समाजाने घ्यावी छोटे शेतकरी आणि महिलांसाठी समुचित कृषी तंत्रज्ञान प्रसाराची जबाबदारी
सुनील शिंदे, जालना जिल्ह्यातील आजचा प्रगतीशील शेतकरी. पण काही वर्षापूर्वी त्यांची परिस्थिती सर्वसाधारण छोट्या शेतकऱ्यांची जी स्थिती असते तशीच होती. त्यातच एकवर्षी बैल जोडीतील एक बैल अचानक गेला. शेतीची कामे कशी करायची हा प्रश्न समोर उभा होता. दोन बैलांनी सगळी काम करायची पारंपारिक सवय. त्यामुळे प्रश्न फक्त तांत्रिक नव्हता, तो सवयीचा पण होता. पण गरज ही शोधाची जननी असते. त्याने एका बैलाने चालणारे वखर बनविले. वखर हे शेतीतील कामांना उपयुक्त औजार आहे. हे सगळ बनवलं त्याच्याकडील भंगार सामानातून. त्यामुळे त्यालाच नाही तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला. एक बैल असलेले शेतकरी पण अशा यंत्राचा वापर करून शेतीची कामे वेळेत करू लागले. सुनिलनी पुढे एक बैल वापराची व अन्य अशी २० हून जास्त प्रकारची औजारे बनविली.
२०१३ साली टेक फॉर सेवा या सेवा कार्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर संबंधी कॉन्फरन्ससाठी योजकने अश्या जमिनी वरील शास्त्रज्ञांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि काय आश्चर्य !!!! महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अशी नररत्ने मिळाली. स्वतः च्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रयोग करीत, साध्या साध्या गोष्टीतून त्यांनी औजारे बनविली. बाबाराव जाधवांचे सऱ्या पाडण्याचे औजार, लक्ष्मण दळवींचे भात लावणी यंत्र, अनिल पटेलांचे मोटार सायकलवरील फवारणी यंत्र, रवींद्र खर्डे यांचे ज्वारी पेरणी यंत्र अशी बरीच यंत्रे होती. एक ७० वर्षाचे तरुण आहेत दादा वाडेकर. ठाणे जिल्ह्यातील वाडा या गावी हे रहातात. यांनी आत्तापर्यंत ४० हून अधिक अशी यंत्रे बनविली आहेत. अश्या १६ यंत्रांचे एक कीट त्यांनी बनविले आहे जे शेतातील बहुतेक कामे करतील. ही सगळी यंत्रे हातांनी चालवायची आहेत. किंमत फक्त २००० च्या आसपास. यात काही विळे वगैरे सारख्या गोष्टी तर खास डावखुऱ्या लोकांसाठी बनविल्या आहेत. अश्या ४० हून अधिक ‘bare foot scientist’ पर्यंत आम्ही पोहोचू शकलो. अजूनही असतीलच. आमचे प्रयत्न कमी पडले. हे सगळे शास्त्रज्ञ आपापल्या परीने, उपलब्ध साहित्यात खऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचे असे म्हणणे नाही की, आम्ही बनवलेलं सगळ चांगल आहे. सुधारणेला वाव आहे बराच. पण त्यसाठी कोणतीही मदत त्यांना नाही. शेती सांभाळून ते हे करतात, तांत्रिक ज्ञानाची कमतरता आहे, आधुनिक साधनांची मदत नाही. ती कशी मिळेल अश्या विवंचनेत ते आहेत.
महिलांचे शेतीतील योगदान व त्यांचे प्रश्न हा तर खरा महत्वाचा विषय. पण आधुनिक शेतीकरणात त्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही. चैतन्य संस्थेच्या कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात तसेच देशभरातील कृषी विद्यापीठांच्या एकत्रित अभ्यासात असे दिसून आले आहे की शेतीतील बहुतांशी कष्टाची कामे महिलाच करतात. यातून त्यांचे आरोग्याचे प्रश्न तयार होतात. अवजड भारे उचलल्याने होणारे मान व पाठीचे दुखणे, योग्य वेळी आणि योग्य आहार न मिळाल्याने होणारे कुपोषण व इतर आजार, मळणी, कापणी करताना होणारे हातांचे आजार, सतत उन्हात काम करायला लागून होणारी सतत डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, हात पायाल मुंग्या येणे असे वेगवेगळे प्रश्न त्यांच्या समोर आहेत.
शेतीतील महिलांना वाटणारी कष्टाची कामे-
सतत एक सारखे काम करायला लागणे - | मका सोलणे इत्यादी |
किचकट कामे करायला लागणे - | धान्य साफ सफाई , बियाणे पेरणी |
एका वेळी खूप ताकद लागणारी कामे - | भारे उचलणे |
उन्हात खूप वेळ लागणारी कामे - | शेत तयार करणे, निंदणी |
विविध कष्टाची कामे व त्यामुळे तयार होणारे आरोग्याचे प्रश्न याचा थेट परिणाम शेतीतील कार्यक्षमतेवर आणि त्यातून उत्पादन, उत्पन्न यावर सुद्धा. तसेच एकूणच घराचे स्वास्थ्य बिघडते, आरोग्यावर अधिक खर्च करावे लागतात. कष्ट, अनारोग्य, आर्थिक ओढाताण याच एक दुष्ट चक्र तयार होत ज्यातून बाहेर पडण कधी कधी अशक्य बनत.
कृषी विद्यापीठे व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत विविध संस्था यांनी मोठ्या प्रमाणात अभ्यास करून अशी अनेक यंत्रे शोधली आहेत. ज्याचा उपयोग छोट्या शेतकऱ्यांना व महिलांना होऊ शकतो. पण अशी यंत्रे गरजूंपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा मात्र उभी राहिली नाही. एक उदाहरण घेऊ. सगळ्या जनजाती क्षेत्रात मका हे मुख्य पिक आहे. मका सोलून त्याचे दाणे काढणे हे एक मोठे काम महिलांचे असते. आपल्या घरात एक दोन कणसाचे दाणे काढणे वेगळे आणि एकर भर मक्याच्या कणसाचे दाणे काढणे वेगळे. तर मका सोलताना महिलांचे हात रक्ताळून जातात. त्यामुळे हाताने सोलायचे मका सोलणी यंत्र हे या महिलांसाठी वरदानच आहे. अश्या यंत्राचे संशोधन झाले आहे. थोड्या प्रमाणात उपलब्ध आहेत पण संशोधन केंद्रात. किंमत किती, तर ६० रू. गावागावातील ज्या कृषी सेवा केंद्रावर शेतकरी अवलंबून आहेत तिथे मात्र हे मिळत नाही. हे एक उदाहरण आहे. अशी अनेक देता येतील. ते का मिळत नाही? याचा अभ्यास करणारी, त्यातून मार्ग काढणारी व्यवस्था आज अस्तित्वात नाही असेच म्हणावे लागेल. जी व्यवस्था आहे तिला अश्या छोट्या गोष्टीत किती रस असेल याचा पण अभ्यास करण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांना माफक गुंतवणुकीत औजारे मिळावीत यासाठी सरकार एक मोठे मिशन चालवते. एका औजार बँकेला १० लाख रू पर्यंत अनुदान मिळते. औजार बँक म्हणजे शेतीला लागणारी वेगवेगळी औजारे भाड्याने देण्यारी गावातील संस्था. अश्या बँकांमुळे प्रत्येक शेतकऱ्याला औजारे विकत घ्यावी लागत नाहीत व पैसे वाचतात. पण त्यात औजारे व यंत्रे कसली मिळतात? बहुतांश ट्रॅक्टर चलित. याचा छोट्या आणि जनजाती भागातील शेतकऱ्यांना काही उपयोग नाही. कारण याची शेती उतारची, छोट्या तुकड्यात पसरलेली. बर हा जास्त करून पारंपारिक अन्न धान्य पिकच घेतो. त्यामुळे अशी मोठी यंत्रे परवडायला पण पाहिजेत. म्हणायला आज दूरदूर ट्रॅक्टर पोहोचलाय पण त्याचा शेतीत किती उपयोग होतो हा प्रश्नच आहे. सध्या याच एक छोट रूप – मिनी ट्रॅक्टर आला आहे पण तोही छोट्या शेतकऱ्याच्या कुवतीच्या बाहेर आहे.
मग शेतीतले हे प्रश्न सोडवणार कसे? कारण यांचा कोणी वाली नाहीये. पण काही जण प्रयत्नरत आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतला एक तरुण सामाजिक उद्योजक नवापूर तालुक्यात छोट्या शेतकऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या यंत्रांसाठीचे बिझनेस मॉडेल तयार करतो आहे. यासाठी त्याने स्थानिक मुख्य जी पिके आहेत भात व डाळी यासाठीची रचना व प्रयोग सुरु केले आहेत. डिजिटल ग्रीन सारखे इंटरनेट आधारित शिक्षण प्रकल्प अश्या यंत्रांचे व्हिडीओ प्रसारित करीत आहेत. कृषी विज्ञान केंद्रे त्याच्या परीने प्रयत्न करीत आहेत. पण ते पुरेसे नाहीत.
हीच परिस्थिती गाव पातळीवरील प्रक्रिया उद्योगाची आहे. प्रक्रिया उद्योग उभारले गेले पाहिजेत अशी चर्चा सगळीकडे होते. पण चर्चा करताना मोडेल समोर मेगा फूड पार्कचे असते. मोठ्या प्रकल्पांच्या काही अंगभूत मर्यादा असतात. अश्या प्रकल्पांना पायाभूत सुविधा अत्युच्च प्रकारच्या लागतात. तसेच ते चालविण्यासाठी अतिकुशल मनुष्य बळाची आवश्यकता असते. भारतासारख्या बहुविध देशात अश्या सुविध्नाची वानवा आहे. पण आपल्याला मोठ्याच एवढ आकर्षण आहे की छोट काही पटतच नाही. हेच बघा ना. भात हे आपल एक मुख्य पिक आहे. पण भात पिकवणाऱ्या भागात (पंजाब व आजूबाजूचे सोडून) साधारण १० किमी ते ४५ किमी एवढ्या दूर भात गिरण्या आहेत. गावागावात जे हलर आहेत त्यामध्ये एवढी तुट होते कr, त्या पेक्षा दूर गिरणीत गेलेल बर. पण यात होत काय वेळ, श्रम व मुख्यतः अन्नाची पोषकता सगळ घालवून बसतो. त्यासाठी सध्या काही परदेशी व देशी भात गिरण्या मिळतात. पण यांना आपल्या संशोधन व्यवस्थेची मान्यता नाही. नंदुरबार मधील खांडबारा परिसरात अश्या ८-१० गिरण्या उत्तम रीतीने चालत आहेत. महिला बचत गट व जनजाती तरुणांनी यातून स्वतःच्या घराला रोजगार दिला आहे. त्याच जोडीला गावातील प्रत्येकी १०००-१५०० महिलांचे श्रम कमी केले, वेळ वाचवला. तांदूळ साठविण्याऐवजी साठवायला सोपी अशी साळ साठविता येऊ लागली. जे पूर्वी साळ विकत होते असे काही जण तर तांदूळ विकायला लागले. सालीच्या दुप्पट भाव मिळतो तांदळाला. या सगळ्या प्रयत्नातून गावाचा पैसा गावातच राहिला, नवीन पैसा आला. उरलेला वेळ इतर कामात महीला देऊ लागल्या. या गिरण्या त्यांनी समाजाने दिलेल्या आर्थिक मदतीवर घेतल्या आहेत. ते पैसे परत फेडण्यास पण त्यांनी सुरुवात केली आहे. यामुळे जनजाती भागात कर्ज फेडत नाहीत हा भ्रम दूर होण्यास पण मदत मिळते आहे. पण उद्या अर्थ पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेला म्हणजे बँकांना हे दाखवून कर्ज द्या म्हटलं तर अश्या मशिनच्या सरकारी मान्यतेचा मुद्दा पुढे येईल? म्हणजे येरे माझ्या मागल्या.
त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी समाजालाच पुढे यावे लागेल. अश्या जमिनीवरील शास्त्रज्ञाना मदत करण्यासाठी समाजाच्या मदतीने चालणारी डिझाईन केंद्रे बनवायला हवी. यांची औजारे अजून अचूक, कमी वजनाची, स्वस्त बनवता येतील का? या विषयी पण अशी केंद्रे मदत करू शकतात. तांत्रिक डिझाईन क्षेत्रात काम करणारे तरुण यासाठी आपला वेळ सेवा म्हणून देऊ शकतात. या औजारांचा व्यावसाय करण्यासाठी गावातीलच फैब्रिकेटर व इतर तरुणांना मार्गदर्शन व आर्थिक मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी अश्या लोकांना सहाय्य करतील अश्या incubation centre सारख्या व्यवस्था करण्याची गरज आहे. सध्या कंपन्या आपले सामाजिक उतर दायित्व पूर्ण करण्यासाठी पुढे येत आहेत. अश्या प्रकारचे डिझाईन, संशोधन केंद्रे तसेच incubation centre उभारण्यासाठी, चालविण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. ग्रामीण भागात कृषी प्रक्रिया उद्योग गावातच सुरु करण्यासाठी मुद्रा बँकेसारख्या योजने मध्ये विशेष विभाग व त्यासाठी बँकांना विशिष्ट उद्दिष्ट्ये देण्याची गरज आहे. ग्रामीण तरुण शहरात येऊन झोपडपट्टी व रस्त्यावर रहात आहे. त्या विषयी फक्त सहानभूती बाळगून किंवा त्यांना दोष देऊन प्रश्न सुटणार नाही. या तरुणातील कित्येक जण शहरातील विविध समस्यांमुळे परत गावमध्ये जाण्याच्या, राहण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना साथ हवी आहे समाजाची. ती जितकी मिळेल तितका गाव-शहरातील भेद कमी होत जाईल. पंडित दीनदयाळ उपाध्यायानी सांगितलेला अंत्योदय दुसरा तिसरा काही नसून अश्याच समाजाच्या अंतिम घटकाच्या प्रश्नाचे निराकरण करणे व त्याला आपल्या पायावर उभे करणे आहे.
- कपिल सहस्त्रबुध्दे