देशभरात झपाट्याने फोर-जी सेवा वापरकर्त्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे इंटरनेटच्या वेगात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असली तरी त्या वेगाचे सातत्य राखण्यासाठी अपुरी पडणारी मूलभूत यंत्रणा. जसे की, मोबाईल टॉवर, ग्राहकसेवा केंद्र, कर्मचारी वर्ग इत्यादी.

 

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने जारी केलेल्रा आकडेवारीनुसार, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरी इंटरनेटचा वापर केवळ २३६ एमबी प्रति महिना इतका होता. मात्र, डिसेंबर महिन्यात त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन तो तब्बल ८८४ एमबी इतका झाला आहे. एकीकडे डेटाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, तर दुसरीकडे फोर-जी सेवांचा वेग वाढण्याऐवजी जवळपास १ एमबीपीएसने कमी झाला आहे. काही ग्राहकांना तर हा वेग १० केबीपीएसपेक्षाही कमीचा मिळत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे, तर दुसरीकडे फेसबुकने केलेल्या सर्वेक्षणाचा विचार केला तर देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला तब्बल ६७ लाख कोटी रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे. फेसबुकने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात सध्या ४६ कोटी नागरिक इंटरनेट सेवेचा वापर करतात. त्यापैकी ३७ कोटी मोबाईलद्वारे इंटरनेट सेवेचा वापर करतात, तर २१ कोटी ग्राहक फोर-जी सेवा वापरत आहेत. देशभरातील इंटरनेट सेवा देणार्‍या कंपन्यांनी आपल्या दरांमध्ये ६६ टक्क्यांची कपात केल्यास देशभरातील प्रत्येक पाच व्यक्तींपैकी चार व्यक्ती इंटरनेटचा वापर करतील, असे फेसबुकचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये याची अंमलबजावणी काही कंपन्यांनी केली देखील आहे. मात्र, याचा परिणाम म्हणजे ग्राहकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात वाढली आहे. यामुळे वेगवान इंटरनेटचा फायदा सामान्य ग्राहकांना पैसे देऊन देखील मिळत नाही.

 

आजकाल अनेक कंपन्या १५ एमबीपीएस, ४० एमबीपीएसच्या नावावर आपले इंटरनेटच्या पॅक्स ग्राहकांच्या गळी उतरवतात. मात्र, आज या कंपन्या ‘मेगा बाईट्स प्रति सेकंद’ नाही, तर ‘मेगा बिट्स प्रति सेकंद’च्या नावाखाली आपल्या इंटरनेट पॅकची विक्री करताहेत. ‘मेगा बिट्स प्रति सेकंद’ इंटरनेटचा वेग मोजण्याचे सर्वात लहान युनिट आहे. मात्र, शब्दांच्या खेळामुळे सामान्य ग्राहकांना आपण ‘मेगा बाईट्स प्रति सेकंद’या परिमाणात इंटरनेटचा वेग अनुभवतो आहोत, असा मोठा गैरसमज प्रचलित आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर एखादी कंपनी आपल्याला ३० मेगा बिट्स प्रति सेकंदाचा वेग देत असेल, तर प्रत्यक्षात आपल्याला ३.६२५ मेगा बाईट्स प्रति सेकंदाचा वेग मिळतो. म्हणजे शब्दांचे खेळ करून ग्राहकांची सर्रास लूट केली जात आहे. आज आपण प्रामुख्याने पाहिले तर जगभरात प्रत्येक मिनिटाला १ कोटी ५० लाख टेक्स्ट मेसेजेस केले जातात, तर प्रति ६० सेकंदाला ६.३८ लाख गेगाबाईट डेटाचे आदानप्रदान केले जाते, तर दुसरीकडे युट्यूबवर प्रत्येक मिनिटाला १३ लाखांपेक्षा अधिक व्हिडिओ पाहिले जातात. आज मोठ्या प्रमाणात जगभरात इंटरनेटचा वापर होत आहे, तर भारतातही इंटरनेटच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंटरनेटच्या दरातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परिणामी त्याचा वेगही मंदावलाच आहे. मात्र शब्दांचे खेळ करून कंपन्यांकडून होणारी ग्राहकांची पिळवणूकही थांबणे गरजेचे आहे.

- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.