शं. नो. वरुण हे भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य. हे जसं नौदलाच्या प्रत्येक सैनिकाच्या भावनांशी जोडले गेले आहे, तसेच भारताची विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट‘ हीदेखील भारतीय नौदलाच्या आणि रॉयल नेव्हीच्या प्रत्येक सैनिकाशी जोडली गेली आहे. ‘आयएनएस विराट’ ही ‘सेंटॉर’ श्रेणीतील विमानवाहू युद्धनौका असून याचे नामकरण संस्कृत शब्द ’विरता’वरून करण्यात आले आहे. ‘आयएनएस विराट’ ही भारतीय नौदलाच्या ताफ्यातील ब्रिटिश बनावटीची अखेरची युद्धनौका असून ती सेवेत असणारी जगातील सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका म्हणून ओळखली जाते. ही युद्धनौका १२ मे, १९८७ रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. तब्बल २९ वर्षांच्या सेवेनंतर ही युद्धनौका आता नौदलाचा निरोप घेणार आहे. ६ मार्च रोजी ही ‘विराट’ आपल्या नौदलाच्या ताफ्यातून कायमची निवृत्ती घेणार आहे.
फेब्रुवारी, २०१५ साली येत्या वर्षात ‘आयएनएस विराट’ नौदलाच्या सेवेतून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. २३ जुलै, २०१६ रोजी ‘विराट‘ने मुंबई ते कोची असा आपला अखेरचा प्रवास केला होता. यानंतर सेवेतून निवृत्त होण्यापूर्वी नौकेची थोडी डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर अखेर २८ ऑक्टोबर रोजी टोईंगच्या साहय्याने ही युद्धनौका पुन्हा मुंबईला आणण्यात आली. मात्र कोचीला जाताना नौकेचे हृदय असणारी तिची इंजिने मात्र परतीच्या प्रवासात नव्हती. आता येत्या ६ मार्च रोजी मात्र ही नौका नौदलाचा अखेरचा निरोप घेण्यास सज्ज झाली आहे. भारतीय नौदल आणि रॉयल नेव्हीमध्ये मिळून सुमारे ५८ वर्षे ही विमानवाहू युद्धनौका सक्रिय होती. ‘आयएनएस विराट‘ने १९५९ साली बिटिश नौदल म्हणजेच रॉयल नेव्हीसोबत आपला प्रवास सुरू केला होता. विराट या विमानवाहू युद्धनौकेचे यापूर्वीचे नाव एच. एम. एस. हर्मिस असे होते. सुमारे २८ वर्षांपर्यंत रॉयल नेव्हीच्या सेवेत रूजू असलेल्या या युद्धनौकेला १९८५ साली रॉयल नेव्हीमधून निवृत्त करण्यात आले. १९८६ साली भारतीय नौदलाने अनेक देशांच्या युद्धनौकांची समीक्षा केल्यानंतर ही नौका रॉयल नेव्हीकडून खरेदी केली होती. यानंतर भारतीय नौदलाने पुढील काळाकरिता ही युद्धनौका नौदलात सेवेत रूजू करून घेण्यासाठी त्यामध्ये अनेक प्रकारचे तांत्रिक बदल केले. यानंतर १२ मे, १९८७ साली अधिकृतरित्या ही विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट’ या नावाने भारतीय नौदलात सामील करण्यात आली. ‘आयएनएस विराट‘वर १२ डिग्री कोनातील एक स्की जंप लावण्यात आला आहे. याचा उपयोग सी हॅरिअर श्रेणीतील लढाऊ विमानांच्या उड्डाणासाठी करण्यात येतो. या विमानवाहू युद्धनौकेवर एकावेळी १८ लढाऊ विमाने उभी करण्याची क्षमता आहे. युद्धनौकेला बाहेरून, त्यावरील मशिन्स, तोफा आणि अन्य शस्त्रास्त्रांना जवळपास १.२ इंचाच्या मोठ्या कवचाने संरक्षित करण्यात आले आहे. यावर असलेल्या शस्त्रास्त्रांच्या कोठारात एकावेळी ८० पेक्षाही अधिक हलक्या वजनाचे टॉरपॅडो ठेवता येऊ शकतात. याव्यतिरिक्त या युद्धनौकेवर एकावेळी ७५० सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे चार छोट्या नौका (लॅन्डिंग क्राफ्ट) ठेवण्यात आल्या आहेत. याचा वापर सैनिकांना युद्धनौकेपासून एखाद्या तटापर्यंत नेण्यासाठी करण्यात येतो. पाणबुड्यांवर नजर ठेवण्यासाठी यावर सी किंग हेलिकॉप्टर्सदेखील ठेवण्यात आले आहेत. ‘आयएनएस विराट‘चे वजन २८ हजार, ५०० टन असून त्याचे वजन खेचण्यासाठी यामध्ये ७६ हजार हॉर्स पॉवर क्षमतेचे टर्बाईन लावण्यात आले आहे.
निरोपासाठी अनेक अधिकार्यांची उपस्थिती
अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य‘ या विमानवाहू युद्धनौकेला भारतीय नौदलात सामील केल्यानंतर आता ‘विराट‘ला निरोप देण्यात येणार आहे. ‘आयएनएस विराट‘च्या निरोप समारंभासाठी नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांच्यासह नौदलाचे अनेक अधिकारी, तसेच ब्रिटिश नौदलाचेदेखील २० मोठे अधिकारी सहभागी होणार आहेत. ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ असे म्हणत या युद्धनौकेला अखेरची सलामी.
जयदीप दाभोळकर