ताज महाल आणि बुलेट ट्रेन

    22-Oct-2017   
Total Views | 11

 

आज जगातल्या कुणा संस्थेने ताजमहालला ‘मानवी संस्कृतीचा अमोल ठेवा’ ठरवलेले आहे म्हणून? तेवढेच असेल, तर मानवी गरजा म्हणून बुलेट ट्रेनवर हल्ले कशाला होतात? अशा भव्यदिव्य वास्तू वा बांधकामांचा सामान्य माणसाच्या जीवनातील गरजांशी काय संबंध असू शकतो? भारतीय अर्थव्यवस्थेला न परवडणारी बुलेट ट्रेन आणि चार शतकापूर्वीचा ताजमहाल यात नेमका कोणता गुणात्मक फरक आहे? पण गंमत अशी दिसेल की, जे लोक बुलेट ट्रेनवर तुटून पडतात, तेच चार शतकापूर्वीच्या तशाच उधळपट्टीला ‘मानवी संस्कृती’म्हणून समर्थनाला पुढे सरसावतात.

 

महिनाभरापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे भारतात आलेे होते आणि त्यांच्याच सरकारने भारताला ८० हजार कोटींचे कर्ज देऊ केल्याने, बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प इथे हाती घेण्यात आला. त्यावरून किती वादळ उठले होते, हे आज नव्याने व विस्ताराने इथे कथन करण्याची काही गरज नाही. कारण, या बुलेट ट्रेनमध्ये कितीही आधुनिकता व भव्यता सामावलेली असली, तरी ती आजच्या प्राधान्याची गोष्ट नाही, असे इथल्या जाणकार बुद्धिमंतांचे मत आहे. कुठल्याही जमान्यात वा समाजात अशाच लोकांना ‘विद्वान’ म्हणून मान्यता असते. त्यांनी नाके मुरडावीत आणि तीच गोष्ट भविष्यकाळात महान वारसा असल्याचे सिद्ध व्हावे, असाच जणू परिपाठ आहे. साहजिकच बुलेट ट्रेनला विरोध हा अपेक्षितच होता व आहे. गंमतीची गोष्ट अशी की, जी नाके मुरडणारी मंडळी असतात, त्यांचे भविष्यातले वारस मात्र त्याच पूर्वजांनी नावे ठेवलेल्या गोष्टींचे गुणगान केल्याचाही इतिहास आहे. फुले-शाहू- आंबेडकरांना त्यांच्या समकालीन बुद्धिमंतांनी कधीच गौरवलेले नव्हते. पण, आजच्या विद्वानांना पदोपदी त्यांचेच दाखले आठवत असतात. नेमके असे बुलेट ट्रेनचे कडवे विरोधक आज अगत्याने ‘ताजमहाल’ नामक वास्तूचे कौतुक सांगायला पुढे सरसावलेले आहेत. मग त्यांना एक साधासरळ प्रश्न विचारणे भाग आहे की, ताजमहाल व बुलेट ट्रेनमध्ये नेमका कोणता गुणात्मक फरक आहे?जेव्हा कधी त्या शहाजहान नामे बादशहाने त्या वास्तूचे निर्माण केले, तेव्हाच्या जमान्यात अशी वास्तू हा समाजासाठी प्राधान्याचा विषय होता काय? तेव्हाची जनता सुखीसमाधानी व आनंदी जीवन जगत होती आणि अधिकच्या उरलेल्या पैशातून हे जागतिक आश्चर्य बादशहाने उभारलेले होते काय? बादशहाच्या अमर प्रेमाचे प्रतिक म्हणून ताजमहाल उभारणे, ही सामाजिक गरज होती काय? नसेल तर तिचे इतके कौतुक कशाला?


 

मुघलांच्या कालखंडात देशातील जनता खुशीत व आनंदात जगत होती आणि देश सुजलाम् सुफलाम् होता. साहजिकच बादशहाच्या तिजोरीत अधिकचा महसूल गोळा व्हायचा, तर त्याची विल्हेवाट कशी लावावी, याची फिकीर बादशहाला पडलेली होती. अशी कुठे ऐतिहासिक दस्तावेजामध्ये नोंद आहे काय? नसेल तर त्याने वास्तव्यही करायचे नाही, अशी ही भव्यदिव्य वास्तू कशाला उभारली? त्यासाठीचा पैसा कुठून गोळा केला? त्यासाठी अधिकचा महसूल वसूल केला किंवा कसे? असे कुठलेच प्रश्न आजच्या शहाण्यांना का पडत नाहीत? त्यांना आजच्या गरीब दीनदुबळ्या जनतेची चिंता इतकी अहोरात्र सतावत असते. त्यांना चार शतकावपूर्वीच्या जनतेच्या दुर्दशेची फिकीर कशाला नसते? किंबहुना, तो महान ताजमहाल बांधताना लोकांकडे राजाचे साफ दुर्लक्ष झालेले असेल, तर त्याने उभारलेल्या वास्तूकडे अन्यायाचा कलंक म्हणून बघण्याची बुद्धी अशा जाणत्यांना कशाला होत नाही? आज जगातल्या कुणा संस्थेने त्याच वास्तूला ‘मानवी संस्कृतीचा अमोल ठेवा’ ठरवलेले आहे म्हणून?तेवढेच असेल, तर मानवी गरजा म्हणून बुलेट ट्रेनवर हल्ले कशाला होतात? अशा भव्यदिव्य वास्तू वा बांधकामांचा सामान्य माणसाच्या जीवनातील गरजांशी काय संबंध असू शकतो? भारतीय अर्थव्यवस्थेला न परवडणारी बुलेट ट्रेन आणि चार शतकापूर्वीचा ताजमहाल यात नेमका कोणता गुणात्मक फरक आहे? पण गंमत अशी दिसेल की, जे लोक बुलेट ट्रेनवर तुटून पडतात, तेच चार शतकापूर्वीच्या तशाच उधळपट्टीला‘मानवी संस्कृती’ म्हणून समर्थनाला पुढे सरसावतात. कारण स्पष्ट आहे, या लोकांना लोकांच्या गरजांशी कर्तव्य नसावे किंवा मानवी संस्कृती म्हणजे काय, त्याचाही थांगपत्ता नसावा. अशा कर्तृत्वहीन लोकांना केवळ कशाला तरी नाक मुरडूनच आपली थोरवी सिद्ध करायची असते. तसे नसते तर इतका विरोधाभास या लोकांच्या बडबडीत आढळला नसता.

 

मुघलांची राजवट जनतेसाठी सुखावह नव्हती, याचे शेकडो दाखले इतिहासात उपलब्ध आहेत आणि बहुतांश मुघल बादशहा अय्याश होते,असेही शिया मौलवींनी खुलेआमसांगितले आहे. त्यांना आपल्या जनतेच्या दुर्दशेची फिकीर नव्हती किंवा हा बादशहा कोणी महान प्रेमवीर वगैरे नव्हता. आपल्या सहकार्‍याची सौंदर्यवती पत्नी आवडली, तर त्याचा मुडदा पाडून त्याने तिला आपली बेगमबनवले. नंतर तिचा इतका उपभोग घेतला, की बाळंतपणे काढतानाच तिचा दु:खद देहांत झालेला होता. त्यानंतरही त्याने तिच्याच बहिणीशी काही दिवसात निकाह लावून आपल्या अजरामर लैंगिक हव्यासाची साक्ष दिलेली होती. अशा बादशहाने जनतेच्या पैशातून उधळपट्टी करून जी वास्तू उभारली तिला ‘प्रेमाचे प्रतिक’ठरवणारे युक्तिवाद म्हणूनच बोगस असतात. ती एक उत्तमव अपूर्व वास्तू असल्याचा दावा मान्य आहे. पण, प्रेमाचे प्रतिक ठरवून चाललेले समर्थन निव्वळ भंपकपणा असतो. शिवाय लाखो हजारो लोकांच्या जीवनावश्यक गरजा पायदळी तुडवून केलेली ती उधळपट्टी असल्याचा आक्षेप कोणी घेत नाही. हा आणखी एक विनोद आहे. त्यातून असे शहाणे राजेशाहीच्या शोषक मानसिकतेचेही समर्थन करतात. त्याचे कारण त्यांना ताजमहालशी कर्तव्य नसते किंवा बुलेट ट्रेनच्या खर्चाविषयीही काही घेणेदेणे नसते. त्यांना आपल्या राजकीय भूमिका पुढे रेटण्यासाठी एखादा मुद्दा हवा असतो. त्यासाठी मग उत्तर प्रदेशातील भाजपच्या कुणा नगण्य आमदाराने केलेले विधान म्हणजे जगबुडी आल्यासारखा गदारोळ केला जातो.त्यातून काहीही सिद्ध होणार नसल्याची त्यांनाही खात्री असते. ताजमहाल पाडला जाणार नाही किंवा भाजपही तसा मूर्खपणा करणार नाही, हे पक्के ठाऊक असते. पण, त्या निमित्ताने आपल्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याची ही केविलवाणी धडपड असते. म्हणून मग असे वाद उकरून काढले जातात.

 

आणखी एक मजेची गोष्ट आहे. ताजमहाल जगातले आश्चर्य म्हणून त्याबद्दलची आपुलकी ठीक आहे. पण, अशा वाचाळवीरांना खरेच त्याचे कौतुक असते काय? तसे असते तर याच लोकांनी भग्नावशेष झालेल्या बाबरी मशिदीच्या पतनासाठी दोन दशके छाती बडवून आक्रोश केला नसता. बाबरीकडे जगातला कोणीही मुस्लीमसुद्धा ढुंकून बघत नव्हता किंवा जगातल्या कोणा संस्थेने तिला कुठला ‘ऐतिहासिक वारसा’ म्हणून मान्यता दिलेली नव्हती. मग तेव्हा नेमकी हीच मंडळी गळा काढून कशाला आक्रोश करीत होती? तर त्यांना यापैकी कशाविषयी आस्था नाही. त्यांचा राजकीय अजेंडा हिंदूंच्या नावाने शंख करण्याचा आहे. जेव्हा तसा विषय नसेल, तेव्हा हिंदुत्व मानणारे सरकार आहे म्हणून जनतेच्या गरजांचा विषय पुढे करून बुलेट ट्रेनच्याही विरोधात आरोळ्या ठोकायच्या, असा अजेंडा आहे. त्यात म्हणून बाबरी, बुलेट ट्रेन वा ताजमहाल असे विषय येत राहातात. ते कोण बोलला यालाही महत्त्व नसते. संगीत सोमहा कोणी भाजपचा महत्त्वाचा नेता नाही. त्याला साधे राज्याच्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आलेले नाही. पण, तरीही त्याचे कुठल्या नगण्य कार्यक्रमातील वाक्य उचलून काहूर माजवले जाते. त्यात बुद्धी वा तारतम्य किंचितही नसते. अर्थात, त्यात नवे काहीच नाही. जगाच्या इतिहासात कुठल्याही समाजात व देशात असेच होत राहिले आहे. स्वत:ला ‘बुद्धिमंत’ वा ‘अभ्यासक’ म्हणवून घेणार्‍या तोतयांना नेहमी असेच कांगावे करून आपल्याकडे लक्ष वेधून घ्यावे लागत असते. त्यांच्यापाशी कुठले कर्तृत्व नसते की पराक्रमगाजवण्याची क्षमता नसते. साहजिकच इतरांना नावे ठेवून किंवा चिखलफेक करून त्यांना आपले चेहरे लोकांसमोर पेश करावे लागत असतात. असे विषय निघाले, तरच या भंगारातील अशा वस्तूंना बाजारात किंमत येणार असते ना? नाहीतर बुलेट ट्रेन काय, बाबरी काय किंवा ताजमहाल काय, यांना कशाचेही सोयरसुतक नसते.

-भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

(Pakistani High Commission official Danish was an ISI agent) ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताने देशाअंतर्गत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या घरभेद्यांचा शोध सुरु केला. यामध्ये गेल्या आठवड्यात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यांमधून अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सगळे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात अधिकारी असणाऱ्या आणि आयएसआय एजंट एहसान उर रहीम उर्फ ​​दानिश आणि मुझम्मिल हुसेन उर्फ ​​सॅम हाश्मी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर, आयएसआय एजंट दानिश आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121