विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ४८

    15-Dec-2017   
Total Views |


अवंती : मेधाकाकू... तू काल म्हणालीस, या लोकश्रूती तत्वज्ञान सांगतात. एक प्रश्न पडलाय मला ऐकणाऱ्याने आणि वाचणाऱ्याने ते कसे समजायचे ? कारण तत्त्वज्ञान असा शब्द ऐकला की आम्ही मुले आमचे कान बंद करतो. फार कठीण असलं तर मी हे कसे समजून घ्यायचय, दुसऱ्यांना काय आणि कसं सांगायचं. !
 
मेधाकाकू : अरेच्या अवंती, फारच मोठ्ठा प्रश्न पडलेला दिसतोय, तत्वज्ञान हा शब्द आल्याबरोबर. अगं, इतके काही चिंतेचे कारण नाही बर का. ! यात तत्वज्ञान सांगितलंय म्हणजे नक्की काय ते तर आधी विचार. मग प्रश्न पडला तर बघूया आपण. आता ऐक, आपल्या समाजाने काही प्रवृत्ती अयोग्य - अक्षम्य ठरवल्या, तशाच काही भावना-धारणा कशा वापरायच्या किंवा कशा टाळायच्या याचे धडे म्हणजे यातले तत्वज्ञान. सहज-सोपे... सगळ्यांना समजणाऱ्या चार-सहा शब्दांत मांडलेले. ज्या काळात दळण-वळणाची साधने नव्हती, आत्ता सारखी संपर्काची साधने नव्हती त्या काळांत याचे महत्व फार होते. हे लोकसाहित्य-लोकश्रुती-लोकोक्ती अगदी संत साहित्यासाराखाच आहे बघ अवंती... रोजच्या कुटुंब जीवनात आवश्यक अशी आनंदिवृत्ती, योग्य, साक्षर, न्यायवृत्तीचे प्रामाणिक व्यवहार, उत्तम परमार्थ हे सगळ मिळण्यासाठी प्रत्येकाला माहित असलेला एक सहज मार्ग, मात्र तत्वज्ञानाच्या एका जाडजूड पुस्तकाच्या तोडीचे चार-सहा शब्द.
 
अवंती : ओहोहो... मेधाकाकू... मी तो ‘तत्वज्ञान’ हा शब्द ऐकला आणि विनाकारण तणाव घेतला...त्याचा भावार्थ नक्की काय ते समजून घ्यायच्या आधिक. शाळेत परीक्षेच्या वेळी आमचे सगळ्यांचे असेच होते, शांतपणे प्रश्न समजून घ्यायच्या आधीच घाम फुटतो. तेच टाळायचंय आम्हाला सगळ्यांना...!
 
 
मेधाकाकू : नेमक्या याच अपेक्षेने, ह्या म्हणी आणि हे वाकप्रचार समाजात निर्माण झाले आणि नेमके हे काम सहज संपन्न करत राहिले, आजपर्यंत. महिला सक्षमीकरण अशी चर्चा करायला सगळ्यांनाच आवडते, काही महिला त्यांच्यावरच्या अन्यायाची बेगडी जाहिरात करतात. आता गेल्या काही शतकांपासून आपल्या समाजाने आपल्या कुटुंबातील महिलेच्या कर्तुत्वाची, हुशारीची जाणीव कशी ठेवल्ये बघ...
जमाखर्च स्त्रीचे हाती ठेवावा अशी व्यासस्मृती.
मेधाकाकू : महाभारतकार व्यास ऋषींनी स्त्रियांच्या चतुर आणि चाणाक्ष व्यवहार कौशल्याची, विशेष करून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनाची नोंद केली आहे अशी एक लोकश्रूती आहे. प्रत्यक्षात अनुभवला येते कि कुटुंबाचे अर्थकारण सांभाळताना स्त्रिया खरोखरच आवक-खर्च-बचत याचे गणित फार निगुतीने सांभाळतात. कुटुंबकल्याणाच्या अशा जबाबदार्या घरातल्या स्त्रीयांनांच दिल्या जाव्या असा हा स्पष्ट सल्ला म्हणूनच या वाकप्रचारात दिला गेला आहे. अवंती...या अगदी साध्या-सोप्या कुटुंब व्यवस्थेलाच समर्थ रामदासांनी प्रपंच विज्ञान असे संबोधले आहे. या वाकप्रचारातून मांडलेले हेच ते संत साहित्यातील तत्वज्ञान.
 
अवंती : होय मेधाकाकू... हा विषय आम्हा तीन मैत्रिणींच्या बोलण्यात सुद्धा बोलत असतो अलीकडे. असे काही खास कारण नाही...पण स्त्रियांचे कुटुंबकल्याण आणि व्यस्थापन या विषयातले, आमच्या घरी आजी+आईचे आश्वासक विचार आणि मोहिनीच्या घरातली परिस्थिती यात खूप फरक आहे असे आमच्या लक्षात आलाय...!!..स्त्रियांच्या मासिकपाळीच्या संदर्भात फार तणाव असतो तिच्या घरात.
 
मेधाकाकू : अरेच्या... अवंती, तुम्ही मुली फक्त १३ / १४ वर्षांच्या आहात आणि इतके गंभीर विषय बोलता.. मला जरा आश्चर्य वाटतय इतकेच. अशाच घमेंडी आणि सनातनी प्रवृत्ती लोकश्रुतीत नोंदवल्या गेल्या आणि त्यावर सुद्धा भाष्य झालंय...!!..
काशीस गेल्याचे आपण सांगतो पण मांजर मारल्याचे सांगत नाही.
मेधाकाकू : काशीयात्रा करून आले कि पुण्यसंचय होतो अशी श्रद्धा पूर्वापार लोकमानसात रुजलेली आहे. पायी प्रवास करून अशी यात्रा करण्याची पद्धत विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत प्रचलित होती ज्यामुळे देशाटन होऊन अन्य प्रदेशांचा परिचय होत असे. मात्र या धारणेचा उपयोग जेंव्हा स्वतःला फसवून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी सुरु झाला तेंव्हा याचे दुष्परिणाम स्वतःसह कुटुंबाला भोगावे लागतात. अवंती... तू उल्लेख केलास त्या संदर्भात काही ऐक. पुरुष आणि विशेषत: स्त्रीच्या शरीरधर्माचा योग्य परिचय नसल्यामुळे अथवा करून न घेतल्यामुळे, अंधपणे आजही या मासिक पाळीच्या संदर्भात स्त्रियांना विशेषत: तरुण मुलीना अयोग्य वागणूक कुटुंबाची पद्धत, प्रथा आणि परंपरा या नावाखाली दिली जाते. अगदी हाच मुद्दा या वाकप्रचारामधे काशी यात्रेचे रूपक वापरून अप्रत्यक्षरित्या मांडला गेलाय. आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली असूनही आम्ही सोवळे-ओवळे पाळतो असा देखावा निर्माण करणारे कुटुंब आपल्याला दिसते मात्र आपण अंधप्रवृत्तीचे आचरण करतो आहोत, हे काबुल करत नाही. आपल्या समाजाने अशा अनेक अनिष्ट प्रथांपासून दूर राहा, अंधश्रद्धांना स्वीकारू नका, विज्ञाननिष्ठ रहा असा स्पष्ट आणि व्यवहारी सल्ला या वाकप्रचारात नक्की दिलेला आहे.
 
 
अवंती : सही एकदम सही... मेधाकाकू आपल्या या अभ्यासातून मला आत्मविश्वास मिळतो...आणि काही व्यवहारांची कल्पना स्पष्ट होते...!!..
 
मेधाकाकू : होय.. अगदी तोच उद्देश नाही आपला तरी तुझ्या विचारात काही फरक निश्चितच जाणवतोय मला. हा फरक जाणिवांचा आहे समजुतीचा आहे मात्र एक लक्षात घे कि आपण आपल्या दैवदत्त बुद्धीमत्तेनुसार आणि त्यातील उपलब्ध कुवतीनुसारच वागत असतो व्यवहार समजून घेत असतो...!!..
उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला.
मेधाकाकू : ही म्हण आहे एका उंदराची सात शब्दांत सांगितलेली गोष्ट. मस्कतला म्हणजे समुद्रापार व्यापारी माल घेऊन जाणार्या जहाजावर एक उंदीर लपून बसलेला असतो. लांबची समुद्र सफर करून जहाज मस्कतला जाऊन येते...त्यातले व्यापारी खूप पैसा मिळवतात मात्र आपला उंदीर चिंध्या आणि कापड कुरतडण्यातच मग्न रहातो कारण त्याची बुद्धीची जाणीव तेवढीच आहे. यातला सल्ला इतकाच...आपल्या परिचयातील प्रत्येकाची बुद्धीची क्षमता आणि जाणीवा सारख्याच नसतात याची जाणीव ठेवावी...कोणालाही गृहीत धरू नये.
अवंती, आता या तीन वेगवेगळ्या लोकश्रुतींमधे एक समान सूत्र आहे ते म्हणजे विज्ञाननिष्ठ सामाजिक आणि वैयक्तिक व्यवहार समजून घेण्याचे आपली जाणीव जागृती करण्याचे. एकाच लक्षात ठेव आपण अभ्यासाचे असे जे काही निवडक गंभीर वाचन करतो ते वाचून झाल्यावर काही काळ डोळे मिटून त्याचा आढावा घ्यायचा, आणि ते सर्व आपल्या मेंदूच्या स्मरण कोशात सरकवायचे. यामुळे असे वाचलेले काही आपल्याला हवे तेंव्हा वापरता येते...!!
 
अवंती : अरे व्वा... मेधाकाकू... आज पुन्हा एकदा तू मला वेगळे काही दिलेस ते म्हणजे या तीन वेगवेगळ्या संदर्भातील लोकश्रुतींचे समान सूत्र समजावून सांगितलेस. मस्त-मस्त-मस्त...!!..
- अरुण फडके.

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.