आकाशाशी जडले नाते – चंद्रकोरीचा धर्म

    27-Dec-2017   
Total Views |
 
 
“आजी दिसत नाही. बाहेर गेली आहे का?”, सुमितने विचारले.
 
“संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला गेली आहे ती. येईलच इतक्यात. आणि येतांना काहीतरी लुटून आणेल!”, आबा म्हणाले.
 
“आबा, तोपर्यंत मला चंद्राची पुढची गोष्ट सांगा!”, सुमित म्हणाला.
 
“तशीही परवाची गोष्ट अर्धवटच झाली होती. आता त्याच्याच पुढचा भाग सांगतो. परवा आपण पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत आणि अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रकोर कशी बदलते ते पहिले. Time Traveller प्रमाणे आपण एका ठिकाणी बसून, महिनाभर चंद्राचे निरीक्षण केले. आज आपण Space Travellers होऊ. आज आपण एकाच वेळी विविध ठिकाणांहून चंद्रकोर कशी दिसते ते पाहू.”, आबा म्हणाले.
 
“ओह! जागा बदलली की चंद्रकोर वेगळी दिसते? म्हणजे पुण्यातून वेगळी आणि मुंबईमधून चंद्रकोर वेगळी दिसते? असे कसे होईल?”, सुमितने विचारले.
 
“मुंबई, पुणे, लातूर, विशाखापट्टम् या सर्व ठिकाणाहून दिसणारी चंद्रकोर सारखीच असेल. पण चेन्नईमधून दिसणारी चंद्रकोर, नागपुरातून दिसणारी चंद्रकोर आणि दिल्लीतून दिसणारी चंद्रकोर बरीच वेगळी असेल.”, आबा म्हणाले.
 
“You mean, आपण उत्तरेला किंवा दक्षिणेला गेलो तर चंद्रकोर वेगळी दिसेल. पण पूर्वेला किंवा पश्चिमेला गेलो तर मात्र काही फरक पडणार नाही. म्हणजे अक्षांश अर्थात latitude बदलला की चंद्रकोर बदलणार. बरोबर?”, सुमितने विचारले.
“एकदम बरोबर! ही पहा वेगवेगळ्या ठिकाणांहून दिसणारी कोर –
 
 
 
“हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे! म्हणजे कुणाला उभी दिसते, तर कुणाला आडवी दिसते! का होते असे?”, सुमित म्हणाला.
 
“आपण पृथ्वीवर कुठे उभे आहोत यावर आपण चंद्राकडे कसे बघत आहोत ते अवलंबून आहे. आपल्या स्थानावर ती कोर उभी दिसणार की तिरपी दिसणार की आडवी दिसणार हे ठरते! या चित्रात आपण दोन cases पाहू - विशुववृत्तावरून आणि उत्तर ध्रुवावरून दिसणारी कोर –

 
 
 
“या चित्रात माणूस थोडा जास्तच मोठा काढला आहे, पण यामधून लक्षात येते की - विषुववृत्त म्हणजे Equator वरून दिसणारी कोर, उष्ण कटिबंधीय म्हणजे Tropics मध्ये दिसणारी कोर आणि ध्रुवीय प्रदेशात म्हणजे Arctic मधल्या माणसाला दिसणारी चंद्रकोर वेगळी असते.”, आबा म्हणाले.
 
“म्हणजे आपल्या दृष्टिकोनावर, चंद्र कसा दिसतो ते अवलंबून आहे तर! Beauty lies in the eyes of beholder – हे शेकस्पीयरचे वाक्य ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा बरोबर आहे!”, सुमित म्हणाला.
 
इतक्यात दार वाजले. सुमितने पट्कन उठून दार उघडले. दुर्गाबाईंना घरात पाउल ठेवल्या ठेवल्या त्याने विचारले, “काय आजी, आज काय लुटून आणलेस?”, सुमितने विचारले.
 
“टिकल्यांची पाकीट मिळाले!”, दुर्गाबाईंनी बक्षीस जिंकून आणल्याच्या आवेशात सांगितले!
 
“मजा असते बुवा तुमची! मैत्रिणी काय बोलावतात, गिफ्ट काय देतात! वर return-gift पण द्यायची गरज नसते!”, सुमित म्हणाला.
 
“हंम! आम्हा बायकांना सारखंच काही न काही निमित्त काढून ‘Women’s Day’ साजरा करायला मिळतो! ही बघ आजची गिफ्ट!” दुर्गाबाईंनी टिकल्यांची २ पाकिटे सुमितकडे दिली.
 
“आबा, एका पाकिटातल्या टिकल्या पौर्णिमेच्या चंद्राच्या आहेत, आणि दुसऱ्या पाकिटात तृतीयेची चंद्रकोर आहे!”, सुमित म्हणाला.
 
“सुमित तुला आता सगळीकडेच चंद्र दिसायला लागला! कपाळावर आडवी चंद्रकोर रेखायची पद्धत जुनी आहे. आपल्यासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात राहणाऱ्या माणसाला चंद्र जवळ जवळ अडवाच दिसतो. म्हणूनच अशी आडवी कोर कपाळावर काढायची पद्धत!”, आबा म्हणाले.
 
“आबा, तुम्ही मागच्या वेळेला वैदिक काळातील आकाश दर्शकांच्या एका संकल्पनेबद्दल सांगितले होते. त्यांना अशी आडवी चंद्रकोर मोठी होतांना, चंद्राचा घडा सोमरसाने हळूहळू भरत जात आहे, असे वाटले. त्यावरून त्यांनी चंद्राचे निरीक्षण कुठून केले हे सांगू शकतो!”, सुमित म्हणाला.

 
 
“अगदी बरोबर! युरोप मध्ये ‘चंद्र म्हणजे भरत जाणारा घट’ अशा कल्पनेचा जन्म होऊच शकत नाही. कारण तिथे दिसणाऱ्या उभ्या चंद्रकोरीमध्ये द्रव पदार्थ भरला तर तो सांडून जाईल! यावरून वेदांची रचना ही भारतात झाली या मताला दुजोरा मिळतो. अर्थातच, अशी कल्पना तयार होण्यासाठी, वैदिक ऋषींच्या शेकडो पिढ्यांनी इथे वास्तव्य केले असणार.
 
“युरोप मध्ये जन्मलेल्या चंद्रकोरीच्या कल्पना, उभ्या चन्द्रकोरीशीच निगडीत आहेत. जसे, अमेरिकेच्या DreamWorks चा लोगो!
 

 
“आणि तर मध्य एशियात तयार झालेली इस्लामची चंद्रकोर, तिथे दिसणाऱ्या चंद्रकोरीप्रमाणे तिरपी आहे.”, आबा म्हणाले.

 
 
 
“Wow! मनुष्य कोणत्या अक्षंशावर राहतो, यावर त्याच्या कल्पना, त्याचे काव्य आणि त्याची धार्मिक चिन्ह अवलंबून असू शकतात याचा कधी विचार केला नव्हता!”, सुमित उद्गारला.
संदर्भ -
 
१. Vedic Astronomers – P V Holay
 
२. Madison Planetarium
 
- दिपाली पाटवदकर 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.