
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. यासाठी कारण ठरली ती भांडुपची पोटनिवडणूक. त्या पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेला धूळ चारली आणि शिवसेनेची पालिकेत आपले अस्तित्व टिकविण्याची धडपड सुरू झाली. त्यातच जमवाजमव आणि फोडफोडीच्या ’राज’कारणाने वेग घेतला आणि त्याचा फटका राज ठाकरे यांच्या मनसेला बसला. ’आमच्या राजाला साथ द्या,’ म्हणत असतानाच केवळ सात नगरसेवक घेऊन मनसेने मुंबई महानगरपालिकेची पायरी ओलांडली. खरंतर एकेकाळी अगदी जोशात असलेल्या पक्षाची यावेळी झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये दयनीय अवस्था झाली होती. त्यातच पक्षाला आणखी सुरूंग लागला तो भांडुपच्या पोटनिवडणुकीनंतर. शिवसेनेला पालिकेत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी नगरसेवकांची साथ हवी होती. त्यातच एका रात्रीत शिवसनेने एक्के दुक्के नाही, तर तब्बल सहा नगरसेवक फोडत मनसेसमोर पालिकेतील अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केला. त्यातच पोटनिवडणुकीनंतर खा. किरीट सोमय्या यांनीदेखील ’’मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसेल,’’ असे छातीठोकपणे सांगितले. त्यालाच शह देण्यासाठी पुन्हा या ठिकाणी फोडाफोडीच्या ’राज’कारणाचा अवलंब केला गेला. शिवसेना पक्षप्रमुखांनी त्याला ’घरवापसी’ म्हणत सहा नगरसेवकांचे स्वागतही केले. सहा नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेच्या महापौर पदाच्या खुर्चीला सध्या तरी धोका नाही, मात्र मनसेला आता पालिकेत एकसदस्यीय पक्ष म्हणून आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. या राजकारणाला राज ठाकरे यांनीदेखील उत्तर देत, ’’मागितले असते तर सात दिले असते, चोरून फक्त छक्के नेले,’’ असे म्हटले. ’’यापुढे हातावर नाही, तर गालावर टाळी देऊ,’’ असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त करत शिवसेनेचा कडक शब्दांत समाचारही घेतला. मुंबई महानगरपालिका ही प्राणवायू असल्याप्रमाणे त्यात सत्ता आणि आपले अधिराज्य टिकविण्यासाठी आज सर्वांचीच धडपड सुरू आहे. आज निवडून आल्यानंतर स्वत:चे राजकीय हित साधण्यासाठी एका पक्षातून दुसर्या पक्षात बेडूकउड्या मारणे हे काही नवे नाही. मात्र, अस्तित्वाच्या आणि वर्चस्वाच्या लढाईत आज ‘मुंबईचा विकास’ हा केवळ वाचायला मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सर्व काही मुंबईकरांच्या भल्यासाठी, मात्र नेमका हा मुंबईकर नक्की कोण? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच!
आयाराम गयाराम...
खा. किरीट सोमय्या यांनी पोटनिवडणुकीनंतर ‘‘आमचाच महापौर बसेल,’’ असे म्हटले आणि आयारामगयारामचा खेळ रंगू लागला. मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी आणि या मुंबईवर आपलेच अधिराज्य असेल, अशा काहीशा विचारात शिवसेना आज वावरताना दिसते. कांदिवलीच्या भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या संख्याबळातील फरक तीनवर गेला होता. भांडुपच्या निवडणुकीनंतर रिक्त झालेली जागा भाजपने आपल्याकडे आणल्यानंतर सेना-भाजपमधील फरक केवळ दोनवर येऊन ठेपला होता, तर दुसरीकडे याच ठिकाणी कॉंग्रेसला आपली एक जागा गमवावी लागली होती. कांदिवलीतील पोटनिवडणुकीनंतर, ’’कोणत्याही ठिकाणी कोणाचा मृत्यू झाल्यानंतर आपण उमेदवार उभे करत नाही, असे राजकारण आपल्या रक्तातही नाही आणि ती बाळासाहेबांची शिकवणही नाही,’’ असे सांगत राज ठाकरे यांनी आपण उमेदवार उभा केला नसल्याचे वांजळे यांचे उदाहरण देत सांगितले. मात्र, अशा ठिकाणी उमेदवार उभा करून त्याचा मनसेसारख्या पक्षाला कितपत फायदा होणार होता हा प्रश्न आहेच. आज आपल्याच नगरसेवकांना एका गुप्त ठिकाणी लपवून ठेवण्यासारखे प्रकारे मुंबईकरांच्या निदर्शनास येऊ लागले आहेत. अशीच काहीशी परिस्थिती शिवसेनेतून कॉंग्रेसवारी केलेल्या छगन भुजबळांवरदेखील आली होती. त्यांनाही कॉंग्रेसमधील प्रवेशानंतर असेच काही दिवस लपून बसावे लागले होते. आयारामगयारामआणि सध्या सुरू असलेल्या राजकीय चढाओढीत मात्र हा मुंबईकर त्यांना दिसेनासा झालाय, तर दुसरीकडे ‘भाजप विरुद्ध शिवसेना’, ‘शिवसेना विरुद्ध मनसे’ आणि सर्वांविरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व अन्य अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षीय आणि चढाओढीच्या राजकारणात आज मुंबईकरांचा कैवारी असल्याचे दाखविणारा पक्ष मुंबईच्या समस्यांकडे दुर्लक्षच करताना दिसतोय. एकेकाळी सर्वांचा चाहता असलेला मनसेसारखा पक्ष आज या राजकारणामुळे म्हणा किंवा कमकुवत पक्षबांधणीमुळे म्हणा, अगदी रसातळाला गेला आहे. आज महाराष्ट्राचे नाही, तर पक्षाचेच नवनिर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मुंबईकरांचा कोणी कैवारी असो किंवा नसो, त्यांना पूर, खड्डे अशा बिकट वाटेतून मार्ग काढण्याची सवयच झाली आहे. सध्या पारंपरिक राजकारणापेक्षा एक वेगळ्याच बाजाचे राजकारण मुंबईकरांना अनुभवताहेत. तेव्हा, आगामी काळात पालिकेतील हे अटीतटीचे राजकारण आणखी किती कूस बदलते, हेच पाहायचे.
- जयदीप दाभोळकर