त्रिपुरारी पौर्णिमा

    03-Nov-2017   
Total Views |

 

कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव-दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. संपूर्ण भारतात कार्तिकोत्सव कुठे एक दिवस, कुठे ५ दिवस तर कुठे १० दिवस साजरा केला जातो.

 

कार्तिक पौर्णिमेची एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी – एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण अशी चर्चा चालू होती. तेंव्हा शंकराने आपले ज्योती-रूप प्रकट केले. त्याने ब्रह्मा व विष्णूला त्या ज्योतीचा आदी आणि अंत शोधायला पाठवले. ब्रह्मा ज्योतीच्या आकाशाकडचे टोक शोधायला निघाला, तर विष्णू पाताळाकडचे. फार काळ, फार अंतर पार केल्यावर, ब्रह्माला त्या प्रकाशामध्ये तरंगणारे फुल दिसले. ते शिवाच्या जटेतील ३०,००० वर्षांपूर्वी वाहिलेले फुले होते. तेंव्हा ब्रह्माने तोच आरंभ आहे असे मानले. परत येऊन त्याने शंकराला खोटेच सांगितले, की मी तुझ्या ज्योती-रूपाचा आरंभ पहिला! इतक्यात विष्णू पण परत आला. विष्णूने हात जोडून, सत्य सांगितले, “मला काही तुझा अंत लागत नाही!” शंकराने प्रसन्न होऊन विष्णूला वर दिला, “भूलोकी तुझी अनेक मंदिरे बांधून, तुझी पूजा केली जाईल!” आणि ब्रह्माला मात्र शाप दिला, “तुझे मंदिर कोणी बांधणार नाही!” कार्तिक पौर्णिमा त्या अनादी, अनंत ज्योतीचा हा उत्सव आहे.

 

त्रिपुरी पौर्णिमेला शंकराला शेकडो वातींचा दिवा लावायची प्रथा आहे. तर शिवालायांमधून आज रुद्राभिषेक केला जातो.

  

कार्तिक पौर्णिमेसाठी दिव्यांनी सजलेले तामिळनाडूचे अरुणाचलेश्वर शिव मंदिर. इथे कार्तिक पौर्णिमेचा उत्सव सौर कॅलेंडर प्रमाणे साजरा केला जातो. या उत्सवाला कार्थिकै दिपम् किंवा कार्थिकै ब्रह्मोत्सव सुद्धा म्हणतात.

 

कार्तिक पौर्णिमेची अजून एक गोष्ट अशी आहे – तारकासुर नावाच्या असुराची. त्याला तीन मुले होती – ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. त्या तिघांनी एक एक नगरी अर्थात ‘पूर’ वसवले होते. देवासुरांच्या युद्धात शंकराने या असुरांना त्यांच्या तीन पुरांसकट नष्ट केले. तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा. शंकरची म्हणजे ‘तीन पुरांच्या अरीची’ ही ‘त्रिपुरारी’ पौर्णिमा. असुरांच्या जाचातून सुटल्याने आनंदलेल्या देवांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली!

 

या तारकासुराने ब्रह्माकडून ‘अमर’ होण्याचा वर मागितला होता. ब्रह्मा म्हणाला, “असे काही मी देऊ शकत नाही. तू दुसरे काहीतरी माग.” तेंव्हा त्याने, “मला शिवाच्यापुत्राकडून मृत्यू येवो.” असे मागितले. त्यावेळी सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मदहन केले होते. आणि शंकर अत्यंत दु:खी होऊन कित्येक वर्ष समाधी लावून बसले होते. या वराने तारकासुर जवळ जवळ अमर झाल्यासारखाच होता. पुढे पार्वतीची तपश्चर्या, शिव-पार्वती विवाह आणि कार्तिकेयचा जन्म झाला. आणि तारकासुराचा वध कार्तिकेयने केला. कार्तिकी पौर्णिमेला कार्तिकेयाचे दर्शन घेण्याची पद्धत आहे.

 

राजस्थान मधील पुष्कर येथे एक ब्रह्ममंदिर आहे. या ब्रह्ममंदिरात त्रिपुरी पौर्णिमेला फार मोठा मेळा भरतो. उंट, शेळ्या, मेंढ्या, गायी यांची या मेळ्यात खरेदी-विक्री केली जाते. कार्तिक पौर्णिमेला, पुष्कर सरोवरात दीपदान करायची पद्धत आहे.

 
        

 

वाराणसीला गंगेच्या घाटावर हजारो दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते.

 

 

देव दिवाळी, गंगा घाट, वाराणसी

 

शिवाय शिप्रा, नर्मदा, गोमती व इतर अनेक नद्यांमध्ये दीपदान केले जाते. दीपदान करावयाचे दिवे – शास्त्राप्रमाणे गव्हाच्या पिठाचे किंवा मातीचे असावेत. त्यामध्ये तेलाचा नाहीतर तुपाचा दिवा लावावा. असे दिवे नदी प्रदूषित करत नाहीत.

 
                  

  

कार्तिकी पौर्णिमेला, महाराष्ट्र, गोवा येथील मंदिरांमधून शेकडो दिवे लावून दीपमाळा प्रज्वलित केली जाते.

ही कार्तिक पौर्णिमा आपले जीवन ज्ञानाच्या, समृद्धीच्या आणि आनंदाच्या प्रकाशाने उजळू देत! 

 

दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.