‘द अम्युझमेंट मॅन’

Total Views |

 
 
 
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून निवांत क्षणांच्या सोबतीसाठी काही जण निसर्गाचा आसरा घेतात, तर कुणाला रिसॉर्ट, वॉटरपार्कमधली धम्माल-मस्ती अगदी तणावमुक्त करुन जाते. तेव्हा, आपल्या कुटुंबीयांबरोबर, मित्रपरिवाराबरोबर व्यतीत होणारे हे आनंदाचे क्षण सदैव आपल्या स्मरणात राहावेत, यासाठी रिसॉर्टचालक, त्यांचे व्यवस्थापक नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पनांच्या शर्यतीत अग्रेसर असतात. त्यापैकीच याच क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे मोती सिंग क्षत्रिय. एस्सलवर्ल्ड, शांग्रीला आणि याझू पार्कसारख्या अम्युझमेंट पार्कमध्ये आपल्या कल्पनांची, व्यवस्थापकीय कौशल्याची छाप सोडणार्‍या या अवलियाची ही गोष्ट...
 
मोती सिंग यांचं बालपण गिरगावच्या मराठमोळ्या माहोलमधलं. वडील सिक्युरिटी ऑफिसर असल्यामुळे मिळालेल्या क्वार्टर्समध्येच त्यांचं लहानपणही मोठं झालं. घरची परिस्थितीही तितकीशी चांगली नव्हती. पैशाची चणचण तर पाचवीला पूजलेली. त्यामुळे लहानपणीच परिस्थितीचे पूर्ण भान आणि तितकीच जीवनाची जाण. पण अशा बिकट परिस्थितीतही गैरमार्गांचा शॉटकर्ट न धरता, धोपट मार्गच मोतींनी पत्करला. मनगटातील मेहनत आणि बुद्धिमत्तेची साथ त्यांच्या सोबतीला होतीच. त्यामुळे मग अभ्यासासाठी एकीकडे आस्थेने पुस्तकं-वह्या डोळ्यासमोर धरणारे हात आणि दुसरीकडे गाड्या धुवून, घराघरात दूध विकणारे परिश्रमाचे हात... एकच जिद्द की, ही परिस्थिती बदलणार... वेळ पालटणार... आणि त्यांच्या याच दृढ निश्चयाने त्यांच्या नियतीचा, प्रगतीचा मार्ग आकार घेत गेला...
 
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न थांबता आवर्जून महाविद्यालयीन शिक्षणामध्येही त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. लहानपणापासून दु:ख, कष्ट यांच्या छायेत वाढलेल्या मोती सिंग यांनी किमान इतरांच्या आयुष्यात तरी चार क्षण सुखाचे नांदावेत, त्यांच्या चेहर्‍यावरही निखळ विरंगुळ्यातून हास्य फुलावे, याचा विचार केला आणि अम्युझमेंट पार्कच्या दुनियेत प्रवेश केला. इथूनच त्यांच्या आयुष्याला खर्‍या अर्थाने कलाटणी मिळाली. या क्षेत्रातील निवडीविषयी बोलताना ते सांगतात की, ‘‘आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यात कायमएक लहान मूल दडलेलं असतं. मात्र, त्या लहान मुलाला खेळतं करण्याची संधी सगळ्यांनाच मिळते असे नाही. त्यातच धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाची एनर्जी एका ठिकाणी कमी होतेच. मात्र, सध्याच्या या वातावरणात कुठेतरी आठवडाभराच्या कामातून पुढे पुन्हा कामकरण्यासाठी रिचार्ज व्हावे लागते आणि त्यासाठी आपल्या आत लपलेल्या त्या लहान मुलाला जागं करुन, त्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद लुटायला हवा,’’ मृदू स्मित करत मोती सिंग मनमोकळेपणाने बोलत होते.
 
त्यांची या क्षेत्रातील सुरुवात झाली, ती महाराष्ट्रातील पहिल्या वॉटरपार्कमधून आणि ते म्हणजे निशिलँड वॉटरपार्क. या ठिकाणी ते ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह या पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक वयोगटासाठी नवनवीन योजना सुरू केल्या आणि पार्कच्या यशात त्यांच्या कल्पक योजनांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांना मुंबईतील एस्सेलवर्ल्डसारख्या नावाजलेल्या अम्युझमेंट पार्कमध्ये कल्पनाशक्तीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी मिळाली. एस्सेलवर्ल्डमध्ये मोती सिंग यांच्याकडे शालेय विद्यार्थ्यांच्या सहली आणि सामाजिक समूहांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि एस्सेलवर्ल्डमधील कामगिरीच्या करिष्म्यामुळे सिंग यांना शांग्रीला रिसॉर्टमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यांची मेहनत आणि त्यांचा या क्षेत्रातला दांडगा अनुभव पाहता त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आणि ते मॅनेजर पदावर रूजू झाले. शांग्रीलामध्ये निर्णय घेण्याचे स्वतंत्र दिल्यामुळे अनेक नवीन योजनांची त्यांना यशस्वीरित्या अंमलबजावणी करता आली. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला मनसोक्त आनंद घेता येईल, याची पुरेपूर काळजी घेत मोती सिंग यांनी रिसॉर्टचा कायापालट केला आणि त्याला पर्यटकांचीही उत्तमदाद मिळाली.
 
आज श्रीमंत व्यक्ती चार पैसे खर्च करून जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात ‘हॉलिडे’ला हजर होतात, पण एक सामान्य मध्यमवर्गीय पर्यटक मात्र पै अन् पैचा ‘होल डे’ प्रमाणे हिशोब करुन काळजीपूर्वक निर्णय घेतो. तेव्हा, अशा सामान्यांचा विचार करून स्वस्तात आणि मनावर कुठलेही ओझे न बाळगता प्रत्येकाला आनंदाचे काही क्षण घालवावे याचा विचार करून त्यांनी अनेक नवनव्या योजनांचा श्रीगणेशा केला. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर सहलीला येणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना मनोरंजनाव्यतिरिक्त शैक्षणिक माहिती देण्यासही सुरुवात केली. त्यांनी लागवड केलेल्या विविध वृक्षवनस्पतींच्या प्रकारांची उपयुक्त माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केली. तसेच, अम्युझमेंट पार्कमध्ये अनेकदा वाया जाणार्‍या प्लास्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात जमा होत असतात, त्यासाठी त्यांनी प्लास्टिक पुनर्वापराचा अनोखा पर्यावरणपूरक प्रकल्प राबविला आणि या प्रकल्पाची माहिती देऊन निसर्गाच्या संरक्षणाचा हरितसंदेश दिला. आपल्या प्रगतीचा वेग असाच गतिमान ठेवत, मोती सिंग यांनीयाझू पार्कमध्येही अल्पावधीतच नावलौकिक कमाविले. जनरल मॅनेजर पदाच्या सर्व जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडत त्यांनी मनाशी एखादी गोष्ट पक्की ठरवली की, सगळंच शक्य असतं हे दाखवून दिलं. सहलीला येणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना स्वयंसंरक्षणाचेही धडे दिले. या प्रवासात आनंददायी क्षणांबरोबर मोती सिंग यांना आव्हानांचाही सामना करावा लागला. आपल्या प्रदीर्घ अशा २० वर्षांच्या कारकिर्दीत सिंग यांनी अनेक चढउतार पाहिले. पण तरीही न डगमगता यशाची एक एक शिखरं ते सर करत गेले. पुढेही याच क्षेत्रात आपली आणखी वेगळी ओळख निर्माण व्हावी, या दृष्टीने आपण प्रयत्न करत असल्याचेही ते सांगतात. दरम्यान, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना तेरापन समाजाकडून ’द अम्युझमेंट मॅन’ या सन्मानानेही गौरविण्यात आले.
 
कौटुंबिक आधार आणि आर्थिक स्थिरता प्राप्त झाली असली तरी मोती सिंग यांनी कधीही आपल्या श्रीमंतीचा पसारा मांडला नाही. उलट, वेळोवेळी सामाजिक भान जपून माणुसकीचा प्रत्यय दिला. आपण ज्या परिस्थितीतून गेलो, त्या परिस्थितीतून अन्य कोणालाही जावे लागू नये, म्हणून ते सदैव प्रयत्नशील असतात. नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरुणांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला. सुशिक्षित तरुणांना मदत करण्यासाठी त्यांनी ’आशा फाऊंडेशन’ नावाची सामाजिक संस्थाही सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत, जेणेकरुन गरजूंचे आयुष्य ही सकारात्मक ‘आशा’ उजळवून टाकेल. अशा या ’द अम्युझमेंट मॅन’ला त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल अनेक शुभेच्छा!
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.