विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग – ४३

    10-Nov-2017   
Total Views |

 

 

अवंती : मेधाकाकू... मला खूप दिवसांपासून तुला काही विचारायचं आहे. आपण तीन प्राथमिक गरजांविषयी बोललोय, मनुष्य स्वभावाच्या अनेक पैलूंचा संदर्भ लोकश्रुतीत कसा आलाय ते सुद्धा पाहतोय आपण. माझा प्रश्न आहे ‘पैसा’ या एका वास्तवाच्या बद्दल. म्हणजे अजूनपर्यंत आपली म्हणी आणि वाकप्रचारात पैशाविषयी काही टिप्पणी झालेली लक्षात नाही आली माझ्या. काकू, काही अभ्यास करता येईल का या विषयात...?

 

मेधाकाकू : अरे व्वा... अवंती, खूप छान पध्दतीने विचार करतीयेस. ‘पैसा’ हा विषय व्यक्ती आणि समाज जीवनातून आणि राष्ट्राच्या व्यवहारातून कधीच वजा करता येणार नाही. कुठल्याही काळांत, अन्न, वस्त्र, निवारा या तीन प्राथमिक गरजा भागवणारी एकच गोष्ट, ती म्हणजे ’पैसा’. आपल्या पूर्वजांनी याचाही अभ्यास निश्चितपणे केला आणि आज लोकश्रुतींच्या – लोकसाहित्याच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत नक्की पोहोचतो. ज्या काळांत आजच्या सारखा प्रसार माध्यमे आणि प्रचार तंत्राचा शोध लागला नव्हता आणि वापर होत नव्हता त्या काळांत आपली मिळकत, पैशाचा वापर, खर्च, बचत आणि याच्या सवयी आणि मानसिकता यावर छान टिप्पणी आणि सावध राहण्याचे इशारे, सल्ले या म्हणी वाकप्रचारातूनच दिले गेले.

 

 

द्रव्य बळ चांगळे अंग बळ पांगळे.

 

व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या उत्तम शारीरिक आरोग्यापेक्षाही, त्यांची उत्तम आर्थिक परिस्थिती महत्वाची आहे याचा धडा हा वाकप्रचार देतो. यदाकदाचित आरोग्य बिघडले तर उत्तम आर्थिक परिस्थितीच्या बळावरच योग्य ते उपचार करता येतात, अन्यथा मोठी अडचण निर्माण होऊ शकते.  

 

मेधाकाकू : अवंती... आपल्या अभ्यासानुसार हा वाकप्रचार, दोन वेगवेगळ्या अलंकारांनी सजलेला आहे. द्रव्य बळ चांगळे (पैशाचे महत्व) या पहिल्या तीन शब्दांत ‘उपमेय’ काय ते सांगितले आहे, तर अंग बळ पांगळे (शारीरिक अशक्तपणा) या शेवटच्या तीन शब्दांत ‘उपमान’ काय ते सांगितले आहे. आपल्या अभ्यासातला पहिला अर्थालंकार आहे ‘व्यतिरेक.  या अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा महत्वाचे आहे अशी मांडणी केली जाते. आपल्या वाकप्रचारानुसार शारीरिक अशक्तपणापेक्षा (उपमान) पैशाचे महत्व किती जास्त आहे (उपमेय) त्याचे उचित वर्णन केले आहे.

 

या वाकप्रचाराच्या अभ्यासातला आपला दुसरा अर्थालंकार आहे ‘भ्रान्तिमान. या  अर्थालंकारात ‘उपमेय’ आणि ‘उपमान’ या दोन्हीमधे, म्हणजेच उत्तम आर्थिक परिस्थिती हे उपमेय आणि उत्तम आरोग्य हे उपमान या दोन्हीमधे योग्य आणि महत्वाचे काय असा संभ्रम किंवा भ्रान्ति, श्रोता किंवा वाचकाच्या मनात निर्माण होते आहे.  

 

भाषेच्या अर्थालंकारांची मांडणी रचना योग्यरीतीने समजून घेऊन केलेली शब्द आणि शब्दसमूहांची चतुर मांडणी आणि वैयक्तिक आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीचे तुलनात्मक महत्व सांगणारा हा वाकप्रचार, मराठी भाषेच्या अलंकारिक सौंदर्याचा उत्तम नमुना आहे हे कधी विसरू नकोस.        

        

अवंती : माझा छोटासा प्रश्न ‘पैसा’... म्हणीत आणि वाकप्रचारात आजपर्यंत संदर्भाला आला नाही इतकाच. आणि तू चाबूक विश्लेषण दिलेस ! माझ्या मातृभाषेचा अभिमान का वाटावा असा संभ्रम असणारच नाही कोणाच्याही मनात.

 

मेधाकाकू : अवंती... पैसा ही वस्तू फार जपून हाताळावी लागते. या पैशामुळे आणि पैशासाठी, माणूस कुठल्याही थराला जातो. कुठलेही अयोग्य काम करायलाही कचरत नाही. अशा माणसांच्या लोभी वृत्तीला उद्देशून आपला वाकप्रचार काही सांगतोय. बघुया काय ते.

 

 

काजळाच्या कोठडी गेले तर तोंड काळे मोजले तर हात काळे. 

 

या पहिल्या सहा शब्दांत एक रूपक भरून राहिलंय. अवंती. काळा रंग हा बऱ्याचवेळा अंधाराचे, नकारात्मक परिस्थितीचे आणि अयोग्य वर्तन किंवा अयोग्य निर्णयाचे रूपक या अर्थाने वापरला जातो. भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणे म्हणजे काजळाची कोठडी. त्यात प्रवेश केला, भ्रष्टाचार केला की तोंड काळे होणारच आहे. ईभ्रत जाणारच आहे. भ्रष्ट मार्गाने मिळालेले पैसे स्वीकारणे, हाताळणे, म्हणजे हात काळे करण्यासारखेच. श्रीलक्ष्मी म्हणजे साक्षात धनाची देवता. तिचा स्वीकार योग्य मार्गानेच करा असा सावधगिरीचा सल्ला म्हणजे आपला हा वाकप्रचार. स्वभावोक्ती अलंकाराचे वैशिष्ट्य असे की एखादी व्यक्ती, प्राणी, निर्जीव वस्तू यांच्या स्वभावधर्म अथवा वापरासंदर्भात केलेले वर्णन, ज्यामुळे जो संदेश द्यायचा आहे तो योग्यरितीने श्रोत्याला समजतो. या वाकप्रचारात पैशाबद्दल जे समजायला हवे ते योग्य रीतीने श्रोत्याला नक्की समजते.

           

अवंती : आता फक्त त्या चाणाक्ष पूर्वजांना दंडवत घालते मेधाकाकू...!

 

मेधाकाकू : अवंती, नेटाने काम मेहनत करायची तयारी नसते अशा एखाद्या व्यक्तीकडे नेहमीच पैसा कमी पडतो. मग कांगावखोर माणूस वेगळाच प्रयत्न करतो...!

 

 

आपला दाम कुढा आणि वाण्याशी झगडा.  

 

वाण्याकडून डाळ, तांदूळ आणले ते शिजवून जेवण झाले. मग हा कांगावखोर माणूस उरलेली डाळ घेऊन वाण्याकडे येतो आणि डाळ कशी शिजली नाही. कच्चे वरण भात खावे लागले. ही डाळ मला नको. माझे पैसे परत दे, अशी मागणी करून भांडण उकरून काढतो. ज्यायोगे निदान आजचे जेवण सुटेल आणि वाणी आपले पैसे परत देईल.

  

अवंती : परत एक मस्त वाकप्रचार. मेधाकाकू, मला वाटतंय, हा वाकप्रचार नक्की ‘अतिशयोक्तीअलंकारात सजलेला असणार...! बरोबर आहे का माझा अंदाज...?

   

मेधाकाकू : याचे उत्तर पुढच्या भागात... तोपर्यंत एक मोठ्ठा ब्रेक..  

 

- अरुण फडके

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.