भारतात ‘बिलियड्र्स’ हा खेळ तसा फारसा खेळला जात नाही. मात्र, या खेळातही भारताने जागतिक विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे आणि जागतिक विजेतेपदावर सुवर्णाक्षरांनी भारताचे नाव कोरणारे हे खेळाडू म्हणजे विल्सन लायनेस गार्टन जोन्स. विल्सन जोन्स यांचा जन्म२ मे १९२२ साली पुण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांना खेळाची आवड होती. विल्सन यांच्या काकांना बिलियर्ड हा खेळ फार प्रिय होता. विल्सन देखील त्यांच्या काकांना खिडकीतून हा खेळताना पाहत असत. मात्र, त्यावेळी त्यांचे वय कमी असल्याने त्यांना बिलियर्ड टेबल असलेल्या खोलीत जाण्याची परवानगीदेखील नव्हती आणि आज त्यांना ज्या खेळाला जवळून साधी पाहायचीदेखील परवनगी नव्हती, त्याच खेळातील भारतामधील सर्वात ओळखीचे नाव म्हणून विल्सन प्रसिद्ध झाले.
विल्सन यांचे शिक्षण बिशप हायस्कूल आणि विंन्सेंट हायस्कूलमध्ये झाले. १९३९ साली त्यांनी युद्ध सेवेत प्रवेश केला. काही वर्षे सेवा बजावल्यानंतर ते मुंबईतील माझगाव गोदीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर म्हणून रुजू झाले. त्यानंतर आपल्या निवृत्तीपर्यंत ते ‘हाऊस ऑफ विसनजी’मध्ये कार्यरत होते. विसनजींना ग्रीन टेबलवर खेळले जाणारे खेळ फार प्रिय होते. त्यामुळे विल्सन यांनादेखील विसनजींच्या नेपियन सी रोडवर असलेल्या बंगल्यावर जाऊन बिलियर्ड खेळण्याची संधी मिळाली. त्यांना मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्यांनी या खेळात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. १९५० साली विल्सन यांनी टी. ए. सेल्वराज यांचा पराभव करत पहिला राष्ट्रीय किताब आपल्या नावे केला. त्यानंतर लगेचच पुढील वर्षी त्यांनी पुन्हा सेल्वराज यांचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. १९५३ साली त्यांनी चंद्रा हिरजी यांचा पराभव करत राष्ट्रीय विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. १९५० ते १९६६ या कालावधीत विल्सन यांनी तब्बल १२ वेळा बिलियर्डमधील राष्ट्रीय विजेतेपद पटकाविले.
त्यांनी १९४८ साली स्नूकर खेळण्यास सुरूवात केली. १९५२, १९५४, १९५८ आणि १९६० साली त्यांनी स्नूकरचे विजेतेपद पटकावले. दरम्यान, त्यांनी सहा वेळा स्नूकरचे राज्य विजेतेपद आणि बिलियड्र्सचे आठ वेळा राज्य विजेतेपद पटकावले होते. तर दुसरीकडे १९५१ साली त्यांनी कलकत्यामध्ये भरवण्यात आलेल्या ‘वर्ल्ड ऍमेचर बिलियर्ड स्पर्धे’तून जागतिक स्पर्धेत पहिले पाऊल टाकले. मात्र, त्याच्या पुढील वर्षीच त्यांना पराभवाचा सामनादेखील करावा लागला. १९५३ साली जाहीर करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत विल्सन चौथ्या क्रमांकावर होते. आपल्या खेळाच्या जोरावर नाववलौकिक मिळवणार्या विल्सन यांना ‘बेस्ट स्पोट्र्समन’ या किताबाने सन्मानित करण्यात आले. १९५८ साली त्यांनी वर्ल्ड ऍमेचर चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकत ती स्पर्धा जिंकणार्या पहिल्या भारतीयाचा मान मिळवला, तर पुढील वर्षी इंग्लंडमध्ये भरवण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये त्यांना तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांनी १९५८ आणि १९६२ साली दोनवेळा जागतिक स्पर्धा पटकावली. १९६२ साली त्यांना ‘अर्जुन’ पुरस्कार, १९६५ साली ‘पद्मश्री’, १९९० मध्ये ‘महाराष्ट्र’ गौरव तर १९९६ साली त्यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, ५ ऑक्टोबर २००३ साली त्यांचे निधन झाले. अशा या महान खेळाडूला मानाचा मुजरा!
-जयदीप दाभोळकर