अमेरिकेहून माघारी आल्यापासून काँग्रेसचे उपाध्यक्ष कमालीचे फॉर्मात आलेले आहेत. बाकी काही नाही तरी त्यांनी आपली पप्पू ही प्रतिमा पुसली जावी, यासाठी कष्ट घ्यायला आरंभ केला आहे. त्याची सुरुवात त्यांनी सोशल मीडियातून छोटे, पण अर्थपूर्ण संदेश टाकून केला आहे. असे संदेश मग गावभर फिरवण्याची सुविधा त्या माध्यमात काही कंपन्या करून देत असतात. त्याचा योग्य वापर करून राहुल गांधी आजकाल व्हायरल झाले आहेत. म्हणजे त्यांचा प्रत्येक संदेश वा मतप्रदर्शन व्हायरल होत असल्याच्या बातम्याही नित्यनेमाने येऊ लागल्या आहेत. अर्थातच अशा व्हायरल बातम्या वा संदेशांची मीमांसा होण्याचे काही कारण नसते. साहजिकच आपण कसे सभ्य व सुलक्षणी आहोत आणि मोदी कसे असंस्कृत, रानटी आहेत, ते सांगण्याची संधी राहुलनी साधली तर गैर नाही. अशा आरोप वा चिखलफेकीसाठी माध्यमातला एक वर्ग कायम भुकेलेला असतो. त्यामुळे या व्हायरल होण्याला वेगही येतो. तर अलीकडे राहुलनी आपण मोदींवर टीका करतो, पण त्यांच्या पंतप्रधानपदाचा आदरही करतो, असा एक संदेश पाठवला होता आणि तोही व्हायरल झाला. यात आदर हा शब्द राहुलनी कोणत्या भाषेतून वापरला, असा काही सामान्य बुद्धीच्या लोकांना प्रश्न पडलेला आहे. कारण हिंदी, मराठीत आदर हा सन्मान या अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे, तर इंग्रजीत आदर म्हणजे इतर कोणी, सोम्यागोम्या असाही अर्थ होतो. राहुल इंग्रजीतला 'Other' म्हणत असावेत काय? कारण मोदी पंतप्रधान झाल्यापासून वा मुख्यमंत्री असताना त्यांचा काँग्रेसने किती आदर केला हे सर्वांना ठाऊकच आहे. पण, मोदी बाजूला ठेवून त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राहुल किती 'Other' करायचे, त्याचेही व्हायरल बातम्या देणार्यांना विस्मरण कसे झाले?
२०१३ सालात संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेला गेलेले होते. त्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन एक अध्यादेश तयार केला होता आणि तो राष्ट्रपतींच्या सहीसाठी रवाना केलेला होता. त्यावरून मोठी खळबळ माजलेली होती. लालूप्रसाद व तत्सम कोर्टात दोषी ठरून शिक्षा झालेल्यांचे अपील बाजूला ठेवून, त्यांची निवड रद्द करावी, असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता. तो गुंडाळून अशा दोषपात्र लोकप्रतिनिधींची निवड कायम राखण्यासाठी तो अध्यादेश होता. साहजिकच त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. त्याविषयीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी एक पत्रकार परिषद योजली होती आणि त्यात अध्यादेशाचे समर्थन माकन करीत असताना राहुल तिथे पोहोचले. मग त्यांनी पत्रकारांशी काही मिनिटे एकतर्फी संवाद साधला. त्यात तो अध्यादेश म्हणजे शुद्ध मूर्खपणा असून तो फाडून कचर्याच्या टोपलीत फेकून देण्याच्या लायकीचा असल्याचे सांगून टाकले. याला पंतप्रधान व त्यांच्या एकूण मंत्रिमंडळाचा 'Other' करणे म्हणतात. तसा तो आदर राहुलनी इतक्या जाहीरपणे केला, की अमेरिकेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जागतिक नेत्यांमध्ये तोंड वर करून चालण्याचीच चोरी झालेली होती! त्यांनी तशी तक्रार फोन करून सोनियांच्या कानी घातली होती. इकडे राष्ट्रपती प्रणबदांनी त्या अध्यादेशावर सही करण्याऐवजी तो तसाच बाजूला सारून ठेवला. अखेरीस मनमोहन माघारी परतले, तेव्हा त्यांनीही निमूट तो अध्यादेश रद्द केला. याला म्हणतात पंतप्रधानपदाचा 'Other' करणे. पंतप्रधान असो किंवा अन्य कोणी गल्लीतला नगरसेवक, राहुलना फरक पडत नाही. स्वत:ला सोडल्यास ते बाकीच्यांना इतर कोणीतरी म्हणजे 'Other' करत असतात. मनमोहन त्याला अपवाद नव्हते. योगायोगाने ते पंतप्रधानपदावर बसलेले होते.
राहुल गांधी यांनी आपल्या पित्याचा इतका केलेला 'Other' बघून मनमोहन सिंग यांची कन्या कमालीची विचलित झाली होती आणि तिला आपल्या पित्याने असा 'Other' होण्यापेक्षा सत्तापदाचा राजीनामा द्यावा, असे वाटलेले होते. कधीकाळी मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेल्या संजय बारू यांनी जाहीरपणे तसे ट्विटरवर लिहिले होते आणि मनमोहनकन्येने त्याला दुजोरा दिलेला होता. असाच कुणाचा 'Other' केला जात असेल, तर त्यापेक्षा अपमान बरा म्हणायची वेळ येणार ना? म्हणून मनमोहन यांनी अमेरिकेतून फोन करून सोनियांचे अशा आदरातिथ्यासाठी आभार मानले होते. यामुळे अमेरिकेत मनमोहन यांचा किती सन्मान वाढलेला असेल ? पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ही तेव्हा तिथेच होते आणि पत्रकारांनी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी मनमोहन सिंग यांचा उल्लेख, पाणवठ्यावरची रडवेली बाई म्हणून केलेला होता. मात्र, तिथे हजर असलेल्या कुणा भारतीय पत्रकाराने नाराजी व्यक्त केली नाही, की त्याची बातमीही प्रसिद्ध होऊ दिली नाही. व्हायरल होणे तर दूरची गोष्ट झाली. अर्थात, तेव्हा व्हायरल हा शब्द मराठी वा भारतीय पत्रकारितेत रूढ झालेला नव्हता. पण, पुढे लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि तेव्हा प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी तो किस्सा जाहीरपणे कथन केला. तेव्हा त्याच्या बातम्या गाजल्या. आजच्या भाषेत नवाज शरीफ यांनी नावाजलेल्या पंतप्रधानांचा 'Other' व्हायरल झाला होता. त्यात मोदींनी भारतीय पत्रकाराचे नाव सांगितले नव्हते. पण, तरीही आपण त्या नवाज गप्पांमध्ये सहभागी नव्हतो, असा खुलासा बरखा दत्त या महिला पत्रकाराने तडकाफडकी केलेला होता. म्हणूनच आता राहुल पंतप्रधानांचा आदर करतात म्हणत असतील, तर त्यातला 'Other' समजून घेण्याची गरज आहे. पण, बातम्या व्हायरल झाल्या की बुद्धीही चक्रावून जाते ना? म्हणून राहून गेले असेल.
मुद्दा राहुलनी कुणाचा आदर वा 'Other' करावा असा नसून, माध्यमांच्या व्हायरल होण्याचा आहे. यापैकी कोणाला या शब्दाचे अर्थही उमजेनासे झालेले आहेत, ही बाब लक्षणीय आहे. त्यापैकी मोदींनी पंतप्रधानांचा कोणता अवमान केला वा अनादर केला, त्याचा खुलासा विचारणे आवश्यक नाही काय? जेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानाकडून भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांची टवाळी झाली, त्याचा जाब विचारण्याची हिंमत कुठल्या पत्रकाराने केली नव्हती. तेव्हा त्याचा जाब माध्यमांना विचारण्याचे धाडस मोदींनी केले. याला मनमोहन नावाच्या पंतप्रधानाचा अवमान म्हणावे काय? ती बातमी झाकूनपाकून ठेवण्याला सन्मान म्हणायचे काय? नसेल तर कुठल्याच माध्यमाने त्याचा कुठे उल्लेख कशाला केला नव्हता? मोदींना ही खबर लागली, म्हणजे असे काही घडलेले होते आणि तिथे भारतीय पत्रकार उपस्थित होता. नवाज शरीफ असे काही बोलले तेव्हा आपण तिथे हजर नव्हतो, असा खुलासा बरखा दत्त करते, म्हणजे शरीफ यांनी मनमोहन यांची टवाळी केल्याचे तिलाही ठाऊक होते, याचीच ग्वाही दिली जाते. पण, त्याच्या विरोधात साधा निषेध वा नाराजी व्यक्त करण्याचे कष्टही कोणी घेतले नव्हते. त्याला वाचा फोडण्यातून मोदींनी पंतप्रधानपदी असलेल्या मनमोहन यांचा अपमान केला, असे राहुलना म्हणायचे असेल तर त्यांच्या बुद्धीचे कौतुकच करायला हवे ना? त्याहीपेक्षा त्याविषयी मौन धारण केलेल्या भारतीय माध्यमांचेही गुणगान करायला हवे. राहुल उशिरा व्हायरल झाले. त्यापूर्वीच भारतीय पत्रकार व माध्यमे किती सैरभैर- सॉरी व्हायरल झालेली आहेत, त्याचीच ही साक्ष म्हणायला हवी. असो. अशा लोकांकडून आदर मिळवण्यापेक्षा त्यांचे शिव्याशाप अधिक अभिमानास्पद असू शकतात. म्हणूनच असावे, देशातल्या जनतेने मोदी यांना पंतप्रधानपदावर नेवून बसवले असावे. जनतेलाच आपल्या पंतप्रधानाला 'Other' केलेले बघवले नसावे कदाचित!