पुणे... शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने न्हाऊन निघालेला ऐतिहासिक भूभाग. या भूभागात अनेक रांगडे मर्द जन्माला आले. ज्यांना हरणे कधी माहीतच नव्हते. सतत संघर्ष करून, स्वकष्टावर स्वराज्य निर्माण करायचं, हे तर राजांनी त्यांना शिकवलेलं. अशाच पुण्यभूमीतील मंचरमधला तो. कबड्डीसारख्या मर्दानी खेळातला मुरलेला खेळाडू. नोकरी करताना वाट्याला आलेल्या अपमानास्पद वागणुकीने तो पेटून उठला. हेच गुण त्याने व्यवसायात आणले. प्रचंड मेहनत करण्याची तयारी, प्रत्येक क्षणाचा सदुपयोग, संपर्कात येणार्या प्रत्येक व्यक्तीशी सौहार्दाचे संबंध असे गुण त्याच्यात कबड्डीमुळे आपसूक आले होते. हेच गुण त्याने व्यवसायात वापरले आणि शून्यातून सुरुवात करून आठ आकडी म्हणजेच कोटींची उलाढाल त्याने केली. ही उलाढाल करणार्या कंपनीचं नाव आहे ‘आर-कम्फर्ट’ आणि ही कंपनी सुरू करणारा तो रांगडा मर्द म्हणजे राजेेंद्र भेके. पूर्वीच्या काळी भारतीय लोकांमध्ये एक चांगली प्रथा होती ती म्हणजे शहरात कोणीही राहत असेल तर तो गावाहून आलेल्या आपल्या माणसांना राहण्यासाठी आश्रय द्यायचा. प्रसंगी पोटाला चिमटा काढून तो आपल्यातला घास त्याला भरवत असे. राजेंद्रचं कुटुंब देखील काहीसं असंच होतं. राजेंद्रचे बाबा कोलगेट कंपनीत कामाला होते. ४ बहिणी, आई-बाबा, २ चुलतभाऊ, २ चुलत काका आणि राजेंद्रसह ११ जणांचं कुटुंब. मुलुंड नवघर येथील १० बाय १० च्या खोलीत हे ११ जणांचं बिर्हाड राहायचं. दहावीपर्यंत राजेंद्रचं शिक्षण मुलुंडच्याच मराठी विद्यालयात झाले. घरची परिस्थिती बिकट असल्याने कामकरणं आवश्यक होतं. म्हणून राजेंद्र दिवसा गाड्या धुण्याचं कामकरायचा आणि रात्री नाईट कॉलेजमध्ये शिकायचा. राजेंद्रला गाड्या धुताना पाहून एका माणसाने त्याला विचारलं, ’’तुझं गाड्या धुवून भविष्य घडणार नाही, तू माझ्यासोबत गॅरेजमध्ये चल. तुला मेकॅनिक बनवितो.’’ ३०० रुपये मोबदल्यावर राजेंद्र गॅरेजमध्ये कामकरू लागला. दरम्यान, पुण्यात राहणार्या एका मित्राने त्याला सांगितले होते, ’’पुण्याला ये, तुला चांगल्या नोकरीला लावतो.’’
चांगल्या नोकरीच्या आमिषापोटी राजेंद्र पुण्याला गेला. त्याकाळी मोबाईल वगैरे काही नसल्याने अचानक उगवलेल्या राजेंद्रमुळे त्याचा मित्र गांगरला. मित्र ज्या खोलीत राहायचा तिथे चार जणांसाठीच झोपण्याची जागा होती. राजेंद्रपुढे झोपण्याचा-राहण्याचा प्रश्न उभा राहिला. मात्र, त्या चारपैकी एकाची रात्रपाळी आल्याने राजेंद्रचा झोपण्याचा प्रश्न मिटला. काही दिवसांत राजेंद्रला एका कंपनीत हाऊसकिपिंगचं काममिळालं. वस्तूंची गाडीतून चढ-उतार करणे असं काहीसं कामाचं स्वरूप होतं. एकदा आलेल्या टेम्पोचं चलन पाहताना राजेंद्रला वरिष्ठ कर्मचार्यांनी पाहिलं. त्यावेळेस त्यांना कळलं की, राजेंद्र पदवीधर असूनसुद्धा अशा स्वरूपाची कामे करतो. त्यांनी एचआरसोबत बोलून राजेंद्रला वेगळ्या सेक्शनमध्ये कामदिलं. तिथे राजेंद्रला ९० रुपये रोज आणि ३० रुपये जेवणासाठी मिळत असे. अडीच वर्षे कामकेल्यानंतर राजेंद्र खुर्च्या तयार करणार्या एका मोठ्या कंपनीत कामाला लागला. आधीच्या कंपनीत वरिष्ठांमुळे शिकायला मिळालेल्या कौशल्यामुळे राजेंद्रला येथे सेक्शन इनचार्ज म्हणून खूप चांगल्या स्वरूपाची नोकरी मिळाली. दरम्यान, राजेंद्रचे लग्न ठरले. लग्नासाठी सुट्टी मागायला राजेंद्र संबंधित कंपनीच्या मॅनेजरकडे गेला. ४३ दिवसांची राजेंद्रची सुट्टी शिल्लक असताना मॅनेजर फक्त ५ दिवसच सुट्टी देत होता. राजेंद्रने अधिक सुट्टी मिळण्याची विनवणी केली असता, ‘‘हवी असेल तर एवढीच सुट्टी मिळेल नाहीतर राजीनामा देऊन निघू शकतोस. ’’कंपनीसाठी आपण राबराब राबलो आणि लग्नासाठी आपल्या शिल्लक असूनसुद्धा सुट्ट्या दिल्या नाही. वरून पाणउतारा केला गेला.’’ हा अपमान राजेंद्रच्या जिव्हारी लागला अन् त्याने नोकरीचा राजीनामा दिला.
आपल्या नोकरीची बातमी त्याने होणार्या बायकोला आणि सासर्यांना सांगितली. मात्र, सासरेबुवांनी राजेंद्रवर विश्वास दाखविला. लग्न झाले. देवदर्शन वगैरे सगळे झाले. कामकाहीच नव्हते. घरी बसणार्या राजेंद्रला पाहून त्याचे वडीलसुद्धा म्हणाले की, ’’लग्न झाल्याने घर सोडवत नाही की काय?’’ आपली नोकरी गेली हे सांगण्याचं धारिष्ट्य राजेंद्रला होत नव्हतं. तो घरातून डबा घेऊन जात असे. जेणेकरून घरच्यांना वाटे की हा कामाला लागलाय. दरम्यान, आधीच्या कंपनीत कामकरणारा शमी नावाचा मुलगा राजेंद्रला म्हणाला होता की, ‘‘तू जिथे असशील तिथे मी असेन.’’ राजेंद्रने शमीला फोन करून त्याच्या हातात कुठलंही कामनसल्याचं सांगितलं. सुदैवाने याचवेळी एका मित्राच्या सोफा दुरुस्तीचं कामराजेंद्रला मिळालं. त्यासाठी राजेंद्रने एक गाळा घेतला. गाळा घेण्यासाठी डिपॉझिटला देण्यासाठी पैसेही नव्हते. दुप्पट भाडे आकारून राजेंद्रने तो गाळा भाड्याने घेतला. ते सोफा दुरुस्तीचं कामहोतं ९७०० रुपयांचं आणि खर्च आला १०,७८० रुपयांचा. तसं पाहिल्यास पहिल्याच कामात तोटा आलेला. मात्र, हा सोफा दुरुस्त करत असताना आणखी पाच सोफ्यांची कामेदेखील मिळाली. यामुळे हळूहळू राजेंद्रचं नाव होऊ लागलं. ‘राजेंद्र म्हणजे सोफा’ असं समीकरणच जणू झालं. आज राजेंद्रची ‘आर-कम्फर्ट’ १० शोरुमसोबत संलग्न आहे. निव्वळ सोफाच नव्हे, तर वॉर्डरोब, पलंग आणि इतर फर्निचर ही कंपनी उत्पादित करते. या फर्निचरचं डिझाईन करण्यासाठी २२ इंटिरिअर डिझायनरची फौज आहे. त्यांचा चार हजार चौरस फुटांचा कोपरखैरणेला कारखाना आहे. या कारखान्यात ३० कामगार कार्यरत आहेत, तर पेण येथे शोरूमआहे. ज्या कंपनीत राजेंद्र कामकरायचा त्या कंपनीला आज राजेंद्रची कंपनी फर्निचर पुरविते. सध्या ‘आर-कम्फर्ट’ची दोन कोटी रुपयांची उलाढाल आहे.
सन २०२५ पर्यंत कंपनीची उलाढाल ५० कोटी रुपये करणे हे राजेंद्रचे प्रमुख उद्दिष्ट होय. दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे, तरुण पिढीसाठी मंचरला क्रीडा संकुल उभारणे. एकेकाळी गाड्या धुणारा हा मुलगा आज स्वत:च्या गाडीने फिरतो. त्याच्या आई-बाबांसाठी हेच मोठ्ठं यश आहे. ‘वेळ वाया घालवू नका,’ असे राजेंद्रचे तरुण पिढीला सांगणे आहे. ‘कम्फर्ट झोन तोडा, तरच यशस्वी व्हाल,’ हेच जणू ‘आर-कम्फर्ट’च्या राजेंद्र भेकेंचा जीवनप्रवास सांगतो.
-प्रमोद सावंत