रॅगिंगची बदलती व्याख्या

    12-Oct-2017
Total Views | 10


कॉलेज कॅम्पस, कँटीनच्या कट्‌ट्‌‌‌यावर रमलेली गप्पांची मैफिल, लेक्सर्चला जाण्याची घाई, परीक्षा जवळ आली की लायब्ररीमध्ये जाऊन नोट्‌स काढायच्या, एकमेकांना नोट्‌सची देवाणघेवाण... महाविद्यालयात रंगणार्‍या स्पर्धेसाठी रात्री उशिरापर्यंत केलेली तालीम... हे सगळं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं की मनाच्या एका कोपर्‍यामध्ये साचून ठेवलेल्या महाविद्यालयीन जीवनाच्या अनेक कडू-गोड, आठवणी ताज्या होतात. महाविद्यालयात पहिल्यांदा पाऊल टाकताना एक उत्सुकता, हुरहूर असते. मग अशा वेळेस या वातावरणामध्ये मुरलेले काही विद्यार्थी महाविद्यालयात नव्याने प्रवेश केलेल्यांची मनातील भीती दूर करण्यासाठी थोडी मज्जा-मस्ती करतात. त्याला ’रॅगिंग’ असे म्हणतात. हे रॅगिंग करण्यामागचा मूळ हेतू, उद्देश पूूर्वी तरी चांगला असायचा. कॉलेजमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे, नवीन विद्यार्थ्यांच्या ओळखी व्हाव्यात. त्यांनी कॉलेजच्या नव्या विश्वामध्ये रमावं. मग त्यासाठी नवनवीन फंडे वापरले जायचे. मग उगाच त्या विद्यार्थ्यांना खोटे निरोप दे, उगाच टिंगलटवाळी कर, पुस्तके लपवायची. अर्थात हे सगळं करण्यामागचा हेतू हा केवळ धम्माल करणे हा होता, परंतु गेल्या काही वर्षांपासून रॅगिंगचे स्वरूप पूर्णतः बदलून गेले आहे. यासंदर्भातल्या अनेक बातम्या वर्षभर झळकत असतात. नुकतीच अशी एक घटना मुंबईमध्ये घडली. मध्य मुंबईतील एका आर्किटेक्चर महाविद्यालयामध्ये रॅगिंग प्रकरणात पोलीस कसून चौकशी करत आहेत. मात्र, या प्रकरणातील आरोपी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने परीक्षेनंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकणारी २० वर्षीय पीडित तरुणी रॅगिंगला बळी पडली. रॅगिंगच्या नावाखाली हे विद्यार्थी वेळोवेळी पीडित मुलीचा फोटो आणि तिच्यासोबत केलेल्या रॅगिंगच्या क्लिप सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी करत होते. या प्रकारांमुळे पीडित तरुणी मानसिक तणावाखाली आल्याने तिने महाविद्यालयात जाणे सोडून दिले.आपल्या मुलीच्या वागण्या-बोलण्यामध्ये झालेला बदल तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेतले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पण, या तरुणीच्या बाबतीत झालेला प्रकार उघडकीस आला असला तरी तो रॅगिंगला बळी पडलेल्यांच्या प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही.

 

 

आवाज उठवा...!

काही महाविद्यालयांमध्ये रॅगिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते. यातून काहींचे मानसिक संतुलन बिघडते, तर काही चक्क आपले आयुष्य संपवून टाकतात. केवळ मज्जा-मस्ती करण्यासाठी केले जाणारे रॅगिंग विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकत आहे. गेल्या काही वर्षांपासून रॅगिंगमुळे होणार्‍या गैरप्रकारांमध्ये वाढ झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक विद्यापीठात ‘ऍन्टी रॅगिंग मॉनिटरी सेल‘स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, विद्यापीठाने १८ ऑगस्ट २००९ मध्ये विद्यार्थी कल्याण संचालकांच्या देखरेखीखाली ’ऍन्टी रॅगिंग मॉनिटरी सेल‘ची स्थापना केली आहे. या सेलद्वारे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांना अनेकवेळा पत्र पाठवून रॅगिंगविरोधात थेट तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी विद्यार्थ्यांना गुप्तपणे तक्रार करण्याची मुभाही देण्यात आली. परंतु, दुर्देवाची बाब म्हणजे ३० टक्के विद्यार्थी त्याला प्रतिसाद देत असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये उघडकीस आले होते. विद्यार्थ्यांचे कॉलेजमध्ये रॅगिंग कितीही होत असले तरी ते प्रकरण बाहेर आले की मग कॉलेजमधून असे प्रकार झालेच नसल्याचा दावा केला जातो. कारण अशा या प्रकारांमुळे त्या महाविद्यालयांचे, संस्थेचे नाव खराब होत असते. आज राज्यात नावाजलेल्या महाविद्यालयांपासून थेट अधिकृत नसलेल्या महाविद्यालयांमध्ये असे रॅगिंगचे प्रकार घडत असतात.परंतु हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी कमी प्रकरणे उजेडात येतात. या प्रकरणाला बळी पडलेल्या पीडितांना न्याय मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर अनेक प्रकरणांमध्ये केवळ समाजात नाव खराब होण्याच्या भीतीपोटी सगळं काही निमूटपणे सहन करणार्‍यांची संख्या जास्त आहे. आज महाविद्यालयात रॅगिंग करणारे काही विद्यार्थी सुखवस्तू कुटुंबातील असल्याने त्यांना कायदा, शिक्षा या सर्व गोष्टी अगदी किरकोळ वाटतात. ते कायद्यापुढे झुकत नाहीत आणि अशा घटनांच्या चौकशी मधून कितीही प्रकरणे बाहेर पडली तरी त्यांचे पुरावे गोळा करण्याचे कामफार अवघड असते. रॅगिंग ही समाजातील विकृती असून तिच्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होत असल्यामुळे यावर वेळीच नियंत्रण येणे तितकेच गरजेचे आहे.

 

- सोनाली रासकर

अग्रलेख
जरुर वाचा
पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!

पाहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,"जग मागतंय सिंदूर... चितेच्या राखेतून!''

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121