अखेरच्या टप्प्यात...

Total Views |

 
 
विधान परिषदेचे पहिले काही दिवस गोंधळात गेल्यानंतर कामाचा वेग वाढला खरा. मात्र, रोज प्रश्नोत्तरांचा वेग किमान तीन ते चार प्रश्नांवरच राहिला. हल्लाबोल फसल्यानंतर विधान परिषद आणि विधानसभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले. आरोप प्रत्यारोपांच्या फेर्‍या रंगू लागल्या. मात्र, विरोधकांकडे कोणताही मुद्दाच नसल्याने जुन्याच मुद्द्यांवर विरोधकांची खेळी सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या ’डल्लामार’च्या वक्तव्यानंतर एकंदरीत हिवाळी अधिवेशन कसं चालणार याचा प्रत्यय येऊन गेला. त्यातच मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीमध्ये तब्बल ४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शंकास्पद असल्याचं आकडेवारीसह सांगत कोणाला कसे कसे मिळवून दिले याचा पाढाच सर्वांसमोर मांडला.
 
शनिवार-रविवार सुट्टी असल्याने अनेकांचा कामाकडे कल फारच कमी होता. त्यातच सोमवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचे निकाल काय येणार याकडे अर्ध्यांचे लक्ष होते. त्यातच निकाल जाहीर झाल्यानंतर काहींंना आपल्या जागा गेल्याचे तर काहींना सत्ता न मिळाल्याचे दु:ख सहजच दिसून आले. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने तर बोलता बोलता आता राज्यात ओबीसी कार्डच खेळावे लागणार असल्याचे मनसुबे व्यक्त केले. दुसरा आठवडा अनेक लक्षात राहणार्‍या गोष्टींनी भरलेला होता. एकीकडे ओखीसारख्या वादळाने अनेकांच्या संसाराचा गाडा घसरला होता. मात्र वेळीच पंचनामे सुरू करून चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना मदत जाहीर करून त्यांचा गाडा पुन्हा रस्त्यावर आणला. सत्ताधारी पक्षाने महिलांविषयी, शिक्षणविषयक आणि ज्येष्ठांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला तर आता हिवाळीऐवजी पावसाळी अधिवेशन नागपुरात भरवण्यावर विचार सुरू असल्याचे गिरीश बापट यांनी जाहीर केले. विधान परिषदेनेही काही विनोदी किस्से या आठवड्यात अनुभवले. कधी सभापती आणि समाजवादी शिक्षक संघटनेच्या आमदारांमध्ये विनोदी शाब्दिक चकमक झाली तर कधी काही आमदारांनी गुरुजींचीच शाळा घेतली. त्यातच गुरुवारचा दिवस गाजला तो म्हणजे विधानसभेच्या आजी माजी अध्यक्षांच्या खडाजंगीमुळे. चर्चेच्या वेळी मंत्री सभागृहात नसेल तर लॉबीतून चर्चा करायची का? असा प्रश्न दिलीप वळसे-पाटील यांनी केला तर अध्यक्षांनीही त्याला प्रत्युत्तर देत कुठे बसायचे, हा तुमचा अधिकार आहे,असे उत्तर दिले. तसेच मंत्री नसताना चर्चा करून चुकीची परंपरा मांडू नका आणि सत्तापक्षाला पाठीशी घालू नका, असा सज्जड दमदिला. आता कामकाजाचा अखेरचा दिवस उरला आहे. अखेरच्या दिवशी नागपुरातल्या या अधिवेशनात काय काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.