जागतिक आरोग्य क्षेत्रातील दमदार भारतीय

Total Views | 30
 
 
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामिनाथन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) उपमहासंचालकपदी (कार्यक्रम) नियुक्ती करण्यात आली. एका भारतीय व्यक्तीची जागतिक दर्जाच्या संघटनेच्या वरिष्ठपदी नियुक्ती होणे ही देशासाठी खरं तर अभिमानास्पद बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या उपमहासंचालकपदी नियुक्त होणार्‍या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. डॉ. सौम्या स्वामिनाथन यांचा जन्म २ मे १९५९ रोजी चेन्नईमध्ये झाला. त्यांनी आपले एमबीबीएसचे शिक्षण पुण्यातील सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ‘एम्स’मधून एमडी आणि लॉस एंजेलिसमधील बालरुग्णालयातून फेलोशिपदेखील पूर्ण केली आहे. त्या भारतातील हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामिनाथन यांच्या कन्या होत.
 
 
 
सध्या डॉ. स्वामिनाथन या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत आहेत. तसेच त्या भारतातील जैविक वैद्यकीय संशोधनाची रचना, समन्वय आणि प्रोत्साहनासाठी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या महासंचालक म्हणूनही कार्यरत आहेत. स्वामिनाथन या एक बालरोगतज्ज्ञ असून क्षयरोगात केलेल्या संशोधनासाठी त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्यांचे संशोधन क्षेत्रातील योगदान पाहता, त्यांना क्षयरोग आणि एड्‌सवरील संशोधनासाठी जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त संशोधक म्हणून संबोधले आहे. वैद्यकीय संशोधन क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा अधिक काळ डॉ. स्वामिनाथन यांनी व्यतीत केला आहे.
 
 
 
क्षयरोगावरील संशोधनासाठी स्वामिनाथन यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी त्यांनी ’इंडिया टीबी रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ या संघटनेची स्थापना केली. देश-विदेशातील संशोधकांना एकत्रित आणून औषधे, रोगनिदान आणि लसीसह टीबीचा सामना करण्यासाठी नवीन साधने विकसित करण्यासाठी डॉ. स्वामिनाथन यांनी ही संघटना उभारली होती, तर २००९ ते २०११ या कालावधीत त्यांनी युनिसेफ, यूएनडीपी, जागतिक बँक, जिनेव्हामधील ट्रॉपिकल डिसीज (टीडीआर)वरील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी आखण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून देखील काम पाहिले. या व्यतिरिक्त डॉ. स्वामिनाथन यांनी डब्ल्यूएचओच्या ग्लोबल टीबी डिपार्टमेंटचे स्ट्रॅटेजिक ऍण्ड टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप, पब्लिक हेल्थ, इनोवेशन ऍण्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ग्लोबल स्ट्रॅटेजी ऍण्ड प्लॅन ऑन ऍक्शन ऑन पब्लिक हेल्थ, डब्ल्यूएचओ एक्सपर्ट पॅनेलसह अनेक डब्ल्यूएचओ आणि ग्लोबल ऍडव्हायझरी बॉडी आणि समित्यांवर देखील काम केले आहे. त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील संशोधनात्मक कार्यासाठी आणि योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 
-जयदीप दाभोळकर
 
 
 
 
 
 

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121