तुम्ही दिल्लीला प्रवास करण्याचे बेत आखले असतील तर त्याचा पुन्हा एकदा विचार करा. कारण इथले प्रदूषणाचे उच्चांक गाठलेली हवा, इकडचे धुक्यात धूसर झालेले वातावरण तुमच्या जीवनाची तब्बल सहा वर्षे कमी करू शकते. कारण, दिल्लीची सद्यस्थिती पाहता असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. दिल्लीतील वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय वैद्यकीय संस्थेकडून (आयएमए) राज्यात ‘सार्वजिक आरोग्य आणीबाणी’ लागू करण्यात आली आहे. हवेमुळे दिल्लीकरांना श्वसनासंबंधी त्रास होण्याची शक्यता लक्षात घेता येथील शाळादेखील काही काळ बंद ठेवण्यात येणार आहेत. श्वसनाचा आणि हृदय व रक्तवाहिन्यांचा त्रास असलेल्या नागरिकांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. हवेची गुणवत्ता चिंताजनक झाल्याने दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी फिरणेही अवघड झाले आहे. नवी दिल्ली येथील ’भारतीय संशोधन संस्था’ आणि ’इकहान स्कूल ऑफ मेडिसीन’ यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रदूषणामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. खरंतर दिल्लीतील हवेबाबत गेली अनेक वर्षे संशोधन करणाऱ्या संस्थांनी तेथील वायूप्रदूषण २०२० पर्यंत १९ पटींनी वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. ’आयआयटी रूरकी’, अमेरिकेतील ’मिनेसोटा विद्यापीठ’, ब्रिटनमधील ’सरे’ विद्यापीठ यांनी २००८ ते २०१५ अशी आठ वर्षे दिल्लीतील हवेचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, १९९१ ते २०११ या काळात दिल्लीत वाहनांमधून बाहेर पडणार्या विषारी वायूंचे प्रमाण तीनपटीने वाढले आहे. संशोधकांनी वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे, २०२० पर्यंत या प्रदूषणामध्ये आणखीनच भर पडणार आहे. ’ऍटमॉस्फेरिक एनव्हॉयर्नमेंट’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले होते. खासगी वाहनातून म्हणजे मोटारी व दुचाकी वाहनातून कार्बन डायऑक्साईड, हायड्रोकार्बन, पीएम १० (पार्टक्यिुलेट मॅटर), कार्बन मोनॉक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड व बुटाडाईन, ऍसेटाल्डिहाइड,बेंझिन, फॉरमॅल्डीहाईड, अल्डीहाईड, पॉलि अरोमेटिक हायड्रोकार्बनचे प्रमाण २०११ ते २०१५ या काळात २०११च्या तुलनेत दोन ते १३ पट वाढले आहे. दिल्लीमध्ये मध्यंतरी वाहनांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेत, सम आणि विषम प्रयोग करण्यात आला होता. परंतु, त्याचा फारसा फरक पडले नसल्याचे दिसून येत आहे. वाहनांमधून निघणारा धूर आणि अन्य प्रदूषकांचे कण वातावरणाचे प्रदूषण ४० ते ६० टक्क्यांनी वाढवितात. त्यामुळे दिल्लीकरांनी व तिथल्या सर्व व्यवस्थांनी त्यांच्यावरचे संकट दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महिलांनो, आरोग्य जपा !
काळ बदलला आणि महिलाजगतातही हळूहळू सगळं काही बदलत गेलं. ’चूल’ आणि ’मूल’ केवळ हेच ध्येय उराशी न बाळगता त्या पलीकडे जाऊन आपली स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार करण्यासाठी जास्तीत जास्त मुली शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागल्या. महत्त्वाची बाब म्हणजे, केवळ शिक्षण न घेता स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ’ती’ नोकरी, छोटे-मोठे व्यवसाय करू लागली. हे सगळं वाचल्यावर नकळतपणे प्रत्येक महिलेला, तरुणीला अभिमान वाटणं साहजिक आहे. परंतु, हे सगळं सुरळीत सुरू असताना मध्येच कधीतरी एखादी आरोग्याशी संबंधित असलेली समस्या निर्माण होते आणि मग डॉक्टरांच्या क्लिनिकची पायरी चढावी लागते. मग एखादा लहान-सहान किंवा गंभीर आजार झाल्याचं डॉक्टरांनी सूचित केल्यावर आपण आपल्या आरोग्य, तब्येतीकडे केलेल्या दुर्लक्षाची जाणीव होऊ लागते. असाच काहीसा एक अहवाल ‘जागतिक पोषण आहारा’ने नुकताच सादर केला आहे.भारतातील १५ ते ४९ वयोगटातील सुमारे ५१ टक्के महिलांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे या अहवालामधून समोर आले आहे. गेल्याच वर्षी हे प्रमाण ४८ टक्के होते.खरंतर स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास महिलांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्तीत-जास्त १४ ते १५ असणे गरजेचे आहे. बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, ताण-तणावाचे दुष्परिणाम हे आरोग्यावर होतच असतात. घर, ऑफिसच्या कामाची दुहेरी कसरत त्यांना करावी लागत असल्यामुळे ’तिचे’ आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर, ती तिच्यापेक्षा तिच्या कुटुंबाचा जास्त विचार करते. त्यामुळे साहजिकच तिला स्वतःसाठी फारसा वेळ देता येत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे,रक्तदान करणार्यांमध्ये महिलांचे रक्तदान करण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने कमी असल्याचे आढळून आले आहे. कारण, हिमोग्लोबिनचे प्रमाण १२च्या खाली असलेल्यांना रक्तदान करता येत नाही. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ ते १४ याच प्रमाणामध्ये जास्त असल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगतात. ग्रामीण भागातील महिलांमध्ये याहीपेक्षा गंभीर स्थिती आहे. त्यामुळे निदान आता तरी महिला, तरुणींनी आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे. सुशिक्षित महिला, नोकरदार महिला, गृहिणी, तरुणी अशा सर्व स्तरातील महिलांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.
- सोनाली रासकर