नांदेडचा धडा अर्थात शिकणार्‍यांसाठी!

    15-Oct-2017   
Total Views | 6


 

 

नांदेड महापालिकेचे निकाल अनेकांना काही शिकवू पहात आहेत. अर्थात ते शिकाय्चे किंवा नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्र्न आहे. तिथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एकहाती मिळवलेले यश नेत्रदिपक नक्की आहे. कारण मागल्या विधानसभेपासून देशातली व राज्यातली कॉंग्रेस पुरती मरगळलेली आहे. त्याही काळात चव्हाण यांनी लोकसभेची नांदेडची जागा जिंकलेली होती. आता त्यांनी महापालिका जिंकलेली आहे. त्यात ८१ पैकी ७१ जागा जिंकणे नक्कीच स्पृहणीय आहे. कारण चव्हाणांना बालेकिल्ल्यातच नेस्तनाबूत करण्यात भाजपा अपेशी झाला आहे. पण त्याचा आनंद कॉंग्रेसपेक्षाही शिवसेनेला अधिक झाला आहे. मागल्या विधानसभा निवडणूकीमध्ये युती तुटल्यापासून या दोन जुन्या मित्रांमध्ये जुंपलेली आहे. त्यात आपल्या अपयशापेक्षा दुसर्‍याच्या अपयशाने ते अधिक खुश होताना दिसतात. म्हणूनच अशी संधी मिळाली, म्हणजे दोघेही एकमेकांना बोचकारून घेण्यास विसरत नाहीत. सहाजिकच आपल्या जागा १४ वरून घसरून एकावर आल्याचे सेनेला दु:ख होण्यापेक्षा भाजपाला महापालिका जिंकता आली नाही याचा आनंद अधिक झाला, तर समजू शकते. पण या मतदानात एकट्या भाजपा वा शिवसेनेचा पराभव झालेला नाही, तर ओवायसी यांच्या मजलीस व पवारांची राष्ट्रवादी यांचाही पुरता बोजवारा उडालेला आहे. म्हणूनच कॉंग्रेसच्या या यशाची योग्य मिमांसा होण्याची गरज आहे. त्यात प्रत्येक पराभूत व विजयी पक्षासाठी काही धडा सामावलेला आहे. विजयी झालो तर कशामुळे आणि पराभूत झालो, तर कोणत्या कारणाने; त्याची मिमांसा प्रत्येकाने करणे भाग आहे. शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून तसा अभ्यास ‘आपल्या पद्धतीने’ करण्याचा वादाही केला आहे. म्हणजे काय, ते त्यांनाच ठाऊक! कारण विधानसभेतील स्वबळावर मिळवलेल्या चांगल्या यशानंतरही तो पक्ष आपल्या यशापयशाची कुठली मिमांसा करताना दिसलेला नाही.


शिवसेना वा भाजपा या मित्रांनाच या मतदानाने दणका दिलेला नाही. राष्ट्रवादी व मजलीस (एमआयएम) अशा दोन पक्षांचे अपयशही डोळ्यात भरणारे आहे. त्यापैकी मजलीस हा पक्ष मागल्या पालिका निवडणूकीपासून महाराष्ट्रात अवतरला. त्याने महाराष्ट्रातील वाटचालच नांदेड येथून पालिका निवडणूकीने केली आणि लहानसहान पालिका वगैरे लढवताना विधानसभेतही दोन आमदार निवडून आणलेले होते. पण तेही विरोधातील मतांची कमालीची विभागणी झाल्यामुळेच विधानसभा गाठू शकलेले होते. त्याचवेळी मुस्लिममतांचे ओवायसींच्या भडकावू भूमिकेविषयीचे आकर्षण त्याला कारणीभूत झालेले होते. त्याला फ़ारकाळ मुस्लिमातही पाठींबा मिळण्याची वा टिकण्याची शक्यता नव्हती. त्याची साक्ष दोन वर्षापुर्वी बांद्रा पुर्व येथील पोटनिवडणूकीनेच दिलेली होती. सेनेच्या बाळा सावंत या आमदाराच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणूक झाली, तेव्हा आधीची मतेही मजलीस टिकवू शकली नव्हती. नांदेडमध्ये त्याच्या पुढले पाऊल पडले आहे. मागल्या पाच वर्षात ओवायसी बंधूंनी अतिशय प्रयत्नपूर्वक देशातील मुस्लिमनेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पुढाकार घेतलेला होता. त्याला महाराष्ट्रात थोडाफ़ार प्रतिसाद मिळाला. पण बाकी अन्यत्र त्यांना मुस्लिमांची मतेही मिळवता आली नाहीत. बिहार-उत्तरप्रदेशात त्यांचा फ़ज्जा उडालेला होता आणि नांदेडने त्यावर आता शिक्कामोर्तब केले म्हणायचे. त्यांनी धुर्तपणे मुस्लिम-दलित अशी मोट बांधलेली होती. म्हणून त्यांना थोडाफ़ार प्रतिसाद मिळत होता. आजवर कॉंग्रेसची मक्तेदारी असलेल्या या समाजघटकावर मध्यंतरीच्या काळात बसपा, समाजवादी अशा पक्षांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. दुबळी विस्कळीत मुस्लिमलीग त्याला कारणीभूत होती. तिथे ओवायसी बंधूंनी शिरकाव करून घेतला होता. पण तीनचार वर्षातल्या मतदानाच्या निकालांनी मुस्लिमपुन्हा कॉंग्रेसकडे परतु लागल्याची ही खुण आहे. त्याचे कारण काय असावे?


मागल्या तीनचार वर्षात कॉंग्रेसची दुर्दशा झाली हे सत्य आहे. पण ज्या कारणाने झाली, यातून बाहेर पडण्याऐवजी राहुल गांधी व त्यांच्या सवंगड्यांनी या काळात अधिक जोरकसपणे आपणच मुस्लिमांचा एकमेव मसिहा असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयास केला. त्यामुळे़च मुस्लिममतदार आता पुन्हा कॉंग्रेसकडे वळू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी या पक्षाकडे असलेला मुस्लिममतदारही मोठ्या प्रमाणात कॉंग्रेसकडे झुकला आहे. नांदेडमध्ये त्याची अधिक स्पष्ट साक्ष मिळाली आहे. बंगाल, उत्तरप्रदेश अशा राज्यातही कॉंग्रेस आता मुस्लिमांचा पक्ष ठरत चालला आहे. मुस्लिमदाट वस्ती असलेल्या भागात अशा गठ्ठा मतदानाच्या जोडीला किरकोळ हिंदू वा बिगरमुस्लिममतेही नगरसेवक निवडून आणतात. त्याचा लाभ चव्हाणांना मिळालेला आहे. पण उलट शिवसेना व भाजपा यांच्यात मतविभागणी होऊनही त्याचा लाभ कॉंग्रेसला मिळाला. त्यात युती असताना सेनेला जो लाभ मिळत होता, तो गमावला व भाजपाला आपली शक्ती वाढलेली दाखवण्याची संधी प्राप्त झाली. आताच्या या निकालाचा तातडीचा लाभ नक्कीच चव्हाणांना झाला आहे. पण त्यात दुरगामी तोटाही असतो. कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या मुस्लिमसदस्यांची संख्या हळुहळू अन्य समाजघटकांना खटकू लागली, मग कॉंग्रेसच्या पारड्यातली हिंदू मते पर्याय शोधू लागतील. हेच नेमके पाच वर्षानंतर उत्तरप्रदेशात घडलेले आहे. २०१२ सालात विधानसभेत सर्व पक्षाचे मिळून ६८ मुस्लिमआमदार निवडून आलेले होते आणि त्याचा जनमानसावर पडलेला प्रभाव दोन वर्षानंतर लोकसभेत एकही मुस्लिमखासदार निवडला जाऊ नये, इतका विपरीत घडला होता. पाच वर्षांनी विधानसभा मतदानात ही आमदारसंख्या उत्तरप्रदेशात ६८ वरून २४ इतकी खाली आलेली आहे. नांदेड त्याच दिशेने वाटचाल करू लागले तर नवल नाही.


प्रत्येक निवडणूक मोठ्या प्रमाणात जिंकणे ही पक्षाची महत्वाकांक्षा असू शकते. पण ती साध्य झाली नाही तरी त्यातून काय साध्य झाले, तेही तपासून बघायचे असते. भाजपाने भले जागा कमी जिंकल्या असतील. पण दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवताना अन्य तीन प्रतिस्पर्धी पक्षांना नामोहरमकेले असेल, तर तिलाही जमेची बाजूच मानले पाहिजे. त्याहीपेक्षा या ताज्या मतदानात मुस्लिमएकगठ्ठा कॉंग्रेसच्या बाजूला गेल्याने तो मुस्लिमपक्ष झाल्याची गोष्ट पुढल्या काळात हिंदुत्ववादी पक्षाला लाभदायक ठरणारी असू शकते. जिथे म्हणून मुस्लिमगठ्ठा मतदान करू लागतात, त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू मतेही धृवीकरण होऊन भाजपाकडे वळतात, हा इतिहास आहे. नांदेडच्या पालिका मतदानात कॉंग्रेसने झाडून मुस्लिममते मिळवली व मजलीसला संपवले असेल, तर त्याने स्वत:वर मुस्लिमपक्ष असा शिक्का मारून घेतला आहे. हे आपापल्या वॉर्डातले मुस्लिमनगरसेवक जितके धर्मांध वर्तन करतील, तितकी तीव्र प्रतिक्रिया हिंदू समाजात उमटणार आहे. भाजपासाठी तो लाभ असू शकेल. अर्थात तशी भाजपाची रणनिती असेल तर. नुसत्याच जागा वा पालिका जिंकण्याला प्राधान्य असेल, तर गोष्ट वेगळी! राष्ट्रवादी पक्षाला यातून शिकायचा धडा म्हणजे आता त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाला बाजारात पत राहिलेली नाही. त्यांनी कॉंग्रेसमध्ये विलीन व्हावे किंवा अस्तंगत व्हावे. मुस्लिमपक्षांनाही तसाच संकेत या मतदानाने दिलेला आहे. त्यांनी उगाच धर्माधिष्ठीत पक्ष म्हणून वेगळी चुल मांडण्यापेक्षा सरळ मुस्लिमधार्जिण्या कुठल्याही सेक्युलर पक्षात विलीन होऊन जावे आणि मतविभागणीची अडचण थांबवावी. देशातले मतदान अधिक स्पष्टपणे दोन गटात विभागले जात असल्याचा हा संकेत आहे आणि ज्याला शिकायचा असेल, त्याच्यासाठी त्यात धडा जरूर आहे. ज्यांना शिकायचे नसते, त्यांच्यासाठी आनंदच आहे.

 

- भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121