एक निळी ताडपत्री. त्यावर विखुरलेले पाषाणाचे ५६ तुकडे. काही छोटे. काही मोठे. त्यातच दिसणारी सुबक, सुंदर शुंडा. सर्पमंडित मोठ्या पोटाचा एक भाग. भग्न कपाळावर अजूनही दिसत असलेला कुंकुमतिलक. छत्तीसगडमधील बस्तरच्या ढोलकल इथल्या दुर्गम जंगलात गेली १००० वर्षे डोंगरमाथ्यावर मोठ्या थाटाने विराजमान असलेल्या श्री गणेशमूर्तीची ही आजची परिस्थिती. हा गणपती कसा भग्न झाला? कुणी भग्न केला असे प्रश्न तुम्हाला पडले आहेत का? मीडिया म्हणतोय की ही मूर्ती 'पडून फुटली'. आता दहाव्या शतकातली ही विशाल गणेशमूर्ती. बस्तरच्या घनदाट जंगलात तेरा हजार फुटांवर एका मोठ्या खडकावर स्थापित केलेली.
गेली एक हजार वर्षे ही मूर्ती तिथे विराजमान होती, तिला कधीही काही झालं नाही. ९ व्या आणि १० व्या शतकात बस्तरमध्ये राज्य करणाऱ्या नागवंशी साम्राज्याच्या काळातली ही मूर्ती. आधुनिक काळात ती पहिल्यांदा सापडली ती १९३४ मध्ये इंग्लिश भूगर्भशास्त्रज्ञ क्रूकशँक यांना. ते तेव्हा बस्तरमध्ये बैलाडिला खाणीचे सर्वेक्षण करायला गेले होते. पुढे स्वातंत्र्यानंतर ही मूर्ती बराच काळ उपेक्षित राहिली कारण तो परिसर अत्यंत दुर्गम, घनदाट जंगलांनी वेढलेला. गेल्या काही वर्षात तिथे नक्षली आणि माओवादी दहशतवाद्यांचा सुळसुळाट झालेला होता. त्यांचं समांतर सरकारच तिथे चालू होतं त्यामुळे बाहेरच्या कुणाला बस्तरच्या त्या भागात हे लोक फिरकूच देत नसत. ही मूर्ती जणू लोकांच्या पूर्ण विस्मृतीत गेली होती.
पण २०१२ मध्ये एका स्थानिक पत्रकाराला त्या भागात ट्रेकिंग करताना ती मूर्ती परत दिसली आणि ढोलकल गणेश ह्या नावाने ह्या मूर्तीची ख्याती देशभर पसरली. छत्तीसगढ राज्याच्या पुरातत्व विभागाने रीतसर सर्वे करून त्या मूर्तीची माहिती काढली. जवळजवळ ५०० किलो वजनाची ही महाकाय मूर्ती लोकांचे श्रद्धास्थान व्हायला वेळ लागला नाही. ही मूर्ती जिथे आहे ते स्थान अत्यंत दुर्गम, घनदाट जंगलांनी वेढलेले. तीन दिवस ट्रेकिंग केल्याखेरीज तिथे पोचता येत नाही. पण ह्या मूर्तीचं आकर्षण इतकं होतं की हजारो भाविक, पर्यटक आणि इतिहासप्रेमी लोक तिथे जायला लागले. टूरिजम वाढलं. स्थानिक आदिवासींना गाईड म्हणून चांगले पैसे मिळायला लागले. जंगलात वर्दळ वाढली.
ह्या वाढत्या वर्दळीचा धोका नक्षलवाद्यांनी जाणला. जिथे गरिबी, अज्ञान, रोजगाराचा अभाव, केवळ तिथेच नक्षलवादी हिंसा रुजू शकते हे त्यांना चांगलंच माहिती होतं. त्यात नोटबंदीमुळे त्यांचं आर्थिक नुकसानही खूप झालेलं. एका बातमीनुसार नोटबंदीनंतरच्या पहिल्याच महिन्यात पाचशेहून जास्त माओवादी दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली होती. हिंसेचा, बळजबरीचा आपला धंदा बसतोय हे त्यांना कळत होतंच, त्यात ढोलकल गणेशाचं दर्शन करायला येणाऱ्या लोकांमुळे जंगलात वर्दळ वाढलेली. लपायच्या जागा कमी झालेल्या. नक्षलवादी आणि डावी चळवळ ही हिंदुद्वेषावर आधारलेली असल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा सूड ह्या गणेश मूर्तीचा विध्वंस करून घेतला.
गणपती हे अवघ्या देशाचे लाडके दैवत. त्याचा विध्वंस करणं म्हणजे हिंदूंना हिणवणं हे न कळण्याइतके माओवादी मूर्ख नाहीत. तेराव्या शतकापासून भारतावर जी इस्लामी आक्रमणे झाली त्यात अक्षरशः लाखो हिंदू देवदेवतांच्या मूर्तींचा विध्वंस केला गेला, हजारो मंदिरे जमीनदोस्त केली गेली. हिंदूंना नेस्तनाबूत करण्याचे सर्व प्रयत्न झाले. ढोलकलच्या गणेशाचा हा ठरवून केलेला विध्वंस म्हणजे त्याच हिंदुद्वेषाची पुनरावृत्ती आहे. हरियाणामध्ये कुठल्या तरी एका चर्चवर एक दगड पडला तरी महिनाभर वचावचा बोलणारी प्रसारमाध्यमे आता मात्र गप्प आहेत. एरवी रोज सोशल मीडियावर असहिष्णुतेच्या नावाने गळा काढून रडणाऱ्या पुरोगामी विचारवंतांच्या तर ही बातमी खिजगणतीत देखील नाही. फार काय, अगदी केंद्र सरकारने देखील ह्या हिंदूद्वेष्ट्या कृत्याची दखल घेतलेली नाही. माहिती आणि प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू ह्यांना चित्रपट दिग्दर्शक भन्साळीला मिळालेली एक थप्पड खटकते पण केवळ हिंदूंचाच नव्हे तर संबंध देशाचा सांस्कृतिक ठेवा असलेली ही गणेशमूर्ती उध्वस्त केल्याची घटना मात्र दखलपात्र वाटत नाही.
1/ Manhandling of Sanjay Leela Bhansali and disturbing the shooting of film is highly objectionable.
— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) January 28, 2017
2/ No one can take law into own hands. Spoke to Smt @VasundharaBJP ji and asked her to take necessary action.
— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) January 28, 2017
खंत एवढीच वाटते की तेराव्या शतकात सुरु झालेला आपल्या प्रतीकांचा विध्वंस आजही सुरूच आहे आणि आपले म्हणवणारे सत्ताधारीही त्यावर मूग गिळून गप्प आहेत.
-शेफाली वैद्य