
(चेतक महोत्सव प्रतिकृती )
पर्यटन म्हटल्यानंतर समुद्रकिनारे, देवळे किंवा थंड हवेची ठिकाणे अशी काहीशी चौकट समजली जाते. पर्यटनाला हवी तितकी चालना देण्यातही महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत पिछाडीवर होता. यातच जुन्या बाबींना मागे सारून सारंगखेड्यातील अश्वांची खरेदी विक्रीसाठी भरणारी जत्रा पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक पातळीवर नेण्यासाठी महोत्सवाच्या रूपात साकारण्याची अभिनव कल्पना महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने प्रत्यक्षात साकारली आहे. तापी नदीच्या तिरावर वसलेल्या सारंगखेड्यात पर्यटन हा विषय दूर दूरपर्यंत नव्हता आणि असला तरी तो एका भागापुरता मर्यादित होता. मात्र या जत्रेला नव्या संकल्पनेची जोड देऊन पर्यटकांसाठी आणि प्रामुख्याने गावातील लोकांसाठी रोजगाराच्या रूपातून नवे माध्यमचेतक महोत्सवाच्या रूपातून निर्माण झाले आहे. तुलनेने पर्यटनाच्या दृष्टीने पूर्वीपासून विकसित असलेल्या किंवा पर्यटकांच्या परिचयाच्या असलेल्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार देऊन समांतर अर्थव्यवस्थेची पायाभरणी होणे अधिक सोपे असते. मात्र, नंदुरबारसारख्या एका टोकाला असलेल्या अतिदुर्गमभागात भरवल्या जाणार्या जत्रेचे पर्यटन महोत्सवात रूपांतर करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणे तितकेच कठीण. मात्र, चेतक महोत्सवाच्या रूपाने सारंगखेड्यातील गावकर्यांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग समजल्या जाणार्या सारंगखेडा या गावाने आपली परंपरा जपली आहे. याच गावात एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. त्यामुळे दरवर्षी दत्तजयंतीपासून साधारणत: महिनाभर तापी नदीकिनारी अश्व जत्रा भरते. अश्व जत्रेला आता ३०० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. भारतीय उपखंडातून उत्तमप्रतीच्या घोड्यांची खरेदी विक्री होणारा आणि जगातील सर्वाधिक घोड्यांची खरेदी विक्री केला जाणारा महोत्सव म्हणून ’चेतक महोत्सव’ ओळखला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या जत्रेला महोत्सवाचे रूप देत परंपरेचे जतन करत पर्यटनाचा एक नवा आयामघालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच माध्यमातून हा महोत्सव जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीनेदेखील पावले उचलण्यात येत आहेत.

( राहण्यासाठी चेतक व्हिलेजमध्ये उभारण्यात आलेले तंबू )

( राहण्यासाठी चेतक व्हिलेजमध्ये उभारण्यात आलेले तंबू )
शहरांमध्ये एखाद्या ब्रँडच्या नावाखाली योग्य नियोजन करून वस्तूंची खरेदी-विक्री होत असली तरी गावांमध्ये भरणार्या अशा जत्रांमधून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी विक्री होत असताना दिसते. आज अनेक गावांमध्ये अशाप्रकारे भरणारे पारंपरिक बाजार भरत असल्याचे दिसून येते. सारंगखेड्यात भरविण्यात येणार्या घोडेबाजारात मोठ्या प्रमाणात होणारी अश्वांची खरेदी-विक्री या बाजाराला एक वेगळेच महत्त्व प्राप्त करून देते. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली होता. मात्र त्याचा फारसा परिणाम या चेतक महोत्सवातील उलाढालीवर झालेला दिसला नाही. त्यावर्षीही तब्बल २ कोटी ७३ लाख ६८ हजार रुपयांवर या जत्रेत उलाढाल झाली होती तर यावर्षीही ही उलाढाल काही दिवसांमध्ये लाखोंच्या घरात गेली आहे. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ’ऑस्कर’ नावाच्या घोड्याला तब्बल एक कोटीच्या वर तर धिप्पाड अशा बाहुबली नावाच्या घोड्याला ५५ लाखांची बोली लागल्याचे त्यांच्या मालकांनी सांगितले. तब्बल २५० प्रजातींचे ३ हजारपेक्षा अधिक घोडे पाहण्यासाठी आज देशातूनच काय तर परदेशातूनही पर्यटक गर्दी करत आहेत. काही देशातील पर्यटक या ठिकाणी येऊन या महोत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत तर काही अश्वप्रेमी दूरवरून येऊन घोड्यांची खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे गावातील प्रत्येक छोट्यात छोट्या घटकापासून मोठ्या घटकापर्यंत सर्वांनाच रोजगाराचे एक साधन उपलब्ध झाले आहे. याशिवाय या ठिकाणी येणार्या पर्यटकांना राहण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त तंबूंची व्यवस्थादेखील चेतक व्हिलेजमध्ये करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी तापी नदीपात्रात पाण्यावरील खेळांचा आनंद लुटण्यासाठीही नव्या व्यवस्था उभारण्यास सुरुवात झाली आहे.पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि पर्यटन विभागाने कंबर कसली आहे. रावल यांचे युवा व्यक्तिमत्त्व, व्यवस्थापनाचे शिक्षण आणि योग्य दृष्टिकोन यामुळेच त्यांना महोत्सवाचे मोठ्या प्रमाणावर नियोजन करणे शक्य झाले आहे. केवळ घोड्यांची खरेदी विक्री होणार्या या जत्रेला महोत्सवाचे रूप देऊन गावात पर्यटन सुरू करण्याची पायाभरणी त्यांनी केली. आज सर्वाधिक रोजगार हा पर्यटनामधून निर्माण होत असला तरी केवळ कागदी घोडे नाचवून ते शक्य होत नाही. आपली संकल्पना प्रत्यक्षात साकार करून गावातील प्रत्येकाला सोबत घेऊन महोत्सवाच्या रूपाने समोर आलेला हा घोडेबाजार जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.

( चेतक महोत्सवमधील राहण्याच्या ठिकाणाकडील गेट )

(विक्रीसाठी असलेले घोडे )
यावर्षी या घोडेमहोत्सवातील आकर्षण ठरले म्हणजे ऑस्कर आणि बाहुबली हे घोडे. ऑस्कर या घोड्याचा बांधा आणि रंग पाहून मन मोहून टाकत असल्याने त्याला सर्वाधिक एक कोटीच्या वर बोली लागली. त्याने आजवर निरनिराळ्या स्पर्धांमध्ये पाच पारितोषिके पटकावली आहेत तर बाहुबली हा घोडा त्याच्या उंचीमुळे सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. केवळ ४१ महिन्यांमध्ये त्याची उंची ६५ इंचांच्यावर गेली आहे. त्याचा रंग या महोत्सवाला येणार्या सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फेडत आहे. त्यालाही या ठिकाणी ५५ लाखांची बोली लावण्यात आली. मात्र, हे दोन्ही घोडे केवळ प्रदर्शनासाठी आणण्यात आले असून ते विकण्यासाठी नसल्याचे त्यांच्या मालकांनी स्पष्ट केले. याच महोत्सवात मोठ्या घोड्यांप्रमाणेच लहानखुरे खेचरही अगदी पाच हजारांपर्यंत विकले जातात.

(सर्वाधिक उंच असलेला घोडा बाहुबली )
देखभालीवर खर्च
पूर्णपणे वाढ झालेल्या एका घोड्याला दिवसाला १० लिटर दूध, पाच ते सहा किलो चणे, पाच ते सहा किलो गहू असा खुराक द्यावा लागतो. त्यातच त्यांना सांभाळण्यासाठी लागणारी किमान दोन माणसे मिळून दिवसाला प्रत्येक घोड्यावर चार ते पाच हजारांचा खर्च होतोे. घोडा सांभाळणे म्हणजेच पांढरा हत्ती पोसण्यासारखेच आहे.
आजही कच्छचे रण असो किंवा पुष्करसारखे ठिकाण असो या ठिकाणीही घोडे बाजार भरले जातात. मात्र या ठिकाणी स्थानिक जातीच्या घोड्यांची विक्री केली जाते. मात्र सारंगखेड्याचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी गुजराती, काठेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा प्रांतातील विविध जातीच्या घोड्यांचीही विक्री करण्यात येते.त्यातच या ठिकाणी देशातील पहिले भव्य असे अश्व संग्रहालय उभारण्यात येणार असून शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या संग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले.
( सर्वाधिक बोली लागलेला घोडा आॅस्कर )
पर्यटनाच्या माध्यमातून सारंगखेड्यासारख्या आदिवासीबहुल भागात विकासाची गंगा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न सध्या सुरू करण्यात येत आहेत. येत्या काळात देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील अधिकाधिक पर्यटक या महोत्सवाकडे आकर्षित होतील यात काही शंका नाही.महोत्सवाला पर्यटनाचे रूप लाभून काहीच अवधी उलटला असल्याने नियोजनात काही कमतरता राहिल्या होत्या. मात्र, प्रत्येक माणूस काही चुकांमधून सुधारत पुढे जात असतो. मोठ्या प्रमाणात येऊ शकणार्या पर्यटकांसाठी येत्या काळात सुविधा तोकड्या पडणार नाहीत याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाईल, अशी आशा व्यक्त करता येईल. येत्या काळात पर्यटक वाढून गावकर्यांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर हा अनोख प्रयत्न सार्थकी लागला, असे समजले तरी वावगे ठरू नये.
अश्वांसाठी रुग्णालय हवे
दरवर्षी या ठिकाणी अनेक घोडे येत असल्याने त्यांच्यासाठी सुसज्ज असे रुग्णालय उभारावे आणि घोड्यांची पैदास करण्यासाठी गावात अश्व पैदास केंद्रांची उभारणी करण्याची विनंती महोत्सवाचे अध्यक्ष जयपालसिंग रावल यांनी केली. तसेच अश्व शर्यतीसाठी भारतीय जातीचे घोडे हे बाहेरील घोड्यांपेक्षा सरस आहेत. मात्र इंग्रजांनी आपला हेतू साधण्यासाठी त्याच्या येथील घोड्यांना प्रसिद्धी दिली आणि तीच परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे देशी घोड्यांना या शर्यतीत परवानगी मिळत नाही. त्यामुळे ही परंपरा मोडून देशी घोड्यांना यात स्थान मिळवून देण्यासाठी सरकारने मदत करावी, असेही ते म्हणाले.
सारंगखेड्याला कसे पोहोचाल?
मुंबईवरून एसटीने धुळे आणि धुळ्यावरून पुन्हा सारंगखेड्याकडे जाणार्या एसटीने या ठिकाणी पोहोचता येऊ शकते. किंवा स्वत:चे वाहन असल्यास मुंबई, नाशिक महामार्गावरून मालेगाव, धुळेमार्गे सारंगखेड्याला पोहोचता येते. किंवा रेल्वेमार्गे मुंबईवरून धुळे आणि धुळ्याहून एसटीने सारंगखेड्याला पोहोचता येते.
- जयदीप दाभोळकर