
आजच्या इंटरनेटच्या युगात व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियासारखे प्रभावी माध्यमउपलब्ध झाले आहे. या सोशल मीडियाच्या प्रेमात दहा ते बारा वर्षांच्या मुलांपासून ते अगदी साठी उलटलेली मंडळीदेखील पडली आहेत, पण हे माध्यमकेवळ आपलं मनोरंजन करत नसून त्यातून बरेच प्रश्न सुटले आहेत. अर्थात, सोशल मीडियाचे काही वाईट परिणामझाल्याची बाब नाकारता येत नसली तरी त्याचा उपयोग नेमका कशाप्रकारे करून घ्यायचा, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणूनच तर आपल्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तरुणी, महिला सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी, भररस्त्यात त्यांची छेड काढल्यावर रोडरोमियोंना भर रस्त्यावर चोप तर दिलाच जात आहे, पण आपल्यावर होणारा अन्याय सगळ्यांना कळावा यासाठी व संबंधितांना धडा शिकवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर वाढतो आहे. आपण घेतलेल्या अनुभवातून शिकून इतर तरुणी, महिलांना सावध करणे हा त्यामागचा हेतू आहे. सध्या फेसबुक आणि ट्विटरवर ’Me Too' हॅशटॅग वापरून महिला जास्तीत जास्त व्यक्त होताना दिसत आहेत. जगभरात स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि शारीरिक शोषण याविरोधात ’#MeToo' च्या माध्यमातून वाचा फोडली जात आहे. यामुळे स्त्रियांवर होणारे शोषणाचे प्रश्र्न समाजासमोर येत आहे. एक वेळ अशी होती की, शारीरिक शोषणाबाबत मुली, महिला फारशा बोलत नव्हत्या, व्यक्त होत नव्हत्या. पण काळानुसार सगळं काही बदलत गेलं. ‘अन्यायाविरुद्ध लढायचं’ असा पण आजच्या तरुणींनी केल्यामुळे त्या आपले अनुभव इतरांशी शेअर करत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबापासून ते अगदी सिनेसृष्टीत कामकरणार्या अभिनेत्रींपर्यंत महिलावर्ग जागृत होऊन अन्यायाविरोधात आवाज उठवू लागला आहे. खरंतर नेमका ’#MeToo' चा ट्रेंड कुठून आला तेही जाणून घेणे गरजेचे आहे. ऑस्करविजेते निर्माते हार्वे वाइनस्टीन यांच्यावर हॉलिवूडमधील २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला. या प्रकरणावर हॉलिवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने ‘‘माझ्यासोबतही असे घडले आहे’’ म्हणत ’#MeToo' ट्विट केले आणि हे ट्विट चांगले व्हायरल झाले. स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्र्न किती गंभीर आहे याची जाणीव झाल्याने संबंधितांना त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले. तेव्हा, महिलांनीही न घाबरता अन्यायाला वाचा फोडली तर न्याय नक्की मिळेल!
गरज पोषक आहाराची
पिझ्झा, बर्गर अशा फास्ट फूडची नुसती नावे जरी ऐकायला मिळाली तरी भूक लागते. अर्थात, रोजच्या फावल्या वेळेत हे असे चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. हे ’फास्ट फूड’ खाण्याचे फायदे आणि तोटे माहिती असूनही आपण अशा चमचमीत पदार्थांनाच पसंती देतो खरी, परंतु या पदार्थांचा आरोग्यावर होणार्या दुष्परिणामांचा फारसा विचार करण्याची तसदी घेतली जात नाही. खरंतर उत्तमआरोग्यासाठी ’आहार’ हा एक महत्त्वाचा घटक असतो. पोषक आणि सकस आहार खाण्यापेक्षा चमचमीत पदार्थ खाण्याकडे आजकलच्या मुलांचा अधिक कल असतो. विशेष म्हणजे, काही पालकांनी आपल्या मुलांना फास्ट फूडची सवय लावलेली असते. आज अनेक चमचमीत पदार्थ एका क्लिकवर मिळत असल्याने व ते सोयीस्कर पडत असल्याने फास्ट फूड खाण्याचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. ’पोद्दार एज्युकेशन ग्रुप’ या शिक्षणसंस्थेने शहरांतल्या काही शाळांत केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की, ’’शहरातल्या मुलांना फळे फार कमी खायला मिळतात. या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार सहावी ते दहावी या वर्गातल्या केवळ १८ टक्के मुलांनाच दररोज किमान एक फळ खायला मिळते. या संस्थेने शहरातील अनेक शाळांची पाहणी केली. या शाळेतीलर विद्यार्थ्यांपैकी केवळ १४ टक्के मुलांना प्रथिनेयुक्त असा आहार आठवड्यातून एकदाच मिळत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, कमी वयामध्ये वेगवेगळ्या आजारांचा सामना या मुलांना करावा लागत आहे. तसेच ५ वर्षे ते १९ वर्षे या वयोगटातल्या मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण गेल्या ४० वर्षांत दहापटीने वाढले आहे. यासाठी शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करून विचारविनिमयातून शिक्षकांनी पालकांचे आहाराबाबत प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. खरंतर आजची लहान मुले ही उद्याची भावी नागरिक आहेत. त्यांच्या कर्तृत्वावार आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे. या उमलत्या कळ्यांच्या आरोग्याचे गणित बिघडत चालले असून ही एक धोक्याची घंटा आहे. मुलांना सकस अन्न खायला न मिळणार्या देशात भारताचा समावेश होतोेे. लंडनचे इम्पिरिअल कॉलेज आणि जागतिक आरोग्य संघटना यांनीही अशीच एक पाहणी केली असून त्यांनाही ही समस्या गंभीर असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे पालकांनी थोडासा वेळ काढून मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेला आहार कसा देता येईल याचा विचार करणे हिताचे ठरणार आहे.
- सोनाली रासकर