
आज जिहादी तितके लाचार राहिलेले नाहीत. ज्यांनी त्यांना मोठे केले, पोसले त्यांच्यावरच ते उलटत चालल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे. आपण जेव्हा एखाद्यासाठी खड्डा खणतो, तेव्हा आपणच त्या खड्ड्यात पडण्याची भीती जास्त असते. त्याची प्रचिती अगदी पाकिस्तानसारख्या देशाकडे पाहून येते. सध्याची पाकिस्तानची स्थिती पाहता तो आपणच खोदलेल्या खड्ड्यात पडतोय की काय? अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धात असो किंवा अन्य ठिकाणी, अनेकदा तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानने आपली गाडी सुरू ठेवण्यासाठी वेळेनुसार वेगळी रणनीती आखली. त्यामागचा उद्देश केवळ अशांतता आणि दुसर्याला त्रास देणे हाच. मात्र, आज तोच त्रास पाकिस्तानच्याच अवघड जागेचे दुखणे होऊन बसला आहे. पाकिस्तानमधील काही धर्मांधांच्या आणि नेत्यांच्या आशीर्वादाने हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा, तालिबान, जैश-ए-मोहम्मदसारख्या माथेफिरू लोकांच्या संघटना उभ्या राहिल्या. पाकिस्तानच्या सरकारनेही त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मदतदेखील केली. त्यातच पाकिस्तानसारख्या अस्थिर लोकशाहीच्या देशात पाकिस्तानचे असलेले लष्करही त्यांना संरक्षण देण्याच्या नावाखाली अशा संघटनांच्या आहारी गेले. अनेकदा त्यांना पैसे, शस्त्रे पुरवण्यापर्यंतचे कामदेखील पाकिस्तानने केले. आज पाकिस्तानने पोसलेल्या याच संघटनांचा सर्वाधिक फटका भारत आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना बसला. भारत, अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या आणि झालेल्या अनेक घातपातांमागे याच संघटनांचा हात आहे. परंतु, या संघटनांचे क्षेत्र जसजसे वाढत गेले तसतसे अन्य देशांनाही त्यांच्या कृत्यांचे चटके बसू लागले. त्यामुळे कालांतराने भारत आणि अफगाणिस्तानप्रमाणेच अनेक देश पाकिस्तानच्या विरोधात उभे राहिले. याचा प्रामुख्याने पाकिस्तानलाही फटका बसला. जगाच्या पाठीवर पाकिस्तान एकाकी पडत गेला. पाकिस्तानने पोसलेल्या हाफिज सईद, दाऊद यांच्यासारख्या पाकिस्तानच्या आड लपून भ्याड हल्ले करणार्या सर्वच देशांना दहशतवादी मानले आहे. मात्र, आज पाकिस्तान त्यांना जराही हात लावण्याच्या स्थितीत राहिलेला नाही. कारण, आज त्यांची ताकद कदाचित पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांपेक्षा वाढली आहे. आज पाकिस्तान आपणच खोदलेल्या खड्ड्यात पडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. याच जिहादींनी आज पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचीही स्थिती ना घरका ना घाटका अशी करून ठेवली आहे.
चोराच्या उलट्या बोंबा
दहशतवादाच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तान तोंडघशी पडल्यानंतर आता पाकिस्तानसमोर सळो की पळो अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणाव्या लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात असंख्य मुस्लिमांच्या रक्ताने माखल्याचे बेताल वक्तव्य त्यांनी केले. कदाचित आपल्या घरातच काय चालले आहे, याची कल्पना त्यांना नसावी.मंगळवारी भल्या पहाटे श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला. त्याची जबाबदारीही पाकिस्ताननेच पोसलेल्या आणि मोठ्या केलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली. हल्लीच अमेरिकेने पाकिस्तानला देणारी रसद बंद करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानचीच गळचेपी झाली. त्यामुळे या जिहादींचे कुठेतरी खच्चीकरण होईल, अशी आशा होती. मात्र, परिस्थिती अगदी उलट झाली. या ठिकाणी जिहादींची नाही तर पाकिस्तानचीच गळचेपी झाली. आज त्यांच्यातल्याच एका हाफिज सईदसारख्या जिहाद्याने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर कुठेतरी पाकिस्तानमधील काही राजकारण्यांना जाग आली आहे. त्यांनी त्याच्या पक्षाला मान्यता मिळू नये, अशी मागणी केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आज पाकिस्तानमधील राज्यकर्तेच सईदच्या विरोधात बोलू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परंतु, हाफिजसारख्या दहशतवाद्यावर त्याचा कोणताही परिणामझाल्याचे जाणवतही नाही. त्याने राज्यकर्त्यांच्या पोकळ धमक्यांना जराही दाद दिलेली नाही. अनेक वर्षे हाफिजला याच राजकारण्यांनी पाठिशी घातले, आज त्यांचाच धाक त्याला राहिलेला नाही. ‘‘राजकीय पक्ष म्हणजे नोंदणी करण्यासाठी काय ट्रक किंवा गाडी आहे का?’’ असा उलट सवालदेखील त्याने केला. नोंदणीविना त्याचा पक्ष निवडणुकादेखील कशा लढवेल हा प्रश्न निर्माण होतो. पण त्याच्या उमेदवारांसमोर अपक्ष म्हणून उभे राहण्याचा पर्यायदेखील खुला आहे. आज हाफिजच्या निमित्ताने दहशतवादीदेखील एका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात उतरत आहेत. त्यापेक्षा एका देशासाठी मोठे दुर्देव तरी कोणते म्हणायचे? आज हीच बाब अगदी पाकिस्तानातील राजकीय अभ्यासकांनादेखील चकित करणारी आहे. या निमित्ताने पाकिस्तानसारखा देश आपणच खोदलेल्या खड्ड्यात रुतत जाणार की नाही हे आगामी काळच ठरवेल.
-जयदीप दाभोळकर