संघ बदलतोय? मुस्लिम समाज बदलतोय? कि मेरा देश बदल रहा है?

    05-Jul-2016   
Total Views |

 

गेल्या काही वर्षात म्हणजेच नेमके सांगायचे झाल्यास मोदी सरकार आल्यासापून कट्टरता या विषयाला आमच्या जीवनात केवळ महत्वच प्राप्त झालेले नसून तो जणू काही आमच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे असेच पहावयास मिळते. वेगवेगळ्या माध्यमांतून बाजूने, विरुद्ध व तटस्थपणे वेगवेळ्या बातम्या येत असतात. आपल्या स्वत:च्या वैचारिक चष्म्यातून आपण या विविध घटनांचे, खरंतर माध्यमांनी दिलेल्या बातम्यांचे आपल्याला हवे तसे अर्थ काढत असतो. हे एवढ्यावरच न थांबता आपण जसा एखाद्या बातमीचा अर्थ काढतो तसा समाजातील बहुसंख्य लोकांनी काढावा याचा काटेकोर, मुद्दामून पण तरीही निष्फळ प्रयत्न केला जातो. एखाद्या घटनेचे वेळोवेळीचे दुवे नेमके त्याचवेळी माध्यमातील सम्राटांना आठवतात. की आठवून दिले जातात?

बांग्लादेशाची राजधानी ढाका या शहरावर दहशतवादी हल्ला झाला आणि परत तर्क वितर्क सुरु झाले. दहशतवादाला धर्म असतो का नसतो यावर विविध वाद विवाद, त्यातून रमजान महिना, इफ्तार पार्टी, तीन वेळा तलाक, सर्वच मुद्दे बाहेर आले. ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल अभिनेता इरफान खान यांनी ट्विट करुन कठोर शब्दात या हल्ल्याचा विरोध केला. तसेच इस्लाम धर्माबद्दल त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक सवाल उपस्थित केला, तो म्हणजे हल्ला एका ठिकाणी होतो आणि इस्लाम सगळीकडे बदनाम होतो, इस्लाम धर्माचा मूळ अमन आणि शांती आहे, असे असताना खरा मुसलमान शांत बसून इस्लाम धर्माची बदनामी होवू देईल का आवाज उठवून सिद्ध करेल की इस्लाम म्हणजे हे नाही..?

 

Hearts bleed all over ..... #BangladeshAttack pic.twitter.com/6um1xFpY4b

लेखक सलीम खान यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून इरफान खान यांच्या पाठोपाठ इस्लाम धर्माच्या बदनामी बद्दल आपले मत नोंदवले. त्यांनी म्हटले जर ढाका येथील दहशतवादी मुस्लिम असतील तर मी मुस्लिम नाही. कारण एक खरा मुस्लिम व्यक्ति कुराण ला मानतो. आणि कुराण कुणाही निर्दोष व्यक्तिची हत्या करण्याची परवानगी देत नाही. कुराण सांगते एका निर्दोष मनुष्याची हत्या करणे म्हणजे संपूर्ण मानवतेची हत्या करणे आहे.

If they are muslims for any reason I am not.The Prophet said "killing one innocent human was equivalent to killing the humanity"

प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी देखील ढाका दहशतवादी हल्ल्यावर हल्ला बोलत ट्विट केले आहे, त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे, तुम्हाला इस्लामी दहशतवादी होण्यासाठी गरीब, अशिक्षित असणे किंवा अमेरिकी परराष्ट्र धोरणाची गरज नाही, तुम्हाला गरज आहे केवळ इस्लामची. या विधानातून दहशतवादाचा धर्म स्पष्ट होतो, का दहशतवादामुळे धर्म बदनाम झाल्याचे स्पष्ट होते? मुस्लिमांसाठी पवित्र असेलल्या रमजानच्या महिन्यात अशा प्रकारच्या निर्घृण हत्या करणे नक्कीच निषेधार्थ आहे.  परंतु मुस्लिमांची ही देखील एक बाजू आहे, हे या वलयांकित जग असलेल्या लोकांच्या विधानातून स्पष्ट झाले आहे.

 

You don't need poverty,illiteracy, frustration,America's foreign policy,Israel's conspiracy to become an Islamic terrorist. You need Islam.

काही महिन्यांपूर्वी अखलाक या मुस्लिम व्यक्तिच्या घरी बीफ (गोमांस) सापडल्यामुळे एकाएकी असहिष्णुतेचे वादळ उठले होते. त्यावेळी राज्यसभेचे माजी सदस्य आणि प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी देखील राज्यसभेत असहिष्णुते विषयी वेगळी भूमिका मांडली होती. माध्यमांनी अल्पसंख्यांक मुस्लिमांची एक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी केली आहे. आणि या प्रतिमेच्या विरुद्ध अशी या काही लोकांची विधाने आहेत. नेमकं काय होतय? मुस्लिम समाज बदलतोय की मेरा देश बदल रहा है?

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमिवर रमजान मधील इफ्तार पार्टी टाळणे शक्यच नाही. या वर्षी मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संरक्षक इन्द्रेश कुमार यांनी, “भारत एक बहुपंथीय, बहुधर्मीय आणि बहुजातीय देश आहे. परंतु आपण या कडे विविध रंगांच्या आणि सुगंधाच्या फुलांनी नटलेल्या बागेच्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. आपआपल्या धर्माचे पालन करत इतर धर्मांचा आदरही केला पाहिजे” असे मत व्यक्त केले. मन, मस्तिष्क आणि आत्म्याला शुद्ध करणारे कुठलेही साबण जगात नाही असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानातून समाजाची सद्य स्थिती लक्षात येते. तसेच तिहेरी तलाक या संकल्पनेचा त्यांनी कठोर शब्दात विरोध केला तसेच ही पद्धत अमानवी आहे आणि हा एक मोठा गुन्हा आहे असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमिवर संघ बदलतो आहे का?, समाज बदलतो आहे का? असे प्रश्न वारंवार उपस्थित होत आहेत. या संदर्भात लगेच बौद्धिक विरोधकांनी आपली मतं व्यक्त केली. कांग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी लगेच संघावर टीका करत “ नवरात्रीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असे आयोजन करताना बघितले नाही” अशी प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्रमोदी सलग तीसऱ्या वर्षी भाजपच्या इफ्तार पार्टीत गेले नाही या मुळे त्यांच्या कट्टरतेविषयी माध्यमांमध्ये चर्चा होत आहे.

मुस्लिम समाजातील महिलांचे स्थान आणि त्यांना मिळालेले अधिकार सुरुवाती पासूनच विवादास्पद राहिले आहेत. त्यातुन तिहेरी तलाक या घटस्फोट पद्धतीविषयी याचिका दाखल झाल्या नंतर या वादांना उधाणच आले आहे. या बद्दल अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे कि, ५२ मुस्लिम देशांपैकी साउदी अरेबिया, कुवैत आणि भारतातच केवळ तिहेरी तलाक ही घटस्फोटाची पद्धत उपयोगात आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेश मध्ये देखील जर ही पद्धत प्रचलित नसेल तर आपण या पद्धतीचा वापर का करावा? हा प्रश्न वाचल्यावर आम्हाला उगाच काही वर्षांआधी जामा मशीदीतील इमामांनी शबाना आझमी यांना दिलेला सल्ला आठवला.

 

 

Of 52 Muslim countries only Saudi Arabia,Kuwait n India practise triple talaq in one go Even Pakistan n Bangladesh dont allow it why shud we

खरेतर तथाकथित दोन्ही बाजूंच्या कट्टरपंथीय लोकांनी अमन के लिये आशेचा किरण निर्माण करणाऱ्या वरील साऱ्या घटना आहेत. परंतु कट्टरतेकडे नेणाऱ्या माध्यमांच्या दुनियेत या सर्व घटना मनात अनेक प्रश्न निर्माण करतात.

सामान्य माणसाच्या मनात मुस्लिम, संघ या विषयी अनेक मतं निर्माण होत असतात त्या संदर्भातील पुढील व्हीडीयो आणखी अनेक प्रश्नांना जन्म देईल. वाल्याचा वाल्मिकी होवूच शकत नाही का ? स्थल काल परत्वे मनुष्याने स्वत:च्या प्रतिक्रिया बदलूच नयेत का? विचारधारेशी बांधिलकी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे का? असे अनेक प्रश्न या घटनांमधून निर्माण झाले आहेत. यातील किती प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील ते काळाला आणि बदलत्या समाजालाच ठरवू देत.

 

 

 

 

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड.