सोयीपुरती आठवणारी मराठी अस्मिता... 

Total Views |

 


ज्या पक्षाने मराठी अस्मितेच्या नावावर राजकारण सुरू केले. त्याला आज केवळ राजकीय साठमारीचे स्वरूप आले आहे. आता मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हा मुद्दा केवळ आपल्या अर्थपूर्ण सोयीपुरताच मर्यादित राहिला आहे. मराठी अस्मितेच्या नावावर गळा काढणारा हा आवाज सध्या थंडावलाय आणि बाहेर जरी आला तरी तो केवळ निवडणुकांपुरताच. गेल्या चार निवडणुकांमध्ये थेट जनतेच्या भावनांना स्पर्श केल्यामुळे निवडणुकांमधलं यश आपणहूनच शिवसेनेकडे चालत आलं. जनतेच्या भावना म्हणजे शिवसेनेचा हुकूमी एक्का अशी काहीशी स्थिती निवडणुका आल्या की, पाहायला मिळते. मराठी माणसाला परप्रांतीयांच्या विळख्यातून वाचविलं कोणी? नव्वदीच्या दशकात दंगलींच्या पार्श्वभूमीवर हिंदूचं रक्षण केलं कोणी? यामुळे आज आम्हाला मुंबईत शिवसेनाच पाहिजे, अशा प्रतिक्रिया आज सर्रास ऐकायला मिळतात.

मुंबई ही कदापि महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. मुंबईवर केवळ आणि केवळ मराठी माणसाचाच अधिकार आहे. मराठी जनतेचा रोजगार कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. यासाठी भगवा फडकलाच पाहिजे, अशी काहीशी थंडावलेली गर्जना पक्षप्रमुख सर्रास काढताना दिसतात. एक तर मराठी माणसाला ते अशिक्षित समजत असावेत किंवा त्याला परिस्थितीची जाणच नाही,अशी त्यांची धारणा असावी. मुंबईचा भूतकाळ आपण खोदला तर ही परिस्थिती चोराच्या उलट्या बोंबासारखीच दिसेल.शिवसेनेने सुरुवातीला गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि अनेक कापड गिरण्या बंद होत गेल्या. कापड गिरण्यांमध्ये कामकरणारा मराठी माणूस बेरोजगार झाला, रस्त्यावर आला. कोहिनूर मिल आज कोणाकडे आहे हे पाहून कापड गिरण्यांच्या जागांवर कोणी डल्ला मारला हे सांगावं लागणारच नाही मुळी. त्यानंतरच्या काळात शिवसेनेने दक्षिण भारतीय लोकांविरोधात आंदोलन छेडलं. ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ असा नारा देखील दिला. रस्त्यांवर नारळपाणी विकणार्‍या दक्षिण भारतीयांच्या जागी मराठी माणूसही आला. मात्र परिस्थिती काय? चक्क नारळ कसा सोलायचा इथपासून सुरुवात झाली आणि पुन्हा मराठी माणसांच्या जागी तोच दक्षिण भारतीय लोकांना प्रिय वाटू लागला, तर सेनेने दिलेल्या पुंगीच्या नार्‍यानंतर दक्षिण भारतीयांची हॉटेल कमी होण्याऐवजी कईकपटीने वाढली आणि मराठी माणूस त्यांच्याच हॉटेलमध्ये धुणी-भांडी करण्यापर्यंतच मर्यादित राहिला. आज मोठ्या साहेबांनी आपली हॉटेल्स काढली म्हणून, ना मराठी माणसाची निवड केली ना मराठी माणसाला रोजगार दिला. असो भूतकाळातून वर्तमानात उगाच उड्या नको. दरम्यान, शबरी कुंभाच्या आंदोलनापासून शिवसेनेने मराठीचा मुद्दा हळूहळू बाजूला करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू केलं. १९९३ साली झालेल्या दंगलींनंतर आपणच हिंदूंचे रक्षक आणि बाकीचे भक्षक अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण करण्यात आली आणि त्याचंच परिवर्तन पक्षाची लोकप्रियता वाढण्यात झाली.

आज जे आपल्यात नाहीत, त्यांच्या पुण्याईवर भावनिक राजकारण करून सर्रास मतं मागितली जातायत. मग त्यांच्याशिवाय तुमचं कर्तृत्व काय? हा प्रश्न विचारल्यावरही त्यांच्याकडे याचं उत्तर देण्याचीही नक्कीच हिंमत हवी. गेल्या वर्षानुवर्ष मुंबई पाण्यातच आहे. आज आम्ही हे करू ते करू हे सांगायची वेळ पक्षप्रमुखांवर आली आहे. मात्र गेल्या २५ वर्षांत आम्ही काय केलं याचं उदाहरण त्यांना कदाचित शोधूनच सापडेल. मुंबईच्या रस्त्यांबाबत सांगयचं झालं तर हर्षोल्लासच. आपल्या टक्केवारीच्या हव्यासापायी एकेकाळच्या डांबरी रस्त्यांची जागा पेव्हर ब्लॉकने घेतली. देशात पेव्हर ब्लॉक तयार करणार्‍या कंपन्या किती आणि कोणाचं कोणाशी साटलोटं हे देखील शोधायला फारसा वेळ लागू नये. २५ वर्षांची सत्ता उपभोगल्यानंतर आजही टक्केवारीची आमची लाळ गळतीच राहिली याची आज सामान्य म्हणून देखील खंत वाटते. एखादा रोग उपचारानंतर बरा होतो, मात्र पालिकेत लागलेल्या या टक्केवारीच्या वाळवीचा नायनाट करायचा तरी कसा? वाढत्या झोपडपट्‌ट्यांनी आज मुंबईची शान पूर्णपणे घालवलीच आहे. वर्षानुवर्ष झोपड्या वाढतात आणि प्रत्येक निवडणुकांपूर्वी अमूकअमूक वर्षांपर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण मिळतं.ना मालमत्ता कर, ना आणखी कर, मात्र अन्य मुंबईकरांच्या खिशातून अनधिकृत झोपडपट्टीवासीय मात्र संरक्षित होतात आणि का बरं त्यांना संरक्षण देऊ नये. जर आज आपण त्यांना बाहेर काढलं, तर आपली मतांची टक्केवारी कमी होईलच, मग आपल्याला सत्ता तरी कशी मिळणार. मुंबईचं वाढलेलं महत्त्व पाहून बहुभाषिकांचा पूर्वीपासूनच मुंबईकडे कल वाढलेला आहे. ती परिस्थिती काही अचानक निर्माण झालेली नाही. अनेक दशकांपासून दक्षिण मुंबई, गिरगाव, मध्य मुंबईत राहणारा मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. मात्र त्यावेळी मराठी अस्मितेचा पुरस्कर्ता वाघ मात्र शांत होता. मराठीच्या नावावर गळा काढणार्‍यांनी मात्र मराठी माणसांसाठी काहीच न करणे पसंत केले. त्याचे कारण सध्याच्या स्थितीवरून ‘समजदार को इशाराही काफी है’ म्हटलं तर त्यात आपसूकच ध्यानात येईल. आजची स्थिती पाहता शत्रूचा शत्रू तो आपला ­­मित्र म्हणत मराठी माणसाला मपटेलफअसे नसले तरी आपल्या महालावर त्याचे महार्दिकफस्वागत करण्यात आले. अशा स्थितीत मुंबईला गुजरातशी जोडण्याचा कट दुसरा पक्ष रचत असल्याच्या आपल्या वक्तव्याचा मात्र पक्षप्रमुखांना विसर पडला. यावेळी तो कट आणि मराठी अस्मिता गेली तरी कुठे?निवडणुकीपूर्वीचे काही महिने सोडले, तर हा ढाण्या वाघ मराठीच्या नावाने गुरगुरतानाही नजरेस पडत नाही. मराठी माणसाचा बहुभाषिकांना आणि त्यांच्या संस्कृतीला आजही आणि पूर्वीही कधी विरोध नव्हता. तो केवळ राजकारण्यांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याच्या नवावावरच केला. मराठी माणूस हा केवळ इतर भाषिकांकडून होणार्‍या गळचेपीमुळे अस्वस्थ होता आणि कदाचित आजही आहे. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या आणि कॉन्व्हेन्टमध्ये शिकलेल्या तिसर्‍या पिढीतील राजकारणी युवराजांची नाळदेखील मराठी जनतेशी जोडली गेल्याचे आजही दिसत नाही. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पालिकेच्या पीचवर उभ्या असलेल्या पक्षप्रमुखांना मबेनिफिट ऑफ डाऊटफदेखील मिळेल का नाही याची शंका आहे. आजही मुंबईचा उरला-सुरलेला माणूस आपल्यासाठी काही तरी होईल, याच आशेने खितपत पडलेला आहे. मात्र टक्केवारीच्या राजकारणात बरबटलेल्यांना याची जाणीव झाली तरच नवलच.­­­­

 

जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.