संगीताच्या तालावर बेहोष करणारं सांबा नृत्य… आधुनिक तंत्रज्ञानानं निर्माण केलेले अद्भूत मायावी जग… विकासाच्या अतिरेकानं ओढावून घेतलेले प्रदुषणाचे दुष्परिणाम… जगभरातील २०७ देशांच्या खेळाडूंचा सळसळता उत्साह, जोष आणि यानंतर सगळ्यांना वास्तविकतेचा चटका देणारं भयाण सत्य सांगणारा जगभरातील विस्थापित खेळाडूंच्या संघाच संचलन… आनंद आणि अश्रूचा अनोखा मिलाफ असणाऱ्या रिओ ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यानं जगभरातील क्रीडा शौकिनांची दाद मिळवली. अफाट पैसा खर्च न करताही उत्तम कलाकृती सादर करता येते हे ब्राझिलनं अवघ्या जगाला दाखवून दिलं. याच रिओ नगरीत जगातील सातवं आश्चर्य म्हणून निवड झालेला ख्रिस्त द रिडमर हा येशू ख्रिस्ताचा पुतळा आहे. दोन्ही बाहू पसरलेला येशू ख्रिस्त जणू या रिओला आपल्या कवेत घेतोय इतकं हे शिल्प सुंदर आहे… अडचणींचाही विक्रम झालेल्या या ऑलिम्पिकचं इतंकं सुंदर उद्घाटन होणं म्हणजे जणू जगातील आठवं आश्चर्य ठरावं.
अवघ्या जगाला सांबा नृत्याची देण देणाऱ्या ब्राझिलनं आज आपल्यातील जिद्दीचं आणि आत्मविश्वासाचं अनोख दर्शन अवघ्या क्रीडा जगताला दिलं. असंख्य अडचणी, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, आर्थिक भ्रष्टाचार, आणि ऑलिम्पिक तयारीतील ढिसाळपणा याचा कुठलाही मागमूस या ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात नव्हता. प्रश्न संपत नसतात पण ते सोडवता येतात हे ब्राझिलनं दाखवून दिलंय. अवघं जग आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडलेलं असताना ब्राझिलनं या ऑलिम्पिकचं शिवधनुष्य उचललं. ऑलिम्पिकचं आयोजन करणारा दक्षिण अमेरिकतील ब्राझिल हा पहिला देश ठरलाय आणि याचा सार्थ अभिमान आज प्रत्येक ब्राझिलियन्सच्या चेहऱ्यावर वाचता येत होता.
ज्या देशात लाकडाचे तुकडे आणि रिकाम्या पत्र्याच्या डब्ब्यातूनही जागतिक दर्जाचे संगीत निर्माण केले जाते त्या ब्राझिलनं ऑलिम्पिक आयोजनांच उद्घाटनरुपी पहिलं शिखर सर केलंय. पुढील १५ दिवस आता कसोटीचे असणार आहेत.
जगातील सर्वाधिक श्रीमंत सुपर मॉडेल असणाऱ्या ब्राझिलच्या जिजेल बुंडचेनंन काळजाचे ठोके चुकविणारा केलला रॅम्पवॉक आणि साथीला साठीच्या दशकात रोमांसची अवघी एक पीढी घडविणारं गर्ल फ्रॉम इपनेमाचं रोमांटिक गाणं… आयुष्यात यापेक्षा सुंदर संध्याकाळ असूच शकत नाही. ब्राझिलमधील इपनेमा बीचवर सौंदर्याची खाण असणाऱ्या सुंदर युवतीवर रचलेल्या या गर्ल फ्रॉम इपनेमा गाण्यानं साठीच्या दशकांत लोकप्रियतेचे नवे उच्चांक रचलेले. या उद्घाटन सोहळयात त्या सुरांना जिजेलनं आपल्या लावण्यानं पुन्हा एकवार जिवंत केलं.
सांबा नृत्याचा तालावर अवघा सोहळा रंगत असतानाच जगातील वास्तवतेचं भानही या ऑलिम्पिकच्या निमित्तानं मिळालं. जगभरातील दहशतवादी कारवायांमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना त्यांच अस्तित्व मिळवून देण्याचा प्रयत्न विस्थापितांच्या संघाच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं केलाय. सिरिया, दक्षिण सुदान, कांगो आणि इतर देशांतील विस्थापित झालेल्या जगभरातील नागरिकांतून १० खेळाडूंचा संघ यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालाय. ऑलिम्पिकच्या ध्वजाखाली हा संघ आपल्या अस्तित्वाची लढाई लढणार आहे. जिंकण्या हरण्यापेक्षा त्यांची लढण्याची जिद्द अवघ्या जगाची उमेद वाढवणारी आहे. या दहा खेळाडूंचा या स्पर्धेत असणं हीच खरी उद्याची आशा आहे. दहशतीनं ना प्रश्न सुटतात ना मिटतात, पण शांततेतून नक्कीच मार्ग निघू शकतो हा मोलाचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. ब्राझिलचा मॅरेथॉन रनर वँडरली लिमा यांनी ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली. याच लिमाला २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिक मॅरेथॉनमध्ये आघाडीवर असताना एका अज्ञात इसमानं आडकाठी केल्यामुळे कास्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी गोल्ड हुकल्याची कुठलीही खंत न बाळगता लिमानं आपली दौड कायम ठेवली होती. लिमाच्या रुपानं खिलाडूवृत्तीची ही क्रीडा ज्योतीमय उब पुढील १५ दिवस २०७ देशांतील खेळूडंना नक्कीचं प्रेरणा देईल.