व्हाय व्हाय गर्ल - महाश्वेतादेवी

    28-Jul-2016
Total Views |

 


 

माझी मुलगी जेव्हा चार वर्षांची होती तेव्हा ती कुठल्याही गोष्टीला सतत 'का, पण?' हा प्रश्न विचारत रहायची. कंटाळून गेले होते मी तिच्या ह्या प्रश्नोपनिषदाला. ह्याच दरम्यान मी एका पुस्तकांच्या दुकानात एक लहान मुलांसाठी असलेलं पुस्तक बघितलं. त्या पुस्तकाचं नाव होतं 'व्हाय व्हाय गर्ल' म्हणजे 'का? का? मुलगी'. नुसत्या नावावर भाळून मी ते पुस्तक उघडलं. ते पुस्तक इतकं सुरेख होतं की मी ते तिथेच, त्या पुस्तकांच्या दुकानातच बसल्या बैठकीत वाचून संपवलं आणि विकतही घेतलं. एका सतत प्रश्न विचारणाऱ्या, चौकस आदिवासी मुलीची, मॉयनाची गोष्ट होती ती.


ते पुस्तक मी घरी आल्यानंतर माझ्या मुलांना वाचून दाखवलं. त्यांनाही सतत 'व्हाय व्हाय' असा प्रश्न विचारणारी बडबडी मॉयना खूपच आवडली. ते पुस्तक आम्ही इतक्यांदा वाचलं की त्या पुस्तकातले उतारेच्या उतारे त्यांना पाठ झाले होते. त्या पुस्तकाच्या लेखिका होत्या ज्ञानपीठ पारितोषिकाच्या मानकरी महाश्वेतादेवी. त्या आधी मी महाश्वेतादेवींचं नाव वाचलं होतं ते रुदाली, हजार चौरासीर माँ ह्या चित्रपटांच्या मूळ कथांच्या लेखिका म्हणून आणि अरण्येर अधिकार ह्या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाच्या संदर्भात. अरण्येर अधिकार सारखं जळजळीत साहित्य निर्माण करणाऱ्या महाश्वेतादेवींनींच बोलक्या मॉयनाची गोष्ट लिहिली आहे हे त्यांचं नाव वाचूनही मला पटेना.


महाश्वेता देवी होत्याच तश्या. त्यांची ओळख नेहमी 'रायटर, एक्टीव्हिस्ट' अश्या जोडनावांनीच केली जायची. त्या लेखिका होत्याच पण त्याआधी त्या सामाजिक चळवळीतल्या बिनीच्या कार्यकर्त्या होत्या. दलितांच्या, महिलांच्या आणि आदिवासींच्या हक्कांसाठी त्या आयुष्यभर लढल्या. विशेषतः पश्चिम बंगाल मधल्या शबर ह्या आदिवासी जमातीसाठी त्यांनी खूप काम केलं. व्हाय व्हाय गर्ल मधली मॉयना ही शबरच होती. त्यांच्या पुस्तकातले नायक-नायिका बहुधा समाजाच्या तळागाळातून आलेलेच असत. त्याबद्दल महाश्वेतादेवींनी एकदा म्हटलंही होतं, 'खरा इतिहास साधी माणसंच घडवतात. माझ्या साहित्याचे नायक-नायिका आणि स्फूर्तिदाते माझ्या भोवतालचे हेच लोक आहेत जे वर्षानुवर्षे अन्याय सोसूनही ठाम उभे आहेत, जीवनाच्या संघर्षात त्यांनी अजून हार मानलेली नाहीये.'


लिखाणाचं आणि चळवळीचं बाळकडू महाश्वेतादेवींना बालपणीच मिळालेलं होतं. त्यांचे वडील मनीष घटक आणि आई धरित्रीदेवी दोघेही लेखन करायचे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक हे महाश्वेतादेवींचे काका. घटक कुटुंब मूळचा मुळचं ढाक्याचं, पण भारताच्या फाळणीनंतर ते कलकत्त्यात आले. महाश्वेतादेवींचं शिक्षण गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन मध्ये पूर्ण झालं. इप्टा ह्या डाव्या विचारांच्या नाट्यचळवळीशी महाश्वेतादेवींचा जवळून संबंध आला. इप्टाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, नाटककार बिजोन भट्टाचार्य ह्यांच्याशी त्यांनी पुढे विवाहही केला. महाश्वेतादेवींचा मुलगा नबारुण भट्टाचार्य हा देखील एक प्रसिद्ध बंगाली लेखक आहे.


महाश्वेतादेवींची वैचारिक बांधिलकी आयुष्यभर कम्युनिस्ट विचारांशी राहिली पण त्यांचं साहित्य मात्र अस्सल भारतीय मातीत रुजलेलं होतं. त्यांच्या पुस्तकातली माणसं सच्ची आहेत, त्यांचे संघर्ष खरे आहेत, म्हणूनच त्यांचे राजकीय विचार न पटणाऱ्या वाचकांना देखील त्यांचं साहित्य कायम प्रेरणादायक वाटत राहिलं. वयाच्या ऐशीव्या दशकात देखील महाश्वेतादेवी सतत कार्यरत होत्या. रॅमन मॅगसेसे सन्मानापासून ते पदमविभूषण पर्यंत अनेक सन्मान त्यांना लाभले. त्यांच्या गोष्टीतल्या मॉयनाप्रमाणेच त्याही प्रस्थापित व्यवस्थेला कायम प्रश्न विचारत राहिल्या. २८ जुलै रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी महाश्वेतादेवींचं म्हातारपणामुळे निधन झालं. एका व्हाय व्हाय गर्लचे प्रश्न कायमचे शांत झाले.