तड़पत हूँ दिन रैन
सांवरिया तड़पत हूँ दिन रैन..
बिन देखे नाही चैन
सांवरिया बिन देखे नाही चैन..
ओ रस के भरे तोरे नैन
सांवरिया रस के भरे तोरे नैन..
’ठुमरी सम्राज्ञी’ म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या आणि बनारस घराण्याचा वारसा पुढे नेणार्या ख्यातनाम गायिका गिरिजा देवी यांच्या ठुमरीतील मन मंत्रमुग्ध करणार्या या काही ओळी... पण मंगळवारी हा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आणि संगीतातील एका सुरेल युगाचा अंत झाला. गिरिजा देवी यांचा जन्म ८ मे १९२९ रोजी कला आणि संस्कृतीचे माहेरघर मानल्या जाणार्या वाराणसी म्हणजेच तत्कालीन बनारसमध्ये झाला. त्यांचे वडील एक उत्तम हार्मोनियम वादक होते. संगीतावर असलेल्या अपार श्रद्धेपोटी त्यांनी गिरिजा देवी यांना वयाच्या पाचव्या वर्षी पंडित सर्जू प्रसाद मिश्रा यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेण्यास पाठवले. वयाच्या नवव्या वर्षी गिरिजा देवी यांनी पंडित श्रीचंद्र मिश्रा यांच्याकडून संगीतातील विभिन्न शैलींचे शिक्षण घेतले, तर लहान असताना त्यांनी ’याद रहें’ या हिंदी चित्रपटात एक भूमिकादेखील साकारली होती.
खर्या अर्थाने गिरिजा देवी यांचा आवाज सर्वांसमोर आला तो ऑल इंडिया रेडिओमुळे. त्यांनी आपला गायनाचा पहिला कार्यक्रम रेडिओवरून सादर केला. मात्र, काही पूर्वापार चालत आलेल्या परंपरांमुळे त्यांनी सार्वजनिकरित्या सादर केलेल्या कार्यक्रमाला त्यांच्या आईने आणि आजीने विरोध केला होता. १९५१ मध्ये त्यांनी बिहारमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम सादर केला. मात्र, असे असतानाही त्यांनी आपले संगीताचे शिक्षण सुरूच ठेवले होते. १९६० सालापर्यंत त्या आपले गुरू श्रीचंद्र मिश्रा यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. १९८० च्या सुमारास त्यांनी कोलकात्यामधील ‘आयटीसी’ या संगीत संशोधन संस्थेत तर १९९० च्या दशकात त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात अध्ययनाचे काम केले. आपला सांगीतिक वारसा जपण्यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले आणि त्याचबरोबर आपले संगीत दौरेही सुरूच ठेवले. पूरबी अंग शैलीच्या ठुमरीचे सादरीकरण हे त्यांच्या गायन शैलीचे वैशिष्ट्य होते. कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत अशा विविधांगी व उपशास्त्रीय गायन प्रकारांवर गिरिजा देवी यांचे विशेष प्रभुत्व होते. संगीतातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल १९७२ मध्ये त्यांना ’पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर १९७७ साली त्यांना संगीत नाटक अकादमी आणि १९८९ साली ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले, तर २०१० मध्ये संगीत नाटक फेलोशिप आणि २०१६ मध्ये ’पद्मविभूषण’ पुरस्काराने त्यांच्या संगीतातील योगदानाचा गौरव करण्यात आला.
- जयदीप दाभोळकर