अवंती: मेधाकाकू... अग आजपर्यंत आपण वाचलेल्या सगळ्या म्हणींमध्ये सगळे कसे धूर्त-लबाड-कांगावखोर-फसव्या स्वभावाचेच प्राणी आणि व्यक्ती भेटले मला...!!! आता मी विचार करत्ये की सगळे असेच का....?? सुस्वभावी-सज्जन असे कोणी भेटणारच नाही का....?? अनेक शतकांपासून या म्हणींमधे उत्तम गुणवत्तेची नोंद केली गेली असेलाच ना...!!!
मेधाकाकू: अवंती किती मस्त मुद्दा मांडलायस.... अगदी योग्य निरीक्षण आहे तुझे. आता पुढच्या पानावरचीच म्हण वाच आणि तूच त्याचा अर्थ मला समजाऊन सांगायचा प्रयत्न कर पाहू...!!
उरी केश माथा टक्कल.
अवंती: ओहो.... ओके... कूल... काकू... अग.. पुन्हा एक बाऊन्सर आहे माझ्यासाठी.. पण मी आज नक्की प्रयत्न करते. आता बघ मेधाकाकू..... उरी केश हे काही लक्षात येत नाहीये पण मात्र माझा अंदाज आहे की हे एखाद्या पुरुषाचे वर्णन असावे. याचे कारण असे की टक्कल असलेला फक्त पुरुषच असू शकतो, ना....!!!
मेधाकाकू: ठीक विचार करत्येस तू आज अवंती, म्हणींतील रूपकांचा अर्थ लावायची ही तुझी पद्धत योग्यच आहे. हे खरोखर एखाद्या पुरुषाचेच किंबहुना एका वत्सल पित्याचे वर्णन आहे. असे बघ, उर म्हणजे छातीचा भाग आणि पुरुष जेंव्हा आपल्या लाडक्या-छोट्या मुलाला प्रेमाने जवळ घेतो तेंव्हा त्याला छातीशी कवटाळतो. आता यात ‘उरी केश’ हे दोन शब्द प्रेमळं वडिलांच्या उबदार स्पर्षाचे रूपक आहे. पण या म्हणींच्या पुढील दोन शब्दांची गम्मत वेगळीच आहे. या वडिलांच्या उरी भरपूर केस आहेत आणि हा पुरुषांचा शरीरधर्म आहे. मात्र या म्हणीतले पुढचे दोन शब्द आहेत ‘माथा टक्कल’. आता याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, डोक्यावरील केसांचा पूर्ण अभाव म्हणजे अर्थातच या वडिलांचे टक्कल. एका अर्थी डोक्यावरचे टक्कल हे सामान्य बुद्धिमत्तेचे रूपक किंवा लक्षण समजले जाते मात्र वास्तवात तसे अनुमान काढता येत नसते.
तर थोडक्यात असे की परंपरेने रूढ झालेल्या या म्हणीत ‘उरी केश’ हे प्रेमळ मनाचे रूपक तर ‘माथा टक्कल’ हे सामान्य बुद्धीचे रूपक. यातला मथितार्थ असा की सामान्य बुद्धीच्या पण मनाने प्रेमळ असलेल्या सदगृहस्थाचे वर्णन ह्या म्हणीत केले आहे.
अवंती: एकदम सही... काकू.... माणसाच्या शरीर लक्षणांचा किती समर्पक वापर रूपक म्हणून केलेला दिसतोय आपल्याला आणि यातूनच कुटुंबातील व्यक्तीची, लहानांप्रती असलेली वत्सल भावनाही पोहोचते आपल्यापर्यंत. पण आता पुढच्या म्हणींत आपण एकदम गणितात शिरलोय की काय....???
नाकी नऊ आले.
मेधाकाकू: आता शब्दार्थ वाचून या म्हणींत तुला गणिताची आठवण येणे साहजिक आहे पण आता लक्षपूर्वक ऐक...!! प्रत्येक व्यक्तीचा जीव शरीरात दहा ठीकाणी असतो असे एक गृहीतक प्रचलित आहे. कोणाचाही मृत्यू जवळ आला की प्रथम या दहा जीवांचा हळूहळू नाकावाटे मृत्यू होतो अशी लोकश्रुति म्हणजे समजूत समाज मनात असते. यातला नववा जीव मृत्युच्या आधी नाकात येतो, त्या क्षणाचेच वर्णन या म्हणींत केले असावे. या अशाच लोकश्रुतिनुसार नाकाने घेतला जाणारा श्वास हा दहावा आणि शेवटचा जीव असे समजले जाते. “नाकी नऊ आले” म्हणजे आता शेवटचा एकच जीव शिल्लक, म्हणजे मृत्यू समीप येण असा या म्हणीचा अर्थ पारंपारिक असून गेली काही शतके मराठी भाषेच्या बोली आणि लेखी व्यवहारात प्रचलित आहे. दुसर्या अर्थाने अनेक अडचणींना सामोरे जाणार्या, खंतावलेल्या व्यक्तीचे आणि त्याच्या परिस्थितीचे हे रूपक आहे. वर्तमानात हा अर्थ अशा रीतीनेच घेतला जातो तो असा.... “नाकी नऊ येणे” म्हणजे सततच्या अडचणींमुळे दैनंदिन जीवन असह्य होणे.
अवंती... शरीरधर्म आणि व्यक्तिगत अनुभव यांची रूपकांच्या माध्यमातून सुरेख सांगड घालणारी मी तीन शब्दांची विलक्षण मांडणी, आता तुला नाकीच आवडेल.
- अरुण फडके