माणुसकीची रंगशलाका जपणारे मराठमोळे उद्योजक - आनंद शेट्ये

    24-Nov-2017   
Total Views |
 
 
बोरिवलीच्या नॅशनल पार्कचा सिग्नल. एक लाल रंगाची कार येऊन उभी राहते. तेवढ्यात डोक्यावर देव्हारा घेऊन एक बाई जोगवा मागत त्या कारजवळ जाते. त्या तरुणाच्या मनातला दातृभाव जागृत होतो आणि आपसूक हात खिशाकडे वळतात. कारमधल्या तरुणाकडे असतात फक्त ५० रुपये. ते ५० रुपये तो त्या बाईला देतो. बाई आर्शिवाद देऊन पुढे निघून जाते. खिशात एकही दमडी नसलेला हा मनाचा श्रीमंत तरुण मात्र तिथेच उभा असतो. मात्र पुढच्याच वेळी नियती त्याच्यासमोर ऐश्वर्य घेऊन उभी, हे त्याच्या गावीही नसते. एखाद्या फिल्मी कथेसारखी ही कथा आहे रंगशलाकाच्या आनंद शेट्ये यांची. मनाची श्रीमंती असलेला हा मराठमोळा उद्योजक आज कोटी रुपयांच्या उद्योगाचा जनक आहे. आणि तितकाच तो दातादेखील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील खानयाले गाव. गोव्याला अगदी चिकटून असलेले एक खेडे. याच खेड्यात शेतकरी कुटुंबातील काशिनाथ शेट्ये आणि आशालता शेट्ये या शेट्ये दाम्पत्याच्या पोटी आनंदचा जन्म झाला. सहा बहिणी आणि एक भाऊ असा आनंदचा मोठा परिवार. शेतीसुद्धा पावसावर अवलंबून. त्यामुळे एकप्रकारे हातावरचं पोट असलेलं हे कुटुंब सांभाळण्यात काशिनाथ आणि आशालता या शेट्ये दाम्पत्याची कसरत व्हायची. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांना चांगलेच उमजले होते. म्हणून त्यांनी पोटाला चिमटे काढून आपल्या सगळ्याच मुलांना चांगले शिक्षण दिले. आनंदने सिव्हील इंजिनिअरचा डिप्लोमा केला. त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या सिंचन खात्याने ग्रामीण भागातील तरुणांना इंजिनिअरिंंगचे धडे मिळावेत म्हणून इंजिनिअरिंग सुरू केलं. त्यामुळे आनंदला इंजिनिअर होता आलं. शिक्षण झालं. आता पैसा कमवायचा. तो कमावण्यासाठी आनंद मुंबईत १९८८ साली मोठ्या बहिणीकडे आला. मालाडच्या कुरार व्हिलेज मधल्या १० बाय १० च्या खोलीत राहू लागला. आठ महिने होऊनसुद्धा नोकरी मिळत नव्हती. कारण नोकरी कोणाकडे मागायची हेच मुळी आनंदला माहित नव्हतं. त्यात बुजरा स्वभाव. शेवटी एका ओळखीने त्याला एका बिल्डरकडे साईट सुपरवायझरची नोकरी मिळाली. ३००-४०० रुपये पगार होता. आनंद प्रामाणिक आणि मेहनती होता. ओळखीने त्याला इतर ठिकाणीदेखील नोकर्‍या मिळत होत्या. कुटुंबाच्या चरितार्थासाठी पैसा महत्त्वाचा म्हणून जिथे १००-२०० रुपये जास्त तिथे आनंद काम करू लागला. याच दरम्यान त्याचे अनेक मित्र झाले. यापैकी एक मित्र, महेंद्र सकपाळने एका बिल्डींगच्या कठडा दुरुस्तीचं काम आणलं. दोघांनी मिळून ते १३ हजार रुपयांचं काम चोख करून दिलं. दोघांना प्रत्येकी ७०० रुपये निव्वळ नफा म्हणून पैसे मिळाले. आपण महिना राबून जेवढे पैसे कमावतो तेवढे आपल्याला निव्वळ एका आठवड्यात मिळाले. इथे खर्‍या अर्थाने आनंदमध्ये उद्योजकतेची बीजे रोवली गेली.
 
त्याच सुमारास त्याला दहिसरला एका १२ माळ्याच्या इमारतीचा सुपरवायझर म्हणून नोकरी मिळाली. त्याकाळात एक्सप्रेस टॉवर हीच उंच इमारत म्हणून गणली जायची. त्यामुळे १२ माळ्याच्या इमारतीचा सुपरवायझर म्हणून काम मिळाल्याचा त्याला अनोखा आनंद झाला. याच ठिकाणी आनंदला मिलनभाई मेहता नावाचा नवीन मित्र मिळाला. तो आनंदला म्हणे की, तुला परिवार मुंबईला आणायचा आहे, घर घ्यायचं आहे, बहिणीची लग्न करायची आहेत तर ते नोकरी करून होणार नाही. त्यासाठी बिझनेसच करावा लागेल. आनंदला हे पटलं. त्याचवेळी आनंदला सत्तारभाई म्हणून अजून एक पेंटर मित्र भेटला. तो आनंदला म्हणाला की, तू या बिल्डींगमधल्या घर घेणार्‍या लोकांना सांग की घराला डिस्टेम्पर लावा. त्या काळात चुना जास्त प्रचलित होता. एका घरमालकाने डिस्टेम्पर लावण्याची ऑर्डर दिली. ते कामआनंदने इतक्या सुंदर पद्धतीने केलं की इतर घरमालकांनीसुद्धा आनंदला कामे दिली. आनंद नोकरी करत असल्याने थेट कामे घेत नसे. मिलनभाई कामे घेत आणि सत्तारभाई कामे करत असं सर्व सुरळीत चाललेलं. याचवेळी आनंदने सांताक्रुझला एका बंगल्याच्या दुरुस्ती व रंगरंगोटीचं कामघेतलं. ४ लाख रुपयांचं कामहोतं. कामपूर्ण केल्यानंतर दुसर्‍या दिवशी पैसे मिळणार होते. ४ लाख रुपये रक्कमम्हणजे १९९८ साली मोठी होती. दरम्यान आनंदने आई आणि बहीण भावाला मुंबईला आणले होते. चारकोपला भाड्याच्या घरात ते राहत होते. लग्नदेखील झालं होतं. आता आपण पूर्ण सेटल होऊ, असा विचार डोक्यात होता. दुर्दैवाने त्याच दिवशी त्या घरमालकाचे दुर्दैवी निधन झाले होते. हा व्यवहार आपल्याला माहीत नाही म्हणून त्याच्या मुलांनी हात वर केले. सव्वा लाख रुपयांचे सप्लायर्सचे देणे होते. ज्याने काममिळवून दिले त्याला मध्यस्थी करून कसेबसे एका मुलाने ७५ हजार रुपये दिले. त्याचवेळी मिलनभाई भेटला. त्याला पूर्ण माहिती कळल्यानंतर तो आनंदला घेऊन थेट कारच्या शो रुममध्ये घेऊन गेला आणि ६३ हजार रुपयांची कार घेऊन आला. आनंद पाहताच होता. मिलन म्हणाला, ’’तू माझ्यावर विश्वास ठेव.’’ तो आनंदला कारमधून घेऊन सप्लायर्सकडे गेला. गुजरातीमध्ये तो सप्लायर्सना सांगायचा, ’’याच्या बिझनेसमध्ये सध्या प्रॉब्लेम आलाय मात्र टेन्शन घेऊ नका. हा पैसे देईल. ३ लाखाची कारसुद्धा त्याच्याकडे आहे आणि मीसुद्धा आहेच की.’’ सप्लायर्स त्या कारकडे पाहून आणि मिलनभाईकडे पाहून थांबले. दुसर्‍या दिवशी आनंद ती कार घेऊन बोरिवलीच्या नॅशनल पार्कला उभा असताना त्या बाईला खिशातले एकमेव ५० रुपयांची नोट देऊनसुद्धा बसला. मात्र इथेच नियती त्याची परीक्षा घेत होती. त्याच सिग्नलला त्याला एक जुना मित्र भेटला. त्याला नेमकं त्याच्या सोसायटीच्या दुरुस्ती आणि रंगरंगोटीचं काम करायचं होतं. तो आनंदला सोबत घेऊन सोसायटीमध्ये गेला. आनंदने अंदाजपत्रक दिले आणि आनंदच्या कंपनीला काम मिळालं. येथून मागे आनंदने वळून पाहिलेच नाही. आज आनंद शेट्ये यांची रंगशलाका कंपनी इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटीचं काम करते. १५० हून अधिक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कामगार रंगशलाकामध्ये कार्यरत आहेत. त्यासोबत बालपणीचा मित्र आणि गोव्याचे माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्यासोबत वास्तुकला बिल्डर्स नावाची बांधकाम व्यवसायातील कंपनीदेखील ते चालवतात. आज आनंद शेट्ये काही कोटी रुपयांची उलाढाल करतात. मात्र या सार्‍या उद्योजकीय प्रवासाचं श्रेय ते बहीण सुचित्रा नाईक, मिलनभाई मेहता, सत्तारभाई, सुधीर धरणे, डॉ. राम घोडगेकर यांना देतात. शिवाजी महाराज प्रेरणास्थान असणार्‍या आनंद शेट्ये यांना प्रत्येक मराठी तरुण व्यावसायिकदृष्ट्या आपल्या उद्योग साम्राज्याचा राजा बनला पाहिजे, असे वाटते आणि त्यासाठी ते स्वत: शक्य तितकी मदत करण्यास तयार आहेत.
 
 
- प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

लेखक ‘युक्ती मीडिया कन्स्लटन्सी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून २०१० साली मुंबई विद्यापीठातून त्यांनी संज्ञापन व पत्रकारिता विषयात मास्टर्स केले आहे. ते ‘डिक्की’चे सदस्य असून उद्योग, उद्योजकता यांचा गाढा अभ्यास व त्यासंबंधी लिखाणात त्यांचा हातखंडा आहे.