दोन वर्षांमागे सोसायटीच्या दारात बोगनवेल लावली होती. ती वेल आता कमानीवर ऐसपैस पसरली आहे. दारात तिच्या खाली उभे राहिले, की ‘तीयाचीया वेलू गेला गगनावरी’ – असेच वाटते! वर्षाचे १२ महिने, हजारो फुलांची महिरप पांघरलेली कमान आल्या-गेल्याचे स्वागत करते.
गच्च फुललेल्या बोगनवेलीची डाळींबी आणि पांढरी फुले, डोळ्याचे पारणे फेडतात! एखादी झुळूक आली, की आतल्या रस्त्यावर त्या फुलांची बरसात होते. आणि मग भर रस्त्यात वाऱ्याबरोबर त्या कागदी फुलांचा पाठशिवणीचा खेळ सुरु होतो! एका संध्याकाळी मी तो नाचणारा रंगीबेरंगी गालीचा न्याहळत उभी होते. इतक्यात माझी शेजारीण गाडीवरून आली अन् म्हणाली, “किती कचरा पडतो नाही या फुलांचा?” त्या धक्क्यातून मी सावरायच्या आत ती भुरकन गाडीवरून गेली सुद्धा!
कचरा? इतका सुंदर रंगीत फुलांचा सडा म्हणजे कचरा?
काय मोहक दिसतो फुलांचा सडा! उन्हाळ्यात नीलमोहर, गुलमोहर, सोनमोहरच्या पायाशी पडलेला निळा, केशरी, सोनेरी सडा किती खुलून दिसतो! जाई, जुईच्या वेलीखालचा नाजूक सुगंधी सडा आणि प्राजक्ताचा पांढरा - केशरी गालीचा मन भरून टाकतो! सकाळी फिरायला जायच्या रस्त्यावर, प्राजक्ताची ७-८ झाडे आहेत. फिरून परत येतांना मी न चुकता दोन चार फुले वेचून आणते. माझ्या कृष्णासाठी.
त्या फुलांच्या सड्यासाठी सत्यभामा कृष्णावर रुसून बसली होती. किती समजूत काढली, तरी ती काही ऐकेना. शेवटी कृष्णाने स्वर्गात जाऊन, इंद्राकडून पारिजातकाचे रोप आणले. सत्यभामेच्या अंगणात लावले. हळूहळू ते झाड मोठे झाले, बहरले. पण त्याचा सडा पडला शेजारी रुक्मिणीच्या अंगणात! मग काय? सत्यभामा पुन्हा रुसली. कृष्ण पुन्हा इंद्राकडे गेला. पुन्हा एक रोप आणले. या वेळी ते रोप रुक्मिणीच्या अंगणात लावले. या झाडाच्या फुलांचा सडा एकदाचा सत्यभामेच्या अंगणात पडला! मग कुठे राणी सरकार खुश झाल्या!
युगानुयुगे मनाला भुरळ घालणाऱ्या, फुलांच्या सड्याला माझी शेजारीण ‘कचरा’ कसे काय म्हणाली? अजूनही कोडे सुटत नाहीये.
मागे एक झेन गोष्ट वाचली होती. ती अशी होती की – एक झेन गुरु होते. त्यांच्या आश्रमाची एक लहानशी बाग होती. त्यांनी शिष्याला बागेची स्वच्छता करायला सांगितले. त्या शिष्याने बागेची साफसफाई केली. वाळलेले एक एक पान गोळा करून कुंपणा बाहेर टाकून दिले. बाग स्वच्छ झाल्यावर त्याने गुरूंना बोलावून आणले, आणि त्यांना विचारले, “कशी दिसत आहे बाग?” झेन गुरूंनी बागेवर एक नजर फिरवली. आणि काही न बोलता, बागेतली २-४ झाडे गदागदा हलवली. त्या झाडांची वळलेली पाने इतस्त पसरली. मग ते प्रेमाने बागेकडे पाहून म्हणाले, “हं! आता बाग छान दिसत आहे!”
निसर्गावर प्रेम करणाऱ्याला, झाडाखालचा फुलांचा सडाच काय, झाडाखाली पडलेला पाला पाचोळा पण सुंदर दिसतो. त्याच्या सळसळ आवाज, त्याचे मातीचे रंग, त्यावरून कुरकुरीत चालण्याचा फील, त्याचे वाऱ्यावर धावणे आणि नंतर त्याचे मातीत मिसळून जाणे, सगळंच सुंदर आहे. पानाच्या जीवनचक्रातली ही एक महत्वाची घटना आहे. वाळेलेले पान झाडाच्या पायाशी पडते, उन्हात मातीला सावली देते, मातीची धूप कमी करण्यास मदत करते, जमिनीतले पाणी बाष्पीभूत होण्यापासून वाचवते, यथावकाश मातीत मिसळते आणि आपली द्रव्ये मातीत विसर्जित करते. ती पोषक द्रव्ये झाड शोषून घेते. आणि तेच वैभव नवीन पालवीच्या रूपाने पुन्हा फांदी फांदीवर फुलते!
असा पाला पाचोळा झाडाखाली पडून राहिला तर काय हरकत आहे? झाडाचे, मातीचे पोषण करणारा पालापाचोळा का नाकारावा? झाड हवं, पानं हवी, फुलं हवी, फळे हवीत पण पाला पाचोळा नको! असं कसं चालेल?
होते कसे, की परिसर चकाचक दिसण्यासाठी - पाला पाचोळा एकत्र करून, शक्यतो एखादे छानसे झाड पाहून, त्या खाली जाळला जातो. त्या धगीने झाड होरपोळून जाते. कैक दिवस नेहेमीचे पक्षी सुद्धा त्या झाडाकडे फिरकत नाहीत. पोषक पाचोळा नष्ट होतो. हवा प्रदूषित होते. आणि ते जळण कसल्याच कामी येत नाही. असली ‘स्वच्छता’ काय कामाची?
जैव कचऱ्याची काळजी घ्यायला निसर्ग समर्थ आहे! तिथे आपण लुडबुड न केलेलीच बरी!
आपल्याला काळजी घ्यायची आहे ती फक्त आपण तयार केलेल्या कचऱ्याची! प्लास्टिक, रबर, थर्माकोल, पुठ्ठे, कागद, कपडे, काच, राडारोडा, जुने फर्निचर, जुन्या गाड्या, जुन्या चपला, सिरामिक अशा न संपणाऱ्या जंत्रीची काळजी घ्यायची आहे.
संपूर्ण आवार नाही, पण एखादा लहानसा कोपरा पालापाचोल्यासाठी ठेवावा. एक चारचाकी गाडी पार्क करायला लागते तितकी जागा पाचोळ्यासाठी राखून ठेवावी. मातीत पडून राहील! कुजून जाईल! बागेसाठी छान खत होईल. बाग बहरली की, फुलांचा वर्षाव करेल. मग सकाळी येणारा एखादा सफाई कामगार तो ‘कचरा’ झाडून आवार स्वच्छ करेल. आणि बहरलेली बाग संध्याकाळी नवीन नक्षीचा रंगीत गालीचा अंथरेल!
- दिपाली पाटवदकर