आपल्याकडे पाकचे हस्तक वा देशद्रोही म्हणून बघितले जावे, याची पुरेपूर काळजी विरोधकांनी घेतली आहे. साहजिकच प्रगती, राजकीय विचारसरणी, विकास असे मुद्दे बाजूला पडले असून ‘देशद्रोही विरुद्ध देशप्रेमी’ अशी संपूर्ण लोकसंख्येची विभागणी होत गेली आहे. यातून आपण मते व लोकांचा पाठिंबा गमावत चाललो आहोत, याचेही भान विरोधकांना राहिलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आता तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि या काळात त्यांनी काय साधले किंवा करून दाखवले, असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तर काहीही असले तरी भाजप विरोधकांना ते मान्य होण्याची शक्यता नाही. कारण ज्याला समजून घ्यायचे नसते, त्याला समजावता येत नसते. साहजिकच त्याला समजावण्यात आपला वेळ वाया घालविण्याची गरज नसते. त्यापेक्षा आपण काय साध्य केले वा अजून काय साध्य करायचे आहे, त्याचा ऊहापोह करण्यालाच प्राधान्य असले पाहिजे. एक नवे सरकार आले, मग त्याने काय केले असे प्रश्न नेहमी विचारले जातात. पण निवडणुकांच्या राजकारणात असलेल्या पक्षांना व नेत्यांना फक्त जनहिताच्या मागे लागून चालत नसते. त्यांना आपले राजकीय प्रभावक्षेत्रही वाढवावे लागते. आपला प्रभाव टिकवणेही भाग असते; किंबहुना विरोधातल्या शक्तींचे खच्चीकरण करण्यालाही प्राधान्य द्यावे लागत असते. सुदैवाने नरेंद्र मोदींना आपल्या कारकिर्दीत मनमोकळे सहकार्य देणारे विरोधी पक्ष व नेते मिळाले आहेत. प्रत्येक विरोधक व विरोधी पक्ष आपल्या परीने मोदींचा प्रभाव वाढण्यासाठी स्वत:ला खच्ची करून घेण्याचे योगदान मोठ्या प्रमाणात देतो आहे. म्हणून तर निवडणुका इतक्या सहजगत्या जिंकणे मोदींना शक्य झाले आहे. पहिले वर्ष मोदींना आपले स्थान दिल्लीच्या राजकारणात पक्के करण्यातच खर्ची पडले. नंतरच्या दोन वर्षांत मोदी खर्या कामाला लागले. आपले स्थान वा पक्षाची सत्ता जनमतावर विसंबून असल्याने, अधिकाधिक मतदार आपल्या बाजूला गोळा करण्याला प्राधान्य असते. मतदार अनेक कारणांनी तुमच्या बाजूला येतो किंवा तुमच्यापासून दुरावत असतो. त्यात दुरावणार्याला थांबवणे व दूर असलेल्यांना आपल्या जवळ आकर्षित करणे, महत्त्वाचे असते. यात विरोधकांचे मोठे सहकार्य मिळावे लागते.
यापूर्वीचे सरकार सत्तेत असताना त्यांनी जी राजकीय-सामाजिक परिस्थिती निर्माण केली, ती पोकळी भरण्यासाठी नव्या नेत्याची व राजकारणाची गरज त्यांनीच निर्माण करून ठेवली. मग ती पोकळी भरून काढण्यासाठी लोकांनी शोध सुरू केला. तेव्हा नरेंद्र मोदी हे दिल्लीबाहेरचे नाव पुढे आले. तेव्हा मनमोहन सरकार व सोनिया गांधी यांच्या अराजकाला वैतागलेल्या भारतीयांना पर्याय म्हणून मोदी पुढे आलेले होते. तरी ती लोकप्रियता त्यांना आधीच्या सरकारी नाकर्तेपणाने बहाल केलेली होती. साहजिकच कारभार चोख झाला तरी मतदार खूश राहणार, हे मोदींना कळत होते. त्यांनी काटेकोर कारभार करीत आपल्या हातून फारशा चुका होऊ नयेत, याची खूप काळजी घेतली. म्हणून तीन वर्षे उलटल्यावरही विरोधक मोदींवर कुठला आरोप करू शकलेले नाहीत. मोदी सरकारवर आरोप होऊ शकलेला नाही. पण म्हणून पुढली निवडणूक सोपी नसते. आपल्या गुणवत्तेपेक्षाही विरोधकांच्या नाकर्तेपणाला मतांमध्ये खूप मोठे स्थान असते. वर्षानुवर्षे कॉंग्रेसचे नाकर्ते सरकार भारतीयांनी चालवून घेतले. कारण, इतर पक्षांची अनागोंदी कॉंग्रेसी भ्रष्टाचारापेक्षाही भयंकर होती. त्या अनागोंदी व कॉंग्रेसी भ्रष्टाचारापेक्षाही सुखद सरकार मोदींनी चालवून दाखविले आहे. थोडक्यात इतर नाकर्त्यांपेक्षा उत्तमसरकार, असे मोदींचे मूल्यांकन होऊ शकते. दीर्घकाळ अनागोंदी असली मग काटेकोर कारभारही लोकांना उत्तमभासू लागतो. मोदींनी ती अपेक्षा पूर्ण केली आहे. पण मोदींच्या या लोकप्रियतेने त्यांचे विरोधक समाधानी नाहीत. त्यांना तर मोदींना अपूर्व लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाण्याची अनिवार इच्छा असावी. म्हणून विरोधकही मोदींना पुढल्या लोकसभेत अपूर्व बहुमत मिळावे, अशा तयारीला लागले आहेत की, आपल्या प्रामाणिक विरोधकांना मोदींनीच या कामाला जुंपले आहे? लोकांनी आपल्याला नाकारावे म्हणून विरोधक इतकी मेहनत, अन्यथा कशाला करीत असतील?
मागल्या दोन वर्षांत, म्हणजे प्रामुख्याने ‘पुरस्कारवापसी‘पासून सुरू झालेले नाटक बघितले, तर विरोधकांनी आपल्याला ‘राष्ट्रद्रोही’ ठरवून घेण्यासाठी कमालीची मेहनत घेतली आहे. नेहरू विद्यापीठातील मूठभर मूर्खांनी देशविरोधी घोषणा दिल्या आणि त्या मुलांना अटक करून भाजप सरकारने एक खेळी केली. वरवर बघता देशद्रोहाचा असा आरोप कोर्टाच्या कसोटीवर टिकणारा नसतो, पण त्यातून सरकारवर दडपशाहीचा मात्र मोठा आरोप होऊ शकत असतो. कन्हैयाकुमार वा अन्य कोणी खालिद या विद्यार्थ्यांना त्या आरोपाखाली पोलिसांनी पकडले, मग देशव्यापी गदारोळ विरोधी पक्ष करतील याची मोदींना खात्रीच होती. नाही तरी पुन्हा आणीबाणी येतेय, असा संशय व्यक्त केला जातच होता. तत्काळ मोदीविरोधी राजकारण्यांनी त्या घोषणाबाजांची तळी उचलून धरली. त्यांचा बचाव मांडायला कॉंग्रेसचे दिग्गज वकील कोर्टात धावले आणि राहुलसह केजरीवाल व डावे नेतेही नेहरू विद्यापीठात दाखल झाले. त्यातून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. पण देशातल्या सामान्य जनतेसमोर यातला प्रत्येक नेता व राजकीय पक्ष देशद्रोह्यांचा समर्थक असल्याची एक प्रतिमा तयार झाली. तिथून मग मोदी वा त्यांचे राजकीय सहकारी अशी खेळी करत गेले, की राजकारणात पुरोगामी वा सेक्युलर म्हणजे देशद्रोही वा पाकिस्तानवादी होत, अशी समजूत तयार व्हावी. गेल्या दोन वर्षांत तशी प्रत्येक संधी विरोधकांनी सोडलेली नाही. आपल्याकडे पाकचे हस्तक वा देशद्रोही म्हणून बघितले जावे, याची पुरेपूर काळजी विरोधकांनी घेतली आहे. साहजिकच प्रगती, राजकीय विचारसरणी, विकास असे मुद्दे बाजूला पडले असून ‘देशद्रोही विरुद्ध देशप्रेमी’ अशी संपूर्ण लोकसंख्येची विभागणी होत गेली आहे. यातून आपण मते व लोकांचा पाठिंबा गमावत चाललो आहोत, याचेही भान विरोधकांना राहिलेले नाही. मोदींनी तीन वर्षांत मारलेली ही सर्वात मोठी राजकीय बाजी आहे. वाजपेयी असताना किंवा १५ वर्षांपूर्वी भाजप किंवा हिंदुत्ववाद म्हणजे देशाचे विभाजन करणारी भूमिका विचारसरणी, अशी एक सार्वत्रिक समजूत तयार करण्यात आली होती. तत्कालीन तमाममाध्यमांतील बातम्या, चर्चा किंवा लेख विवेचन वाचले, तर देश हिंदुत्वामुळे धोक्यात असल्याचा पगडा दिसून येतो. आज ‘हिंदुत्वाचा धोका’ हा विषय कुठल्या कुठे अडगळीत गेला असून; सेक्युलर, पुरोगामी म्हणजे देशद्रोही, अशी एक सार्वत्रिक मानसिकता रुजत चाललेली आहे. पण अशा हिंदुत्वाला पंतप्रधान म्हणून मोदींनी चुकूनही खतपाणी घातलेले नाही. पण आपल्या डावपेचात किंवा कृतीमधून मोदी अशी काही खेळी करतात, की तमामपुरोगामी विरोधकांनी ‘हिंदुत्वा’च्या ऐवजी ‘राष्ट्रवाद’ किंवा राष्ट्रप्रेमाची खिल्ली उडवावी. देशासाठी प्राणार्पण करणार्या जवान सैनिकांच्या विरोधात सेक्युलर मतप्रदर्शन व्हावे, अशा गोष्टींचा सामान्य माणसाच्या मनावर मोठा परिणामहोत असतो. देशात किमान दोन कोटींहून अधिक माजी सैनिक आहेत आणि त्यांचे आप्तस्वकीय धरल्यास दहा कोटींच्या घरात तशी लोकसंख्या आहे. आपला कोणी सैनिक होता व त्याने देशासाठी प्राणाची बाजी लावण्यात आयुष्य खर्ची घातलेले असेल, तर सैन्याच्या विरोधात बोलणार्यांचे मूठभर बुद्धिमंत कौतुक करतील. पण हे सैनिकांचे दहा कोटी आप्तस्वकीय विरोधात जातील, याचे भान पुरोगाम्यांना राहिले नाही. म्हणूनच उत्तर प्रदेशात भाजपला मोठे यश मिळाले. या तीन वर्षांत मोदींच्या नावावर असलेला हिंदुत्वाचा टिळा पुसला गेला असून, देशाची एकात्मता व अखंडता टिकवणारा कोणी मसिहा, अशी प्रतिमा त्यांच्या विरोधकांनीच निर्माण करून दिली आहे. आपले विरोधक व प्रामुख्याने पुरोगामित्व मिरविणारे म्हणजे देशद्रोही, अशी परिस्थिती मोदींनी निर्माण करून ठेवली आहे. पंतप्रधान होण्यापूर्वीची मोदींची प्रतिमा आणि आजची प्रतिमा, यातला फरकच तीन वर्षांची कहाणी वा हिशोब स्पष्ट करणारा आहे.
- भाऊ तोरसेकर