पूजाताई कॉलेज मधून आल्या आल्या रघु आणि रजू तिच्या मागे लागले. “पूजा ताई! आजची गोष्ट सांग!”
“अरे! हातपाय तरी धुवून येऊ दे!” पूजाताई म्हणाली, “तुम्हा दोघांना फारच आवडायला लागल्या आहेत ज्ञानेश्वरीतल्या गोष्टी!”
“हो ताई! मागच्या वेळेसारखी मस्त हसायची गोष्ट सांग!”, रघु म्हणाला.
“रघुनंदना! सारखी कशी हसायची गोष्ट बरे? आज एक गंभीर गोष्ट सांगते! पुन्हा एकदा ज्ञानेश्वरांच्या काळातली.”
“म्हणजे १३ व्या शतकातील शेवटची २५ वर्ष. Right?”, रघु म्हणाला.
“Correct! इकडे महाराष्ट्रात ज्ञानेश्वर गीता सांगत होते. आणि तिकडे कर्नाटकात, उडुपी येथे मध्वाचार्य गीतेवर भाष्य लिहित होते. मात्र या दोघांच्या भाष्यातील फरक असा की मध्वाचार्यांचे भाष्य संस्कृत मधून होते आणि ते द्वैतमत प्रसारासाठी होते.”
“पूजाताई, मध्वाचार्य कोण होते?”, रघुने विचारले.
“मध्वाचार्य (ईस १२३८ - १३१७) एक महान संन्यासी होते. त्यांनी उडुपी मध्ये आठ मठांची स्थापना केली. तिथे त्यांनी स्थापन केलेले एक कृष्ण मंदिर देखील आहे. हातात रवी घेतलेली इथली कृष्णाची मूर्ती अतिशय मोहक आहे.
“व्यास मुनींनी गीता आणि ब्रह्मसूत्रे लिहिली. आधुनिक काळातील भारतीय तत्वज्ञानाचे तीन स्तंभ म्हणजे – आदि शंकराचार्य, रामानुजन् आणि मध्वाचार्य, या तिघांनीही व्यासांच्या गीता व ब्रह्मसूत्रांवर भाष्य लिहिले. परंतु प्रत्येकाने आपल्या भाष्यामधून - अद्वैत, विशिष्टाद्वैत आणि द्वैत मत मांडले.
“शंकराचार्यांचे अद्वैत मत म्हणजे – शिवोहं! मीच शिव आहे! मीच तो आहे! तत्वमसी. अर्थात प्रत्येकात देव आहे असे मत.
“शंकराचार्यांच्या नंतरचे रामानुजन् यांचे विशिष्टाद्वैत हे द्वैत आणि अद्वैत या दोन्ही मतांचा मध्य.
“तर त्यांच्या नंतरच्या मध्वाचार्यांचे द्वैतमत म्हणजे – मी आणि देव हे दोन वेगळे आहेत. भक्त देवाच्या जवळ पोहचू शकेल पण तो देव नाही, असे. या पंथात भक्तीयोगाला अनन्यसाधारण महत्व आहे.”
रजू लक्ष देऊन ऐकत होती. तिने विचारले, “ज्ञानेश्वर यापैकी काय सांगतात?”
पूजाताई म्हणाली, “ज्ञानेश्वर शंकराचार्यांच्या अद्वैतमताला धरूनच गीता सांगतात. ते म्हणतात की गीता समजून घेण्यासाठी मी शंकराचार्यांना वाट पुसली. त्यांची ही एक ओवी फार सुंदर रित्या द्वैत आणि अद्वैताबद्दल बोलते –
पै शून्य जै दावावे जाहले | तै बिंदुले एक केले |
तैसे अद्वैत सांगावे बोले | तै द्वैत कीजे || १३.८८८ ||
“शून्य जर दाखवायचा झाला, तरी ‘एक’ खुण, एक बिंदू काढावा लागतो. म्हणजे ‘शून्य’ लिहायला ‘एका’ आधार लागतो. तसेच अद्वैत सांगायला द्वैताचा आधार लागतो. कारण अद्वैत सांगायचे म्हणजे सांगणारा एक आणि ऐकणारा एक हवा! असे द्वैत नसते, तर अद्वैत अभ्यासणारी गुरु-शिष्य परंपरा कशी झाली असती? अद्वैताकडे जाणारी वाट, द्वैतातील निरुपणातून जाते!
“ज्या प्रमाणे गणित सोडवून झाल्यावर लिहिलेला ‘शून्य’ खोडून टाकला तरी चालतो, तसे परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर द्वैताची भाषा संपते.”