बीएसएफ - भारताच्या संरक्षणाची पहिली फळी

Total Views | 5
 
 
दिवाळी असो वा दसरा किंवा इतर कुठलाही सण, आपण मोठ्या जल्लोषात निश्चिंत होऊन अगदी सुरक्षित वातावरणात साजरा करतो. कारण, हजारो किलोमीटर दूर आपल्या धुमसत्या सीमांवर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जवान अखंड तैनात असतात. देशासाठी...देशवासीयांसाठी. आपल्याला त्यांचा सर्वस्वी सार्थ अभिमान असतोच, पण प्रत्यक्ष सीमेवर गेल्यावर, जवानांशी मनमोकळेपणाने बातचित केल्यावर आणि एकूणच सीमेवरील परिस्थिती पाहिली की हा अभिमान निश्चितच द्विगुणित होतो. जवानांच्या जोखमीचे मूल्य समजते. तेव्हा, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याची प्रथमजबाबदारी असलेल्या सीमा सुरक्षा दल अर्थात ‘बीएसएफ’च्या अटारी सीमेला भेट देण्याचा योग जुळून आला. तेव्हा, ‘बीएसएफ’चे कार्यक्षेत्र, त्यांच्या पुढील आव्हाने आणि प्रत्यक्ष सीमेवरील अनुभवचित्रण कथन करणारा हा लेख...
 
सच्चे मन से सेवा करुँगा|
और मैं भारत कें सीमा सुरक्षा बल में
इमानदारी और सच्चे मन सें निष्ठावान बना रहूँगा|
मुझें जहॉं कही भी भेजा जाएगा में खुशी सें जाऊँगा|
में भारत के राष्ट्रपती और उस अधिकारी की
जिन्हे मेरे उपर नियुक्त किया जाएगा उनकी आज्ञाओं को मानूँगा|
और उनका पालन करूँगा|
चाहें इसमें मुझे अपना जीवन का ही बलिदान क्यूं ना देना पडे...
 
 
प्रतिज्ञा ऐकल्यावर जवानांप्रतीचा अभिमान अधिकच द्विगुणित होतो. त्यांच्या शौर्य आणि धैर्याला सलाम ठोकून डोळेही कुठेतरी पाणावतात. तो जवानही कुणाचा मुलगा, कुणाचा बाप, कुणाचा भाऊ तर सीमेवर या जवानांना खांद्याला खांदा लावून चोख कर्तव्य बजावणार्‍या रणरागिणीही मुलगी, पत्नी, बहीण अशी सगळी नाती बाजूला ठेवून दिवसाचे २४ तास, वर्षाचे ३६५ दिवस ऊन, पाऊस, वारा अशा सर्व प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीचा सामना करत आपल्या देशाच्या सीमांचे अहर्निश संरक्षण करतात. तप्त वाळवंट असो, हिमाच्छादित शीत शिखरे, दलदलीत रुतवणारी वाट किंवा घनदाट जंगलांची जीवघेणी सफर, २ लाख ५७ हजारांपेक्षा अधिक सक्रिय महिला आणि पुरुष जवान सतत डोळ्यात तेल घालून सीमांच्या संरक्षणासाठी तैनात आहेत. भारताच्या ६,५०० कि.मी जमीन, आकाश आणि समुद्रातील विस्तृत सीमांचे शत्रूपासून रक्षण करणार्‍या या जवानांना मात्र आपल्या जीवनाची तमा नाही. कारण, त्यांचे जीवन स्वखुशीने राष्ट्ररक्षणासाठी सदैव समर्पित...अशा या भारताच्या ‘फ्रन्टलाईन गार्डियन’, ‘बॉर्डरमेन्स’च्या खांद्यावर सीमांच्या संरक्षणाबरोबरच, तस्करी, घुसखोरी रोखण्याचीही जबाबदारी आहेच. असे हे शूरवीर, धाडसी आणि देशाच्या सीमांचे पहारेकरी म्हणजे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)... भारताची ‘फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स.’
 

 
‘आजीवन कर्तव्य’ या ध्येयवाक्याप्रमाणेच ‘बीएसएफ’चे जवान कोणत्याही संकटांची पर्वा न करता देशाच्या संरक्षणाकरिता आपले बलिदान देण्यासाठी क्षणभरही विचार करीत नाहीत. कारण, इथे एक छोटीशी चूकही किंवा चुकीची कृतीदेखील अतिशय प्राणघातक ठरू शकते. त्यामुळेच सतत सतर्क राहून जवानांना आपल्या सीमांचे रक्षण करावे लागते. मात्र, या ध्येयनिष्ठतेचा कळस गाठण्यासाठी प्रत्येक जवानाला अथक शारिरीक आणि मानसिक अशा खडतर प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघावे लागते. ‘बीएसएफ अकॅडमी’मध्ये सामान्य व्यक्तीमधील असामान्य, आपल्या प्राणांची पर्वा न करणारा असा एक ‘डिसिप्लिन्ड बॉर्डरमेन’ देशाच्या रक्षणासाठी सज्ज होतो. बीएसएफच्या अकॅडमीमध्ये आलेल्या सर्व जवानांचा दिवस सुरू होतो तो अगदी पहाटे तीन-साडेतीन वाजता. त्यानंतर पाच सव्वा पाचच्या सुमारास त्यांच्या मार्चची सुरुवात होते. त्यानंतर धावणे, अडथळ्यांची शर्यत पार करणे, नेमबाजी अशा खडतर प्रशिक्षणातून जवानांचा दिवस सुरू असतो. पण इंग्रजीत म्हणतात ना, ’द गोईंग गेट्‌स टफ, द टफ गेट्‌स गोईंग’ हेच सूत्र या कठोरतम प्रशिक्षणामध्ये तंतोतंत लागू होते. ५७ आठवड्यांच्या या प्रशिक्षणामध्ये जवानांना त्यांच्या अखेरच्या मर्यादेपर्यंत पारखले जाते. यानंतरच ‘डेली ड्रिल’मधून त्यांचं परिवर्तन होते ते म्हणजे ‘फायटिंग मशीन्स’मध्ये. सामान्य व्यक्ती एखाद्या कठीण परिस्थितीत अडकते, त्यावेळी त्याच्यासमोर ‘आता पुढे काय करायचे’ हा प्रश्न उभा ठाकतो. मात्र, प्रशिक्षणादरम्यान एखाद्या जवानासमोर एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर तो उठतो, त्या प्रसंगाला समजून घेतो आणि म्हणतो, ‘आता आम्ही असं करू...’ आणि ’ड्युटी ऑन टू डेथ’ अर्थात ‘आजीवन कर्तव्य’ हे ‘बीएसएफ’चे ब्रीदवाक्य सत्यवचनी उतरते.
 
 
‘बीएसएफ’ अकॅडमीमध्ये खडतर प्रशिक्षण घेतलेल्या जवानांना आपली नियुक्ती देशाच्या कोणत्या भागात होईल, आपल्याला कोणत्या परिस्थितीत कर्तव्य बजावावे लागेल, याची तसूभरही कल्पना नसते. त्यांच्या प्रतिज्ञेप्रमाणेच त्यांची ज्या ठिकाणी नियुक्ती केली जाते, त्या ठिकाणी त्यांना कर्तव्य बजावावे लागते. प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुरुप जवानांना प्रशिक्षणाचे धडे दिले जातात. यासंबंधीचा एका जवानाशी बोलतानाचा किस्सा मनाला चर्रर्र करून गेला. काही दिवसांपूर्वीच त्या ‘बीएसएफ’ जवानाची नियुक्ती पंजाबमधील एका सीमेनजीक झाली. त्यापूर्वी त्या जवानाला झारखंडसारख्या नक्षलग्रस्त भागात धाडण्यात आले होते. घनदाट जंगलात नक्षलवाद्यांशी दोन हात करताना तीन-चार दिवस कसे निघून गेले ते कळलेदेखील नसल्याचे जवान सांगतो. त्यांच्याकडे उपलब्ध सामानामध्येच जवानांना दिवस काढावे लागणार होते. त्यातच इथे घरापासून हजारो कि. मी दूर असलेल्या या जवानाच्या आईची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे त्याचीही मनात एक धाकधूक... त्यात ना मोबाईल आणि संपर्कक्षेत्राच्या पल्याड असे ते दूर्गम जंगल... अशा बिकट परिस्थितीतही आपल्याकडचे सामान संपल्यानंतर मिळेल त्याचा पोटाला कसाबसा आधार देत, पाणवठ्यांमधील गढूळ पाणी ढकलत, त्या जवानाने आपल्या सहकारी जवानांबरोबर हे मिशन यशस्वीरित्या पार पाडले. मात्र, त्यावेळी जर घरच्या परिस्थितीचा विचार केला असता, तर मानसिकदृष्ट्या खचलो असतो म्हणून कोणताही विचार न करता पुढे चालत जाणे क्रमप्राप्त असल्याचे तो जवान मनावर अगदी दगड ठेवून सांगत होता. जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या स्वत: सक्षम असू, तेव्हाच आपण आपल्या देशवासीयांचे संरक्षण करू शकतो. त्यामुळे कितीही विपरीत परिस्थितीत जवानांना कर्तव्यापासून मुक्ती नाही. नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्गम भागांत समाजविघातक शक्ती घुसखोरी, तस्करीच्या माध्यमातून अशांतता आणि दहशतीचा शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना डोळ्यात तेल ओतून सेकंदा सेकंदाच्या हालचालींवर सूक्ष्मनजर ठेवावी लागते. म्हणजे हेच बघा ना... या लेखासाठी अटारी सीमेवर ‘बीएसएफ’च्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. मात्र, त्याच दिवशी ‘बीएसएफ’ची नजर चुकवून जवळच्याच अजनोरी सेक्टरमध्ये दोन शसस्त्र पाकिस्तानी घुसखोरांनी भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वी जवानांना या घुसखोरीचा सुगावा लागल्यामुळे दोन्ही घुसखोरांनी दिसताक्षणीच कंठस्नान घालण्यात आले. पाकिस्ताननेही त्यांचे मृतदेह स्वीकारत जणू ते पाकिस्तानी नागरिक असल्याच्या घटनेलाच दुजोरा दिला. पंजाबमधील ‘बीएसएफ’च्या जवानांनी केलेल्या अनेक कारवायांपैकी ही सर्वात महत्त्वाची कारवाई होती. त्यामुळे कधी, कुठून आणि कसा शत्रू सीमेवर धडक देईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे ‘बीएसएफ’चे जवान २४ तास अलर्ट मोडवर असतात. 
 
 
सीमेवरील राष्ट्रभक्तीचा जयघोष
 
आज भारत आणि पाकिस्तानमध्ये कितीही तणावाचे वातावरण असले तरी ज्या ठिकाणी हे वातावरण ‘थेट्रीकल’ अंदाज घेते ते म्हणजे सर्वांच्या परिचयाची अटारी सीमा. या ठिकाणी दररोज होणार्‍या परेडमुळे या परिसरात अगदी राष्ट्रभक्तीने भारवलेले वातावरण निर्माण होते. ’भारतमाता की जय...’ ’हिंदुस्थान जिंदाबाद’च्या जयघोषात हा परिसर अक्षरश: दुमदुमून जातो. प्रत्येकाच्या मनात असलेली देशभक्तीची भावना या परेड दरम्यान दिसून येते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही ठिकाणी बसलेल्या देशभक्तांच्या जयघोषात दोन्ही देशांमध्ये असलेले गेट्स उघडले जातात. ‘बीएसएफ’ आणि ‘पाकिस्तान रेंजर्स’कडून दररोज या ठिकाणी परेड सादर केली जाते. यामध्ये एकमेकांमध्ये असलेला जोश, पायांच्या हालचाली आणि एकमेकांच्या डोळ्यातील देशभक्ती ओसंडून वाहत असते. संध्याकाळी सूर्यास्त होताना गेट्‌स बंद करण्यापूर्वी दोन्ही देशांचे ध्वज आदराने उतरवले जातात. मात्र, या ठिकाणी परेड सादर करणारे महिला आणि पुरुष जवान केवळ यासाठी नियुक्त केलेले नाहीत. टाळ्या वाजवणार्‍या गर्दीपेक्षा अतिशय दूर हे जवान आपल्या सीमांचे संरक्षण करत आपले कर्तव्य बजावत असतात. 
 

 
‘समझौता’ची सुरक्षा
 
भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेले अटारी हे रेल्वे स्थानक. पंजाबमधील अटारीतून दर सोमवारी आणि गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता पाकिस्तानातून भारतात आणि २ वाजता भारतातून पाकिस्तानकडे ‘समझौता एक्सप्रेस’ रवाना होते. सर्वात संवेदनशील रेल्वे गाड्यांपैकी ‘समझौता एक्सप्रेस’. यावेळी प्रवाशांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असतेे. दर सोमवारी आणि गुरुवारी सीमा सुरक्षा दलाचे जवान यासाठी अपार परिश्रमघेत असतात. रेल्वे सीमेवर आल्यावर दोन्ही देशांमधील असलेले गेट उघडले जातात. यावेळी ‘बीएसएफ’ची एक तुकडी पुढे थांबलेल्या रेल्वेजवळ जाऊन श्वानांच्या मदतीने संपूर्ण परिसराची पाहणी करते. या ठिकाणी कोणत्यी प्रकारचा घातपात तर घडवून आणला जाणार नाही ना याची संपूर्ण खात्री केल्यानंतरच ही रेल्वे ‘झिरो लाईन’वरून अटारी स्थानकापूर्वी असलेल्या जीआरपीच्या पहिल्या पोस्टकडे आणपर्यंतची महत्त्वपूर्ण जबाबदारी याच जवानांच्या खांद्यावर असते. याव्यतिरिक्त कोणताही घातपात होऊ नये यासाठी शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा ‘बीएसएफ’च्या गाड्या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असतात, तर दुसरीकडे घोडेस्वार जवानदेखील संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात.
 

 
शेतकरीमित्र ‘बीएसएफ’
अटारीची भारत-पाकिस्तान दरम्यान असलेली सीमा ही अन्य सीमांपेक्षा अतिशय वेगळी मानली जाते. या ठिकाणी असलेल्या सुपीक जमिनीमुळे पंजाबला भारताचे ‘ब्रेड बास्केट’ देखील म्हटले जाते. या सुपीक जमिनीचा काही भाग आंतरराष्ट्रीय सीमा आणि सीमेवर असलेल्या कुपंणादरम्यानदेखील आहे. या ठिकाणी असलेले ‘बीएसएफ’चे जवान ‘शेतकर्‍यांचे गार्ड’ म्हणूनदेखील आपली जबाबदारी पार पाडतात. कोणतेही बेकायदेशीर कृत्य घडू नये यासाठी तैनात जवान सर्व शेतकर्‍यांची झडती घेऊनच त्यांना पुढे शेतावर सोडत असतात. या ठिकाणी असणार्‍या कुंपणापुढे दोनशे ते अडीचशे मीटरवर अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी आहेत. त्यामुळे त्यांची झडती घेऊन त्यांच्याबरोबरच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेत आणि कोणत्याही प्रकारची तस्करी होऊ नये, यासाठी सुरक्षा गार्डदेखील पुढे जातात. आज आपले सीमा सुरक्षा दलाचे जवान सोबत येत असल्यामुळे कोणतीही चिंता आणि भीतीविना आपण या ठिकाणी शेती करत असल्याचेही शेतकर्‍यांकडून ऐकायला मिळाले. आज देशाच्या सर्वच सीमांवर सतर्क राहावे लागत असून दिवसेंदिवस आव्हानांची तीव्रताही वाढते आहे. त्यामुळे सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्याबरोबरच अमली पदार्थांची होणारी तस्करी रोखणे हेदेखील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसमोर मोठे आव्हान आहे आणि ते त्यांनी अगदी लीलया पेलले आहे. शत्रू एवढाच जवानांचा सामना हा निसर्गाशीही असतो. निसर्ग कोणत्या वेळी कोणते रुप धारण करेल, याची शाश्वती नाहीच. त्यामुळे प्रत्येक जवानाचा पहिला सामना हा निसर्गाशी आणि नंतर अन्य शत्रूंशी... तेव्हा, कर्तव्य आणि देशसेवेतच धन्यता मानणारे असे हे ‘बीएसएफ’चे जवान...
 
अगदी याच ठिकाणी थोड्या अंतरावर हा सीमावर्ती भाग अगदी एकमेकांपासून वेगळा असल्याचे जाणवत जाते. याच सीमावर्ती भागामध्ये पूरपरिस्थितीही उद्भवते. त्यामुळे दैनंदिन गस्तही अगदी कठीण होऊन जाते. जवान अगदी गुडघ्यापर्यंत असलेले रबर बुट्‌स घालून २४ तास गस्त घालतात. भाक्रा-नांगल धरणातून पाणी सोडले जाते, त्यावेळी या क्षेत्रामध्ये तब्बल पाच-पाच फुटांपर्यंत पाण्याची पातळी वाढते. तरीही जवान सीमेच्या संरक्षणासाठी पाय रोवून उभे असतात.
 

 
‘बीएसएफ’चा ‘रण’ संग्राम पंजाबच्या उत्तरी सीमेकडून दक्षिणेतेला सीमावर्ती प्रदेश हाही तितकाच आव्हानांनी भरलेला. दूरदूरपर्यंत केवळ कोरडेठाक शुष्क वाळवंट... वर्षातील बहुतांश महिने खार्‍या पाण्याने वेढलेल्या या जमिनीचेही ‘बीएसएफ’चे जवान रक्षण करतात. हा प्रदेश म्हणजे कच्छचे रण. कच्छचे रण हे जगातील सर्वात मोठ्या खार्‍या वाळवंटांपैकी एक मानले जाते. या ठिकाणी असलेला ’पिलर ११७५’ हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये असलेला अखेरचा पिलर आहे. यापुढे अरबी समुद्रात जाऊन मिळणार्‍या काही खाड्या आणि जलप्रवाहही दिसून येतात. भारताच्या गुजरात आणि पाकिस्तानातील सिंध प्रांताला वेगळे करणारी जवळपास ९६ किलोमीटर लांबीची सर खाडीही दिसते. सर खाडी ही दोन्ही देशांमधील विवादीत खाडी मानली जाते. इथे समुद्र वरचेवर शांत दिसत असला तरी मोठ्या प्रमाणात उसळणार्‍या लाटा कोणत्याही मोहिमेमध्ये बाधा आणू शकतात. समुद्री सीमेच्या रक्षणासाठी ‘बीएसएफ’ची स्वत:ची एक ‘वॉटर विंग’ आहे. समुद्राच्या आणि नद्यांच्या संरक्षणासाठी ‘फास्ट अटॅक क्राफ्ट्‌स’मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज म्हणजे ‘अल्ट्रा मॉडर्न कम्युनिकेशन सिस्टिम्स’चा वापर करण्यात येतो. या नौकेचा दिवसरात्र कोणत्याही क्षणी वापर करता येणे शक्य आहे. यामध्ये असलेल्या रडार, जीपीएस आणि इको साऊंडर प्रणालीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान शत्रूवर नजर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेले नवे नकाशे आणि मार्ग जवान अंकीत करून ठेवतात. याचा वापर करून आवश्यक त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी पोहोचणे सोपे जाते. याच खाडीपासून काही अंतरावर ’सावला पीर’ नावाची एक ‘बीएसएफ’ची एक आऊटपोस्ट आहे. ही पोस्ट अनेक किलोमीटरच्या परिसरातील एक ‘हायेस्ट पॉईंट’ मानली जाते. या ठिकाणी गस्त घालताना सापांपासून असलेला धोका पाहता, जवान हाय बुट्‌स आणि अँकलेट्स घालून गस्त घालताना दिसतात. पाकिस्तानच्या कुरापतखोर कारवाया पाहता, या ठिकाणाला सैनिकी डावपेचांच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे. तसेच खाडीजवळ असलेल्या दलदलीच्या जमिनीवर दिवसातून दोन वेळा येणार्‍या भरतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. याचा सामना करण्यासाठी जवानांमध्ये विशेष कौशल्याची गरज असते. त्यासाठी तैनात असलेले ‘क्रिक क्रोकोडाईल कमांडोज’ या परिस्थितीशी जुळवून घेच आपले कर्तव्य अतिशय चोखपणे पार पाडताना दिसतात. पाकिस्तानच्या अनेक ताब्यात घेतलेल्या नौकाही इथे दिसतात. त्यावरून हे ठिकाण किती संवेदनशील आहे, याचा अंदाज येईल. त्यामुळे या ठिकाणची प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि आव्हाने तैनात जवानांची जणू परीक्षाच घेत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
 
 
हिमालयाचे संरक्षक
 
जशी जमीन बदलते तशी आव्हानेही बदलत जातात असे म्हणतात. अगदी तशीच परिस्थिती जम्मू-काश्मीर, राजस्थान, गुजरात आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घुसखोरीबरोबरच प्रामुख्याने होणार्‍या निरनिराळ्या प्रकारच्या तस्करींवरही अंकुश ठेवावा सागतो. हिमाच्छादित प्रदेशात अनेक जवानांना ‘हाय अल्टिट्यूड बॉर्डर’वर म्हणजेच ‘लाईन ऑफ कंट्रोल’वर आपले कर्तव्य बजावावे लागते. या ठिकाणी असलेला कमी ऑक्सिजनचा पुरवठा जवानांच्या जिवासाठी अतिशय धोकादायकही ठरू शकतो. त्यामुळे शत्रूशी लढण्यापूर्वी जवानांना आपले शरीर या वातावरणाशी समायोजित करावे लागते. समुद्रसपाटीपासून १३ हजार फुटांपेक्षाही उंचीवर असलेली ही जागा म्हणजे काश्मीरमधील पीर पंजाल पर्वताचा दक्षिणेचा प्रदेश, जो ’फॉरवर्ड डिफेंडेड लोकॅलिटी’ म्हणून ओळखला जातो. जम्मू-काश्मीरमध्ये ‘एलओसी’ म्हणजेच ‘लाईन ऑफ कंट्रोल’ भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील एक ‘मिलिटरी फ्रंटलाईन’ आहे. ‘लाईन ऑफ कंट्रोल’ दोन्ही देशांमधील ‘डिवाईडिंग लाईन’चे कामकरते. मात्र, यावरही आज अनेक विवाद आहेत. दोन्ही देशांपैकी कोणताही देश या सीमेला आंतरराष्ट्रीय सीमा मानत नाही. भारतीय सैन्यदलाच्या ‘ऑपरेशनल कंट्रोल’अंतर्गत ‘एलओसी’च्या काही भागांच्या संरक्षणाची जबाबदारी ‘बीएसएफ’च्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. बर्फाने आच्छादित ‘फ्रंटलाईन’वर कार्यरत जवानांची घरे म्हणजे बर्फामध्ये अर्धे दबलेले बंकर्स... या ठिकाणी छोट्या तारांनी गुंफलेल्या वायर्सच्या कुंपणाची दोन्ही देशांना विभागणारी सीमा. या सीमेपासून काही मोजक्याच अंतरावर पाकिस्तानी पोस्टही आपण पाहू शकतो.
 

 
अशा या सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती सावधानता. कारण, एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. म्हणून या ठिकाणी तैनात जवान देखरेखीमध्ये कोणत्याही प्रकारची कसूर होणार नाही, यासाठी दक्ष असतात. देशबांधवांना अगदी कोणत्याही काळजीविना दिवाळी साजरी करता यावी यासाठी ‘बीएसएफ’चे जवान अगदी सणासुदीच्या काळातही आपल्या सीमांचे आणि देशवासीयांचे अहोरात्र संरक्षण करतात. त्यांची दसरा, दिवाळी, ईद सीमेवरच... ‘‘आपल्या देशवासीयांनी कोणतीही भीती न बाळगता सण साजरे करावे, त्यापेक्षा कोणतीही मौल्यवान भेट आमच्यासाठी नाही. देशवासीय अगदी सुरक्षित वातावरणात आमच्यावर विश्वास ठेवून कोणत्याही ठिकाणी वावरू शकतात आणि सण मोठ्या आनंदाने साजरा करू शकतात. त्यामुळे देशवासीयांचा आमच्यावर असलेला विश्वास हीच आमच्यासाठी सर्वात मोठी भेट आहे,’’ असे ‘बीएसएफ’चे जवान मोठ्या उत्साहाने सांगतात. मात्र, एकीकडे देश दिवाळीसारखा सण साजरा करत असतो आणि दुसरीकडे हाच काळ आपल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसाठीही आव्हानांनी भरलेला आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा असतो. याचवेळी सीमा भागांमधून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्याची शक्यताही असते. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था अतिशय चोख ठेवावी लागते. याचाच विचार करून या ठिकाणी निरनिराळ्या ‘कोम्बिंग टिम्स’ तयार करण्यात येतात. आपल्या प्लाटून कमांडरने दिलेल्या आदेशानुसार या तुकड्या घुसखोरी रोखण्यासाठी पुढे निघतात. या ठिकाणी असलेला बर्फ आपल्या डोळ्यांना अगदी सपाट आणि साध्या जमिनीसारखा वाटतो खरा पण परिस्थिती अगदी याउलट असते. या ठिकाणी असलेला बर्फ जवानांसाठी कर्दनकाळही ठरू शखतो. तसेच त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा सामना करणेदेखील कठीण होऊन बसते. एक छोटी चूकही मोठे संकट बनून समोर उभे राहू शकते. त्यामुळे या ठिकाणी अनावधानानेही चूक करायला वाव शून्य. याचाच विचार करून गस्त घालत असतानाही जवानांना आपले प्रत्येक पाऊल अगदी काळजीपूर्वक टाकावे लागते. घुसखोरांना रोखण्यासाठी जवानांना अगदी कडेकपारीत प्रत्येक जागेची कसून तपासणी करावी लागते. भारतीय सीमा ही स्वातंत्र्यापासून नेहमीच धगधगती राहिली आहे. घुसखोरी, गोळीबार, शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि त्यामुळे सीमेनजीकच्या निष्पाप नागरिकांचे जीवावर घोंगावणारे मृत्यूचे सावट.... तेव्हा सीमासुरक्षेचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीतील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात दर आठवड्याला बैठक बोलावली जाते. या बैठकीमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांना सीमेवर होणार्‍या प्रत्येक बारीकसारीक हालचालींची माहिती दिली जाते. तसेच बॉर्डर पोस्टवरील प्रत्येक घटनेचा व्हिडिओ दाखवून सद्यपरिस्थितीचा आढावा सादर केला जातो. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही सीमा सुरक्षा दलाने सुरू केला आहे. सीमेवर होणार्‍या प्रत्येक हालचालीची माहिती घेण्यासाठी मुख्यालय आता सॅटेलाईट इमेजिंग तंत्राचादेखील वापर करते. जवळपास ६,५०० किलोमीटर लांबीच्या अशा आव्हानांनी भरलेल्या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आज ‘बीएसएफ’वर आहे. असाच एक आव्हानांनी भरलेला प्रदेश म्हणजे, राजस्थानमधील थार वाळवंट.
 
 
थार वाळवंट
सूर्याचे पहिले किरण पडताच अगदी सोन्याप्रमाणे चमकणारे आणि दिवसभर तळपणारेही... उष्णतेच्या झळांनी अंगाची लाहीलाही करणारा हा वाळूचा डोंगर...त्यातच साप किंवा विंचू चावण्याचाही सर्वाधिक धोका... त्यामुळे माणसांना वस्ती करण्यासाठी सर्वाधिक आव्हानात्मक अशा जगभरातील क्षेत्रांमध्ये थार वाळवंटाची गणना केली जाते. तरीही देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने थारचे वाळवंट हे अतिशय संवेदनशील क्षेत्र. या ठिकाणीही भारत आणि पाकिस्तानची सर्वाधिक सीमा जोडली जाते. इथे दूरदूरपर्यंत मानवी पाऊलखुणांचा लवलेशही दिसत नाही. अशा या ओसाड वाळवंटातही बीएसएफचे जवान भारताच्या सीमांचे संरक्षण करतात. या वाळवंटात वाळू कधीही आपले स्थान कोणत्याही दिशेला बदलते. वाळूचे गरमवारेच इथे वाहत असतात. असे हे फिरत्या वाळूचे वाळवंट जगात केवळ दोन ठिकाणी पाहायला मिळते, एक म्हणजे जगातील आणि आफ्रिकेतील सर्वात मोठे सहारा वाळवंट आणि दुसरे म्हणजे भारतातील राजस्थानचे थार वाळवंट. या वाळवंटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या तापत्या वाळूच्या काही फूट खोल लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा अंश असल्याचेही म्हटले जाते. थारचे वाळवंट याच कारणामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. अशा जीवार बेतणार्‍या वातावरणात प्रत्येक पाऊल अगदी काळजीपूर्वक टाकावे लागते. या ठिकाणी या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांव्यतिरिक्त कोणत्याही मानवी जीवनाच्या पाऊलखुणा शोधूनही सापडणार नाहीत. थारच्या सीमेवरील लोखंडी तारांकडे पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे समोरची सीमा ही बेभरवशाच्या पाकिस्तानची आहे, तेव्हा सतर्क राहा, असे कदाचित आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या या तारा सांगत असाव्या. १९६५ साली झालेल्या भारत-पाक युद्धानंतर जेव्हा दोन्ही देशांमध्ये पश्चिमी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित केली गेली, तेव्हापासून पाकिस्तानने या क्षेत्राला आपला निशाणा बनवला आहे. पाकिस्तानकडून अनेकदा या क्षेत्रात नापाक कारवाया केल्या जातात. घुसखोरांना या मार्गाने भारतीय सीमेमध्ये घुसवण्याचे पाकने अनेक फोल प्रयत्नदेखील केले, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
 

 
आज थारमधील ज्या ठिकाणी सीमा सुरक्षा दलाचे जवान कर्तव्य बजावत आहेत, त्या ठिकाणी पाण्यालाही सोन्यापेक्षा जास्त भाव आहे असेच म्हणावे लागेल. खरी पाण्याची किंमत या जवानांना चांगलीच ठाऊक आहे. या ठिकाणी सीमेवर तैनात प्रत्येक जवानाला आपल्याबरोबर फक्त चार ते पाच लिटर पाणी घेऊन जावे लागते.
 
थारमधील वाळू सातत्याने आपली जागा बदलत असल्यामुळे अनेकदा दोन्ही देशांना विभागणारी सीमादेखील या वाळूमध्ये दिसेनाशी होते. त्यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवल्यास आपली सीमा निर्देशित करण्यासाठी लोखंडाचे मोठे दांडे उभारले आहेत.
 
 
मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेही आपल्या पश्चिमी क्षेत्रांमध्ये सुरक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. थारच्या वाळवंटात उभारलेल्या लोखंडी सळ्या जेव्हा वाळवंटाखाली पूर्णपणे दबून जातात, त्यावेळी ‘बीएसएफ’च्या जवानांना अधिक दक्ष राहून सीमांचे संरक्षण करावे लागते. तेव्हा, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाटी बीएसएफने एक पर्यायी व्यवस्था उभारली आहे. थंडीच्या मोसमात थारची वाळू फार कमी वेगाने आपली जागा बदलते. मात्र, उन्हाळ्यात एकेका रात्रीत वाळूचे ढिगच्या ढिग गायब झाल्याचे अनुभव जवान सांगतात. अनेकदा हे अवाढव्य वाळूचे ढिग जवानांच्या चौक्यांनादेखील झाकून टाकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत जवानांना चौक्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागते. या परिसराला सीमा सुरक्षा दलाने ‘राजस्थान फ्रंटियर’ असे नाव दिले आहे. यामध्ये बिकानेर, जोधपूर, जैसलमेर आणि बारमेर सेक्टर्सचा समावेश होतो. राजस्थानमध्येच जवळपास १,२०० किलोमीटर लांबीची भारत-पाकिस्तान सीमा आहे. या ठिकाणची सीमा ‘नोटीफाईड क्षेत्र’ म्हणून ओळखली जाते. याचाच अर्थ सीमा सुरक्षा दलाच्या परवानगीशिवाय या क्षेत्रात कोणीही ये-जा करू शकत नाही. रात्रीच्या अंधारातही ‘बीएसएफ’चे जवान सीमेच्या संरक्षणासाठी तत्पर असतात. इथे जसजशी रात्र वाढत जाते, तशी गस्तही वाढत जाते. उंटावर तैनात तुकडी या सीमेच्या संरक्षणात कोणतीही उणीव ठेवत नाही. उंटांचा वापर करून सीमांचे संरक्षण करणारी ‘बीएसएफ’ ही जगातील पहिली आणि एकमात्र संरक्षण यंत्रणा आहे. रात्रीच्या वेळीही आपली सीमा अगदी स्पष्ट दिसावी यासाठी सीमेवर ‘बीएसएफ’कडून प्रकाशाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. वेळोवेळी सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकाशयंत्रणेची पाहणीदेखील करतात. थारच्या अतिशुष्क वाळवंटात पाण्याच्या दुर्भिक्ष्याबरोबरच दुसरी सर्वात मोठी समस्या आहे, ती बदलत्या तापमानाची. इथे थंडीच्या मोसमात तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरतो, तर कडक उन्हाळ्यात हेच तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंतचा उच्चांक गाठते. त्यामुळे या दोन्ही परस्परविरोधी तापमानासाठी जवानांना स्वतःला सक्षमठेवावे लागते.अशा या बिकट परिस्थितीत वाळवंटामध्ये जिवंत राहण्याचे आव्हानही ‘बीएसएफ’च्या जवानांना पेलावे लागते. त्यामुळे वाळवंटातील कोणते फळ किंवा कोणत्या वनस्पती खाऊन आपण जगू शकतो, याचीही माहिती या जवानांना प्रशिक्षणादरम्यान दिली जाते. वाळवंटामध्ये पायी गस्त घालणे तितकेसे शक्य नसल्यामुळे ‘बीएसएफ’मध्ये आधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या वाहनांच्या मदतीने वाळूच्या प्रत्येक डोंगरावर वेगाने गस्त घालता येणे शक्य झाले आहे. थार वाळवंटाच्या अगदी मध्यावर आहे हिरवळीने नटलेले मरुद्यान. या परिसरात एकेकाळी सरस्वती नदी प्रवाही असल्याच्या कथा आजही ऐकायला मिळतात. पौराणिक ग्रंथांमध्येही सरस्वती नदीचा उल्लेख आढळतोे. शंभर-दोनशे वर्षांपूर्वीचे अनेक हिरवेगार वृक्ष आजही इथे तग धरुन उभे आहेत. या मरुद्यानानजीकच्या गावात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीची तपासणी ‘बीएसएफ’कडून केली जाते. वेळोवेळी गावकर्‍यांना पाणी देण्यापासून सर्व प्रकारची मदत करण्यापर्यंत ‘बीएसएफ’चे जवान सदैव तत्पर असतात. त्यामुळे गावकर्‍यांच्या संरक्षणाची जबाबादारीही सीमा सुरक्षा दलाचे जवान उत्तमरित्या पार पाडतात.
 
 
त्याचबरोबर जवानांना उंच प्रदेशातील पोस्ट वरदेखील तैनात केले जाते. या ठिकाणी त्यांना लागणारे सामान पोहोचविण्याची व्यवस्था देखील केली जाते. काम संपल्यानंतर थोडा विसावा म्हणून याच पोस्टच्या खाली त्यांच्यासाठी आराम करण्याची देखील सोय करण्यात आली आहे. कामसंपल्यानंतर जवानांना या तणावपूर्ण वातावरणातून थोडी सूट मिळावी म्हणून या ठिकाणी क्रीडास्पर्धांचेदेखील आयोजन केले जाते. जवानांचे दोन वेगवेगळे संघ करून कबड्डीचे सामनादेखील खेळवले जातात. इथे जवानांची राहण्याची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकदा त्वरित तैनात होण्याचे आदेश मिळताच जवान एकमेकांचे गणवेश घालून देखील मैदानात धाव घेतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेल्या बंधुत्वाचे नातेही यानिमित्ताने दृढ होते. कोणत्याही जवानाच्या मनात आपण कोणत्या प्रदेशाचे, आपली भाषा कोणती, धर्म कोणता असे प्रश्न कधीच पडत नाही. कारण, सीमेवर तैनात प्रत्येक जवान हा प्रथमभारतीय असतो आणि त्यांच्या मनात एकमेकांविषयी आदर, बंधुभाव आणि प्रेमयाच भावना असतात. वातावरण गरमअसो वा थंड, कोणत्याही परिस्थितीसा आज हे जवान आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात.
 
 
बांगलादेशच्या सीमेवरील घुसखोरीचे आव्हान
भारताच्या पूर्वेकडे असलेला आणि १९७१ पासून पाकिस्तानपासून विभक्त झालेला बांगलादेश. भारताचे मित्रराष्ट्र असले तरी बांगलादेशच्या सीमेवरील आव्हाने उत्तरी सीमांपेक्षा वेगळी आहेत. यामध्ये प्रमुख आव्हान म्हणजे गाईगुरांची होणारी तस्करी. आज भारत-बांगलादेशची सीमा जवळपास चार हजार किलोमीटर लांबीची आहे. यालाच ’रेड क्लिफ लाईन’देखील म्हणतात. त्रिपुरा म्हणजेच भारतातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात छोटे राज्य. त्रिपुरा आणि बांगलादेशची सीमा तीन ठिकाणी एकत्र येते. काही ठिकाणी जास्त लोकसंख्या असलेली गावेदेखील आंतरराष्ट्रीय सीमेच्या अगदी जवळ वसलेली आहेत. या ठिकाणी असलेला ‘२०३३’ क्रमांकाचा पिलर हा एका घराच्या अगदी मध्यभागी येतो. येथे राहणार्‍या कुटुंबातील काही व्यक्ती या बांगलादेशचे नागरिक, तर काही भारताचे नागरिक असल्याचा अनोखा किस्सा पाहायला मिळतो. या सीमेची देखरेख करणे हे जवानांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. कारण, आजही या ठिकाणी राहणारी अनेक मोठी कुटुंबे अर्धी बांगलादेशच्या हद्दीत, तर अर्धी भारताच्या हद्दीत येतात. मात्र, लोकांपेक्षा दूर त्रिपुरातील लो हिल्सवर गस्त घालणे हे जवानांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरते. या ठिकाणी असलेल्या डासांपासून संरक्षण करण्यासाठी गस्त घालताना जवानांना मॉस्किटो नेट फेस मास्क घालून गस्त घालावी लागते. येथे सर्वात घातक मलेरिया पॅरासाईट प्लासमोडिअम, फेल्सिपिरमयांसारखे आजारांचा प्रादुर्भाव आढळतो. येथे या आजारावरील उपचारासाठीही कोणत्याही प्रकारची सोय नसल्यामुळे जवानांना आपले संरक्षण करत देशाचे संरक्षण करावे लागते. अशा दुर्गमठिकाणी वैद्यकीय सुविधांच्या अभावी जवानाला आपले प्राणही गमवावे लागू शकतात, तर त्रिपुराच्या उत्तर पश्चिमेला असलेल्या पश्चिम बंगालमध्येही तैनात असलेल्या जवानांना वेगळ्या आव्हांनाचा सामना करावा लागतो. कारण, या ठिकाणी गस्त घालताना ‘बीएसएफ’च्या जवानांकडून ‘थर्मल इमेजर’चा वापर केला जातो. याच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेत होणारी तस्करी रोखण्यास मदत मिळते.
 

 
भारत आणि बांगलादेशमध्ये जवळपास एक चतुर्थांश सीमेवर कुंपण नसल्यामुळे या ठिकाणी गाईंची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. प्राप्त आकड्यांनुसार, केवळ २०१४ साली लाखो डॉलर किमतीच्या गाईगुरांची तस्करी या सीमेतून करण्यात आली होती. मात्र, ‘बीएसएफ’ने वाढवलेल्या गस्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ‘बीएसएफ’चे खास ‘वॉर विंग’ बंगालच्या उपसागराच्या आसपासच्या परिसरावर देखरेख ठेवण्याचे कामकरते. या ठिकाणी जवळपास १० हजार चौरस किलोमीटरमध्ये सुंदरबनचा परिसर पसरलेला आहे. सुंदरबनचा अर्धा भूप्रदेश हा भारतात आणि उर्वरित बांगलादेशमध्ये. या परिसरात अनेक ठिकाणी छोटी छोटी बेटं आणि दलदलीदेखील आहेत. त्यामुळे अनेक विषारी आणि वन्यजीवांचा अधिवासदेखील या जैवविविधता संपन्न क्षेत्रात आढळतो. ‘दुर्गा’ नावाच्या आऊटपोस्टमधून सुंदरबनच्या प्रदेशावर देखरेख ठेवली जाते. संरक्षणासाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या प्रत्येक नौकेवर इको साऊंडर, सॅटेलाईट नेविगेशन इक्विपमेंट्स देण्यात आल्या आहेत. ‘दुर्गा’ या आऊटपोस्ट नौकेवर ‘बीएसएफ’चे ३० जवान कार्यरत असतात. तसेच चार जलदगतीच्या गस्त नौकांद्वारे या ठिकाणी तस्करी किंवा घुसखोरी रोखण्यासाठी ‘बीएसएफ’चे जवान सज्ज असतात. या जलदगती नौका ‘फ्लोटिंग चेक पॉईंट्स’ म्हणून कामपाहतात. दूरस्थ क्षेत्रातील नागरिकांमध्ये आपल्याबद्दल विश्वासाचे नाते निर्माण करण्याचेही महत्त्वाचे काम‘बीएसएफ’च्याच खांद्यावर आहे. आज या दूरस्थ प्रदेशांमध्ये रुग्णालये किंवा दवाखान्यांसारख्या मूलभूत सुविधादेखील उपलब्ध नाहीत. याचीच दखल घेत ‘बीएसएफ’कडून अशा भागांमध्ये औषधोपचार पुरवले जातात. ‘बीएसएफ’चे डॉक्टर्स फिरत्या रुग्णालयांद्वारे या भागाचा दौरा करून रुग्णांची काळजी घेत असतात. भारत-पाकिस्तान सीमेप्रमाणेच भारत आणि बांगलादेश दरम्यानही एक रेल्वेलाईन आहे. भारत आणि बांगलादेशचे जवान अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात या सीमेचे रक्षण करताना दिसतात. या ठिकाणी होणार्‍या फ्लॅग मिटिंगद्वारे लहानमोठ्या प्रकरणांचा योग्य वेळेतच छडा लावण्याचे कामदोन्ही देशांच्या जवानांमार्फत केले जाते.
 

 
‘बीएसएफ’ ही आज केवळ देशाच्या सीमांवरच नव्हे, तर देशांतर्गत शांती प्रस्थापित करण्याचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहे. ‘बीएसएफ’ची स्थापना शांतता काळात देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी करण्यात आली होती. मात्र, देशांतर्गत होणार्‍या कारवाया रोखण्याची जबाबदारीही आज ‘बीएसएफ’वर सोपविण्यात आली आहे. आज देशासमोर असलेल्या सुरक्षेच्या आव्हानांशीदेखील हे जवान दोन हात करत आहेत. मध्य भारताच्या जंगलातील नक्षली कारवायांचा सामना करण्यासाठीदेखील ‘बीएसएफ’च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ‘बीएसएफ’च्या कार्यतत्परतेमुळे, प्रसंगावधानी वृत्तीमुळे नक्षलवादी कारवायांना रोखण्याचे अतिशय महत्त्वाचे कामत्यांच्यावर सोपविण्यात आले आहे. आपण स्वत: नक्षलवाद्यांचे ’लक्ष्य’ बनू नये यासाठी जवान अगदी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकतात. अनेकदा या ठिकाणी नक्षलवाद्यांकडून जवानांवर हल्ला करण्यासाठी जमिनीमध्ये आयईडीसारख्या स्फोटकांचा वापर केला जातो. त्यामुळे जवानांना अधिक काळजी घ्यावी लागते. तरीही नक्षलवादी कारवायांमध्ये अनेकदा जवानांना आपले प्राणदेखील गमवावे लागतात. आज ‘बीएसएफ’च्या जवानांना त्यांच्या शौर्याबद्दल देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘बीएसएफ’चे जवान आपल्या ’आजीवन कर्तव्य’ या ब्रीदवाक्याप्रमाणेच आज देशसेवा बजावत आहेत. देशाच्या सीमांचे संरक्षण करणे सोपे नाही. यासाठी खडतर मेहनत आणि प्रशिक्षणातून जावे लागते. कठीण प्रशिक्षण आणि ‘अंतिमपग ’ या रेषेपुढे पाऊल ठेवणे ही प्रत्येक सामान्य व्यक्तीपासून देशसेवेसाठी आपले जीवन अर्पण करणार्‍या जवानासाठी आनंदाची बाब असते. आपल्या कुटुंबाकडून पहिल्यांदाच आपल्या खांद्यावर आपले ‘रँक’ लावून घेण्यासारखे भावूक क्षण याचवेळी या जवानांच्या आयुष्यात येतात. भारताच्या सीमेचे रक्षण करणारे, शांतीकाळात देशाच्या पोलिसांच्या स्वरूपात भूमिका बजावणारे आणि युद्धजन्य परिस्थितीत लढवय्या सैनिक म्हणून कर्तव्य बजावणार्‍या या जवानांना एक मानाचा सलाम...
 
मी जवानांना दिल्या जाणार्‍या हत्यारांचा सन्मान करेन...
माझ्या सहकारी जवानाला एकटं सोडणार नाही...
मी एकटा असेन किंवा अनेकांसोबत...
मी त्या प्रत्येक गोष्टीचे रक्षण करेन, जी देशासाठी पवित्र मानली जाते. 
 
 
 
‘बीएसएफ’ची व्याप्ती
‘बीएसएफ’ अर्थात सीमा सुरक्षा दलाची स्थापना १ डिसेंबर १९६५ साली करण्यात आली. शांततापूर्ण काळात देशाच्या सीमांचे संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय कारवायांना रोखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ‘बीएसएफ’वर सोपविण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत होणार्‍या कारवायांना प्रतिबंध करून देशांतर्गत शांती प्रस्थापित करण्याचे काम‘बीएसएफ’ करत आहेत. सध्या बीएसएफमध्ये १८८ बटालियन आहेत. सीमा सुरक्षा दल हे जगातील सर्वात मोठे सीमा संरक्षण दल आहे. आज देशातील हिमाच्छादित प्रदेश असो, वाळवंट असो, जंगल असो किंवा नद्या असो प्रत्येक ठिकाणी सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. सीमावर्ती भागात राहणार्‍या नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना आज ‘बीएसएफ’चे जवान निर्माण करत आहेत.
 
 
‘बीएसएफ’कडील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे
आज ‘बीएसएफ’कडे आयओएफ ३२ रिव्हॉल्वर (६ शॉट गन्स), ९ एमएमपिस्तुल्स, हॅक्लर अँड कोच एमपी ५ ए ३, हॅक्लर अँड कोच के, बेरीटा एमएक्स ४ स्टॉर्म मशीन गन्स, रायफल्स, डिएमआर, स्नायपर रायफल्स, ऑटोमॅडिक ग्रेनेड लॉन्चर्स, ८१ एमएम, ५१ एमएम, १२० एमएममॉर्टर, १०५ एमएमइंडियन फिल्ड गन्स आणि याव्यतिरिक्त अत्याधुनिक यंत्रणा आहेत.
 
 
‘बीएसएफ एअर विंग’
‘बीएसएफ’च्या एअर विंगमध्ये सध्या हॉकर सिड्ली एचएस ७४८, बीचक्राफ्ट सुपर किंग एअर, एम्बरर १३५, हॅल ध्रुव हेलिक़ॉप्टर, एमआय १७ सारखी हेलिकॉप्टर्स सेवेत रूजू आहेत.
 
 
‘एलिट कमांडो फोर्स’
’क्रिक क्रोकोडाईल कमांडो फोर्स’ ही ‘बीएसएफ’ची ‘एलिट कमांडो फोर्स’ आहे. प्रामुख्याने ‘एलिट कमांडो फोर्स’ कच्छच्या रणामध्ये कार्यरत आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवर समुद्र किंवा खाडीच्या मार्गाने भारतीय हद्दीत घुसघोरी करणार्‍यांना प्रतिबंध करण्यासाठी‘बीएसएफ’ने पहिले कमांडो युनिट ‘क्रिक क्रोकोडाईल्स’ तयार केले आहे. 
 
जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121