आज १४ नोव्हेंबर. बालदिन. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा आजचा हा दिवस ‘बालदिन’ म्हणून ओळखला जातो. आज या बालदिनाच्या निमित्ताने अनेक नावाजलेल्या शाळांपासून ते सर्वसाधारण गटात येणार्या शाळांमध्ये तसेच घराघरांमध्ये आजचा ‘बालदिन’ साजरा केला जाईल. पण, या बालदिनाच्या निमित्ताने आजूबाजूला घडलेल्या धक्कदायक, अगदी हादरवून सोडणार्या घटनांमधून धडा घेऊन पुन्हा या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दखल घेणेही तितकेच गरजेचे आहे.
दिल्लीनजीकच्या गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणार्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येचे प्रकरण समोर आले आणि समस्त पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. अर्थात, अशी अंगावर काटा आणणारी प्रकरणे यापूर्वीही झाली आहेत. परंतु, नेहमीप्रमाणे त्या घटनाही काही काळ लक्षात राहिल्या, चर्चिल्या गेल्या, पण त्यातून फारसा बोध घेण्यात आला नाही आणि आपल्या चिमुकल्या मुलामुलींना कायमचे गमावून बसण्याचे अतीव दु:ख पालकांना पचवावे लागले. संसाराच्या वेलीवर कळी उमलण्याची चाहूल लागली की, त्या दोघांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपल्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या त्या नवीन जीवाच्या आगमनापासून ते त्याच्या भविष्यापर्यंतची अनेक स्वप्ने रंगवली जातात. मुलांनी वयाचा दीड ते दोन वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतर पालकांना मुलांना शाळेत घालण्याचे वेध लागतात आणि तिथूनच पालकांचा मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा संघर्ष सुरू होतो. मग कुटुंबातील सदस्यांच्या, मित्रमैत्रिणींचा सल्ला घेऊन अनेक निकषांचा सांगोपांग विचार करुन सुयोग्य शाळेची निवड केली जाते. शाळांची यादी काढून त्यामधील ‘बेस्ट’ शाळेच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाते. खरंतर आजकाल शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या शाळेची अवाढव्य इमारत, इन्फ्रास्ट्रक्चर लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना आकर्षित करण्यासाठी केलेली सजावट पाहून आपल्या मुला-मुलीला याच शाळेत प्रवेश घ्यायचा, असं मनाशी केल जातं आणि मागचा-पुढचा कोणताही विचार न करता भरमसाट फी मोजून पालक आपल्या रूटीनमध्ये व्यस्त होतात. मग कधीतरी शाळेमध्ये होणारे गैरप्रकार, गैरकृत्य कानावर आलं की, पालकांच्या जीवाची घालमेल होते. त्यामुळे आजच्या या ’बालदिना’च्या निमित्ताने मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि एक पालक म्हणून आपलं काही चुकत तर नाही ना याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. वयाची तिशी ओलांडलेले, नोकरीमध्ये स्थिरावलेले पालक मोबाईलमधल्या एखाद्या ऍपची माहिती जाणून घेण्यासाठी किंवा चुकून काहीतरी भलताच मॅसेज आल्यावर आपल्या चिमुरड्यांच्या हातात देऊन ‘‘हे काय झालं बघं,’’असं बोलून त्याच्या हाती मोबाईल सुपूर्द करतात आणि पुढच्या काही क्षणामध्येच पालकांना न जमलेले ते कोडं ही चिमुरडी मुलं अलगद सोडवतात. आज जवळपास सगळ्याच घरांमध्ये असे चित्र पाहायला मिळते. ‘‘मग मला कस जमलं नाही, याला कसं काय जमलं?’’ असा प्रश्न पालकांच्या मनात येतो. सांगायचा मुद्दा हाच की,तांत्रिक युगात वावरणार्या आजच्या लहान मुलांना तंत्रज्ञानाशी जोडलेल्या कोणत्याच गोष्टी शिकवण्याची गरज भासत नाही. त्यांना कोणाचाही सल्ला न घेता हे जमतं.अर्थात एक पालक म्हणून मोबाईल, ऍप, संगणक, इंटरनेटशी संबंधित असलेली अनेक माहिती मुलांना माहीत असल्याचा एक पालक म्हणून अभिमान वाटणे साहजिक आहे. परंतु, मुलांच्या वयाचा विचार केल्यास त्यांच्या आयुष्यातील तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या यंत्रणेचा वाढता वापर हा तितकाच हानिकारक आहे. सतत मोबाईल,संगणक, लॅपटॉपवर रेंगाळणार्या मुलांनी खरंतर या वयात मैदानी खेळ खेळले पाहिजे. परंतु, आजकालच्या पालकांनाच मैदानी खेळाचे महत्त्व समजत नसल्यामुळे गफलत झाली आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांवर ताण येऊन चष्मा लागणे, तसेच आरोग्याच्या इतर तक्रारी निर्माण होऊ लागल्या आहेत. एक पालक म्हणून मुलांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा देण्यामध्ये मग्न झाले आहेत. पण हे सगळं करत असताना आपल्या मुलांना नेमकं काय हवे आहे, त्यांच्या अंतरमनात नक्की काय चालू आहे याचं भान फारसं राखलं जात नाही.
खरंतर आजची विभक्त कुटुंबपद्धती आणि त्यातूनही आई आणि वडील नोकरदार असल्यामुळे अपेक्षित असलेला निवांत वेळ मुलांना इच्छा असूनही देता येत नाही आणि मिळालेल्या वेळेमध्ये शाळा, शाळेचा अभ्यास, परीक्षा, शाळेतील ऍक्टिव्हिटी याच विषयांवर चर्चा केली जाते. खरंतर हे विषय वगळता एक आई-वडील आणि पाल्य यांच्या नात्यामधल्या अनेक गोष्टी कुठेतरी हरवत चालल्या आहेत. आज इमारतीच्या आवारात, शाळेच्या भोवती मुलांच्या घोळक्यामध्ये होणारे संवाद ऐकले की,आश्चर्य आणि दुःख, चीड अशा संमिश्र भावना निर्माण होतात. आश्चर्य अशासाठी म्हणता येईल की, आजची मुले आपल्या अवतीभोवती घडणार्या घटनांचे चोख निरीक्षण करतात. त्यांच्यातील आत्मविश्वास, अभ्यास याव्यतिरिक्त इतर अनेक लहान-सहान क्षेत्राचं त्यांना असलेलं ज्ञान पाहाता आजची मुले खरंच किती हुशार आहेत, असा विचार मनात येतो आणि दुःख, चीड यासाठी की, मुलांच्या अवतीभोवती घडणार्या घटनांचा वाईट परिणाम त्यांच्या बालमनावर होतो. अनेक आघात झाल्याने मन अस्वस्थ करतात. प्रत्येक जोडप्यामध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. कधीकधी हे वाद इतके टोकाला जातात की, त्याचे रुपांतर मारहाणीपर्यंत होते.मुलांच्या डोळ्यांदेखत हे सगळं होत असल्याने आपल्या वयाच्या सवंगड्यांसोबत चार भिंतीच्या आत घडलेला सर्व प्रसंग ते सांगतात, त्यावेळेस त्या मुलांवर झालेल्या परिणामांची प्रचिती येते.
लहान मुले ही खरचं मातीच्या गोळ्यासारखीच असतात. एक पालक म्हणून आपण जसं त्यांच्याशी वागतो, त्यांना वागवतो, तसतशी ती घडत जातात. त्यामुळे जर मुलांच्या हातून एखादी चूक झाली, तर पालकांनी त्यासाठी नक्की जबाबदार कोण, याचा विचार करायला हवा. अनेक पालकांची तक्रार असते की मुले त्यांच्याशी खोटं बोलतात, हट्टीपणा, आदळापट करतात, जास्त आक्रमक होतात. मग मुलांच्या या वागणुकीला कंटाळलेले पालक पाल्यांवर हात उचलतात, पण खरंतर त्यांच्यावर हात उगारणे हा त्यावरचा उपाय असू शकत नाही. मुलांच्या प्रत्येक चुका सांभाळून घ्यायच्या नसतात. वेळप्रसंगी कठोर होणे गरजेचे आहे. एखादी चूक झाल्यानंतर त्यांनी असं का केलं, त्यामागची कारणे जाणून घेतली पाहिजे. त्यांच्या त्या चुकीमुळे झालेल्या परिणामांची त्यांना समजेल अशा शब्दांत, भाषेमध्ये जाणीव करून दिली पाहिजे.तसेच मुलांशी मित्रत्वाचे नाते निर्माण करून त्यांच्याशी सुसंवाद साधणे, त्यांची अडचण समजून घेणे, त्या वावरत असलेल्या मित्र-मैत्रिणींबरोबर चांगले संबंध निर्माण करणे गरजेचे आहे. अर्थात, एक पालक म्हणून हे एक प्रकारचे आव्हान असले तरी ते प्रत्येक पालकाने पेलले पाहिजे. तसे करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.
आज ‘हम दो, हमारा एक’ अशा प्रकारची कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आली आहे. त्यामुळे आपल्या एकुलत्या एक मुलाचा प्रत्येक हट्ट पुरवण्याची मोठी चूक पालक करतात. खरंतर मुलांचा प्रत्येक हट्ट हा पुरवायचा नसतो. त्याची गरज ओळखून त्या-त्या गोष्टी पुरवायच्या असतात. त्यामुळे गरज आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू यांमधला फरक ओळखण्याची गरज आहे. तसेच मुलांना केवळ आई-वडील याच विश्वात न रमवता इतर नातेवाईकांच्या घरी नेणे, आपल्याला दिलेला खाऊ इतरांसोबत वाटून खाणे या सगळ्या सवयी लावल्या पाहिजेत. आपले रीतीरिवाज, सण-समारंभाचे महत्त्व समजावून सांगायला हवे. त्यामुळे वयाचा एक टप्पा ओलांडल्यानंतर बाहेरच्या जगाशी संपर्क आल्यानंतर तिकडचे बदल स्वीकारणे पाल्यांना अवघड जाणार नाही.
चला तर मग, आज या बालदिनाच्या निमित्ताने एक पालक या नात्याने आपल्या पाल्यांसोबत एक मित्रत्वाचे नाते निर्माण करून त्यातला ओलावा कायम टिकवण्याचा संकल्प करूया.
सुरक्षिततेचा पालकांनी सतत आढावा घ्यावा
पालकांनी मुलांना शाळेत पाठवल्यानंतर इथे आपली जबाबदारी संपली, हा जो भम्र निर्माण करून घेतला आहे, त्यातून पाहिले बाहेर पडण्याची गरज आहे. शाळेमध्ये केवळ आणि केवळ अभ्यासाची चर्चा झाली पाहिजे, असं नाही. शाळेमध्ये घडणारे गैरप्रकार लक्षात घेता पालकांकडून फी आकारताना मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाय केले आहेत, हा मुद्दा शाळेच्या प्रशासनाला पालकांनी विचारला पाहिजे. पालक सभेमध्ये यावर चर्चा केली पाहिजे. एखादी शाळा यासाठी टाळाटाळ करत असेल,तर पालकांनी गप्प न राहाता थेट तक्रार करावी.
सुहासिनी ताम्हाणे, नोकरदार पालक
स्वच्छतागृहांमध्ये मुलांना एकटे पाठवू नका
आतापर्यंत घडलेले अनेक गैरप्रकार पाहाता ते शाळेच्या स्वच्छतागृहांमध्येच घडले आहेत. त्यामुळे शाळेमध्ये लहान मुलांना स्वच्छतागृहात पाठवताना त्यांच्यासोबत शिपाई असणे गरजेचे आहे. काही मुले वारंवार स्वच्छतागृहांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामागे नक्की काय कारण आहे, हे जाणून घेतले पाहिजे. तसेच शाळेच्या आवारात वावरताना काही व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास याबाबत शाळेचे मुख्याध्यापक, तसेच इतर शिक्षकांना त्याची कल्पना पालकांनी देणे गरजेचे आहे.
श्वेता बोरकर-भंडारी, गृहिणी
पालकांच्या तक्रारीसाठी विशेष दालन पाहिजे
मुलांचा जास्तीत जास्त वेळ हा शाळेमध्ये जातो. काही शाळा सोडल्या तर शाळा हे फक्त पैसे कमविण्याचे साधन झाले आहे. ‘डोनेशन’च्या नावाखाली लाखो पैसे कमावले जातात, पण मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आला की, शाळेचे प्रशासन यामध्ये फारसा रस घेत नाही. खरंतर शाळांमध्ये मुलांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचा सांभाळ करणे ही शाळेची जबाबदारी आहे. मग ती शाळा पालिकेची असो की नावाजलेली. शाळेत एखादा गैरप्रकार घडला की शाळेचे प्रशासन हात झटकते. त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करते परंतु, पालकांनी त्यांना समाधानकारक कारवाई झाल्याशिवाय गप्प बसू नये. मुजोर शिक्षक व शाळा प्रशासनावर शासनाने नियंत्रण ठेऊन पालकांच्या तक्रारीसाठी विशेष दालन निर्माण केले पाहिजे.
नरेंद्र कसबे, नोकरदार
पालकांनी शिक्षकांसोबत संपर्कात राहावे
पालकांनी मुलांना बोलतं केलं पाहिजे. शाळेमध्ये आज काय झालं, कोणती गोष्ट आवडली, कोणती गोष्ट खटकली आणि ती का खटकली याविषयी चर्चा केली पाहिजे.मुलांना चांगल्या वाईट सवयी लागायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे संशयाच्या नजरेने मुलांकडे न पाहाता एक जागरूक पालक या नात्याने मुलांसोबत संवाद सातत्याने साधणे गरजेचे आहे. मुलांचा आणि शिक्षकांचा संबंध हा केवळ चार ते पाच तासांसाठी येतो. त्यातच अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिक्षकांना दिल्या जाणार्या कामामुळे शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यासोबत वैयक्तिक संवाद साधणे शक्य होत नाही. त्यामुळे पालकांनी त्याची दखल घेणे आवश्यक आहे. पालकांनी-शिक्षकांसोबत सतत संपर्क, संवाद साधणे तितकेच गरजेचे आहे.
सायली देवरूखकर
शिक्षिका, शिवनेरी विद्यामंदिर, साकीनाका
सोनाली रासकर