
चेन्नई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुरुंगात असलेल्या शशिकला यांचे भाचे टी.टी.व्ही. दिनकरन यांचा आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
दिनकरन यांनी अण्णाद्रमुक पक्षाच्या इ. मधुसूदन यांचा ४० हजार ७०७ मतांनी पराभव केला आहे. अपक्ष दिनकरन यांना एकूण ८९ हजार मते मिळाली असून, इ. मधुसूदन यांना ४८ हजार मते मिळाली आहेत. त्याचबरोबर द्रमुक पक्षाचे उमेदवार मरुध गणेश यांना एकूण २४ हजार, तर भाजप उमेदवार के. नागराजन यांना १४१७ मते मिळाली आहेत.
सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षासाठी ही पोटनिवडणुक महत्वाची मानली जात होती. जयालिता यांचे निधन झाल्यानंतर अण्णाद्रमुक पक्षात मोठ्याप्रमाणात यादवी माजलेली होती. त्यात शशिकला आणि दिनकरन विरुद्ध पलनीस्वामी आणि पनीरसेल्वम असे दोन गट पडले आहेत. सध्या शशिकला भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात असल्यामुळे दिनकरन यांच्या राजकीय हालचालींवर लक्ष लागून आहे. पोटनिवडणुकीत मिळालेला विजय कदाचित तामिळनाडूच्या पुढच्या राजकारणासाठी एक संदेश देऊन गेला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.