‘‘काय करावे, कुठे करावे, कधी करावे, कुणी करावे, का करावे, कसे करावे... अभ्यासूनी हे कार्य करावे... थोडे थोडे सतत तुम्ही बदल करूनी कार्यामध्ये सुंदर सुंदर सुबक चांगले कार्य साधावे आपुले...’’ नाही...नाही, या कोणा कवीच्या काव्यपंक्त्या नाहीत. मात्र, आपल्या आयुष्यात आपल्याला अशक्य असं काहीच नाही. प्रयत्न केले तर सर्वकाही आपण साध्य करू शकतो. एखाद्याला गद्यापेक्षा पद्याची भाषा लवकर समजते. म्हणूनच आपली आगळीवेगळी कार्यशैली पद्याच्या माध्यमातून स्वतः आत्मसात केलेले आणि इतरांना सहजरित्या समजवणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व म्हणजे वसई-विरार क्षेत्रातले नावाजलेले आणि जागतिक कीर्तीचे डॉक्टर दीपक देसाई...
एखादी गोष्ट जर आपण एखाद्या वेगळ्या, कल्पक पद्धतीने समजावली तर ती समोरच्याला लगेच समजते. म्हणूनच गद्याऐवजी पद्याचा वापर करून मोठ्यात मोठ्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने उलगडून सांगण्याची कला अवगत करणारे डॉ. देसाई. आणि याची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केली. एखादी गोष्ट आपण नियोजनबद्ध पद्धतीने केली, तर ती नक्कीच पूर्ण होते हे त्यांनी आत्मसात केले. तेव्हा, पद्य आणि गद्याचा असा अनोखा ताळमेळ साधणारे डॉ. दीपक देसाई यांचे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व.
डॉ. दीपक देसाई यांचा जन्म८ डिसेंबर १९५३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचवली या गावी झाला. गावाकडची स्वछंद जीवनशैलीच त्यांना अतिशय प्रिय. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झाले. मात्र, त्यांचे वडील मुंबईत नोकरीला असल्यामुळे देसाई कुटुंबही या महानगरात स्थायिक झाले आणि हाच निर्णय त्यांच्या जीवनाला सर्वार्थाने कलाटणी देणारा ठरला. गावाकडची शाळा मध्यातूनच सोडावी लागल्याने मुंबईतल्या शाळेतही त्यांना उशिरा प्रवेश मिळाला. गावची शाळा म्हणजे दिवसा शाळेत गुरूजी शिकवत आणि रात्रीच्या वेळी नक्षत्र दाखवणं, जंगलाकडची माहिती देणं असं निसर्गाच्या सान्निध्यातलं हसतखेळत शिक्षण. पण मुंबईतील शालेय जीवन चार भिंतीत बंदिस्त. एकूणच देसाई यांच्या अभ्यासावर ग्रामीण-शहरी शालेय शिक्षणाच्या दरीचा खोलवर परिणामझाला आणि पाचवीत पहिल्यांदा ‘नापास’चा शिक्काही बसला. मात्र, दोनच विषय राहिल्याने त्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात आले. हे सांगताना हीच परंपरा आपण सातवीपर्यंत कायमठेवल्याचंही ते काहीसं स्मित करत सांगतात. ते सकाळी नेहमीप्रमाणे शाळेसाठी घराची पायरी ओलांडत, पण शाळेत न जाता राणीच्या बागेतच त्यांचे मन रमू लागले. कसेबसे आठ दिवस त्यांनी असेच निभावून नेले. पण याच नाउमेदीच्या आठ दिवसांमध्ये त्यांच्या आयुष्याला कायमची कलाटणी देणारे काही प्रसंग घडले. राणीच्या बागेतील पशुपक्षी, फुलझाडांकडून बरंच काही शिकायला मिळाल्याचे देसाई आनंदाने सांगतात. वृक्षवल्लींप्रमाणे आपणही आपल्या जीवनात व्यवस्थापनाचे बीज रोवून आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, हा आत्मविश्वास त्यांच्या मनात जागृत झाला. या निसर्गातील व्यवस्थापन कौशल्याप्रमाणेच आपले आयुष्य सुनियंत्रित करुन यशोशिखर गाठायचेच, या दृढ निश्चयाने ते अभ्यासाला लागले. त्यांच्याच वर्गातल्या एका मुलाने दिलेल्या विश्वासाच्या जोरावर ते शालांत परीक्षेत शाळेतून तिसरे आले.
त्यानंतर देसाई यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करायचा असा मनोमन ठाम निर्धार करत मुंबईतील रूईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण जर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला नाही, तर वनस्पतीशास्त्र किंवा प्राणिशास्त्राचे शिक्षण घेऊन प्राध्यापक होण्याचा पर्यायही देसाई यांनी खुला ठेवला होताच. पण सुदैवाने तशी वेळ आली नाही आणि त्यांना मेडिकलला प्रवेश मिळाला. मेडिकलच्या तिसर्या वर्षाला ’स्त्रीरोग’ या विषयात देसाई यांना अपयशाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पुन्हा आपल्या मनाचा निग्रह करून आणि अहोरात्र अभ्यास करून ‘स्त्रीरोग’ या विषयातच प्राविण्य मिळवायचे त्यांनी ठरवले. त्यानंतर मुंबईतील कांदिवली येथे त्यांनी काही काळ नोकरी केली. यानंतर त्यांनी विरारला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने त्यांच्यासमोर निर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. त्यावेळी कुटुंबीयांनी आणि मित्रांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर त्यांनी विरारमध्येच आपलं छोटं हॉस्पिटल सुरू केलं आणि त्याचेच आज त्यांनी सुसज्ज अशा रुग्णालयात रूपांतर केले आहे. काम करायची, कष्ट करण्याची त्यांच्यात ताकद होती. निसर्गाचा अभ्यास असल्यामुळे सततच आपण काय करतोय किंवा आणखी चांगलं कसं करता येईल, या गोष्टींवर त्यांनी भर दिला. हळूहळू सायकलपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास त्यांच्या कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावर मर्सिडीजपर्यंत जाऊन पोहोचला.
_H@@IGHT_613_W@@IDTH_613.jpg)
कामाच्या संदर्भात अनेक पुस्तके वाचताना त्यांच्या वाचनात एक दिवस ’कायझेन’ नावाचे एक व्यवस्थापन कौशल्याचे पुस्तक आले. त्यावेळी त्यांनी हेच व्यवस्थापनाचे तत्वज्ञान आपल्या आयुष्यातही लागू करण्याचे ठरवले. आपल्या डॉक्टरी पेशात याच व्यवस्थापनाच्या तत्वज्ञानाच्या कौशल्याचा वापर करुन देसाई यांनी सिझेरिअनसारख्या शस्त्रक्रिया ज्यामध्ये ४५ ते ५० मिनिटं लागतात, त्या त्यांनी १० ते १५ मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचे तंत्रज्ञान अवगत केले. त्यांनी आपली ‘एक्स्ट्रा पेनिट्रोनिअल सिझेरिअन’ पद्धत विकसित केली. याच तंत्रज्ञानामुळे आज त्यांचे भारत आणि जगभर नाव परिचयाचे झाले आहे. आपला व्यस्त डॉक्टरी पेशा सांभाळत त्यांनी शेतीचे तंत्रही शिकून घेतले. दर पंधरा दिवसांनी कामावरून सुट्टी घेऊन ते आपली शेतीची आवड जोपासतात. यावेळी त्यांनी डुक्करपालन, ससेपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन यासारखे शेतीला पूरक असे जोडधंदेही सुरू केले. वाचनाची आपली आवड जोपासताना ‘कायझेन’चे सल्लागार शामतळवडेकर यांचे ’सूर्य दोनदा उगवला’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्यांची भेट घेऊन प्रत्येक गोष्ट एका साचेबद्ध पद्धतीने राबविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. भारताबद्दल एक किस्सा सांगताना ते प्रकर्षाने एक गोष्ट सांगतात. ‘‘आपण कायमच ‘भारतमाता की जय’म्हणतो. पण खरंच आपल्याला भारतातली सगळी राज्य तरी माहीत आहेत का?’’ त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा भारतातली सगळी राज्य काव्यात गुंफून मुलांना भारतदर्शन घडविण्याचा अनोखा यशस्वी प्रयत्न केला. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. देसाई यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत समाजासाठी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या या प्रवासात त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या पत्नीची. डॉ. देसाई यांना देशात आणि देशाबाहेर फिरण्याची फार आवड आणि या आवडीखातर या हौशी देसाई दामपत्याने आजवर चारचाकीने भारतभ्रमंती केली आहे. आपल्या धकाधकीच्या जीवनात वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही सायकलिंग सोडले नाही. दरम्यान, लहान मुलांमुळे निर्माण झालेली स्केटिंगचीही आवड देसाई दामप्त्याने वयाच्या ६०व्या वर्षीही पूर्ण केली.

याव्यतिरिक्त त्यांना काही भाषाही अवगत आहेत. काही वर्षांपूर्वी डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या त्यांच्या हॉस्पिटलला भेट दिली आणि त्यांच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. बाबा आमटे यांनी आपल्या हॉस्पिटलला दिलेली भेट हा आपल्यासाठी अविस्मरणीय प्रसंग असल्याचे ते आवर्जून नमूद करतात. सामाजिक जबाबदारीचे भान असलेले डॉक्टर देसाई हे रुग्णांनाही सामाजिक कार्यासाठी हातभार लावण्याचा सल्ला देतात. उलट पैसे आश्रमाला दान देण्याकडे त्यांचा कल आहे.

मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेची हाक दिली होती. यासाठीही आपली मदत व्हावी या दृष्टीने त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने हातात झाडू घेऊन सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला. त्यांचे हे कार्य पाहून त्यांच्या परिसरातील लहान मुले आणि अन्य मंडळीही त्यांच्यासोबत जोडली गेली. लोकांना कचरा टाकण्यासाठी डबे उपलब्ध व्हावे यासाठी स्वखर्चाने त्यांनी परिसरात कचराकुड्यांची व्यवस्थादेखील करून दिली. त्यांच्या या उपक्रमाची पालिका प्रशासनानेही दखल घेऊन पालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीमराबविण्यास सुरुवात केली. डॉक्टर दीपक देसाई यांना आजवर देशात आणि देशाबाहेरही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. देसाई यांनी केलेले प्रयोग प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी परदेशातूनही डॉक्टर्स त्यांच्या रुग्णालयाला भेट देतात. तेव्हा, वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या डॉ. देसाईंच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
- जयदीप दाभोळकर