‘त्या’ क्षणाचे महत्त्व

    23-Mar-2017   
Total Views |

भाजपने एकही मुस्लीमउमेदवार न देता उत्तर प्रदेशमध्ये मिळविलेले घवघवीत यश व त्यानंतर योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी केलेली निवड या दोन्ही एकापाठोपाठ बसलेल्या धक्क्यांमधून स्वत:ला ‘सेक्युलरवादी’ म्हणविणारे विचारवंत सावरण्याच्या आतच सर्वोच्च न्यायालयानेही श्रीरामजन्मस्थानावरील मंदिरासंबंधातील याचिकेवरील सुनावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतातल्या सेक्युलॅरिझमचे आता काय होणार, याची त्यांना चिंता लागून राहिली आहे. हा घटनाक्रमपाच कारणांसाठी क्रांतिकारक आहे. भारत आता निश्र्चितपणे एका नव्या वळणावर आहे, याची प्रचिती या घटनाक्रमातून येत आहे.

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी कॉंग्रेसने ‘हिंदी राष्ट्रवादा’चा स्वीकार केला होता. हिंदू आणि मुस्लीमसमाजांनी एकत्र येऊन नव्या ‘हिंदी राष्ट्रवादा’ची कास धरावी, अशी न्या. रानडे यांनी कल्पना मांडली होती. आपण कधीकाळी या देशावर राज्य केले होते, हे मुस्लीमसमाजाने विसरून जावे व इथल्या संस्कृतीशी समरस व्हावे आणि हिंदू समाजानेही आक्रमक मुस्लिमांचा इतिहास विसरून जावा, असे त्यांचे प्रतिपादन होते. त्यासाठी त्यांनी औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोव याचे उदाहरण दिले. दारा शुकोव मुस्लीमअसूनही उपनिषदांचा व हिंदू तत्त्वज्ञानाचा त्याचा अभ्यास होता. परंतु, नंतरच्या काळात ‘हिंदी राष्ट्रवादा’ची ही भूमिका बाजूला राहिली व काहीही करून मुस्लीमसमाजाला आपल्यासोबत ठेवणे म्हणजे ‘हिंदी राष्ट्रवाद’ अशी ती बनत गेली. हिंदू-मुस्लीमऐक्याच्या भ्रमजालात भारताचा स्वातंत्र्यलढा अडकत गेला. मुस्लीमलीगच्या नेत्यांनी मुस्लिमांच्या जातीयवादी विखाराला खतपाणी घालून आपल्या मागण्यांमागची शक्ती वाढवीत नेली, त्यांच्या मागण्या वाढत गेल्या. त्याचा परिणामफाळणीत झाला. फाळणीपासून कोणताही बोध न घेता स्वातंत्र्यानंतर तीच धोरणे ‘सेक्युलरवादा’चे नाव घेऊन सुरू राहिली. काहीही करून मुस्लीममते आपल्यासोबत कशी राहतील, हा त्याचा मंत्र बनला. त्यासाठी मुस्लीमजातीयवाद, सामाजिक मागासलेपण यांच्या विरोधात जे बोलतील, त्यांना ‘हिंदू जातीयवादी’ ठरविण्यात आले. उत्तर प्रदेशच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर सपा आणि बसपा यांच्यात मुस्लीमतुष्टीकरणाची स्पर्धा लागली. सेक्युलरवाद्यांच्या दृष्टीने ती जातीयवादी नव्हती, पण भाजपने एकही मुस्लीमउमेदवार उभा न करणे हा जातीयवाद होता. नेहरूप्रणीत सेक्युलॅरिझमची ही विकृत व्याख्या रद्दबातल ठरवून भाजपने मिळविलेला विजय ही पहिली क्रांती.

योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड करून प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेल्या प्रतिमा निर्मितीला आपण यत्किंचितही महत्त्व देत नाही, हे दाखविल्याने प्रसारमाध्यमांचा तिळपापड उडाला आहे. या देशातील सहिष्णुता, लोकशाही, सेक्युलॅरिझमजणू काही आमच्यामुळेच टिकून आहे अशा भ्रमात ही प्रसारमाध्यमे आहेत. ‘मुस्लीमजातीयवादा’कडे दुर्लक्ष करणे व हिंदूंच्या कोणत्याही मागणीची जातीयवादी वासलात लावणे, या आजवरच्या अनुभवामुळे ज्याप्रमाणे नेहरूप्रणीत सेक्युलॅरिझमबद्दल तिरस्कार निर्माण झाला आहे, तसाच मीडियामधील पुरोगामित्वाबद्दल निर्माण झाला आहे. आदित्यनाथ यांची निवड झाल्यानंतर सोशल मीडियावर, ’’योगी आदित्यनाथ यांची निवड ऐकल्यानंतर ती योग्य आहे की नाही, याबद्दल मी संभ्रमात होतो, पण प्रसारमाध्यमातून त्यावर टीका झाल्यानंतर हीच निवड योग्य आहे, हे माझ्या लक्षात आले.’’ असा संदेश फिरू लागला. यावरून लोकांच्या मनात प्रसारमाध्यमांबद्दल किती तिरस्कार भरलेला आहे, हे स्पष्ट होते. आपल्याच गुर्मीत असलेल्या प्रसारमाध्यमांना त्यांची जागा दाखविण्याचे धैर्य भाजपच्या नेतृत्वाने दाखविले, ही दुसरी क्रांती आहे.

शेकडो वर्षे गुलामीत गेली की त्यातून लाचारीची एक मानसिकता बनते. त्यामुळे कोणताही नेता आपल्या शक्तीची जाणीव करून देऊ लागला की निर्माण होणार्‍या भीतीतून जी संस्कृती बनते, तिचीच ‘सुसंस्कृतता’ अशी आजवर भलामण केली जात असे. त्यामुळे आपल्या देशातून चर्चिलसारखे नेतृत्व उभे राहणेच अशक्यप्राय होते. त्यातूनच चीन, पाकिस्तान यांच्याशी भिऊन वागणे यालाच ‘मुत्सद्देगिरी’ मानले जात असे. रशिया, चीन, अमेरिका यांच्या नेतृत्वात असा न्यूनगंड नाही. योगी आदित्यनाथ यांची निवड करून ‘न्याय्य निर्भयतेचा’ आपण सन्मान करतो, असा संदेश दिला गेला आहे. ही हिंदू जनमानसातील तिसरी क्रांती आहे.

श्रीराममंदिराबाबतचा वाद हा एक मंदिर किंवा मशीद एवढा मर्यादित वाद नाही. अयोध्या, काशी, मथुरा येथील हिंदूंची उद्ध्वस्त श्रद्धास्थाने या हिंदू समूहमनावर डागल्या गेलेल्या डागण्या आहेत. त्या जखमा जोवर दूर होत नाहीत, तोवर हिंदू-मुस्लीमऐक्याची कल्पनाच अशक्य कोटीतील आहे. परंतु, आजवर असे म्हणणे हेही सेक्युलर पाप समजले जात होते. ‘‘या प्रश्नावर समजुतीने मार्ग काढला जावा, यासाठी मध्यस्थ म्हणून कामकरायला मीही तयार आहे,’’ असे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी म्हणणे एवढा परिस्थितीत बदल होणे, ही चौथी क्रांती आहे.

’’आम्ही आमच्या धर्मश्रद्धांप्रमाणे वागू, आमच्याशी कसे जुळवून घ्यायचे ते जगाने ठरवावे,’’ अशा थाटात केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील मुस्लीमसमाज वागत आला आहे. सहिष्णुतेपोटी, भीतीपोटी, कधी डावपेच म्हणून आजवर मुस्लीमसमाजाचे तसे वागणे जगाने सहनही केले आहे. मुस्लिमांच्या धर्मवेडेपणाचा उपयोग करून नास्तिक कम्युनिस्ट रशियाला धडा शिकविता येईल म्हणून अमेरिकेने इस्लामी अतिरेकी प्रवृत्तींना खतपाणी घातले. याउलट मुस्लिमांच्या इस्रायलविरोधाचा उपयोग करून अमेरिकेला धडा शिकविता येईल, म्हणून रशियाने मुस्लीमदहशतवादाला खतपाणी घातले. आज चीन भारताविरुद्ध पाकिस्तानचा उपयोग करून घेण्याकरिता पाकिस्तानच्या दहशतवादाची पाठराखण करीत आहे. वास्तविक, या तिन्ही देशांना मुस्लीमदहशतवादाचे तडाखे बसले आहेत, बसत आहेत. युरोपने मानवतावादापोटी मुस्लीमनिर्वासितांना आश्रय दिला. ते देश आज त्याची फळे भोगत आहेत. त्यामुळे सर्वत्र मुस्लीमदहशतवाद्यांबद्दलचे भय निर्माण झालेले आहे. या पार्श्र्वभूमीवर मुस्लीमसमाजात परिवर्तनाची प्रभावी चळवळ निर्माण व्हायला हवी होती. परंतु, अजूनही प्रचारमाध्यमातील व विद्यापीठीय वातावरणात मुस्लीमप्रश्र्नाची चिकित्सा करणे हे ‘असहिष्णू पाप’ मानले जाते. ज्या रोगाची चिकित्साही केली जात नाही, तो बरा कसा होणार? ‘हिंदू-मुस्लीमऐक्यासाठी हिंदू समाजाने काय केले पाहिजे?’ असा प्रश्र्न गुजरातचे माजी प्रांत प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांना एका कार्यक्रमात विचारला गेला होता. यावर उत्तर देताना लक्ष्मणराव म्हणाले, ‘‘हिंदू-मुस्लीमऐक्यासाठी हिंदूंनी आजवर खूप काही केलेले आहे, पण त्याचा उपयोग झाला नाही. यासाठी मुस्लिमांनी काय केले पाहिजे हे विचारण्याची वेळ आली पाहिजे, असा विचार आपण कधी करणार?’’

जर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यशस्वी ठरले, तर तो क्षण दूर नाही आणि आदित्यनाथ यांना त्या पदावर बसविण्यात मोदी आणि शाह यांचा महत्त्वाचा वाटा असावा, हाही योगायोग नाही. ही पाचव्या आणि महत्त्वाच्या क्रांतीची वेळ आहे.

 

दिलीप करंबेळकर

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय.