काय मुलांनो, दिवाळीची तयारी सुरु झाली ना ? आता शाळेच्या सहामाही परीक्षा संपल्या असतील. मग काय ? मजाच मजा ! दिवसभर मित्र – मैत्रिणींबरोबर किल्ला करायचा. दुपारभर दगड, माती, चिखलात मनसोक्त खेळायचं. शिवाजी महाराज आणि मावळे मांडायचे. तोफा डागायच्या. मोहरी अळीव पेरायचं. आणि घरी येऊन हातपाय धुवून आई – आजी फराळाचे करत असतात, त्यावर ताव मारायचा!
संध्याकाळी बाबा घरी आला, की त्याच्या बरोबर आकाशकंदील करायचा. आधी मस्त रंगीबेरंगी कागद आणायचे. मग बाबाच्या हाताखाली कात्री आण, पिना आण, इथे चिकटव, तिथे धर, याला अडकव, त्याला बांध, झाडू - खराट्याच्या काड्या पळव! असलं काय काय करून कंदील तयार झाला की दारावर लावायचा.
आईला घर आवरायला मदत करायची. स्टुलावर चढून माळ्यावरून नको नको ते समान काढून बघत बसायचं. आई-बाबांचे लहानपणाचे फोटो. जुन्या पेपर मधला फारच interesting मजकूर. मामाचे ते हरवलेले पत्र, ते मिळते. मग ते सगळे वाचत बसावं लागतं. त्यात फारच वेळ घालवला की मग आईचा धपाटा खाऊन पुढचं पटपट आवरायचं.
एखाद्या संध्याकाळी काका बरोबर फटाके आणायला जायचं. मावशी बरोबर पणत्या रंगवायच्या. ताई बरोबर रांगोळीत रंग भरायचे. आणि दिवाळीच्या पहाटे अभ्यंग स्नान आणि फराळ झाला, की आजोबां बरोबर दिवाळी अंक वाचायचे. कसला भरगच्च कार्यक्रम आहे!
दिवाळीच्या आधीपासूनच दिवाळीची गंमत सुरु होते! दिवाळीची अशी जंगी तयारी चालू असतांनाच, दिवाळीचा पहिला दिवस येतो – तो दिवस म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशीचा. या दिवसाला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणतात. ज्यांच्या घरी गुरं असतात त्यांनी श्रावणात पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा केली असते. आज गायींचा turn! आजच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. गायीसाठी खास पुरणाची पोळी केली जाते. गाय – वासराला अंघोळ घालून, फुलांची माळ घालून, नमस्कार करून पुरणाची पोळी भरवतात.
मग, दुसरा दिवस येतो धनत्रयोदशीचा. धन्वंतरीचा Happy Birthday, अर्रर्र ... जयंती! त्याच्या जन्माची गोष्ट आशी आहे की - एकदा देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन करायचे ठरवले. त्यासाठी मंदार पर्वताची रवी केली. त्याला वासुकी नागाची दोरी बांधली. मग, असुरांनी वासुकीची फण्याची बाजू धरली, आणि देवांनी शेपटीची. मग देव आणि असुर समुद्राचे मंथन करायला लागले. वासुकीच्या तोंडातून फुत्कार निघू लागले. समुद्रात खळबळ माजली. आणि समुद्रातून एक एक रत्न बाहेर पडू लागले. चंद्र, ऐरावत, पारिजातक, कौस्तुभमणी, अलक्ष्मी, लक्ष्मी, धनवंतरी, अमृत असे काय काय प्रकट झाले.
धन्वंतरी ज्या दिवशी समुद्रातून आला, तो दिवस होता धनत्रयोदशीचा. म्हणून आज धन्वंतरीची पूजा करायची. धन्वंतरी हा प्राचीन डॉक्टर होता. तो झाडांपासून तयार केलेले औषधे देऊन रुग्णाला मृत्युच्या तावडीतून परत आणतो. जसे गुरुपौर्णिमेला शिक्षण देणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तसे या दिवशी आरोग्य देणाऱ्या वैद्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची.
मग येते नरकचतुर्दशीची पहाट! एकदम लवकर उठून आईकडून छान तेल लावून घ्यायचे. ओवाळून घ्यायचे. सुंगंधी उटणे लावून सूर्योदयाच्या आधी अंघोळ केली की स्वर्गाचे first class चे booking होते! आणि अंघोळीला उशीर केला तर? तर नरकात! माहिताय न ती नरकासुराची गोष्ट?
नरकासुर नावाचा एक दुष्ट असुर होता. त्याने खूप खूप राजकन्यांना पळवून आणले आणि बंदी करून ठेवले. त्याला असा वर मिळाला होता की फक्त एक स्त्रीच त्याला ठार मारू शकते. त्याला वाटायचं, स्त्री तर शक्तिवान असूच शकत नाही, मग मी कधीच मरणार नाही! वेडाच होता तो!
कृष्णाला त्याचा वर माहित होता. कृष्णाने बंदिवान राजकन्यांना सोडवण्यासाठी, नरकासुरावर हल्ला केला. पण त्याने सत्यभामेला बरोबर नेले. या युद्धात सत्यभामेने नरकासुराला मारले! मरतांना त्याने विनवणी केली, की लोकांनी माझी आठवण ठेवावी. तेंव्हा कृष्णाने वर दिला की आजचा दिवस तुझ्या नावाने “नरकचतुर्दशी” म्हणून ओळखला जाईल. आणि जो कोणी सूर्योदयाच्या नंतर अंघोळ करेल, तो नरकात जाईल!
या नंतरचा दिवस असतो अमावस्येचा. अश्विन अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन. समुद्र मंथनाच्या गोष्टीत, समुद्रातून अलक्ष्मी आणि लक्ष्मी आली. त्यापैकी अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहिण. ती आहे दुर्भाग्याची देवता. तिला कोणीच ठेवून घेईना. तिने देवाला प्रश्न केला, “मी कुठे जाऊ? कुठे राहू?”. तेंव्हा देवाने तिला सांगितले – ज्या घरातले लोक आळशी आहेत, कष्ट करत नाहीत, अभ्यास करत नाहीत, एकमेकात भांडतात, एकमेकांचा हेवा करतात, उलट उत्तरे देतात, ज्या घरात अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे, अंधार आहे तिथे तू रहायला जा! अशी अलक्ष्मी घरात आली की मग दारिद्र्य येते, अनारोग्य बळावते, आजारपण येते, कुटुंबात दुरावा निर्माण होतो, प्रेम नाहीसे होते.
तेच ज्या घरात – स्वच्छता आहे, दिवे लावून उजेड केला आहे, जिथे सरस्वतीची आराधना केली जाते, अभ्यास केला जातो, जिथे कुटुंबातील सदस्य एकमेकांवर प्रेम करतात तिथे लक्ष्मीचा वास असतो! त्या घरात लक्ष्मी म्हणजे – आरोग्य, दीर्घायुष्य, कीर्ती, संपत्ती, कुटुंबात एकी, शांती या सर्वांचा वास असतो. अशा लक्ष्मीची पूजा दिवाळीत केली जाते!
या नंतरचा दिवस असतो - कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा. दिवाळीतील पाडाव्याचा. विक्रम संवत् कॅलेंडरच्या नवीन वर्षाचा हा पहिला दिवस. दोन हजार वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी विक्रमादित्य राजाने ही नवीन कालगणना सुरु केली होती. त्याने परकीय शकांना हरवल्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी ही कालगणना सुरु केली होती. तो विजयोत्सव आपण नवीन कपडे घालून, एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आनंदाने साजरा करतो.
आणि दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीजेचा! काय मग, मुलींना छान छान ओवाळणी मिळणार. आणि मुलं आपला pocket-money साठवून बहिणींसाठी छोटी छोटी gift आणणार!
चला मग! घराची, परिसराची स्वच्छता करून, मस्त नवीन कपडे घालून, छान छान खाऊ खाऊन, दिवे लावून, फटाके उडवून, मस्त पुस्तके वाचून दिवाळी साजरी करणार ना? आणि हो! या गडबडीत, किल्ल्यावर मोहरी आणि आळिव पेरले असतील तर त्याला पाणी घालायला विसरू नका!
- दिपाली पाटवदकर