गेल्या महिन्यात तापी जिल्ह्यातील मयाली नावाच्या गावात होतो. मयालीत शेतकऱ्यांचे अनुभव ऐकायचे होते. सुधारित बियाणं लावलं तर काय फरक वाटला? अस विचारल्यावर नेहमीच उत्पादन वाढले वगैरे प्रातिनिधिक उत्तर झाली. थोडे खोडून विचारले तर एक जण म्हणाला हा तांदूळ तुटतो कमी आणि खायला जुन्या तांदुळा सारखा लागतो. दुसरा म्हणाला पीक कापायला एकदम सोप आहे. तिसरा पटकन म्हणाला अहो साहेब माझी जमीन हलकी, उताराची आहे त्यात पण चांगला होतो हा भात. असे वेगवेगळे अनुभव लोक सांगत होते. येणाऱ्या वर्षात हा भात आपल्याच बियाणाने लावू हा निर्धार दिसत होता. सुधारित जातींनी दुहेरी फायदा दिसला त्यांना, उत्पान्नात फरक नाही आणी बियाणेही घरचे.
साधारण १५० घरांच गाव. भारतातील कुठल्याही जनजाती खेड्यासारखं. पण या गावाने या वर्षी बियाणातील परावलंबनाच चक्र तोडायच ठरवल. डॉ. आंबेडकर वनवासी कल्याण ट्रस्ट, सुरत मार्फत गेल्या तीन वर्षापासून तापी आणि डांग या दोन जिल्ह्यात हे चक्र तोडायचे प्रयत्न चाललेत. त्या मध्ये गाव सहभागी झाल. या वर्षी ११ गावांनी आपल बियाणं आपणच पिकवायच या उद्देश्याने काम सुरु केलं.
गावात पावसावर आधारीत शेती, भात मुख्य उत्पादन. बदललेल्या स्थितीत शेतीला लागणारी बियाणे, खते, औषधे आणि सल्ला सगळंच बाहेरून आणणार. आपल्या विकास प्रक्रियेने आपल्या खेड्याना इतक पंगु बनवलय की बियाणं कंपन्यांनी बियाणं विकल नाही तर काही लाख खेड्यातील शेती बंद पडेल अशी स्थिती आली आहे. ट्रस्टने अश्या गावात कृषी विद्यापीठ व शेतकरी यातील सेतू बनवण्याच ठरवल. योग्य वेळेत बियाण विकत घेतल, तेही त्या परिसराला योग्य अश्या जातींच. शेतकऱ्यांना उन्नत लागवडीच प्रशिक्षण दिल, यासाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत घेतली. पहिल्यांदा एका गावात सुरु झाल, मग १० आणि या वर्षी नवीन १० गावात. गेल्या वर्षी आजूबाजूच्या गावांमध्ये ३००० किलो बियाण विकल. सध्या हे बियाणं किमान ५० एक गावात पोचलं आहे. एका ठिकाणी तरुणांनी बियाणे विकण्याची व्यवस्था तयार करण्यात रस दाखविला आहे.
योजकनी सुरु केलेल्या ‘मध्य भारत वनांचल समृद्धी योजनेत’ सहभागी झाल्यावर डॉ. आंबेडकर वनवासी कल्याण ट्रस्टने नवीन अर्थाने त्यांच्या कार्य क्षेत्राकडे बघायला सुरुवात केली. तापी जिल्ह्यातील जवळ जवळ ८० गावांचा अभ्यास केला, तरुणांबरोबर विशेष वेगळा अभ्यास केला. यातून पुढे आले नैसर्गिक स्त्रोत खास करून शेती संबंधीच वेगळच चित्र. बियाण हा शेतीचा आत्मा. पण आज ९०% शेतकरी बियाण्यासाठी कंपन्यावर अवलंबून आहे. ज्या देशातील शेतकऱ्यांनी स्व-प्रयत्नातून एकेकाळी १ लाखहून अधिक भाताच्या जाती तयार केल्या तेथील शेतकरी आज बियाण बाजारात जाऊन खरेदी करतो. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील काही करोड रुपये दरवर्षी बाहेर जातात. बर हे बियाण बनत कुठे? कुणाच्यातरी शेतातच, कारखान्यात नाही.
पारंपारिक, सुधारित आणि हायब्रीड असे अन्नधान्य पिकांतील बियाणाचे तीन प्रकार भारतात अस्तित्वात आहेत. यातील पारंपारिक बियाणे शेतकऱ्यांकडे असतात. सुधारित आणि हायब्रीड बियाणे विद्यापीठ व कंपन्या तयार करतात. यात विद्यापीठ सुधारित बियाणे निर्मिती वर जोर देत तर कंपन्या हायब्रीड वर. यातली हायब्रीड बियाणातली गोम अशी आहे कि ते दरवर्षी विकत घ्याव लागत तर सुधारित बियाण किमान ३ व जास्तीत जास्त ५-६ वर्ष चालू शकत. यामध्ये उत्पादनातील फरक असतो. तुलनेत हायब्रीड जास्त उत्पादन देत पण या बरोबर विविध जोखीम पण वाढतात जस नैसर्गिक आपत्तीत कमी उत्पादन मिळत. तसच हायब्रीड बियाणाच्या गरजा ही फार. हे वापरायच असेल तर रासायनिक खत देण अनिवार्य आहे तसेच हे बऱ्याचदा रोगांना बळी पडतात त्यामुळे कीटक नाशक ही लागते. आता हे चक्र तुम्हाला लक्षात आले असेलच. या जोडीला जनावरांसाठी चारा कमी मिळतो , भाताची चव, कस असे इतर विषय ही आहेतच.
तर ट्रस्टला हा अभ्यास करताना बियाणा संबंधी अनेक प्रश्न समोर आले. शेतकऱ्यांची गरज, उपलब्धता, विद्यापीठातील रचना, त्याचे प्रश्न, शेतकरी आणि विद्यापीठ यातील अंतर, ते दूर करू न शकणारी पण करते आहे असे भासमान चित्र तयार करणारी व्यवस्था, बियाणाच्या क्षेत्रात असलेले मोठे आर्थिक संबंध इत्यादी. अगदी छोट वाटेल पण फार महत्वाच अस एक उदाहरण सांगतो. तापी जिल्ह्यात छोटे शेतकरी अधिक संख्येने आहेत. त्यामुळे यांची बियाणांची गरज प्रत्येकी २-५ किलो असते. पण विद्यापीठाच बियाण मिळत ३० किलोच्या पॅकिंगमध्ये. विद्यापीठाच्या व्यवस्थेचेही काही प्रश्न आहेत. पण या मध्ये शेतकऱ्याला योग्य बियाण मिळत नाही. कंपन्या मात्र १,२ किलो पासून बियाणे पाकीट विकतात. त्यामुळे साहजिकच शेतकरी कंपनीचे बियाणे विकत घेतो. त्या शिवाय शासन व्यवस्थेची इच्छा शक्ति हा पण यक्ष प्रश्न आहे. बियाणे विकणाऱ्या व्यापाऱ्यापर्यंत विद्यापीठचे बियाणे पोहोचणार कसे? असो. हायब्रीड बियाणाची किंमत ३०० रू किलो, सुधारित ३० रू किलो, पण सुधारित बियाण जास्त लागत. तरीही ते अधिक वर्ष वापरता येत त्यामुळे परवडतच. त्यामुळे सरकार काही करत नाही अस ओरडत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपले प्रश्न सोडविण्यासाठी नवीन विचार करण हे महत्वाच आहे. मयालीच्या शेतकऱ्यांनी हाच नवीन विचार केला आहे.
असाच एक प्रयत्न नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा परिसरात पण झाला. इथे शेतकरी एक पाउल पुढे गेले आहेत. त्यांनी अनुभवातून आता एका कंपनीची स्थापना करणे सुरु केले आहे. यातील कामातील एक अनुभव, अडचणी कश्या येऊ शकतात आणि त्यावर कशी मात करता येईल याच चांगल उदाहरण आहे. या परिसरातील ५० शेतकऱ्यांनी पहिल्यांदा बियाण तयार करण्यासाठी डॉ हेडगेवार सेवा समितीच्या प्रकल्पात सहभाग घेतला. अत्यंत कष्टाने बियाणे निर्मिती सुरु केली. तथाकथित मागास, कमी शिकलेले हे शेतकरी पण त्या वर्षीचे सर्वात सुंदर बियाणे प्लॉट केले त्यांनी. हे स्वतः विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सांगितल. यामुळे हुरूप वाढला. आता कापणी झाली आणि बियाण हाती आलं. बियाण जर विकायचं असेल तर त्याची एक पद्धत आहे, काही मान्यता घ्याव्या लागतात.
त्याची प्रक्रिया किचकट, वेळ खाऊ आणि स्वतःमध्ये विविध प्रश्न तयार झालेली आहे. त्यामुळे त्या शिवाय कस विकायचं. हातात वेळ पण कमी होता. मग त्यांनी ठरवलं की ५ किलोच्या पिशव्या करायच्या आणि प्रत्येक पिशवीवर ज्याच्या शेतात पिकल आहे त्याच नाव लिहायचं आणि आपल्या परिसरातच विश्वासाच्या जोरावर विकायचं. आणि पहिल्या वर्षी १२०० शेतकऱ्यांनी विकत घेतल. त्यामुळे विश्वासाचे महत्व परत अधोरेखित झाल. १-२ वेळा हे ठीक आहे, पण सरकारने ठरविलेली प्रक्रिया करून, मान्यता घेऊनच विकू आणि त्याला आपल्या विश्वासाची जोड देऊ असे ठरवून त्यांनी प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे.
गावात लागणार सुधारित बियाण जर तिथल्या पंचक्रोशीतच तयार झाल तर त्याचे विविध फायदे आहेत. एकतर त्याच परिसरात तयार झालेलं आहे त्यामुळे तिथल्या हवामानाला ते सुयोग्य आहे हे नक्की होत. उत्पादनाची खात्री प्रत्यक्ष शेतातले प्लॉट बघून घेता येते. बियाणाचे जे पैसे गावाबाहेर, पंचक्रोशी बाहेर जात होते ते आपल्याच परिसरातील शेतकऱ्यांना मिळतात. त्यामुळे स्थानिक अर्थ व्यवस्थेला चालना मिळते. सर्वात महत्वाच कुठल्या तरी अगदी लांबच्या कंपनी वरच अवलंबित्व आणि त्यातून होणारी पिळवणूक कमी होते. सुधारित बियाणाचा प्रसार हा समाजातील अगदी अंतिम घटक ज्याच्याकडे आजही कमी दर्जाची जमीन आहे त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. तो मयालीतला शेतकरी म्हणालाच ना माझी जमीन, हलकी, उताराची आहे पण तिथेही हा भात चांगला उगवला.
अंत्योदय हे जर आपले साध्य असेल तर बियाणे स्वयंपूर्णता सारखे जमिनीवरचे उपाय ते गाठण्यासाठीचे एक साधन आहे. विकासाचा हा मार्ग कंटकाकीर्ण आहे. पण यावरूनच चालावं लागेल हे नक्की.
-कपिल सहस्त्रबुध्दे