वेध- आता उभं तरी कुठं रहायचं?

Total Views |


देशभरात कॉंग्रेसला झटक्यांवर झटके लागण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांना आता आपण उभं तरी कुठे राहायचं? हा प्रश्न नक्कीच पडला असेल. १० वर्षे केंद्राचा हाकलेला गाडाही गेला, त्यापाठोपाठ राज्यही गेली आणि आता उरल्यासुरलेल्या पालिकाही हातातून निसटू लागल्या आहेत. शुक्रवारी समोर आलेल्या निकालानंतर कॉंग्रेसचा गड समजला जाणारी लातूर महानगरपालिकाही कॉंग्रेसच्या हातातून अखेर निसटलीच! कॉंग्रेसचा गड समजल्या जाणार्‍या लातूर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले.

लातूर हा खरं तर कॉंग्रेसचा बालेकिल्ला. लातूर नगरपालिकेच्या स्थापनेपासून १९९५ सालचा अपवाद वगळला तर या ठिकाणी कायमच कॉंग्रेसचे वर्चस्व होते. लातूर, कॉंग्रेस आणि विलासराव देशमुख असे एक समीकरणच तयार झाले होते. मात्र, विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरचंही नेतृत्व त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख यांच्याकडे गेलं. दोन वेळा विधानसभेवर निवडून गेल्यानंतर मात्र आता पालिकेसाठी लातूरकरांनी त्यांच्या नेतृत्वाला सपशेल नाकारलं. गेल्यावर्षी लातूरमध्ये दुष्काळाने त्राही त्राही केली होती. मात्र, यावेळी राज्यातील भाजप सरकारच्या अनेक योजनांमुळे लातूरकरांची तहानही भागली. यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपने कॉंग्रेसच्या गडाला सुरूंग लावला होता. यावेळची निवडणूक जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख यांच्या प्रतिष्ठेची होती. मात्र, यामध्ये पालकमंत्र्यांनी बाजी मारत कॉंग्रेसचा सुपडा साफ केला. सर्वच ठिकाणांहून कॉंग्रेसचे नेतृत्वही ढासळत चालल्याची पुनरावृत्ती या ठिकाणी लातूरमध्ये पाहायला मिळाली. मात्र, आता भाजप ’कॉंग्रेसमुक्त भारत’ करण्याच्या दिशेने योग्य वाटचाल करत असल्याचेही दिसत आहे. मधल्या काळात जगभरातील भ्रष्ट राजकीय पक्षांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातही कॉंग्रेसने अगदी पहिल्या पाचात येण्याचा मान मिळवला होता. जिथे सगळ्या कामांचं श्रेय लाटण्यासाठी कॉंग्रेस पुढे येत असते, मात्र यानंतर कॉंग्रेसचा कोणताही नेता याचं श्रेय लाटण्यासाठी पुढे आला नाही.

आता जनतेलाही याची जाणीव झाल्यामुळे कॉंग्रेसचं नेतृत्व सर्वच ठिकाणांहून हळूहळू झिडकारलं जाऊ लागलं. आता कॉंग्रेसला नेतृत्वबदल करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची जास्त गरज आहे. आगामी काळात उरल्यासुरलेल्या ठिकाणाहूनही कॉंग्रेसचं नाव पुसलं जाईल यात काही शंका नाही. आता कॉंग्रेसच्या नेत्यांनाही ‘आपण उभं तरी कुठे राहायचं?’ हा प्रश्न नक्कीच सतावत असेल.

 

- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.